(ही कथा काल्पनिक आहे. वास्तवाशी  कुठलेही  साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

हेमंत व त्याची पत्नी नंदिनी दोघेही गिरिभ्रमणासाठी निघाले होते .हिमालयातील  गिरिपरिभ्रमण असल्यामुळे ते जय्यत तयारीने निघाले होते.त्यांच्याबरोबर चार शेर्पा  सामान उचलण्यासाठी व वाटाड्ये म्हणून घेतले होते.हेमंत व नंदिनी या दोघांनाही ट्रेकिंगचा नाद होता.वेळ मिळेल तेव्हा किंवा वेळ मुद्दाम काढून दोघेही कुठे तरी गिरिभ्रमणासाठी निघत असत.त्यांची ओळखही अशीच एका भ्रमणशिबिरामध्ये झाली होती .त्या ओळखीची परिणिती शेवटी विवाहामध्ये झाली होती .

या वेळचे ट्रेकिंग जरा अवघड होते.कुमाऊँ प्रदेशातील  हिमालयातील दोन नंबरचे शिखर नंदादेवी याची परिक्रमा करावयाची योजना होती . हे परिभ्रमण अत्यंत बिकट आहे असे अनेक ट्रेकर्सनी सांगितले होते .हिमालयातील वातावरण अतिशय अस्थिर असते .सकाळी ऊन दुपारी अभ्रे संध्याकाळी मुसळधार पाऊस असे होत असते .विशिष्ट वातावरणामुळे ढगफुटी व गारा पडणे हे सामान्य आहे.काही वेळेला गारा मोठ्या बचकेएवढ्या आकाराच्याही असतात . त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी विशेष तयारीची गरज असते . नाहीतर कवटी फुटून मृत्यू निश्चित ठरलेला असतो .

तर अशा तयारीनिशी हेमंत नंदादेवी शिखरपरिभ्रमणाला निघाला होता. हे परिभ्रमण अत्यंत पवित्र समजले जाते .आता नंदादेवी शिखर जवळ दिसू लागले होते.एक अतिशय बिकट चढ चढून सर्वजण वर आले.रूपकुंड तलाव दिसू लागला होता .त्रिशूल पर्वताच्या पायथ्याशी हा तलाव आहे .वर्षातील दहा महिने तो बर्फमय असतो .गोठलेला असतो .उन्हाळ्यातील फक्त दोन तीन महिने तो जलरूपात असतो .त्याचे पाणी अतिशय स्वच्छ आहे .दोन तीन मीटर खोल असलेला तळही खडानखडा दिसतो.

जून महिना होता.सर्वत्र स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता.दूरवर बर्फशिखरे चमकत होती.एकाएकी वातावरणात फरक जाणवू लागला .सोसाट्याचा वारा सुटला .एका जागी उभे राहणेही अशक्यप्राय झाले .सर्वांनी जमिनीबरोबर समांतर झोपून घेतले .आकाशात मोठ्या प्रमाणात अभ्रे दाटून आली .भर दुपारीही संध्यासमयीचा प्रकाश पडला.जोरात पर्जन्यवृष्टी होऊ लागली . थोड्याच वेळात मोठ्या आकाराच्या बचकेएवढ्या गारा पडू लागल्या.आपल्या पूर्वजांना मुक्त करण्याऐवजी आपणच इथे त्यांच्या साथीला पडून राहणार असे वाटू लागले . त्याने  ही मोहीम पूर्वजांच्या मुक्तीसाठी काढली होती . एवढय़ा थंडीतही हेमंतला दरदरून घाम फुटला .त्याचे काळीज धाडधाड उडू लागले .हृदय फुटून छातीच्या फासळ्यातून बाहेर येईल की काय असे वाटू लागले.

आणि तो जागा झाला . अनेक दिवस  त्याला थोड्या फार फरकाने मधून मधून हेच स्वप्न पडत होते. गेले तीन दिवस लागोपाठ त्याला हे एकच स्वप्न पडत होते .नंदादेवी शिखर, त्याच्या शेजारचा त्रिशूल पर्वत ,त्याच्या पायथ्याशी असलेले रूपकुंड सरोवर  सर्व त्याला आतासुध्दा मन:चक्षूसमोर स्वच्छ दिसत होते. पूर्वजांच्या मुक्तीसाठी आपण हे गिरीपरिभ्रमण करत आहोत असे त्याला स्वप्नात वाटत असे .  

भारतातील बहुतेक सर्व राज्यांवर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते अरुणाचलपर्यंत पसरलेल्या या देशात निसर्गाचे अनेक अविष्कार पाहण्यास मिळतात. अनेक उत्तुंग पर्वतराजी, शेकडो मैलांचा सागरकिनारा, रखरखीत वाळवंट, सदाहरित जंगले आणि अतिवृष्टीचे प्रदेश अशी निसर्गाची अनेक रूपें इथे अनुभवण्यास मिळतात.

भारतीय उपखंडाचा मुकुटमणी म्हणजे नगाधिराज हिमालय! भारतीय टॅक्टॉनिक प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील प्राचीन काळात झालेल्या घर्षणामुळे हिमालयाची निर्मिती झाली. घडीचा पर्वत म्हणून प्रसिद्ध असलेला हिमालय हा जगभरातील अनेक सर्वोच्च पर्वतशिखरांचं माहेरघर आहे. ७२०० मीटरपेक्षा अधिक उंचीची सुमारे शंभरावर पर्वतशिखरें हिमालयात आहेत. आशिया खंडाबाहेरील सर्वात उंच शिखर हे अँडीज पर्वतातील ६९६१ मीटर उंचीचं आहे!

हिमालयाचा वरदहस्त उत्तर भारतातील काश्मिरपासून ते सिक्कीमपर्यंतच्या अनेक राज्यांना लाभला आहे. अशा राज्यांपैकीच एक म्हणजे उत्तराखंड!

उत्तराखंड राज्याचे मुख्यतः दोन विभाग पडतात. गढवाल आणि कुमाऊँ! हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असलेली बद्रीनाथ-केदारनाथ ही तीर्थक्षेत्रे या प्रदेशात आहेत. गंगा नदीचा उगम असलेलं गोमुख, प्रसिद्ध हिमशिखर नीलकंठ, नैनीताल-अलमोडा आणि मसूरी यांसारखी प्रसिद्ध हिलस्टेशन्स देखील याच राज्यात आहेत. कुमाऊँचा प्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट याने शिकार केलेले अनेक नरभक्षक वाघ आणि चित्ते याच प्रदेशात धुमाकूळ घालत होते! भारतातील पहिलं व्याघ्र अभयारण्य असलेलं कॉर्बेट नॅशनल पार्क हेदेखील याच प्रदेशात आहे.

कुमाऊँच्या पश्चिम भागात हिमालयाच्या तीन पर्वतशिखरांचा एक समुह आहे. एकाशेजारी एक उभ्या असलेल्या या शिखरांकडे पाहिल्यावर शिवशंकराच्या हातातील ज्या शस्त्राचा भास होतो त्याचंच नाव या शिखरांना मिळालेलं आहे....

त्रिशूल!

त्रिशूल पर्वताच्या उत्तर-पूर्वेकडे सुमारे ९ मैलांवर भारतातील दुसर्‍या क्रमांकाचं शिखर आहे...

नंदा देवी!

कुमाऊँतील परंपरागत लोककथांनुसार नंदादेवी ही हिमालयाची कन्या! नंदादेवीचं वसती स्थान म्हणून या पर्वताला तिचं नाव देण्यात आलं आहे. कुमाऊँ प्रदेशातील जनमानसांत नंदादेवीचं स्थान अढळ आहे.

त्रिशूल पर्वताच्या पायथ्याशी, ग्लेशीयरपासून तयार झालेलं एक लहानसं सरोवर आहे...

रूपकुंड!

कुमाऊँच्या चमोली जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सुमारे ५०३० मीटर उंचीवर असलेलं रूपकुंड सरोवर अत्यंत निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे. सरोवराच्या चारही बाजूंना ग्लेशीयर पसरलेलं आहे! अनेक बर्फाच्छादीत पर्वतशिखरं या सरोवरावर लक्षं ठेवून असल्यासारखी आजूबाजूला उभी ठाकलेली आहेत.रूपकुंड जेव्हा गोठलेले नसते त्या वेळी या शिखरांची  सरोवरात पडलेली प्रतिबिंबे अत्यंत मनोहारी दिसतात.जेमतेम दोनतीन मीटर खोलीचे रूपकुंड थंडीच्या काळात पूर्णपणे गोठलेल्या अवस्थेत असते. चारही बाजूंनी उतार असलेल्या एका खोलगट बशीसारख्या भागात हे सरोवर आहे. रूपकुंडपासूनची सर्वात जवळची मानवी वसाहत ही २२ मैलांवर आहे!

अजून हेमंत नंदादेवी शिखरपरिभ्रमणासाठी गेला नव्हता.त्याच्या डोक्यात तो विचारही आला नव्हता.त्याला स्वप्नात जे शिखर दिसत होते ते नंदादेवी असे का वाटत होते तेही त्याला कळत नव्हते.जे सरोवर दिसले त्याचे नाव रूपकुंड आहे असे त्याला कां वाटत होते त्याचा त्याला उलगडा होत नव्हता

(क्रमशः)

३/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel