(ती मी नव्हेच)

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

तिच्या बाबांना दीप्तीचे लग्न करण्याची थोडी घाई आहे असा आम्हाला संशय आला .परंतु मुलीच्या वडिलांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते स्वाभाविक आहे असेही आम्हाला वाटले.आमचे बाबा तसे जरा हट्टी.त्यांनी साखरपुडा लगेच करून घेऊ व लग्न सावकाशीने करू असा आग्रह धरला .आमचा एकुलता एक मुलगा आम्हाला लग्नाची तयारी करण्यासाठी भरपूर वेळ पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.

मुलीच्या बापाच्या दृष्टिकोनातून ती नाराजी आम्हाला स्वाभाविक वाटली.पुढे खरे कारण कळल्यावर त्या नाराजीचे गुपित उघड झाले .

या घटनेनंतर काही आठवड्यात मी एका मित्राच्या लग्नाला हजर राहण्यासाठी नाशिकला गेलो होतो .दीप्तीच्या बाबांना किंवा दीप्तीला मी तेथे येत आहे असे मुद्दामच कळविले नव्हते.मला सरप्राईज भेट द्यायची होती .मी ज्यावेळी त्यांच्या ब्लॉकवर गेलो तेव्हा तिथे कुलूप आढळले.सर्वच मंडळी कुठे तरी बाहेर गेली असतील असे मला वाटले.त्यांना फोन करून यायला पाहिजे होते .आपण सरप्राइजच्या भानगडीत उगीच पडलो असेही वाटले. त्यांना फोन करावा म्हणून मी मोबाईल काढला.एवढ्यात शेजारच्या ब्लॉकचा दरवाजा उघडला.बाहेर आलेल्या मध्यम वयाच्या  गृहस्थांनी मला विचारले. तुम्हाला कोण पाहिजे ?मगाचपासून ते मला खिडकीतून पाहात असावेत.त्यांनी कोण पाहिजे असे मला विचारता मी दीप्तीच्या दरवाजाकडे बोट दाखविले . त्यावर त्यांनी ती मंडळी इथे नेहमी राहत नाहीत .मधूनच केव्हा तरी येतात .असे उत्तर दिले .दीप्ती  इथे शाळेत नोकरी करते ना?यावर त्यांनी मला माहित नाही असे उत्तर दिले .त्याचे बोलणे मला थोडे  गूढ वाढले .

तुम्ही कोण कशाला आला होतात असे त्यांनी विचारता  मीही त्यांना सहजच भेटायला आलो होतो असे मोघम उत्तर दिले .मी दीप्तीच्या वडिलांना फोन करण्याचा बेत रद्द केला.  त्यांनी सांगितलेल्या शाळेत जाऊन दीप्ती तिथे नोकरी करते की नाही याची शहानिशा करून घेण्याचे ठरविले . तिच्या शाळेत जावून चौकशी करता या नावाची इथे कुणीही शिक्षिका नाही असे उत्तर मला त्यांच्या ऑफिसमध्ये मिळाले . दीप्ती नोकरी करते ही कदाचित त्यांनी मारलेली थाप असेल असे मला वाटले .अशी थाप त्यांनी का मारावी असा प्रश्न मन कुरतडू लागला .एकूण सर्वच प्रकरण गूढ वाटू लागले होते .काही तरी कुठे तरी गडबड आहे असे जाणवत होते .

धक्क्यावर धक्के बसण्याचाच तो दिवस होता  .मी केव्हातरी फोनवर बोलताना माझ्या पोलिसांतील एका मित्राला माझे लग्न ठरले आहे असे सांगितले होते .त्या दिवशी मित्राच्या लग्नात आमची भेट झाली .त्याने गमतीने वहिनींचा फोटो आहे का? म्हणून मला विचारले .मी जरा खुशीत येऊन त्याला माझ्या मोबाइलमधील दीप्तीचा फोटो दाखविला .त्याने तो फोटो लहान मोठा करून निरनिराळ्या अँगलमधून पाहिला.हिला कुठेतरी पाहिलेले वाटते असे त्यावर तो म्हणाला .हा माझा मित्र पोलिसात आहे . पोलिसांना नेहमी सर्वत्र संशयाने पाहायची सवय असते .हिने एखादा गुन्हा केला म्हणून तर हा फोटो सर्वत्र प्रसिद्ध  झाला असे तर  नाही ना म्हणून मी त्याला थोडे थट्टेत  विचारले .त्याने विषय थट्टेत न घेता गंभीरपणे मला मोबाइलवर तो फोटो पाठव असे उत्तर दिले .मी त्याला तो फोटो त्याच्या मोबाइलवर पाठवला .दोन तीन तासांनी त्याचा मला तू लगेच पोलिस स्टेशनला ये असा फोन आला .

तिथे गेल्यावर एक वेगळीच स्टोरी उलगडली .ही मुलगी तिचे आई वडील भाऊ बहीण ही एक भामट्यांची टोळी आहे .श्रीमंत अविवाहित स्थळे शोधून काढायची .त्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचे.त्यासाठी वाट्टेल ती नाटके बेमालूम  करायची. काहीतरी कारण सांगून शक्यतितक्या लवकर लग्न करायचे,आणि दागदागिने पैसे जेवढे हाताला लागतील तेवढे घेऊन अदृश्य व्हायचे, अशी यांची मोडस ऑपरेंडी आहे .

दरवेळी निरनिराळ्या नावाने निरनिराळ्या शहरात ही टोळी आपला जम बसविते .श्रीमंत स्थळे हेरून त्यांना जाळ्यात अडकविते.व लग्नानंतर त्यांना चुना लावून अदृश्य होते .दीप्ती प्रीती ज्योती प्रगती कीर्ती  अशा नावाने तिने आतापर्यंत किमान चारपांच लग्ने केलेली आहेत.निदान एवढ्या गुन्ह्यांची पोलिस स्टेशनला नोंद आहे.आणखी काही लग्ने केली असल्यास त्याची आमच्याजवळ नोंद नाही.   

आम्हाला ही टोळी सापडत नव्हती .जे फसविले गेले ते पुरेसे सहकार्य करीत नाहीत .त्यांना पोलिसांची प्रश्नावली म्हणजे नसते झंझट वाटते .पोलिसांकडून विशेष काही होईल असे त्यांना वाटत नाही. पोलिसही आपले बळ एकवटून या केसेस मागे लागलेले नाहीत .त्यांना दुसरी अनेक महत्वाची कामे आहेत.नीट चौकशी न करता लोक फसतातच कसे असा त्यांना प्रश्न  पडतो.

आपण त्यांना रंगेहात पकडूया.असे म्हणून त्याने मला एक प्लॅन सांगितला .मी काही दिवसांची रजा टाकून कोल्हापूर व मुंबईला जाऊन आईवडिलांना व बहिणीला भेटून आलो.त्यांना सर्व हकीकत सविस्तर सांगून माझ्या पोलीस मित्राचा प्लॅनही सांगितला .वडीलही सुदैवाने सहकार्य करायला तयार झाले 

दीप्तीच्या बाबांना फोन करून आम्हालाही लवकर लग्न करायचे आहे असे माझ्या बाबांनी सांगितले .आमचे सावकाशीने लग्न करायचे मत अकस्मात का बदलले असा त्यांनी आडून आडून प्रश्न विचारला. त्यांना कदाचित काही संशय आला की काय कोण जाणे .

त्यावर बाबानी आमचे नेहमीचे ज्योतिषी नसल्यामुळे दुसऱ्या ज्योतिषांना पत्रिका दाखविली होती .त्यांनी लांबचा मुहूर्त दिला होता .पुढील सहा महिने मुलाला लाभत नाहीत असे सांगितले होते .आमचे नेहमीचे ज्योतिषी आल्यावर त्यांना पत्रिका दाखविता त्यांनी लवकर लग्न करायला कांहीच हरकत नाही म्हणून मुहूर्त काढून दिला असे पटणारे उत्तर दिले 

दीप्तीचे वडील डामडौल भपका यांच्या विरुद्ध होते .थोडक्यात लहान प्रमाणात लग्न करावे व वाचलेले पैसे एखाद्या धर्मादाय संस्थेला द्यावे असा त्यांचा उदात्त विचार होता.आम्हीही त्याला होकार दिला.नाशिकला आमच्या बाजूने नातेवाईक म्हणून लग्नासाठी हॉलमध्ये जमलेली बहुतेक मंडळी वेष पालटून आलेले पोलीस होते.प्रत्यक्ष लग्नाच्या वेळीच दीप्ती तिचे आई वडील भाऊ बहीण व आणखी काही मंडळींना   अटक करण्यात आली . 

आता त्यांच्यावर केस चालेल .कोर्टाच्या सवडीने निकाल लागेल .तूर्त गुन्हेगार मंडळी जामिनावर सुटलेली आहे .आम्हाला जेव्हा बोलावण्यात येईल त्यावेळी आम्ही साक्षीदार म्हणून जाऊ.

सुदैवाने आम्ही बालंबाल बचावलो आहोत .

त्या दिवशी फोन न करता अकस्मात त्यांच्या घरी जाण्याचे माझ्या मनात आले नसते तर कदाचित मीही त्या टोळीचा बळी ठरलो असतो .

*दीप्ती ही मला आपत्ती ठरली असती.*

*मित्राच्या लग्नासाठी मी नाशिकला जातो काय ?*

*मला पूर्वसूचना न देता त्यांच्या घरी जाण्याचे मनात येते काय?*

*मला माझा पोलीस मित्र तिथे भेटतो काय?*

*सहज आमच्या गप्पा माझ्या लग्नावर येऊन तो फोटो पाहतो काय?*

*आणि एका टोळीचा पर्दाफाश होतो काय?* 

*मी सही सलामत शंभर टक्के या संकटातून सुटतो काय?*

*सर्वच अचंबित करणारे आहे.*

*अशा वेळी आपले दैव म्हणून काहीतरी एक चीज नक्की आहे हे मान्य करावे लागते.*

(समाप्त)

२६/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel