सूर्य, चंद्र, समुद्र, वारा व पिंपळ असे पांचजण भाऊ होते. त्यांची आई फार फार वृद्ध झाली होती. मोठ्या कष्टाने ती दिवस लोटीत होती.
इतक्यांत एके दिवशी त्यांना एका ब्राम्हणा कडून जेवायचे आमंत्रण आले, तेव्हां त्या दिवशी म्हातारीने सगळ्यांना ब्राम्हणाकडे जेवायला पाठविले.
त्या दिवशी जेवणाला पुरणपोळ्यांचा बेत होता.
जेवतां जेवतां चंद्राच्या मनांत आले आएण सारे मिष्ठान्नावर ताव देतो आहों पण आपली म्हातारी आई उपाशीच ना?
तेव्हां त्याने काही पुरणपोळ्या आईसाठी घरी न्यावयाचे ठरविले. पण नेणार कशा ! काही उपाय सुचेना.
तेव्हां त्याने सुरीने आपली मांडी कापली आणि त्यांत चार पुरणाच्या पोळ्या ठेवून मांडी पूर्ववत करून सर्वांबरोबर घरी आला.
घरी आल्यावर वृद्ध आईनें प्रत्येकाला विचारले की कायरे तुम्ही जेऊन आलेत पण मला काय आणलेत ! सगळे म्हणाले कांही नाही.
तेव्हां चंद्र म्हणतो, “वा ग आई ? असे कसे होईल ? ह्या बघ मी तुझ्यासाठीं चार पुरणाच्या पोळ्या आणल्या आहेत.”
असे म्हणून त्याने आपली मांडी उघडली व पोळ्या आईला दिल्या. तेव्हां आईला फार आनंद झाला.
तिने चंद्राला वर दिला की तूं अगदी शीतळ असशील व तुझ्याकडे पाहून सगळ्यांना आनंद होईल.
पण बाकी चौघांचा मात्र तिला फार राग आला व तिने चौघांस शाप दिले. सूर्याला शाप दिला की तूं तळतळत असशील.
कोणी डोळे उघडून तुझ्याकडे पाहाणार नाही.
समुद्राला शाप दिला की तूं खळखळत असशील अन खारट होशील.
वाऱ्याला व पिंपळाला शाप दिला की तुम्ही नुसते सळसळत राहाल.