(ती मी नव्हेच)
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे साठ या कालखंडात माधव काझी नावाची एक व्यक्ती अनेक नावांनी वावरत होती .त्याने सुशिक्षित उच्च घराण्यातील अनेक मुलींंशी लग्न केले.एकाच वेळी अनेक शहरात त्याने आपली घरे ठेवली होती. तो त्या त्या शहरात अनेक बायकांशी एकाचवेळी यशस्वीपणे संसार करीत होता.एकेकीला पूर्णपणे लुबाडून झाल्यावर तो नाहीसा होत असे .तो वेषांतर करण्यात पटाईत होता.
एकोणीसशे बासष्ट साली आचार्य अत्रे यांनी त्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर "तो मी नव्हेच" या नावाचे एक नाटक लिहिले .त्यात लखोबा लोखंडे या नावाचे एक अजरामर पात्र त्यांनी निर्माण केले.त्या नाटकाचे फिरत्या रंगमंचावर अक्षरश हजारो प्रयोग झाले .अत्यंत यशस्वी नाटकांत त्यांची गणना केली जाते.
वरील सर्व गोष्टी आठवण्याचे कारण म्हणजे माझ्या मित्राच्या मुलाला आलेला एक विचित्र अनुभव .हा माझा मित्र कोल्हापूरला असतो .त्याचा मुलगा आकाश इन्कमटॅक्स ऑफिसर आहे. तो त्या जाळ्यातून सहीसलामत सुटला. नाही तर त्यांचे काही खरे नव्हते .तोच काय त्याचे कुटुंब पूर्णपणे लुटले गेले असते .वर बदनामी झाली असती ती वेगळीच .पुन्हा लोक वरती म्हणायला मोकळे की एवढीही गोष्ट लक्षात कशी आली नाही ?हुरळली मेंढी चालली लांडग्यांच्या मागून .असे काही सांगत बसण्यापेक्षा आकाशला जो काही अनुभव आला तो त्याच्याच शब्दात पुढीलप्रमाणे
आकाश
मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये अॉफिसर आहे . हल्ली माझे पोस्टींग अमरावती येथे आहे .माझे वय अठ्ठावीस वर्षे .मी मूळचा कोल्हापूरचा .माझे आई वडील कोल्हापूर येथे असतात.मला एक थोरली बहीण आहे .तिचे लग्न झाले आहे .तिला एक मुलगा एक मुलगी .माझे लग्न लवकर व्हावे असे माझ्या आई वडिलांना व बहिणीला वाटते .मला पुष्कळ मुली सांगून येत आहेत .अजून तरी मला कुठलीही मुलगी पसंत पडलेली नाही .मध्यंतरी बाबांनी मला,माझे कुठे लव्ह अफेअर आहे का ?असे विचारले .मी नाही असे म्हटल्यावर त्यांनी मग तुला मुली पसंत का पडत नाहीत ?असा प्रश्न केला .का कोण जाणे परंतु मला हवी तशी शिक्षित हुषार व मनात भरेल अशी मुलगी काही महिन्यांपर्यंत आढळलेली नव्हती .
विवाह जुळविणाऱ्या दोन तीन संस्थेमध्ये माझे नाव वडिलांनी रजिस्टर केले आहे.कोल्हापूरकडे आमची शेतीवाडी आहे .वडील सीए त्यांची फर्म आहे.मी सीए आहे. कोल्हापूरला आमचा मोठा आलिशान बंगला आहे.मी वरच्या पोस्टवर आहे . मी कदाचित नोकरी सोडून माझ्या वडिलांच्या फर्ममध्ये जाईन. थोडक्यात आम्ही संपन्न आहोत.माझे स्थळ आकर्षक आहे.मला एरवीही मुली सांगून येतच होत्या.वडिलांनी नाव नोंदवल्यावर त्याचे प्रमाण वाढले आहे .मी फार चुझी आहे असे नाही .परंतु मला मनासारख्या मुली सांगून येत नाहीत एवढे खरे .
माझी एवढी पार्श्वभूमी पुरेशी आहे असे मला वाटते. गेल्या काही महिन्यात मला एक विचित्र वाईट अनुभव आला .सुदैवाने मी त्यातून बालंबाल बचावलो.
नेहमीप्रमाणे संध्याकाळी मी ऑफिसातून घरी आलो होतो.त्या दिवशी एक गृहस्थ मला भेटायला आले.त्यांच्याकडे बघितल्याबरोबर यांची मुलगी लग्नाची आहे हे माझ्या लक्षात आले. लग्नाचा मुलगा मुलीच्या वडिलांना बरोबर ओळखतो .माझा अंदाज बरोबर ठरला .बोलता बोलता त्यांनी पुढील माहिती सांगितली ~ते नाशिक येथे राहतात .त्यांची मुलगी तिथेच एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करते .ती एमएस्सी बीएड आहे .तिचे वय चौवीस आहे. ते पुढे म्हणाले ,त्यांनी कोल्हापूरला माझ्या वडिलांकडे फोन केला होता .बाबानी प्रथम आकाशला मुलगी पसंत पडू दे मग आम्ही पाहू असे सांगितले .म्हणून ते माझ्याकडे आले होते .~असे म्हणून त्यांनी फोटो माझ्यापुढे ठेवला.फोटो बघितल्याबरोबर मुलगी माझ्या मनात भरली .माझ्या चेहर्यावरून त्यांना अंदाज आला असावा .त्यांचा चेहरा माझी पसंती पाहून आनंदित झाला .त्यांनी पत्रिका पाहायची आहे का? म्हणून विचारले .त्यावर मी अर्थातच नाही म्हणून सांगितले .
मुलगी कशी वाटते असे त्यांनी मला विचारले .मी त्यांना फोटोवरून काही अंदाज करता येत नाही.हल्ली कॉम्प्युटरवर कुशल फोटोग्राफर काहीही करू शकतात असे म्हणालो .त्यावर त्यानी मुलगी घेऊन केव्हा येऊ असे विचारले.मी त्यांना पूर्वनियोजनाने केव्हाही असे उत्तर दिले .त्यावर त्यांनी आम्ही हॉटेलात उतरलो आहोत .माझ्या बरोबर माझी मुलगीही आहे .आज तुम्ही हॉटेलवरच आमच्याकडे जेवायला का येत नाही? म्हणून विचारले .मला त्यांची सूचना आवडली . मुलगी पाहणे हा पारंपरिक कार्यक्रम मला विशेष पसंत नाही.
मी संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आठ वाजता त्यांच्या हॉटेलवर गेलो.दीप्ती पाहिल्याबरोबर मला पसंत पडली.बऱ्यापैकी उजळ सुंदर आकर्षक बोलण्यामध्ये चतुर; कुणावरही लगेच छाप पडेल असे तिचे व्यक्तिमत्त्व होते.ती बहुश्रुत होती.मी कॉमर्स सीए असल्यामुळे मला सायन्सबद्दल काही माहितीही नव्हती.मला तिचा इंटरव्ह्यू थोडाच घ्यायचा होता .ती एमएस्सी बीएड आहे .ती चांगल्यापैकी शिक्षित आहे. बहुश्रुत आहे.नोकरी करते. स्वतंत्र विचारांची आहे. बोलण्यामध्ये चतुर आहे. एवढ्या गोष्टी मला पुरेश्या होत्या.नाहीतरी आपण शिक्षण वय नोकरी पगार इत्यादी गोष्टींवर विश्वास ठेवतो .लगेच सर्टिफिकेट्स मागत नाही.
मी त्यांना लगेच संमती दिली. कोल्हापूरला जाऊन माझ्या आईवडिलांना भेटा असे सांगितले.माझी बहीण मुंबईला असते केव्हा मुंबईला गेल्यास तिलाही भेटा असे सांगितले.
पुढे गोष्टी पटापट घडत गेल्या.किंवा मुद्दाम घडविल्या गेल्या. मला मुलगी पसंत आहे असे म्हटल्यावर आई वडील व बहीण यांनीही होकार दिला.मुळात तिच्यात नाकारण्यासारखे काहीही नव्हते.ती व तिचे वडील छाप पाडण्यात माहीर होते.फोन करून मी नाशिकला एक चक्करही मारली. मी त्यांचा ब्लॉकही बघितला. तिच्या आई बरोबर व भावाबरोबर भेट झाली.घराणे सुसंस्कृत शालीन व खानदानी वाटले.
बाबांनी आपण कोल्हापूरला साखरपुडा करून घेऊ व नंतर सावकाशीने नाशिकला लग्न करू असा प्रस्ताव ठेवला.साखरपुड्याऐवजी एकदम लग्नच करावे असे तिच्या बाबांचे म्हणणे होते.उगीच निष्कारण खर्च कशाला करायचा असे त्यांचे म्हणणे होते.थाटामाटात डामडौलात लग्न करण्याच्या विरुद्ध ते होते .साधेपणाने लग्न करून वाचलेला पैसा एखाद्या धर्मादाय संस्थेला द्यावा असे त्यांचे उच्च विचार होते.
तिच्या बाबांना दीप्तीचे लग्न करण्याची थोडी घाई आहे असा आम्हाला संशय आला .परंतु मुलीच्या वडिलांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते स्वाभाविक आहे असेही आम्हाला वाटले.आमचे बाबा तसे जरा हट्टी.त्यांनी साखरपुडा लगेच करून घेऊ व लग्न सावकाशीने करू असा आग्रह धरला .आमचा एकुलता एक मुलगा आम्हाला लग्नाची तयारी करण्यासाठी भरपूर वेळ पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
*शेवटी दीप्तीच्या बाबांना आमच्या बाबांची सूचना मान्य करावी लागली . लवकर लग्न नाही यामुळे ते नाराज दिसले .*
*मुलीच्या बापाच्या दृष्टिकोनातून ती नाराजी आम्हाला स्वाभाविक वाटली.*
*पुढे खरे कारण कळल्यावर त्या नाराजीचे गुपित उघड झाले .*
(क्रमशः)
२६/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन