जे पावन, ते जगती ठरती पतित
परि पतित, पूतसे गणित
यत्स्पर्शाने श्रीशिव होइल पूत
अस्पृश्य ते जगी ठरत
जे आलस्ये दंभे दर्पे भरले
ते स्पृश्य पूज्य परि झाले
दुनियेचा उलटा गाडा
जे सत्य म्हणति ते गाडा
जे थोर म्हणति ते पाडा
हे दंभाला पूजिति धर्मच म्हणुन
मयसभा राहिली भरुन।।
मज दीप गमे आहे तेथे भव्य
दावील पंथ मज दिव्य
त्या दीपाचा पंथ सरळ लक्षून
चाललो धीट होऊन
मज दीप अता दिसेल सुंदर छान
पडतील पदे ना चुकुन
परि तिथे भयद अंधार
ना अंत नसे तो पार
ना पंथ नसे आधार
या अंधारा भजति दीप मानून
मयसभा राहिली भरुन।।
मृदू शीतलसे सुंदर दिसले हार
सर्प ते प्राण घेणार
किति सुंदरशी सुखसरिता ती दिसत
परि आत भोवरे भ्रमत
जे अमृत मला जीवनदायी दिसले
ते गरल मृतिप्रद ठरले
मृगजळे सकळ संसारी
होतसे निराशा भारी
ही किमर्थ धडपड सारी
ते कांचन ना कांत दिसे जे वरुन
मयसभा राहिली भरुन।।
जे जगताला जीवन अंबुद देती
त्यामाजी विजा लखलखती
या जगति जणू जीवनगर्भी मरण
परि देइ जीवनामरण
ज्या मखमाली त्यातच कंटक रुतती
परी कंटक कोमल फुलती
हे कसे सकल निवडावे
परमहंस केवी व्हावे
जलरहित पय कसे प्यावे
हे कोण मला देइल समजावून
मयसभा राहिली भरुन।।
-नाशिक तुरुंग, फेब्रुवारी १९३३