(ही कथा काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी संबंध नाही कुठे आढळल्यास तो योगायोग समजावा )
गावात सगळीकडे कुजबूज सुरू झाली होती .सदाभाऊंनी वांगी भूत वश करून घेतलेले आहे ! त्याशिवाय का एवढी सुबत्ता एकाएकी येते?सदूभाऊ म्हणजे फाटका माणूस.आज व्यवस्थित जेवायला मिळाले तर उद्या कसे मिळेल अशी भ्रांत असलेला माणूस .आणि एकाएकी त्यांचा हा रुबाब !
काही दिवसांपर्यंत सदुभाऊ एकदम गरिबीत दिवस काढत होते .सदुभाऊ साठीला आले होते. गावात त्यांना सर्वजण नाना म्हणत. सत्यभामाबाईंना सर्वजण वहिनी म्हणत. त्यांचे वय पंचावन्न असावे .तर नाना व वहिनी हे जोडपे अगदी गरिबीत दिवस काढीत होते . घरासभोवताली पाच पंचवीस कलमे आणि थोडेसे भात येईल एवढी शेती याशिवाय त्यांना उत्पन्नाचे काही साधन नव्हते .नाना दोन चार देवळात व दोन चार घरी पूजा करीत. त्यातून त्यांना थोडेसे पैसे मिळत . गावातील जी मंडळी शहरात किंवा परदेशात जाऊन स्थिर झाली होती, त्यापैकी काहींचे देव येथे होते .त्यांची पूजा करण्याचे काम नानांकडे सोपविलेले असे .घर नसले तरी देवघरापुरती एखादी छोटी झोपडीवजा व्यवस्था केलेली असे.या मंडळींना कितीही पैसा मिळत असला तरी नानानी थोडक्यात पूजा करावी असा त्यांचा विचार असे .त्यामुळे पूजेतून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नसे. एकेकाळी नानांच्या पूर्वजांची खूप शेती होती .परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कूळ कायदा आला आणि ती सर्व शेती कुळांना गेली .एक लहानसा तुकडा तेवढा नानांच्या आजोबांकडे राहिला .घरी काही उत्पन्न नाही, जेवणाचीच विवंचना,त्यामुळे हळूहळू एकेक जण शहरात स्थलांतर करू लागला .कमी जास्त शिकून कुठल्या ना कुठल्या नोकरीवर मंडळी रुजू झाली. काही जणानी स्वतंत्र व्यवसाय सुरू केले .सदुभाऊ मात्र इथेच राहिले .
नानाना दोन मुलगे व एक मुलगी.सर्व शहरात स्थिरावले होते . शहरात उत्पन्न जेवढे मिळेल तेवढे खर्च होत असे .दाही दिशांनी खर्चाला वाटा फुटत .त्यामुळे त्यांच्या मुलांना,आपल्या वडिलांना म्हणजेच नानांना,उचलून काही रक्कम देता येत नसे.त्यांचे दोन्ही मुलगे म्हणत नाना आई तुम्ही येथे येऊन राहा.आम्ही जेवतो त्यातील दोन घास तुम्हाला देऊ .तुम्ही आलात तर आम्हाला आनंदच आहे.घरी काही उत्पन्न नाही. तेथे वैद्यकीय सुविधाही फारशा नाहीत.म्हातारपणी तुम्ही आमच्या जवळच राहा .परंतु आम्हाला उचलून तुम्हाला काही पैसे देणे शक्य होणार नाही .जमले तर ,जमेल तेव्हा, थोडे बहुत आम्ही तुम्हाला देऊच .नाना व वहिनीनी शहरात जाऊन राहण्याचा प्रयत्न केला.परंतु ऐसपैस घरात राहिलेल्या त्यांचा, शहरात जीव गुदमरत असे .तसे ते काही दिवस जाऊन रहातही असत.परंतु त्यांचे मन तिथे रमत नसे .शिवाय देवांची पूजा ही एक जबाबदारी होती .ते शहरात जात तेव्हा कुणाकडेतरी तात्पुरती पूजेची जबाबदारी सोपवीत असत.
तर नानांचे असे खुटूरुटू खुटूरुटू चालले होते.कलमांचे चार पैसे येत ते कुठे केव्हा खर्च होत तेही कळत नसे . पूजेचे काही पैसे मिळत त्याचाही थोडा बहुत उपयोग होई. ही जी भातशेती त्यांच्याकडे होती ती ते स्वत: कसत नसत.ना त्यांच्याकडे बैल जोडी, ना त्यांच्याकडे इतर लागणारी शेतीची सामुग्री,ना त्यांच्याकडे मनुष्यबळ. कुणाचे तरी जोत आणून, कुणाकडून तरी ते पिकवून घेत असत.उत्पन्नाचा निम्मा वाटा कसणाऱ्याला जाई.व काही पोती भात सदाभाऊंच्या वाट्याला येई.कागदोपत्री कसणारा कूळ नसे तो केवळ नोकर असे.कागदोपत्री नाना स्वतः ती जमीन कसत असत .
नाना नेहमी पंचा नेसून फिरत असत .त्यांनी सदरा घातलेला काही वर्षापर्यंत कोणीही पाहिला नव्हता .शहरात जाताना त्यांच्या खांद्यावर सदरा असे.शहरात गेल्यावर ते तो घालीत तर शहराबाहेर पडल्यावर पुन्हा काढून ठेवीत. आधी कोकणात उकाडा किती, त्यात सदरा घालणे म्हणजे शरीरावर अत्याचार असे त्यांचे लाडके मत होते .
त्यांच्या आगरात फणसाची झाडे भरपूर होती .दोन तीन महिने आंबे व गरे हेच त्यांचे मुख्य अन्न असे. फणसाची व आंब्याची साटे म्हणजे फणस पोळी व आंबा पोळी तयार करून ते विकत असत.त्यातूनही त्यांना थोडेसे उत्पन्न मिळे.आठळा म्हणजे गर्यातील बिया काढून त्या ते मातीमध्ये पुरून ठेवीत.मातीवर मधूनमधून किंचित पाणी शिंपडत असत.त्यामुळे आठला जशाच्या तशाच काही महिने रहात.पावसाळ्यात त्या उकडून शिजवून चिरून त्याची भाजी करून खाता येत असे.घराभोवती ते थोडासा भाजीपाला पिकवीत .त्यातून त्यांना घरापुरती भाजी मिळत असे.
थोडक्यात आजचा दिवस गेला, उद्यांचा कसा जातो, याची त्यांना विवंचना असे.मुले कधी पैसे पाठवीतही परंतु त्यात नियमितता नसे.उन्हाळ्यात सुटीची मंडळी घरी येत असे .त्यावेळी मात्र लागणारा पैसा ते खर्च करीत असत .
एकंदरीत त्यांचे दिवस असे चालले होते.असे असताना त्यांचे एकाएकी दिवस पालटले.नानांच्या अंगावर झुळझुळीत तलम धोतर दिसू लागले .सदर्याचे कापडही चांगल्यापैकी असे.ते नेहमी पांढरा शुभ्र सदरा वापरू लागले .
पूर्वी त्यांच्या सदऱ्याचा रंग कधीतरी पांढरा होता असे सांगावे लागे.सदर्याच्या दोन बाजूला साईडला दोन खिसे व छातीवरही दोन खिसे असत.पूर्वी हा सदरा त्यांच्याकडे असे परंतु तो ते कधी घालीत नसत.शहरात जाण्यापुरताच तो घालत असे
आता ते सर्रास सदरा वापरू लागले .घरी दोन चार जादा धोतरे दोन चार जादा सदरे दिसू लागले .वहिनींच्या अंगावरही झुळझुळीत पातळ आले.नेहमीची दोन व ठेवणीतील एक अशा तीन पातळाऐवजी आता त्यांनी निरनिराळ्या रंगांची निरनिराळया डिझाइनची निरनिराळ्या प्रकारची बरीच पातळे घेतली.
गावात सर्वत्र वीज आली होती .जे गावात राहत होते त्यांची घरे विजेने उजळून टाकली होती.शहरात राहणार्या लोकांनीही त्यांच्या येथील घरांमध्ये वीज घेतली होती.परंतु नानानी मात्र वीज घेतली नव्हती.कारण त्यांच्याजवळ इलेक्ट्रिक फिटींग करण्यासाठी पैसे नव्हते.विजेचे बिल देण्यासाठीही पैसे नव्हते . त्यांच्या घरात मिणमिणता कंदील किंवा साधी ठाणवी(कडून तेलाचा समईसारखा दिवा) असे.
पूर्वी अशी परिस्थिती असताना नानांनी एकाएकी घरात विजेचे फिटिंग करून घेतले .सर्वत्र एलईडी दिवे लावले .रेडिओ तर घेतलाच परंतु टीव्हीही घेतला .त्यासाठी डिशही बसवली.नानांकडे फोन आला .गावात टॉवर आल्यावर त्यांनी मोबाइलही घेतला.
पूर्वी वहिनी म्हणजे लंकेच्या पार्वती होत्या.आता त्यांच्या अंगावर झुळझुळीत पातळाप्रमाणेच चार ठसठशीत दागिने दिसू लागले.नानांना चालविता येत नव्हती म्हणून नाही तर त्यांनी मोटारसायकलही घेतली असती असे लोक म्हणू लागले .काही जण तर ते मोटारही घेतील व शोफरही ठेवतील असे बोलू लागले.
गेल्या दोन तीन वर्षांमध्ये नानांच्या आर्थिक स्थितीमध्ये असा हळूहळू फरक होत गेला .शहरात गेलेल्या एका स्थानिक ग्रामस्थाकडून त्यांनी त्याची कलमांची बाग विकत घेतली .एक डोंगर विकत घेऊन त्यावर शंभर कलमेही लावली.
नानांचा हा सर्व दिशांनी होत असणारा उत्कर्ष कुणाला पाहावत नव्हता.काही लोकांनी त्यात काडय़ा घालण्याचा प्रयत्नही केला .आयकर विभागातील लोकांनी येऊन त्यांच्या उत्कर्षाची चाचपणी केली .परंतु नानानी हुषारीने सीएची मदत घेऊन सर्व हिशेब चोख ठेवला होता.त्याच्याच मदतीने त्यांनी आयकर विभागाचे समाधान केले .
* तर हा उत्कर्ष नानाना वांगी भुतामुळे मिळाला आहे असा सर्वत्र समज होता.*
* त्यांना कुठे तरी हे भूत भेटले .आणि त्यांनी त्याला वश करून घेतले .असा काही लोकांचा समज होता .*
* तर तीन चार वर्षांपूर्वी नाना सिंधुदुर्गात मालवणला गेले होते.तिथे त्यांनी हे भूत विकत घेतले असा काही जणांचा समज होता.*
* हे भूत ते नेहमी खिशात ठेवतात .त्यामुळे ते बाहेर जाताना नेहमी सदरा घालतात .घरात सदरा खुंटीला टांगलेला असतो .त्या सदऱ्याच्या खिशात वांगीभूत आराम करीत असते .नाना जे काम सांगतील ते काम ते भूत करते असे सर्वजण म्हणत.*
* त्यामुळे सर्व जण हल्ली नानांना वचकून असत.*
एखाद्याने धीर करून भुताबद्दल नानाना विचारले तर त्यावर ते फक्त हसत असत.त्यावरून प्रत्येक जण जे समजायचे ते बरोब्बर समजत असे.असे असले तरी नानांनी त्यांच्या पूजा मात्र सोडल्या नव्हत्या .सर्व पूजा ते त्याच निष्ठेने व त्याच उत्साहाने साग्रसंगीत करीत असत.तुम्ही आता पूजा कशाला करता असे कुणी जर विचारले तर ते हसून त्यावर ही सर्व लक्ष्मीनारायणाची कृपा त्यांना मी कसे सोडू असे म्हणत.
*मी जर देवाना विसरलो तर ते मला विसरतील असे त्यांचे एक आवडते वाक्य होते .*
त्यांच्या उत्कर्षात अक्षरश: पूजेचा, देवांचा, लक्ष्मीचा, हात होता.ते सर्व असे झाले .
नाना नेहमीप्रमाणे नारायण लक्ष्मीची पूजा करीत होते .ते नेहमीच घासून पुसून मूर्ती स्वच्छ करून त्यांना स्नान घालून वस्त्रे नेसवीत असत.त्या दिवशी लक्ष्मीच्या दोन्ही पायांच्या मधील अडकलेली फुले काढताना त्यांनी जरा जास्त जोर देत तेथील भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला .आणि काय झाले कोण जाणे ?तेथेच खाली कुठेतरी एक कळ होती.अनेक वर्षे दोन्ही पायांच्या मधील भाग साफ करता करता तेथील काही भाग निघाला असावा.त्याच्या खाली एखादी कळ असावी.ती कळ, नकळत नानांकडून योग्य प्रकारे फिरविली दाबली गेली असावी.आणि काय आश्चर्य लक्ष्मी तिच्या आसनावरून किंचित सरकली .मध्ये जी फट पडली त्यात एक तांब्याचा डबा होता.फटीत बोट घालून त्यांनी तो तांब्याचा डबा मोठ्या कष्टाने बाहेर काढला.त्याचे वजन एक किलो होते .शंभर ग्रॅम सोन्याची एक लड अश्या त्या दहा लड्या होत्या .नानांनी त्यातील एक लड काढून घेतली.डबा जाग्यावर ठेविला . लक्ष्मीला पुन्हा आपल्या जागी ठेवली !
दुसऱ्या दिवशी जपून ती लड आपल्या खिशात ठेवून नाना शहरात गेले.सोनाराकडे जावून त्यांनी ती लड त्याला दाखविली.ती लड अस्सल सोन्याची चोवीस कॅरेटची व शंभर ग्रॅम वजनाची होती .त्याची किंमत बाजारभावाने तीन लाख रुपये होती .परंतु सोनाराने त्यांना फक्त अडीच लाख रुपये दिले .कारण ती वितळविणे आणि ते सोने बाजारात विकणे हे थोडे जबाबदारीचे काम होते.असे सापडलेले सोने खाजगी मालकीची नसते .ते सरकारी मालकीचे असते .ते सरकारमध्ये जमा करावे लागते .बक्षीस म्हणून व्यक्तीला मूल्याच्या काही टक्के दिले जातात .
गरज पडली की नाना लक्ष्मीला नमस्कार करीत .कळ दाबली कि लक्ष्मी थोडी बाजूला सरके आणि नाना एक लड काढून घेत.
* नानांच्या उत्कर्षाचे भाग्याचे हे कारण होते .*
* नानांच्या चारी दिशांनी होणार्या प्रगतीच्या मुळाशी लक्ष्मी होती.*
*त्यामुळेच नाना उत्साहाने सर्व देवांची पूजा पूर्वीप्रमाणेच करीत असत*
*इतकी वर्षे केलेल्या पूजेचे हे फळ आहे असे ते म्हणत*
*लोक जेव्हा नानांना वांगी भूत प्रसन्न आहे असे म्हणत तेव्हा नाना फक्त हसत असत *
*जास्तीच खोलात कुणी जाऊन चौकशी केली तर ते दोन्ही हात जोडून ही सर्व लक्ष्मीची कृपा असे म्हणत असत *
*तुम्हा आम्हालाही लक्ष्मी अशीच प्रसन्न होवो अशी त्या लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना*
*अशी ही साठा उत्तराची कहाणी लक्ष्मी कृपेने सफळ संपूर्ण *
१९/७/२०१९ ©प्रभाकर पटवर्धन