(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे जिवंत वा मृत व्यक्तींशी यांचा संबंध नाही यातील संस्थाही काल्पनिक आहेत.साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
.कंपनीतर्फे, सरकारतर्फे व वैयक्तिक त्यांच्या मुला मुलींकडून, शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला .
काहीही सापडले नाही .जणूकाही मोटारीसह तिघेही अदृश्य झाले होते .
नवीन प्रोजेक्ट इंजिनिअरची प्रकल्प प्रमुखाची नेमणूक कंपनीतर्फे झाली .दोन्ही बंगले त्या नवीन प्रकल्प प्रमुखाला देण्यात आले.बोगद्याचे काम झपाट्याने चालू होते.कुणी कुणासाठी थांबत नाही .कुणाला थांबताही येत नाही .जगाचे व्यवहार चालूच रहातात.भा रा तांबे यांनी म्हटल्याप्रमाणे "जन पळभर म्हणतील हाय हाय तू जाता राहील कार्य काय"हेच खरे . थोड्याच दिवसात सर्वजण झालेली घटना विसरले .
एक दिवस त्या घाटमाथ्यावरील बंगल्याच्या मालकाचा मित्र त्या रस्त्याने त्याच्या काही कामासाठी जात होता .त्याला बंगल्यात दिवे लागलेले दिसले .कदाचित शहा पतीपत्नी,त्या बंगल्याचे मालक वुइकएंडसाठी आले असतील असे त्याला वाटले.त्याने शहांना भेटून जाण्याचे ठरविले .गाडी बंगल्याच्या दिशेने वळविली .फाटक बंद होते .तेथील केअरटेकरला बोलावण्यासाठी त्या मित्राने हॉर्न वाजविला .हॉर्नचा आवाज आल्याबरोबर बंगल्यातील दिवे मालवले गेले.एवढ्यात केअरटेकरही धावत आला .त्यांनी मालकांच्या मित्राला ओळखले. कडक सलाम केला.फाटक उघडले.प्रथम मित्राला वाटले की मालक नाहीत असे पाहून दामू बंगल्याचा वापर करीत असावा .आपल्याला आलेले पाहून त्याने घाईघाईने दिवे मालवले असावेत .परंतु यातील काहीच प्रकार नव्हता.बंगला संपूर्ण बंद होता .बंगल्याला कुलूप तसेच होते .सर्व दरवाजे बंद होते .दामू आऊटहाउसमध्ये होता .त्यांने साहेब किल्ली आणून बंगला उघडू का? म्हणून विचारले.
मित्र आपल्याला जे दिसले ते सत्य की आभास या संभ्रमात पडला.त्याने मालक एवढ्या आले होते का म्हणून विचारले.त्यावर दोन तीन महिन्यांत ते आलेले नाहीत असे उत्तर दामूने दिले.मित्रांबरोबर त्याचे आणखी दोन तीन सहकारी होते .सर्वांना बंगल्यात लाईट लागलेले दिसले होते .एकाला भास होईल परंतु तोच भास सर्वांना कसा होईल हे गूढ कुणीच उलगडू शकले नाही .मित्राने झालेली घटना शहांना लगेच फोन करून कळविली.
सुरुवातीला कुणीच ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही .परंतु दामूसकट अनेक जणांना त्या बंगल्यात दिवे लागलेले वेळोवेळी जाता येता आढळून येऊ लागले .त्या बंगल्यात जणूकाही कुणीतरी रहात आहे असे सर्वांना वाटू लागले. माणसांच्या सावल्या काचेवर रात्री हलताना दिसत. त्या बंगल्याचा जणूकाही कुणीतरी ताबा घेतला होता .दामूने घाबरून आपली केअरटेकरची नोकरी सोडून दिली.बंगला हाँटेड आहे कुणातरी अदृश्य शक्तीच्या ताब्यात आहे असा सर्वांचे मत पडले.
त्यानंतर आणखी एक घटना त्या रस्त्यावर घडू लागली.ढगे यांची मोटार सर्वांच्याच ओळखीची होती .गाडीचा नंबरही सर्वांना पाठ होता .घाटरस्त्यावरून ती मोटार प्रवास करताना वेळोवेळी बऱ्याच जणांना आढळून येऊ लागली .एकदा तर एकाने ती मोटार अडविण्याचा प्रयत्न केला .त्यावेळी ती अकस्मात अदृश्य झाली .
एके दिवशी घाटामाथ्याजवळून जिथे तो अपघात घडला असा अंदाज होता त्या जागेवरून एकाचा पोलिसांना फोन आला .घाटाच्या दोन्ही बाजूला पोलीस चौक्या होत्या .फोन आल्याबरोबर रेस्क्यू वाहनासह सर्वजण तिथे पोचत असत .त्याने एक मोटार दरीमध्ये पडताना पाहिली .त्यामुळे त्याने फोन केला होता.त्याच्या पुढे ती मोटार वळणे घेत घेत घाट चढत होती.हा पाठोपाठ होता .अकस्मात ती मोटार डाव्या बाजूला कड्यावरून दरीत कोसळली होती .म्हणून त्याने फोन केला होता.कसून तपास करण्यात आला परंतु काहीही तपास लागला नाही. आभास म्हणून ती घटना सोडून देण्यात आली.परंतु असे दरीत मोटार पडल्याचे फोन रेस्क्यू टीमला मधूनमधून येऊ लागले .जावे तरी पंचाईत न जावे तरी पंचाईत.अपघात असेल तर गेले पाहिजे.आभास असेल तर उगीचच खटाटोप .अशा द्विधा अवस्थेत रेस्क्यू टीम असे.
नवीन प्रकल्प प्रमुखांची पत्नी व मुले गावाला गेली होती.त्याने बंगल्यातील सर्व दिवे बंद केलेले होते .तरीही रात्री जेव्हां तो आला तेव्हा त्याने बंगला रोषणाईने उजळून गेलेला पाहिला.प्रथम त्याला आपली पत्नी व मुले गावाहून परत आली असावी असे वाटले.प्रत्यक्षात तसे काहीही नव्हते .रात्री त्याला बाथरूममधून नळ सोडल्याचा आवाज,दरवाजांची उघडझाप झाल्याचे आवाज ,कुणीतरी एखादे गाणे गुणगुणत आहे असे आभास झाले.रात्रभर त्याला झोप लागली नाही .ताबडतोब त्याने आपला बाडबिस्तारा कंपनीच्या गेस्टहाऊसमध्ये हलविला.
थोडक्यात घाटमाथ्यावरील बंगल्यात कुणीतरी रहात आहे असे आभास,दरीत विशिष्ट मेकची,विशिष्ट रंगांची,विशिष्ट नेमप्लेट असलेली मोटार कोसळत असल्याचे आभास,कंपनीने दोन्ही बाजूला घेतलेल्या बंगल्यात कुणीतरी रहात आहे असे अाभास,अशी दृश्ये ,अनेक जणांना अधूनमधून दिसू लागली.या सर्व घटना रात्री होत असत .
या घटनांचा उलगडा करण्यासाठी मांत्रिक आणले गेले .विशिष्ट प्रकारच्या हवेत रात्रीच्या प्रकाशात असे आभास होणे शक्य आहे का?तेही तज्ज्ञांकडून पडताळण्यात आले .एकाच प्रकारची दृश्ये एकाच वेळेला अनेक जणाना कशी काय दिसू शकतील यावरही चर्चा झाली .कुणीही काहीही उलगडा करू शकले नाही .
ढगे पतिपत्नी ड्रायव्हर व ती मोटार या सर्व घटनांच्या मागे आहे अशी सर्वांची दृढ भावना होती .त्यांनी कधीही कुणालाही कसलाही त्रास दिला नाही .अफवा किती व वास्तव परिस्थिती किती याबद्दल सर्वांच्या मनात संभ्रम आहे .
बोगदा पूर्ण झाला . बोगद्यातून सर्व वाहतूक व्यवस्थित सुरू झाली.डोंगराला वळसा मारून जाणारा पर्यायी रस्ताही चांगला केला गेला .घाटातील रस्त्याकडे थोडे दुर्लक्ष झाले .तो रस्ता घाटातील जवळच्या गावांसाठी अपरिहार्य होता .त्यावरून कमी प्रमाणात गाड्या येत जात असतातच .कधी कधी वर उल्लेख केलेले भास होतातच.घाटमाथ्यावरील बंगल्याचा मालक बंगला हाँटेड म्हणून तिथे कधीही आला नाही.कंपनीने दोन्ही बाजूला तात्पुरते भाड्याने घेतलेले बंगले आता मालकांना परत केले आहेत.
* ते तीनही बंगले विकणे आहे .परंतु त्याला कुणीही ग्राहक येत नाही .त्या बंगल्यांची आता रया गेली आहे .ते बंगले खरेच आता भूत बंगले दिसू लागले आहेत .*
*अजूनही कधी कधी मोटार दरीत पडल्याचे, तीनही बंगल्यातून कुणीतरी वावरत असल्याचे आभास होत असतात*
*जगातील अनेक न उलगडलेल्या गूढांमध्ये रहस्यांमध्ये या एका रहस्याची भर पडली आहे *
(समाप्त)
४/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन