पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा दुसरा पंधरवडा होय.यालाच अर्थात कृष्ण पक्ष म्हणतात.आपण अमावास्येला महिना संपला असे धरतो.व महिन्याचे दोन भाग शुक्लपक्ष व कृष्णपक्ष असे म्हणतो.भारतात कांही ठिकाणी पौर्णिमान्त महिना पाळतात. पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत महिना पाळला जातो.त्याठिकाणी महाराष्ट्रातील मराठी महिना गणनापद्धतीनुसार अश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा पितृपंधरवडा पितृपक्ष म्हणून धरला जातो.
या काळात आपले पूर्वज म्हणजेच पितर भूतलावर येतात असा समज आहे.या कृष्णपक्षात पंधरा दिवस त्यांना रोजच जेवायला घालावे अशी पूर्वी प्रथा होती.कारण ते पंधरा दिवस पितर येथे वास्तव्य करून असतात.पितरांना प्रत्यक्ष जेवायला आपण घालू शकत नाही.(तसे फक्त एकनाथच)म्हणून कुणातरी मध्यस्थांमार्फत त्यांना अन्न पोचविले जाते.हे मध्यस्थ म्हणजे भटजी होय.भटजी उपलब्ध नसल्यास, एखाद्या संस्थेला दान करून किंवा कुणाही गरीब पांथस्थाला जेवायला घालून त्यामार्फत पितरांना अन्न पोचले असे समजले जाते.कांहीच शक्य झाले नाही तर साग्रसंगीत वाढलेले जेवणाचे पान गाईला दिले जाते.घराबाहेर ठेवले जाते.पक्षी कीटक मुंगी इत्यादी ते खातात त्यांच्या मार्फत आपल्या पितरांना ते पोहोचले असे समजले जाते. थोडक्यात कुणाला तरी रोज अन्नदान करून त्यामार्फत पितरांना अन्न दिले जाते. त्यांचे स्मरण केले जाते.
पंधरा दिवस रोज असे करणे शक्य होत नाही.त्यामुळे आपले वडील ज्या दिवशी,ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल त्या तिथीला अन्नदान करून कुणातरी मार्फत ते अन्न पितरांना पोचले असे समजले जाते.केवळ वडिलांना अन्नदान न करता त्यांचे श्राद्ध न करताच सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते.श्रद्धेने केलेले ते श्राद्ध होय.आपल्या गोत्रातील सर्व पूर्वजांचे स्मरण यानिमित्ताने केले जाते.आणि भटजींना अन्नदान केले जाते.ते शक्य नसल्यास मी वर म्हटल्याप्रमाणे एखाद्या संस्थेला किंवा गरिबाला दानधर्म करून पितरांचे स्मरण केले जाते.याला महालय श्राद्ध असेही म्हटले जाते.पंधरा दिवस पितर आपले येथे वास्तव्यास येत असल्यामुळे रोज श्राद्ध करावे असे हिंदू धर्म शास्त्रात सांगितले आहे.न जमल्यास एक दिवस तरी श्राद्ध करावे.त्या तिथीला न जमल्यास अमावास्येला करावे.अशी प्रथा आहे.
मृत्यूनंतर पितर यमलोकात असतात असा एक समज आहे.तेथून ते भूतलावर आपल्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाकडे,म्हणजेच मुलाकडे, हे पंधरा दिवस वास्तव्यास येतात अशी समज आहे.तिसर्या पिढीअगोदरचे पितर मुक्त झाले असे समजले जाते.पिता,पितामह आणि प्रपितामह,अशा तीन पिढय़ा भूतलावर वास्तव्यास येतात.
हा काळ कां कोण जाणे अशुभ समजला जातो.शुभ कार्यें,नवी खरेदी, केली जात नाही.
या सर्व गोष्टी माहीत असूनसुद्धा मी एक गोंधळ घातला त्याची ही गोष्ट .(माझ्या पितरांची भेट झाल्यावर आता असे वाटते की मी गोंधळ घातला नसून योग्य तेच केले होते.)