एक दिवस दोन मुलानी फूस लावून, वेगळ्याच बहाण्याने , एका मुलीला वाड्यात आणले.त्यांचा इरादा ठीक दिसत नव्हता.मुलांचा पवित्रा बघून ती मुलगी घाबरली.तिला लगेच निघून जायचे होते परंतु ती मुले तिला जाऊ देत नव्हती .समंधाला हळूहळू त्या मुलांचा राग येऊ लागला होता.
त्या मुलांकडून काही कमी जास्त होण्याचा इरादा लक्षात येताच समंध चवताळला.त्या मुलांच्या पुढ्यात तो एकाएकी ग्रामीण खेडूताच्या रूपात उभा राहिला .त्याने मुलांना प्रतिबंध केला . मुकाट्याने निघून जाण्यास सांगितले .एक मुलगा चवताळून त्याच्या अंगावर धावून गेला .तो मुलगा बऱ्यापैकी बॉक्सर होता .त्याने एक त्याच्या मतीने जबरदस्त पंच खेडूताच्या तोंडावर मारला.खेडूताने तो पंच चुकविण्याचा काहीही प्रयत्न केला नाही.त्याचा हात त्या खेडूताच्या आरपार गेला .तो तरुण त्या खेडूताच्या अंगाला जाऊन भिडला.त्या खेडूतातून तो तरुण आरपार निघून गेला आणि मागील भिंतीवर जोरात आपटला.त्या तरुणाचा हात खांद्यापासून लचकला.भिंतींवर जोरात आपटल्यामुळे तोंडाला जोरात मार बसला आणि तो कळवळला. दुसऱ्या एकाने शेजारील एक वीट उचलून ती त्या खेडूतावर मारली.तीही आरपार जावून मागील भिंतीवर आपटली. आता मात्र ते वाह्यात तरुण चमकले . हे प्रकरण काहीतरी वेगळे आहे हे त्याच्या लक्षात आले .एकाएकी समंधाने भयानक रूप घेतले. तो चवताळला होता .हल्ला करणाऱ्या तरुणाचा हात पकडून त्याने तो इतका जोरात पिरगाळल कि तो खांद्यापासून निखळला.हात निर्जीव होउन खांद्यापासून लोंबू लागल्यावर प्राणांतिक वेदनांनी तो तरुण गुरासारखा ओरडू लागला . समंधाचे डोळे खदिरंगासारखे लाल झाले.आजूबाजूच्या इमारतीतील दिव्यांचा, रस्त्यांवरील दिव्यांचा,जो अंधूक प्रकाश पडत होता तो कसा कोण जाणे एकाएकी तीव्र झाला .समंधाच्या खोबणीतून डोळे बाहेर येत आहेत की काय असे वाटू लागले.डोक्यावरील मांस वितळू लागले. डोळे खोबणीतून निघून जमिनीवर पडले .सर्वत्र लाल प्रकाश पडला होता .ते दृश्य पाहून त्या दोन तरुणांपैकी एक जण बेशुद्ध झाला. तर ज्याचा हात खांद्यापासून लोंबत होता त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला.आणि तो तिथेच ठार झाला.
त्या तरुणीने डोळे घट्ट मिटून घेतले होते .तिला मुली घाबरू नकोस असा आश्वासक प्रेमळ स्वर कानावर पडला .ती डोळे उघडून पाहते तो ती वाड्यामध्ये नव्हती.गजबजलेल्या रस्त्यावर एका बसस्टँडवर ती उभी होती.आपण पाहिले ते स्वप्न, भास, की सत्य त्याचा तिला उलगडा होत नव्हता.तिला ज्या कुणी वाचविले त्यांचे मनोमन आभार मानत ती घरी परतली .
तो तरुण तिथे मृत होऊन पडला .बेशुद्ध पडलेला तरुण थोड्याच वेळात शुद्धीवर येऊन पळून गेला .भट्टी चालवणाऱ्या पंटरने पोलिसांना निनावी फोन केला .पोलीस तिथे आले .पंचनामा झाला .भट्टी लावणाऱ्यांचे पोलिसांशी कनेक्शन असल्यामुळे त्याचा संबंध येथे कुठेही दाखविला गेला नाही.सर्व काही शांत होईपर्यंत भट्टी काही दिवस बंद ठेवण्यात आली .भट्टीचे सामानही गायब करण्यात आले . पंचनाम्यात तो तरुण वाड्यात कां आला होता त्याचे कारण माहीत नाही. अज्ञात कारणामुळे हात निखळून निघाला. हृदयविकाराने मृत्यू अशी नोंद करण्यात आली.निरनिराळ्या पेपर्सच्या व इतर सामाजिक प्रसार माध्यमांच्या न्यूज रिपोर्टरनी, त्या वाड्याला या कारणाने भेट दिली. तो वाडा प्रसारमाध्यमांमध्ये चांगलाच गाजला. त्याचे अनेक व्हिडिओ अपलोड केले गेले.
पोलिसांवर टीकाही बरीच झाली .वाड्यात चालणार्या गैरप्रकारांचा बंदोबस्त केला पाहिजे. कॉर्पोरेशनने तो वाडा विकत घ्यावा . तो पाडून तिथे मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड करावे. अशीही सूचना करण्यात आली.तो वाडा ताब्यात घ्यायचा तर त्याचा कायदेशीर मालक सापडत नव्हता. असंख्य मालकांना भेटून वाडा विकत घेण्यामध्ये कॉर्पोरेटना रसही नव्हता व वेळही नव्हता.
नेहमीप्रमाणे काही दिवसांनी सर्व काही शांत झाले . प्रसारमाध्यमांना चघळण्यासाठी आणखी काही दुसऱ्या गोष्टी सापडल्या .
समंधाने आतापर्यंत दारूच्या भट्टीकडे दुर्लक्ष केले होते.भट्टीचा मालक भट्टी लावल्यानंतर सुखेनैव घरी निघून जात असे.देखरेखीसाठी एका पंटरची नेमणूक केलेली होती.समंधाला दारु वगेरे अवैध गोष्टी वर्ज्य असाव्यात. एक दिवस तो समंध पंटरच्या पुढ्यात भयानक स्वरूपात उभा राहिला.हात पाय नसलेले नुसते धड तेही हवेत तरंगत असलेले पाहून तो पंटर खिळे मारल्यासारखा जागच्याजागी खिळून उभा राहिला.त्या आकृतीच्या खोबणीतून डोळे बाहेर येऊन त्या पंटरपासून एक वीत अंतरावर स्थिर झाले .एकाएकी त्या धडाला एकच हात फुटला.तो हां हां म्हणता लांब झाला . त्या पंटरची मान पकडून त्याला एखाद्या मांजरीच्या पिलासारखे अलगत त्या हाताने रस्त्यावर नेवून ठेवले .त्या सगळ्या प्रकाराने पंटरने हाय खाल्ली .त्याला सणकून ताप भरला .त्याची दातखिळी बसली .आठ दिवसानंतर त्याने काय झाले ते चाचरत चाचरत मालकाला सांगितले.
हा प्रकार घडला त्याच्या दुसऱ्या दिवशीच मालक स्वतः भट्टीच्या जागी गेला होता.तिथे त्याला त्याची भट्टी संपूर्ण उद्ध्वस्त झालेली आढळून आली होती .तो रोज पुन्हा पुन्हा भट्टी लावण्याचा प्रयत्न करीत होता .आणि कुणाचे तरी अदृश्य हात ती भट्टी उद्ध्वस्त करीत होते.एक दिवस तर कमालच झाली .त्याच्या पुढ्यात एक अजस्त्र आकृती उभी राहिली .त्याने त्याला तू इथे भट्टी लावू नकोस परिणाम चांगला होणार नाही म्हणून सांगितले .धीर करून मालकाने तू मला सांगणारा कोण? म्हणून विचारले.त्यावर काहीही न बोलता त्या समंधाचे संपूर्ण शरीर वितळू लागले आणि तिथे एक मांसाचा ढीग राहिला.
ते भयानक दृश्य पाहून भट्टीचा मालक वाड्यातून पळून गेला. त्यानंतर त्या वाड्यात पुन्हा येण्याची त्याची हिंमत झाली नाही .
फुटकळ वेश्या केव्हा केव्हा पुन्हा तिथे येऊ लागल्या. भयानक स्वरूपात त्यांना दर्शन देऊन समंधाने पळवून लावले.त्यानंतर तेथे पुन्हा येण्याची त्यांना हिम्मत झाली नाही .
आता ना तेथे भिकारी येतात .ना दारूची भट्टी चालते .ना वारयोषिता येतात.ना जुगार चालतो .ना कुणी कुणाला पळवून तेथे आणते .
वाड्यामध्ये काहीतरी अमानवी अद्भुत शक्ती वास करते अशी बातमी सर्वत्र पसरलेली आहे.ती शक्ती वाड्यामध्ये काहीही अनिष्ट प्रकार घडू देत नाही .वाड्याचा तो रक्षणकर्ता आहे. चांगल्याशी चांगला तर वाइटाशी तो फारच वाईट आहे ,ही माहिती सर्वदूर पसरलेली आहे.तेथील समंधाच्या खऱ्या खोट्या अनेक कथा सांगितल्या जातात.
तो समंध त्या वाड्याचा मूळ मालक आहे.मृत्यूनंतर तो येथे येऊन पिंपळावर राहू लागला .तो तिथे सुखेनैव राहात असताना एकाएकी रस्ता रुंदीमध्ये पिंपळ पाडण्यात आला. तेव्हापासून तो आता वाड्याच्या वरच्या मजल्यावर राहतो .अशी एक कथा सांगितली जाते .
*समंध ही एक जबरदस्त अाख्यायिका होऊन बसली आहे.*
*हल्ली अभ्यासासाठी शांत जागा म्हणून तिथे विद्यार्थी येतात .*
*संध्याकाळी काही मुले वाड्याबाहेरील मोकळ्या जागेत खेळण्यासाठीही येतात.*
* त्याना काहीही दिसत नाही.*
*सर्वत्र शांतता असते.*
*मुले अभ्यास करताना, खेळताना पाहून, समंधही आनंदीत होतो.*
*समंध आनंदित झाला कि न ओळखता येणारा एक मोहक आकर्षक सुगंध सर्वत्र पसरतो .*
*वाड्याबद्दलच्या कथा या सर्व अफवा आहेत असे काहींचे मत आहे.*
* एखाद्याला या सर्व अफवा वाटत असतील तर त्याने काही गैर प्रकार करून बघावा.तत्काळ त्याला त्याची शिक्षा होईल *
* त्याचे बारा वाजले नाही तर मी नाव बदलून ठेवीन*
(समाप्त)
८/१२/२०१९©प्रभाकर पटवर्धन