चम्याच्या मृत्यूनंतर रम्या आणि कम्या पूर्णपणे धास्तावले होते.ती आपल्याला भेटली नसती तर फार बरे झाले असते असे त्यांना वाटू लागले होते .तिची पहिली भेट व त्यानंतरच्या सर्व घटना त्याना अपरिहार्यपणे आठवत होत्या.

ते चौघेही कॉलेजमध्ये शिकत होते .बी कॉमच्या फायनल वर्षाला ते होते .तसे ते अभ्यासात विशेष हुशार नव्हते .परंतु दर वर्षी ते वरच्या वर्गात सर्व विषय उत्तीर्ण होऊन जात असत .त्यांचा बराचसा वेळ उनाडक्या करण्यात जात असे.सर्वच घरचे बऱ्यापैकी श्रीमंत होते.आई वडील आपल्या कामात दंग असल्यामुळे त्यांचे मुलांकडे विशेष लक्ष नव्हते .मुले काय करतात कुठे जातात याकडे त्यांचे लक्ष नव्हते .गुंडगिरी करण्यात  मुलींची छेड काढण्यात त्यांना त्रास देण्यात त्यांचा वेळ जात असे .बसस्टँडवर मुली उभ्या असल्या तर त्यांच्या समोर जाऊन मोटारसायकलीच्या कसरती करण्यात त्याना गंमत वाटत असे .यामुळे मुलीवर इंप्रेशन पडेल त्या आपल्यावर भाळतील असा त्यांचा गैर समज होता .मुलगी रस्त्यावरून जात असेल तर मागून मोटसायकलवर येउन  धक्का मारून जाणे ,मुलींच्या मागे जाऊन करकचून ब्रेक दाबणे व ती दचकली की खो खो करून हसणे,मुलीला ऐकू जाईल अशा अश्लील जोक्स कॉमेंट्स मारणे.मुलीच्या पुढ्यात केळ्याची साल टाकणे आणि ती नकळत घसरून पडली तर त्यात आनंद मानणे ,असे त्यांचे अनेक आवडते खेळ होते. थोडक्यात त्यांना मुलींना त्रास देण्यात आनंद वाटत असे.

जर एखादी आगाऊ पोरगी पटली तर तिला फिरवण्यात आणि   तिच्याशी वाटेल त्या थरापर्यंत गंमत करण्यात त्यांना आनंद वाटत असे . सर्वच मुली कमी जास्त प्रमाणात अशाच असतात असा त्यांचा एक गोड गैरसमज होता . 

एखादी नवी मुलगी त्यांना आवडली तर तिला त्रास देण्यात पटविण्यात ते सर्व आघाडीवर असत .

*आणि त्या वर्षी अगम्या एफवायबीएला आली.*

ती सौंदर्याच्या व्याख्येत बसण्यासारखी नव्हती .काही मुली सुंदर नसतात परंतु आकर्षक असतात त्यातली ती एक होती .पहिल्या दिवसापासून त्यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली .त्यांच्या नेहमीच्या सर्व ट्रिक्स त्यांनी वापरून पाहिल्या .ती त्यांच्याकडे मुळीच लक्ष देत नव्हती .ती आपल्याकडे मुळीच लक्ष देत नाही अन्नुलेखाने मारते याची  त्यांना जास्त चीड आली.त्या चौघांमध्ये रम्या जास्त नाठाळ होता.एक दिवस त्याने कॉलेजच्या पोर्चमध्ये जाऊन तिचा हात धरला व माझ्या बरोबर फिरायला येतेस का म्हणून विचारले .त्यावर तिने काहीही उत्तर न देता त्याच्यावर जळजळीत नजर रोखून त्याच्या कानफटात मारली .प्राचार्यांकडे जाऊन ती तक्रार करील व आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील असे त्याला वाटत होते. परंतु यातील तिने काहीही केले नाही.  सर्व मुलामुलींमध्ये झालेल्या या फजितीने अपमानाने तो नुसता जळत होता .तिच्यावर केव्हा सूड घेतो, अपमानाचा बदला घेतो, असे त्याला झाले होते. 

पैशांच्या जोरावर त्याने कुठंतरी अॅसिड मिळविले.एक दिवस त्याने त्याच्या तीनही मित्रांसह विशेष रहदारी नसलेल्या रस्त्यावर तिला गाठले .तिला तू आमच्याबरोबर हॉटेलमध्ये येणार का असे सरळ सरळ  विचारले .त्यावर तिने परवा तुला दिलेले उत्तर पुरेसे नाही का म्हणून रागाने विचारले.त्या कमी रहदारीच्या रस्त्यावर त्या चौघांनी तिला सरळ उचलले आणि रम्याच्या फार्म हाऊसवर आणले. त्यावर रम्याने तू आम्हा चौघांची तुझ्या मर्जीने किंवा तुझ्या मर्जीशिवाय  होणारच,असे बजावले .त्यानंतर दोन तीन तास त्या चौघांनी तिच्या जवळ काय केले ते लिहिण्यासारखे नाही .शेवटी त्यांनी तिला उचलून पुन्हा एका सुनसान रस्त्यावर आणले .रम्याने खिशातील अॅसिडची बाटली काढली त्याचे बूच काढले आणि आता  भोग तुझ्या कर्माची फळे असे म्हणून ते अॅसिड तिच्या तोंडावर फेकले .

तिचा जवळजवळ सर्व चेहरा अॅसिडने भाजला.तिची कातडी अॅसिडमुळे विरघळली. ती आत्यंतिक वेदनानी ओरडली आणि रस्त्यावर बेशुद्ध होऊन पडली . तिला तशीच सोडून ती चांडाळ चौकडी मोटारीत बसून निघून गेली .नंतर कुणीतरी तिला हॉस्पिटलमध्ये पोचविले .ती जवळजवळ एक महिना हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झगडत होती .मरणप्राय वेदना सहन करीत होती .शेवटी सर्व उपाय थकले आणि ती मृत्यूला शरण गेली .

त्यानंतर बरोबर एक महिन्याने ती पम्याला भेटली .आणि त्याची मृत्यू बरा अशी अवस्था तिने करून सोडली.सहा महिन्यांनंतर चम्याला फसवून तिने मारले . हृदयविकाराचा झटका येऊन तो मेला .

आता रम्या व कम्या यांची पाळी होती.ती रात्री सूड घेते. रात्री तिच्या शक्ती अमर्याद असतात. ती वाटेल ते रूप घेऊ शकते .हे त्या दोघांनाही माहिती होते .रात्री बाहेर जायचे नाही असा नियम त्यांनी घालून घेतला.ती केव्हाही येईल या भीतीने त्यांची झोप पळाली होती .अन्न त्यांना गोड लागत नव्हते .भीतीच्या, मृत्यूच्या, दबावाखाली ते थकत जात होते . त्यानी मांत्रिकाला बोलवून तिचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला होता .हे प्रकरण आम्ही हाताळू शकत नाही आम्हालाच धोका पोहचेल असे सांगून त्यांनी पळ काढला होता. 

त्याना हे माहीत नव्हते की तिच्या शक्ती दिवसेदिवस वाढत होत्या .ती आता दिवसाही त्यांना काहीही करू शकत होती .दिवसा किंवा रात्री त्यांच्या घरातही ती येऊ शकत होती .

~ आणि मग तो दिवस उजाडला .~

कम्या एकटाच सिनेमाला गेला होता.सिनेमागृहातून बाहेर पडल्यावर त्याचा तो राहिला नाही .त्याचा संपूर्ण ताबा आता अगम्याच्या भुताने घेतला होता.कम्या मोटारसायकलवर बसून घरी येण्याच्या ऐवजी गावाबाहेर दूर एका कड्यावर गेला.तिथे ती त्याच्या शरीरातून बाहेर आली .आता ती भयानक स्वरूपात त्यांच्या पुढ्यात उभी होती .तिचा चेहरा अॅसिडमुळे संपूर्ण भाजला होता .केस झडले होते .कातडी लोंबत होती .डोळे खोबणीतून बाहेर आले होते.दात सुळ्यासारखे बाहेर आले होते.तिने त्याला विचारले मी असा काय गुन्हा केला होता म्हणून तुम्ही मला अशी शिक्षा दिली .तुमच्या अत्याचाराला तुमच्या पापाला तुमच्या क्रौर्याला क्षमा संभवत नाही .मी तुला आता उचलून या कड्यावरून खाली फेकून देणार आहे .तुला वाचवता येत असेल तर स्वतःला वाचव.तिचा तो भयानक अवतार बघून कम्या संपूर्णपणे गर्भगळीत झाला.त्याला पळावेसे वाटत होते परंतु त्याच्या पायातील त्राण संपले होते .तिने त्याला उचलले ती त्याला फेकणार एवढ्यात तिला काय वाटले कोण जाणे तिने त्याला जमिनीवर ठेवले .

तिने त्याला करकचून मिठी मारली .ती मिठी इतकी भयंकर होती की त्यांच्या शरीरातील हाडांचा चुरा झाला.तो प्राणांतिक वेदनांनी तळमळत होता .त्याला तसाच मरणाच्या मुखात सोडून ती गुप्त झाली .असह्य वेदनांनी तळमळत तीन तासांनी त्याने आपला प्राण सोडला .

दुसऱ्या दिवशी त्याचे प्रेत कड्याच्या टोकाला सापडले. तिथेच त्याची मोटारसायकल होती.ही बातमी रम्याला कळली आणि तो संपूर्णपणे हादरला.आता त्याचा नंबर होता .  

तिचा प्रतिशोध आता संपत आला होता .रम्या त्या सगळ्या कारस्थानाचा प्रमुख असल्यामुळे त्याला तिने शेवटचा नंबर दिला होता .चम्या व कम्या निरनिराळ्या प्रकारे मेले होते. पम्या असह्य  यातना भोगत होता. आपला नंबर केव्हा येतो याची तो वाट पाहत होता .या प्रतीक्षेत तो रोज तीळ तीळ मरत होता.  

आठ दहा दिवस तिने काहीही केले नाही . त्याला भरपूर तळमळू दिले.  आठ दिवसानंतर ती एका महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत गेली.तिथून तिने अॅसिडची बाटली मिळवली.तशीच मध्यरात्री ती रम्याच्या शयनगृहात शिरली. त्याला हलवून तिने जागे केले.त्याच्या पुढ्यात अगम्या मूळ स्वरूपात उभी होती .तिने खोलीतील सर्व दिवे लावले .आता माझ्याकडे नीट बघ म्हणून त्याला सांगितले .बघता बघता तिचे रूप भयानक होऊ लागले.चेहऱ्यावरील जळणारी, लोंबणारी, काळी पडलेली ,धूर येणारी कातडी,झडलेले केस,खोबणीतून बाहेर आलेले डोळे ,या सर्वातून येणारा उग्र दर्प ,हे सर्व पाहून व उग्र दर्प असहय़ झाल्यामुळे त्याला आपण आत्ताच बेशुद्ध होऊ की काय असे वाटू लागले .

*आता तिने अॅसिडची बाटली काढली.*

*त्यावरील डेंजर सल्फ्युरिक अॅसिड ही अक्षरे त्याला दाखवली.*

*तू मला ज्या यातना दिल्यास तशाच यातना मी तुला देणार आहे म्हणून सांगितले.*

*आणि ती संपूर्ण बाटली त्याच्या डोक्यावर रिकामी केली *

*त्याला तळमळत भयानक वेदनांनी मरण्यासाठी तसाच सोडून ती अंतर्धान पावली* 

*तिचा प्रतिशोध संपला होता* 

*तिला आता या जगात राहण्याचे काहीच कारण नव्हते *

*ती सुखेनैव पुढच्या गतीला गेली *

(समाप्त )

१/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel