(ही कथा काल्पनिक आहे .वास्तवाशी कथा किंवा पात्रे यांचे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
आज मधुकर लवकर घरी आला होता .सदाशिव व मधुकर एकाच ऑफिसमध्ये होते.दोघे नेहमी बरोबरच घरी येत .सदाशिवला काम असल्यामुळे तो आज उशिरा येणार होता .ब्लॉक मधुकरच्या नावावर होता.सदाशिव पेइंगगेस्ट म्हणून त्याच्याबरोबर राहात असे.मधुकर ज्या ऑफिसमध्ये कामाला होता त्याच ऑफिसमध्ये मधुकरनंतर वर्षभराने सदाशिवची नेमणूक झाली.मधुकरचा स्वभाव दुसऱ्यांना नेहमी मदत करण्याचा होता.सहज बोलता बोलता सदशिव हॉटेलमध्ये राहतो. तो एकटाच आहे.त्याला जागेची गरज आहे. हॉटेल फारच महाग पडते.हे मधुकरच्या लक्षात आले.सदाशिवचा स्वभाव आपल्याशी जुळता मिळता आहे असेही त्याला वाटले.त्याने त्याला आपल्या घरी पेइंगगेस्ट म्हणून तू राहायला ये असे सांगितले.
त्यावेळीच त्याने त्याला मी तुझी तात्पुरती सोय करीत आहे .मी सांगेन तेव्हा तुला एक दोन महिन्यात जागा सोडून जावे लागेल याचीही कल्पना दिली होती.गेल्या सहा महिन्यात दोघांची मैत्री अगदी घट्ट झाली होती.मधुकरला आता तू आपली सोय बघ असे सदाशिवला सांगणे जिवावर आले होते.परंतू त्याचा नाईलाज होता .
गेले वर्षभर त्याच्या लग्नाची बोलणी चालली होती.त्यामुळेच त्याने सदाशिवला मी सांगेन तेव्हा जागा सोडावी लागेल असे सांगितले होते.आता त्याचे लग्न ठरले होते .सदाशिवला आल्यावर त्याने त्याप्रमाणे सांगितले.सदाशिवलाही त्याचे काही विशेष वाटले नाही .त्याला त्याची पूर्वकल्पना होतीच .मधुकरचे लग्न ठरत आहे आणि आज ना उद्या आपल्याला जागा सोडावी लागणार हे त्याला माहित होतेच .सदाशिवने मनापासून मधुकरचे अभिनंदन केले.त्याचे वैवाहिक आयुष्य आनंदाचे व सुखाचे जावो असेही म्हटले.
त्यावेळी भविष्याच्या पोटात काय दडले आहे त्याची दोघांनाही कल्पना नव्हती .
सदाशिव अगोदरपासूनच जागा पाहत होता .मधुकरचे लग्न झाले की आपल्याला येथून जावे लागेल हे त्याला माहित होतेच.यथावकाश त्याला जागा मिळाली. तो दुसरीकडे राहायला गेला.मधुकरचे लग्न झाले त्याचा संसार व्यवस्थित सुरू झाला.
लग्न झाले तरी मधुकर व सदाशिव यांची मैत्री अभेद्य होती. ती तशीच चालू राहिली.मधुकरच्या लग्नात सदाशिवने महत्त्वाचा भाग उचलला होता .काही जणांना तर सदाशिव मधुकरचा भाऊ आहे असे वाटले .लग्नानंतर सदाशिव मधुकरकडे अनेकदा येत असे.
आज काय पुरणपोळी केली.मधुकरचा सदाशिवला लगेच फोन जाई.आज माझ्याकडे जेवायला ये .
पाऊस पडला भजी केली सदाशिवला लगेच ये म्हणून फोन जाई.
सणासुदीला तर सदाशिव मधुकरकडेच जेवायला असे.
सुरुवाती सुरुवातीला मालिनीला मधुकरच्या पत्नीला सदाशिवचे येणे पसंत पडत नसे.नवीन नवीन लग्न झालेले आहे दोघांत तिसरा कशाला असे तिला वाटत असे.
सदाशिवचा मनमोकळा प्रेमळ स्वभाव जसा तिच्या लक्षात येऊ लागला तसा सुरुवातीला असलेला तिचा विरोध मावळू लागला.तिघांचे त्रिकुट छान जमले होते .तिघेही रस्त्याने जात असताना केव्हा केव्हा त्यांच्यात इतका हास्यविनोद चाले की कोण कुणाची पत्नी असा त्रयस्थाला संभ्रम पडे.हळूहळू सदाशिव दोन दिवस आला नाही तर मालिनीला चैन पडत नसे असे होऊ लागले.ती काही ना काही कारण काढून त्याला स्वतःच बोलावीत असे .तर केव्हा केव्हा मधुकरकडून त्याला आमंत्रण देत असे.परस्पर मालिनीने सदाशिवला बोलाविले तरी त्याच्यात मधुकरला काहीच गैर वाटत नसे. त्याचा पत्नीवर पूर्ण विश्वास होता .उगीचच्या उगीच संशय घेण्याची त्याची वृती नव्हती.
मधून मधून मालिनी सदाशिवला भावोजी तुम्ही लग्न केव्हा करणार म्हणून चिडवत असे.पाहू या करू लवकरच म्हणून सदाशिव तो विषय शिताफीने टाळत असे.हळूहळू सदाशिवच्या नजरेमध्ये फरक पडू लागला होता .अशा गोष्टी स्त्रियांच्या चटकन लक्षात येतात .तिला सदाशिव,मधुकर असेल तेव्हाच घरी यावा असे वाटू लागले होते. सुरुवाती सुरुवातीला ती त्याला टाळू लागली होती .हल्ली हल्ली सदाशिव मधुकर घरी नाही असे पाहून येत असे.
सदाशिवचे विनोद ,लहान लहान चुटके सांगण्याची पद्धती, त्याची बोलण्याची पद्धती ,कुणीही मनासारखा विनोद केला की खळखळून हसणे,तिला हळूहळू आवडू लागले होते .हसता हसता दुसऱ्यांच्या हातावर टाळी देण्याची सदाशिवची पद्धत होती.मधुकरचे नवीन लग्न झाले होते त्यावेळीसुद्धा तो मालिनीला टाळी देण्यासाठी हात पुढे करीत असे .मालिनी कधीही टाळी देत नसे.हळूहळू ती टाळी देऊ लागली .टाळी देण्यासाठी हात पुढे करू लागली .सुरुवातीला दोघांचेही स्पर्श निष्पाप असत.हळूहळू त्यात फरक पडू लागला.चहाची कपबशी देताना खाण्याची डिश एकमेकांना देताना पूर्वी सहज स्पर्श होत असे.सुरुवातीला हात चोरला जाई. मागे ओढला जाई.हळू हळू दोघेही एकमेकांना मोकळा स्पर्श करू लागले . नंतर नंतर तर स्पर्श करण्यासाठी संधी शोधू लागले .टाळी एका हाताने वाजत नाही .दोघेही हळूहळू वाहू लागले होते .
कमी जास्त प्रमाणात दोघेही एकमेकांना~ त्या दृष्टीने~ आवडू लागली होती.
एकेकाळी सदाशिव मधुकरकडे आल्यावर जर मधुकर घरी नसेल तर तो मी पुन्हा केव्हा तरी येईन असे म्हणून परत जात असे .त्या ठिकाणी तो आता मधुकर घरात नाही असे पाहूनच येऊ लागला .
हे सर्व बदल इतके सावकाश होत होते की त्या बदलांची दोघांना सुरुवातीला जाणीवही झाली नव्हती. जेव्हा जाणीव झाली तेव्हा त्यांना त्यात गोडी वाटू लागली होती .काय हरकत आहे असा दोघांचाही दृष्टिकोन होता .
टेबलाभोवती तिघेही रमी खेळत असतील तर पायाने एकमेकांना स्पर्श करणे ही तर नेहमीचीच गोष्ट झाली.
दोघांचेही मोबाइलवरील बोलणे हळूहळू वाढू लागले होते .मधुकर शांत झोपलेला असताना मालिनी व सदाशिव मात्र चॅटिंग करीत असत .
हळूहळू दोघांना आपलेच लग्न झाले असते तर बरे झाले असते असे वाटू लागले.
या सर्व बदलांची मधुकरला काही कल्पनाच नव्हती .त्याला अंधारात ठेवून शिताफीने हे सर्व चालले होते .दोघेही एकमेकांना स्पर्श करण्याची कुठलीही संधी सोडत नसत .
मधुकर घरात नसताना सदाशिवने येणे व दरवाजा बंद करून कितीतरी वेळ तिथे राहणे ही नेहमीची गोष्ट झाली .
संध्याकाळी मधुकर नेमाने जिममध्ये जात असे .त्याचवेळी सदाशिव मधुकरकडे टपकत असे.ब्लॉक सिस्टिममध्ये बऱ्याचवेळा ब्लॉकचे दरवाजे बंद असतात.कोण कुणाकडे येतो.किती वेळ राहतो.केव्हा परत जातो.याची कुणी विशेष चौकशीही करीत नाही.ही गोष्ट दोघांच्याही पथ्यावर पडली होती .
*असे असूनही हळूहळू सदाशिवचे मधुकरकडे येणे लोकांच्या डोळ्यांवर येऊ लागले.*
*तो आला की खुसपूस होऊ लागली.*
*एक दिवस ही गोष्ट मधुकरच्या लक्षात आली.शेजारी पाजारी आपल्याकडे विचित्र नजरेने पाहतात असे त्याच्या लक्षात आले.
*त्याला कुणीतरी निनावी फोन करून सदाशिव तुझ्याकडे तू नसताना वारंवार येतो .काळजी घे . एवढीच बातमी दिली .*
*ती बातमी ऐकून त्याच्या डोक्यात घणाचे घाव बसत आहेत असे त्याला वाटू लागले.*
(क्रमशः)
२८/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन