कुसुम घरी आली तेव्हा तिचा चेहरा उतरलेला होता .तिची मन:स्थिती उद्विग्न होती.ती रडवेली झाली होती .तसेच तिला मोठा शॉक बसला होता .वरुणचे लग्न झालेले असेल ,तो घटस्फोटित असेल ,याची तिला सुतराम कल्पना आली नव्हती .आज अकस्मात तिला तो घटस्फोटित आहे असे कळले .ज्याच्यावर  दीर्घकाळ प्रेम केले, ज्याला आपण जवळजवळ सर्वस्व दिले, तो घटस्फोटीत आहे हे त्याने आपल्याला सांगू नये यामुळे तिला उद्विग्नता आली होती .ती आई वडिलांची एकुलती एक होती. तिच्या चेहर्‍यावरून आज तिचे काहीतरी बिनसले आहे हे आईच्या लक्षात आले .ती आपल्या खोलीत गेली. तिने खोलीचा दरवाजा धाडकन लावून घेतला.हात पाय न धुता, कपडे न बदलता, फ्रेश न होता, तिने धाडकन आपले अंग कॉटवर टाकून दिले .कुणाच्या तरी गळ्यात पडून रडावे कसली तरी मोडतोड करावी असे तिला वाटत होते .रडता रडता तिला झोप केव्हा लागली ते कळले नाही .आता तिला उगीच त्रास देऊ नये .जरा वेळाने शांत झाल्यावर ती आपल्याला सर्व काही सांगेल याची तिच्या आईला खात्री होती. सुमारे तासाभराने ती जागी झाली .

पडल्या पडल्या वरुणची व आपली ओळख केव्हा झाली ,अापण त्याचे नाव पहिल्यांदा केव्हा ऐकिले वगैरे गोष्टी तिला आठवू लागल्या .

ती व सुमन दोघी घट्ट  मैत्रिणी .बालवाडीपासून बारावी सायन्सपर्यंत दोघीही एकत्र एकाच शाळेत कॉलेजात शिकत आल्या .दोघींचेही डॉक्टर होण्याचे ठरले होते .दुर्दैवाने बारावी सायन्सला कुसुम टायफॉइडने आजारी पडली .ती त्या वर्षी परीक्षेला बसू शकली नाही .सुमन चांगले मार्क्स मिळवून मेडिकलला गेली .तिच्या पाठोपाठ दुसऱ्या वर्षी कुसुमही चांगले मार्क्स मिळवून मेडिकलला आली .कॉलेजमध्ये गेल्यावर तिने पहिल्यांदा वरुणला बघितले .तोपर्यंत केवळ सुमनच्या तोंडून ती त्याचे नाव ऐकत होती. 

*कुसुम*

सुमनच्या तोंडून अनेकदा वरुणचे नाव ऐकत होते .आजच त्याला प्रथम पाहत होते.वरुण देखणा आहे .पोरी त्याच्या मागे असतात .तो लेडी किलर आहे .तो फार उंच नसला तरी साडेपाच फूट नक्की आहे .गोरापान सुदृढ सोनेरी केसांचा, निळ्या डोळ्यांचा, चेहरा अत्यंत रेखीव असलेला आहे .तो एखाद्या रोमन योध्यासारखा दिसतो .त्याचे वक्तृत्व चांगले आहे .नाट्य मंडळाचा तो प्रमुख आहे .त्याच्यामुळे आपले कॉलेज आंतर- महाविद्यालयीन नाट्यस्पर्धेमध्ये पहिले येते .तो अभ्यासात हुषार आहे .तो एक वर्ष जीएस ही होता .प्राध्यापकांचाही तो आवडता आहे .एक ना दोन वरुण असा आहे वरुण तसा आहे हे ऐकून माझे कान किटले होते .शेवटी मी सुमनला म्हटले की तुझे वरुण पुराण पुरे कर तू त्याच्याशी ओळख का करून घेत नाहीस.तू त्याला का गटवित नाहीस .त्यावर सुमन म्हणाली की नाहीरे बाबा मला त्याच्याशी बोलण्याची भीती वाटते .तो तिसऱ्या वर्षाला मी पहिल्या वर्षाला आमची गाठभेट होणार कशी?त्यावर मी सुमनला म्हटले की त्यात काय आहे तू नाट्यमंडळ का जॉईन करत नाहीस .त्यावर ती म्हणाली की मला स्टेज फ्राइट आहे .स्टेजवर गेल्यावर माझे हातपाय कापायला लागतात .मी नाट्यमंडळ जॉईन करून काय करू ?एकदा सुमन बरोबर त्याचे नाटक बघायला जाण्याचा योग आला होता .परंतु त्या दिवशी आमच्या घरी पाहुणे आल्यामुळे मला जाता आले नाही .सुमन इतके म्हणते तर तो कसा आहे ते पाहण्याची उत्सुकता होती परंतु योग हुकला.सुमनच्या तोंडून त्याच्या बद्दल इतके काही ऐकले होते की तो एकदम आपल्या ओळखीचाच आहे असे वाटत होते .

आज कॉलेजमध्ये गेल्यावर सुमनला मी वरुण दाखविण्यास सांगितले. तिने हा वरुण असे सांगण्याअगोदरच मी त्याला ओळखले .सुमन सांगत होती त्यात तिळभरही अतिशयोक्ती नव्हती.मी ऐकून सुमनची थट्टा करीत होते परंतु आता बघून घायाळ झाले.त्याच्याशी ओळख व्हावी अशी तीव्र इच्छा मनात निर्माण झाली .तो माझ्याकडे किती लक्ष देईल ते मला माहित नव्हते .कदाचित मुळीच लक्ष न देण्याची शक्यता होती . कारण मी ही अशी काळी सावळी ठेंगू किंचित स्थूल .तशी मी नाकीडोळी रेखीव होते .केस लांबसडक होते.माझ्याकडे लक्ष देण्यासाठी एवढ्या गोष्टी पुरेशा आहेत असे मला वाटत नव्हते .तरीही आपण त्याला भेटावे त्याच्याशी बोलावे सलगी वाढवावी असे मला आवर्जून वाटत होते .तो चौथ्या शेवटच्या वर्षाला मी पहिल्या वर्षाला आमच्या भेटी होणे शक्य नव्हते. पुढच्या वर्षी तो कॉलेजला असेल नसेल. तो एम डी कुठे करील कुणाला माहित?त्याला भेटायचे तर या वर्षी प्रयत्न  करायला पाहिजे होता.नाऊ अॉर नेव्हर! मला लेखन वाचन काव्य यांची आवड आहे .साहित्य मंडळ कॉलेज मॅगेझिन  हा माझा प्रांत आहे .असे असूनही मी नाट्यमंडळ जॉइन करण्याचे केवळ त्याच्यासाठी ठरविले .

*वरुण*

त्या दिवशी नाट्य मंडळाची बैठक होती आणि मी तिला पहिल्यांदा पाहिले .मी चमकलोच.अमर अकबर अँथनी मध्ये अमिताभ ज्याप्रमाणे म्हणतो की डोक्यात  टिंग टाँग टिंग टाँग अशी घंटी वाजली पाहिजे त्याप्रमाणे माझ्या डोक्यात घंटी वाजली .तिच्यात तसे पटकन काहीच आवडण्यासारखे नव्हते .तशा खूप काही गोष्टी आवडण्यासारख्याही होत्या.परंतु त्या हळूहळू लक्षात येत असत . पाहिल्याबरोबर फक्त तिचा सावळा वर्ण दिसे . तिचे डोळे पाणीदार आणि बोलके होते .केस रेशमासारखे मऊ लांबसडक गुडघ्यापर्यंत होते .त्वचा मुलायम होती .या सर्व गोष्टी नंतर हळूहळू लक्षात आल्या .पहिल्याने डोक्यात वाजली ती टिंग टाँग.ती बुद्धिमान होती. साहित्याची तिला अावड होती.तिचे वक्तृत्व चांगले होते.ती सभाधीट होती.याही गोष्टी हळूहळू लक्षात आल्या .पण पहिल्यांदा वाजली ती टिंग टाँग .मी तिच्याकडे नाट्य लेखनाची जबाबदारी सोपविली . मंडळातील चर्चेअंती शेवटी तिने लिहिलेले नाटक बसविण्याचे ठरले .त्यामध्ये आम्ही दोघांनी नायक नायिकेच्या भूमिका केल्या .ते नाटक व आम्हा दोघांना सगळ्या कॉलेजने डोक्यावर घेतले ."पेअर ऑफ दि इयर"म्हणून आम्हा दोघांची एकमताने निवड झाली .आमच्या गाठी भेटी वाढू लागल्या .एकत्र सिनेमाला नाटकाला जाणे फिरणे वगैरे सुरू झाले.मी एमडीला त्याच कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्यामुळे आमचा सहवास सुरूच राहिला .आमच्या भेटी सहजच होत असत. मुद्दाम भेटी घडवून आणाव्या लागत नसत.

ती मला तुझ्या घरी घेऊन चल. आईवडिलांशी ओळख करून दे म्हणून वारंवार सांगत असे परंतु मी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असे .दुर्दैवाने माझे लग्न पूर्वीच झाले होते.तिनेच मला फशी पाडले होते .मी सहज तिच्या कह्यात  गेलो .आईच्या विरुद्ध जावून मी तिच्याशी लग्न केले.तू सुखी होणार नाही असे सांगत असतानाही मी ते ऐकले नाही .आईने तरीही तिचा स्वीकार  केला होता.ती स्वभावाने विचित्र निघाली. तिला माझा एखाद्या खेळण्यासारखा उपयोग करून घ्यायचा होता .दोन तीन महिन्यांमध्ये आमचा घटस्फोट झाला .तीच आमच्या घरून निघून गेली .ही गोष्ट आमच्या कॉलेजमध्ये कुणालाही बहुधा माहिती नव्हती. घटस्फोटित  व्यक्तीकडे लोक जसा काही त्याचा गुन्हाच असावा अशा दृष्टीने बघतात.त्याची बाजू ऐकून घ्यायला कुणीही मनोमन तयार नसतो .एकतर्फी त्याला पिंजऱ्यात उभा करून दंड शिक्षा ठोठावून मोकळे होतात .

तिला आमच्या घरी घेऊन गेलो असतो तर आईने स्वच्छपणे तिला मी घटस्फोटित  आहे असे सांगितले असते.मला तिला अगोदर सर्व नीट सांगायचे होते .परंतु प्रत्येक वेळी जीभ रेटत नसे .तिला काय वाटेल? तिचा मी विश्वासघात केला असे तर वाटणार नाही ना?ती मला सोडून जाणार नाही ना ?अशा अनेक शंका कुशंका, मी तिला गमावून बसेन या भीतीमुळे मी तिला सत्य  सांगण्याचे पुढे ढकलीत होतो.

* सुमन*

कुसुमचे मला काही खरे दिसत नव्हते .वरुण असा आहे वरुण तसा आहे असे सांगताना माझी थट्टा करणारी व मला हसणारी कुसूम तीच का ही ,असा मला प्रश्न पडला.बघता बघता ही वरुणमध्ये पूर्णपणे वाहवत गेली. वरुणचे रेकॉर्ड काही वाईट नव्हते. निदान मी तरी अजून त्याने कुणाला फसविले असे ऐकले नव्हते.तो कुणाशी गैर वागल्याचेही कुणी बोलले नव्हते. मी ऐकले नव्हते.त्याच्या भोवती पोरी घुटमळत असत तेव्हा काय सांगावे ?त्याचे काही उद्योग असले तर ते मला तरी माहीत नव्हते.स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यम् अशी एक म्हण आहे .हे लिहिणारा नक्की पुरुष असला पाहिजे .पुरुष चरित्रही काही कमी नसते .मला तरी वरुण साधा सरळ दिसत होता .कुणाहि मुलीबरोबर गैर वागल्याचे ऐकिवात नव्हते .आणि एक दिवस मला त्याची ही माहिती कळली .मी आईबरोबर कुणाच्या तरी घरी गेले होते .तिथे एक बाई नुकत्याच  येऊन गेल्या होत्या .त्यांच्या मुलाने लवकर लग्न केले आणि पुढे त्याचा दोन महिन्यांत घटस्फोट झाला.असे काहीतरी बोलणे चालले होते .बोलता बोलता ती वरुणची आई आहे असे कळले.वरुणचे लग्न झाले आहे आणि तो घटस्फोटित आहे ही एक मला न्यूज होती.मला त्याचे काही विशेष वाटले नाही .परंतू एवढ्या लहान वयात लग्न मला थोडे आश्चर्य वाटले .आणि लगेच घटस्फोट .घटस्फोट झाला असे म्हटले की नाना प्रश्न डोळ्यासमोर उभे रहातात.

वरुणमध्ये तर काही दोष नाही?वरुणची तर काही चूक नाही ?मन चिंती ते वैरी न चिंती .ही गोष्ट त्याने कुसुमला का सांगितली नाही ? इतके दिवस दोघेही फिरतात त्याने ही गोष्ट सांगायला पाहिजे होती.ठीक आहे आपण कुसुमला हे सांगू .आपण तिची मैत्रीण आहोत .तिला हे सांगणे आपले कर्तव्य आहे .त्याप्रमाणे मी तिला ते सांगितले .ऐकल्यावर ती चांगलीच अस्वस्थ झाली होती .रागारागाने तिने आता तो मला भेटला की त्याची खरडपट्टी काढते असे म्हटले .

* कुसुम*

त्या दिवशी सुमनने मला वरुण घटस्फोटीत आहे असे सांगितले .मला धक्का तर बसलाच .धक्का वरुण घटस्फोटित आहे याचा कमी होता, परंतु आमची इतकी दाट मैत्री असून सुद्धा त्याने मला सांगितले नाही याचा मोठा धक्का होता.दुसर्‍या  दिवशी तो भेटल्यानंतर मी त्याची नाही नाही ते बोलून खरडपट्टी काढली .तो गयावया करीत माझी काही समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होता .मी त्याची बाजू काहीही ऐकून न घेता तशीच रागारागाने घरी आले. आता मी विचार करू लागले आहे .माझा रागाचा भर ओसरला आहे .शांतपणे विचार करता मी वरुणचे म्हणणे नीट ऐकून घेतले पाहिजे होते असे आता वाटत आहे .मी तर रागाच्या भरात तुला आता कधीही भेटणार नाही. तू माझ्या समोर येऊ नकोस.तुझा माझा संबंध संपला असे सांगितले आहे .माझे अजूनही त्याच्यावर प्रेम आहे .त्याचे बोलणे ऐकून घ्यावयाला पाहिजे होते हे मला कळते .परंतु आता मी काय करू ?मी त्याच्याशी बोलायला गेले तर तो माझी थट्टा तर नाही करणार ?तो रागारागाने न बोलता निघून तर जाणार नाही ना ? तसे झाले तर माझा केवढा अपमान होईल?प्रेमामध्ये मान अपमान ठेवायचा नसतो हे मला कळते पण वळत नाही त्याला मी काय करू?थोडक्यात माझा अभिमन्यू झाला आहे यातून मी बाहेर कशी पडू ?

एवढय़ात माझी आई खोलीत शिरली .आई ही माझी केवळ आईच नाही तर मैत्रीणही आहे .पहिल्यांदा मला तो घटस्फोटित आहे असे सुमनने सांगितले त्यानंतर मी घरी येऊन काही न बोलता खोलीत जाऊन झोपले होते त्या दिवशी मी आईजवळ  काहीच बोलले नव्हते .आईनेही मोठ्या मनाने नेहमीप्रमाणे मला क्षमा करून त्याविषयी काहीही विचारले नव्हते .मी केव्हा ना केव्हा तिला सर्व सांगेन याची तिला खात्री होती. मी तिची क्षमा मागून पहिल्यापासून घडाघडा काय काय घडले ते तिला सांगितले .ते ऐकून घेतल्यावर ती मला म्हणाली तुला तो नक्की  आवडतो ना ?तुझी मैत्रीण यावर तोडगा काढील .तू तिला बोलवून घे .दमयंतीने हंसाला जसे दूत केले होते त्याप्रमाणेच मी सुमनला दूत केले .तिच्याबरोबर तोंडी निरोप दिला .

*वरुण*

या मुलीला मी नेहमी कुसुम बरोबर पाहात होतो .एवढ्या मुली माझ्याशी बोलायला धडपडत असत परंतु ही कधीही माझ्याशी बोलायला आली नाही.आज ती माझ्याशी धीटपणे बोलायला आली .तिला दूत करून तिच्याबरोबर निरोप पाठवावा असे मला वाटत होते .तो हीच मला भेटायला आली .तिने मला "कुसुमला तुम्हाला एकदा भेटायचे आहे .तिला तुमचे बोलणे नीट ऐकून घेतले नाही याबद्दल वाईट वाटत आहे .तुम्ही राग मानू नका .तिला एकदा अवश्य भेटा.ती तुमचे बोलणे शांतपणे ऐकून घेईल."असा निरोप दिला.मी तिच्या जवळ आपण नेहमीच्या ठिकाणी भेटू असा निरोप दिला .कुसुम त्याप्रमाणे भेटायला आली .मी तिला गमावीन अश्या भीतीमुळे तिला सत्य परिस्थिती सांगण्याचे टाळत होतो .तिला प्रपोज करण्याच्या अगोदर मी हे सर्व सांगणार होतो.मी लहान होतो. तिने मला फसविले . माझा तिने खेळण्यासारखा उपयोग करून घेतला. ती वाटेल तशी वागत होती .एक दिवस भांडण करून ती आपल्या घरी निघून गेली .जे झाले ती माझी चूक होती. इत्यादी घटना सविस्तर तिला सांगितल्या .

* कुसुम*

वरुणने  सुमन बरोबर निरोप दिल्याप्रमाणे मी आमच्या नेहमीच्या ठिकाणी भेटायला गेले.तिथे अस्वस्थपणे वरुण माझी अगोदरच वाट पाहात होता .त्यांने त्याच्या लग्ना संबंधीच्या घडलेल्या सर्व घटना प्रामाणिकपणे सविस्तर सांगितल्या . त्याच्या चेहऱ्यावर त्याचा प्रामाणिकपणा, त्याचे माझ्यावरचे उत्कट प्रेम ,त्याला त्या सर्व घटनांबद्दल होणारा पश्चाताप सर्व काही नितळपणे स्पष्टपणे दिसत होते .

मी त्याला माफ करून त्याच्या हळूच कुशीत शिरले हे सांगायला लिहायला पाहिजे का?

३/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel