आतापर्यंत रात्रीचे दोन वाजले होते. मी चंद्रकांतची रोचक आणि थरारक कथा वाचण्यात मी इतका मग्न झालो होतो की मला वेळेचे भानच नव्हते. वाचन मध्येच सोडायचे नव्हते. थोडा गरमागरम चहा प्यायल्यानंतर मी पुढे वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते
" दरवाजा ठोठावल्याचा आवाज ऐकून माझे डोळे उघडले. थोडा वेळ मला समजलेच नाही की मी कोण आहे? आणि मी कुठे आहे?
मग मी दार ठोठावल्याचा आवाज तसेच सारिकाचा गोड आवाज ऐकला,
“दरवाजा उघडा. मी सारिका! मी आल्ये उघडा!”
सारिका माझ्या आदेशानुसार सकाळी आली... हो सारिकाच, माझी सारिका आली होती.
“'थांब हं , मी उघडतो” - मी म्हणायचा प्रयत्न केला पण हे शब्द माझ्या घशात खवखव करत राहिले आणि फक्त माझ्या तोंडातून एक विचित्र आवाज निघाला. त्याच्याकडे लक्ष न देता मी दरवाजा उघडण्यासाठी धाव घेतली. माझी सारिका आली आहे. तिला बाहेर ताटकळत ठेवणे चांगले नाही.
सारिका ओठांवर हसू घेऊन समोर उभी होती. पण तीने माझ्याकडे बघताच तिचे स्मित अचानक नाहीसे झाले. तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले. दहशतीमुळे आ वासून तोंड उघडले, नाकपुड्या रुंद झाल्या आणि डोळे मोठे दिसू लागले. तिने आणखी एकदा ओरडण्याचा प्रयत्न केला. पण ओरडू शकली नाही. भीतीमुळे तिचा आवाज घशातच अडकून राहिला. जणू कोणी तिचा गळा दाबला होता. दुसऱ्याच क्षणी ती वादळामध्ये उखडलेल्या केळीच्या झाडासारखी जमिनीवर पडली आणि गतप्राण झाली.
सारिका ने काय भयानक दृश्य पाहिले होते, मला समजले नाही, ज्यामुळे तिची ही अवस्था झाली. अस्पष्ट आवाजात मी “सारिका, सारिका म्हणत हात पुढे केले. मग मी माझे भयानक हात पाहून भीतीने ओरडलो.
इतक्यात सारिकाचे वडील समोर दिसले ते बहुतेक सारिकाच्या मागे आले होते आणि एका उपवर कन्येच्या पित्याच्या नात्याने ते योग्यच होते.त्यांनी डोळे विस्फारून सारिका आणि माझ्याकडे पहिले. मग भीतीने आणि दहशतीने मोठ्याने ओरडून पळायला सुरुवात केली.
मी सुद्धा घराच्या आत पळालो आणि मोठ्या आकाराच्या आरशासमोर उभा राहिलो. आरशात माझे प्रतिबिंब पाहून, माझ्या हृदयात निर्माण झालेल्या भीती, दहशत आणि दुःखाच्या असह्य वादळाचे वर्णन करणे मला अशक्य आहे.
त्या आरशात मला एक सांगाडा दिसला, एक भयंकर हाडांचा सांगाडा. मी माझ्या व्यक्तिमत्त्वाशी नक्कीच परिचित होतो, पण ज्या शरीराला लोक चंद्रकांत जोशी म्हणून ओळखत होते ते त्याचे प्रत्यक्ष प्रतिबिंब नव्हते. सर्व देह, त्वचा, रक्त, मज्जातंतू वगैरे त्या शरीरातून नाहीसे झाले होते. फक्त सांगाडा उरला होता.
मी सर्व काही पाहू आणि ऐकू शकत होतो, पण मला डोळे किंवा कान नव्हते. डोळ्यांच्या जागी दोन भयंकर खड्डे दिसत होते. माझ्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसू शकत नव्हते. माझ्या चेहऱ्याच्या जागी काय होते, फक्त हाडं आणि कवटी. माझ्या शरीराच्या नावाने हाडांचे फक्त हात आणि पाय उरले होते.
मी आता कधीही मरू शकत नाही. माझ्या इच्छेशिवाय मी कधीही मरणार नाही. मला इच्छामरणाची शक्ती मिळाली होती.
माझ्या कथेचा वाचक कदाचित विचार करेल की हे सर्व असत्य आहे आणि माझ्या विकृत मनाने निर्माण केलेली काल्पनिक कथा आहे.
पण मी विचारतो की जर असे असेल तर सारिकाचा मृत्यू का झाला? आणि तिचे वडील कसे वेडे झाले आणि शेवटी मरण पावले?
इंद्रियांशिवाय संपूर्ण भूतकाळाचे अस्तित्व मी कसे अनुभवू शकतो याचे रहस्य मला स्वतःला उमजले नाही. मी डोळ्यांशिवाय सर्वकाही कसे पाहू शकतो याचे उत्तर देणे मला अशक्य आहे. सर्व मानवी ज्ञान-विज्ञान देखील या प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ आहे. सांगाड्यात रुपांतरीत झाल्यानंतरही, मी संपूर्ण संवेदनात्मक सृष्टीचा अनुभव घेऊ शकतो, यात काही शंका नाही.”
त्यानंतर मोडीलिपीतील हस्तलिखिताचे लेखन बरेच संदिग्ध होते. मला वाचता येत नव्हते.