बाळ्याचे नाव तसे बळवंत होते.त्याचे वडील दत्तोपंत यानी त्यांच्या आजोबांच्या नावावरून हे नाव ठेवले होते .दत्तोपंतांचे आजोबा बळवंत यांचे नातवावर म्हणजेच दत्तोपंतांवर खूप प्रेम होते.वृद्धापकाळामुळे ते वारले आणि नंतर बाळ्याचा जन्म झाला .त्यामुळे दत्तोपंतांनी आपल्या मुलाचे नाव बळवंत ठेविले होते .त्याला आपले नाव मुळीच आवडत नसे .दत्तोपंत म्हणत ठीक आहे बळवंत नाही तर आपण तुला बाळ म्हणूया.बाळ नावाचे लोक फार मोठे असतात .उदाहरणार्थ बाळ गंगाधर टिळक .बाळ्याला बाबांचे हे बोल अजिबात पटत नसत.तो लहान होता तेव्हा त्याला बाळ या नावाचे काही वाटत नसे.शाळेत नाव घालतानाही त्याचे नाव बळवंत म्हणून घातले गेले .त्याचे संपूर्ण नाव कोणीही कधीही उच्चारत नसे .सगळे त्याला बाळ्या म्हणूनच हाक मारीत असत.आता हे नाव काही बदलायची सोय नव्हती .अर्थात सरकारमध्ये अर्ज करून नाव बदलून घेता आले असते .परंतु त्याचा काही उपयोग नव्हता.त्याला सगळे बाळ्या म्हणूनच हाक मारणार होते.अर्थात न ओळखणार्यानी कदाचित त्याला नवीन नावाने हाक मारली असती.परंतु त्याचा विशेष काही परिणाम झाला नसता.
बाळ्या,' बाळ्या होता असे म्हटले तर तुम्हाला कसे वाटेल ?मुद्दा असा की तो जातीवंत बुजरा होता .चालताना किंवा शाळेत गेल्यावरही आणि पुढे कॉलेजमध्ये गेल्यावरही त्याची मान सतत खाली झुकलेली असे.तो बावळट होता असे मुळीच नाही .तो अभ्यासात हुषार होता .जरी पहिला नंबर नाही तरी पहिला वर्ग फर्स्टक्लास त्याने कधी सोडला नाही.तो मुखदुर्बळ होता .कधी मान वर करून तो धीटपणे कुणाशीही केव्हाही बोलला नव्हता .त्याला मित्रही फारसे नव्हते .जे होते त्यांच्यात तो थोडा बहुत रमत असे.त्याची आई व वडील त्याला नेहमी म्हणत की तू असा कसा रे ? त्यावर तो काहीही न बोलता गप्प राहात असे . एखादी मुलगी त्याच्याशी जर बोलायला आली तर हा धडपणे बोलत नसे .त्याची जीभ जड पडत असे.
गल्लीत जुने नवे खेळ चालत असत .क्रिकेट विटीदांडू लगोरी आबाधुबी फूटबॉल इ.त्याला आधी मुले खेळायला बोलवत नसत .जर एखाद्याने बोलाविले तर तो जात नसे.जी गोष्ट मैदानी खेळांची तीच बैठ्या खेळांची. पत्ते गंजिफा सोंगट्या बुध्दीबळ कुठेही तो जात नसे .बाळ्या लहान होता तेव्हा स्मार्ट फोन नव्हते.गल्लीत मैदानी खेळ घरी बैठे खेळ सुट्टीत जोरात चालत असत.मुलांनी व मोठय़ांनी बाळ्या ,बाळ्या,म्हणून त्याला पुरता बाळ्या करून टाकला होता .
बाळ्या दहावी चांगल्या मार्कांनी पास झाला.नामांकित कॉलेजमध्ये त्याला अॅडमिशन मिळाली .आता तरी त्याला कुणी बाळ्या म्हणणार नाही असे वाटत होते.परंतु कसचे काय त्यांच्या कॉलनीतील एक मुलगा या कॉलेजमध्ये होता.त्यांच्या शाळेतील एक मुलगा या कॉलेजमध्ये आला.दोघेही जातिवंत खट्याळ असल्यामुळे त्यांनी बाळ्या नाव कॉलेजभर करून टाकले.आता मुलीही त्याला बाळ्या म्हणू लागल्या .
तसा तो दिसायला वाईट नव्हता .चेहराही विशेष बावळट नव्हता .पाच फूट सहा इंच उंची, गहू वर्ण, काळेभोर डोळे, कुरळे केस,रुंद कपाळ, किंचित अपरे नाक,तसा तो दिसायला चांगला होता की!जर तो खांदे पाडून आणि खाली मान घालून चेहर्यावर थोडे बावरले भाव ठेवून राहिला नसता तर त्याला कुणीही बर्यापैकी स्मार्ट आहे बुवा असे म्हटले असते .जर तो ताठ मानेने ताठ कण्याने चेहऱ्यावर स्मित ठेवून किंचित छाती पुढे काढून चालला असता तर त्याला कुणीही स्मार्ट म्हटले असते.
तर हा असा आपला बाळ्या कॉलेज पूर्ण करून नोकरीला लागला .शाळेत त्याला मुलींजवळ बोलावे असे वाटे .परंतु कधीही धीर होत नसे.उलट मुली बोलायला आल्या तर हा बावरून जात असे . काय बोलावे ते त्याला सुचत नसे .त्याची जीभ बहुधा लुळी पडत असे .कॉलेजमध्येही तीच तर्हा त्याच्यात काही बदल नाही.तो जे काही बोलत असे ते मनातल्या मनात .मनातल्या मनात तो धीटपणे वागत असे .इतर तथाकथित चटपटीत मुलांपेक्षा चटपटीत वागत असे.कुणी मुलींची खोड काढीत असला तर तो मारामारीही करीत असे .परंतु हे सर्व मनातल्या मनातच .
त्याची नोकरी बँकेत होती .त्याला अंधेरीची ब्रँच मिळाली होती .हा दादरला रहात होता.त्याने फर्स्ट क्लासचा पास काढला होता.गर्दीच्या प्रवाहाच्या विरुद्ध तो जात असल्यामुळे गर्दी एवढी नसे.तरीही बऱ्यापैकी गर्दी असे.बसायला जागा केव्हा मिळत असे तर केव्हा उभे राहून जावे लागत असे.तो कधीही पुढे घुसून जागा पटकावित नसे.मिळाली तर मिळाली ,नाही मिळाली तर नाही मिळाली,असा त्याचा नेहमी दृष्टिकोन असे .एखादा वाटेतल्या स्टेशनवर उतरण्यासाठी उठला तर हा तिथे पटकन बसून घेत नसे.हा बसण्यासाठी जाईपर्यंत दुसराच कुणीतरी तिथे बसलेला असे.एकूण पुढे घुसणे चटपटीतपणा तो कुठेच दाखवीत नसे. कदाचित त्याच्यामध्येच तो नसावा .
कधी कधी तो बसने जात असे .तिथेही त्याचा हाच खाक्या होता .त्यामुळे कुठेही तो उभा राहूनच साधारणपणे प्रवास करीत असे .
ऑफिसमध्ये काही मुले साहेबांपुढे हुषारी दाखवतात.मुलींपुढे ओव्हर स्मार्टनेस दाखवतात .विशेष जास्त काम न करून सुद्धा ते आवडते होतात.याचा खाक्या त्यांच्या विरुद्ध होता.आपले काम बरे की आपण बरे .कुणाच्या आल्यात नाही गेल्यात नाही. अध्यात नाही मध्यात नाही.साहेबांच्या पुढ्यात पुढ्यात नाही की कुणा मुलींवर लाईन इम्प्रेशन नाही .इतर चहा प्यायला जात.चकाट्या मारीत बसत.हा आपला सदा कामात .याच्या गरीबपणाचा फायदा घेऊन याच्यावर इतरही आपली कामे सोपवून जात असत .
असा हा बाळ्या एक दिवस आई वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी मुकाट्याने लग्न करील व चारचौघांसारखा सरळ संसार करील असा स्वाभाविक तुमचा अंदाज असेल तर तुम्ही काही चुकत नाही .सगळ्यांचा अंदाजहि तसाच होता .
परंतु विधिलिखित कुणाला चुकले आहे काय ?बाळ्याचे विधिलिखित थोडे निराळे होते त्याला तो तरी काय करणार ?
बाळ्याचा हा बावळटपणा एक मुलगी पाहात होती .तीही अंधेरीला नोकरी करीत होती .ती दादरहून अंधेरीला बाळ्याप्रमाणेच जात असे .तिच्या वडिलांची नुकतीच मुंबईला बदली झाली होती .त्यांचा स्वतःचा दादरला शिवाजी पार्क येथे ब्लॉक होता .पूर्वीपासून ते इथेच राहात होते.मध्यंतरी काही वर्षे त्यांची बदली मुंबईबाहेर होती .त्यामुळे या मुलीने बाळ्याला आत्तापर्यंत पाहिले नव्हते .त्याचा बुजरेपणा,त्याचे मान खाली घालून चालणे,त्याचे कुठेही पुढे न होणे,तिला सर्वच कुतूहलजनक वाटत होते.
ती बरीचशी बाळ्याच्या उलट होती.पहिल्यापासून ती कुठेही मिसळणारी आक्रमक स्वभावाची होती .तिच्या अनेक मित्र मैत्रिणी होत्या .सुरुवातीला योगायोगाने ती बाळ्याच्या ट्रेनमध्ये त्याच्याच डब्यात चढली होती .नंतर ती त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झाल्यामुळे नेमाने त्याच ट्रेनने अंधेरीला जात असे .तिला कुतुहल का निर्माण झाले ते ब्रह्मदेवालाच माहित.तसे त्याच्यात कुतुहल निर्माण होण्यासारखे काय होते हा प्रश्नच आहे. एक दिवस ट्रेनमध्ये ती असताना तिची एक मैत्रिण योगायोगाने त्याच डब्यामध्ये चढली.तिने तिला मोठ्याने काय बाळी? इकडे कुठे? असे विचारले .प्रथम आपल्यालाच कुणीतरी हाक मारली असे बाळ्याला वाटले .नंतर बाळ्या नसून बाळी असे आहे हे त्याच्या पुढच्याच क्षणी लक्षात आले .त्याला योगायोगाची फार गंमत वाटली.आपण बाळ तर ही बाळी हिला बाळी नावाचे काही वाटत असेल काय ?तिला तसे काही वाटत असल्याचे दिसत नव्हते .तिने बाळी नावाला दिलखुलास ओ दिली होती .बाळाच्या मनात आपली जोडी किती खुलून दिसेल अशी एक गमतीची कल्पना आली.आपण बाळ तर ही बाळी.
हिचे नाव काय असेल बरे?असा पहिला प्रश्न त्यांच्या मनात आला.त्याचा काही अंदाज चालेना.ही कुठे रहात असेल? ही नोकरी करीत असेल काय?तिने आपल्याला पाहिले आहे काय ?आपला बावळटपणा बघून तिला काय वाटत असेल ?आता आपण जरा धीट झाले पाहिजे.रोज ही याच गाडीला असते का?असेल तर आपल्या लक्षात आत्तापर्यंत का आले नाही ? उद्यापासून हिच्यावर लक्ष ठेवले पाहिजे .असे अनेक प्रश्न, अनेक विचार त्यांच्या मनामध्ये आले .
दुसऱ्या दिवशी उत्सुकतेने तो वाट पाहात होता .गाडी सुटता सुटता ती चपळाईने डब्यात चढली.तिला बघितल्यावर त्याने एक खोल दीर्घ श्वास सोडला.त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.त्या दिवशी डबा जरा रिकामाच होता .ती त्याच्या समोरच्या सीटवर येऊन बसली .तिने त्याच्याकडे एक ओझरता कटाक्ष टाकला .त्याने पूर्वी आपल्याला पाहिलेले आहे.तो आपलीच वाट पाहात होता.आपल्याला पाहून त्याला समाधान वाटले .या सर्व गोष्टी तिला त्या एका कटाक्षात त्याच्या चेहऱ्यावर वाचता आल्या.तिने स्वतःशीच मंद स्मित केले.ती तशी फार सुंदर दिसायला होती असे नाही.परंतु ती त्याला कुठे तरी आवडली होती .एखादा मनुष्य आपल्याला का आवडतो किंवा का आवडत नाही हे सांगता येणे मोठे कठीण आहे.
त्या दिवसापासून त्यांने आपल्यात अामूलाग्र बदल करायला सुरुवात केली.किंवा असे म्हणूया की त्याच्यात तिच्या दर्शनाने काहीतरी फरक पडला.बाळ्याने टापटिपीने राहायला सुरुवात केली.त्याने जाणीवपूर्वक आपले चालणे बदलले .त्याच्या चालण्यात, चालण्यातच काय तर चेहऱ्यावरही आता आत्मविश्वास दिसू लागला .त्याची हालचाल पूर्वी जी मंद होत असे त्याऐवजी त्यांमध्ये चटपटीतपणा आला.त्याच्यातील सूक्ष्म बदल, म्हटल्यास ठळक बदल, तिच्या लक्षात येत होते.आपण त्याला आवडतो हे तिच्या लक्षात आले होते. अजूनपर्यंत त्यांच्यामध्ये काहीही बोलणे झाले नव्हते .रोज एकाच गाडीने जात असूनही त्यांनी ओळखीचे स्मित केले नव्हते .त्याला तिचे टोपण नाव अपघाताने माहित झाले होते . परंतु खरे नाव माहीत नव्हते .त्याचे नाव तर तिला मुळीच माहीत नव्हते .आपले नाव तिला कळले तर तिला काय वाटेल असे त्याला वाटे.आपल्याला ओळखणारा कोणी भेटू नये .भेटल्यास त्याने आपल्याला नावाने हाक मारू नये अशी तो रोज मनोमन प्रार्थना करीत असे.एक दिवस त्याची प्रार्थना अर्धी सफल झाली .त्याचा मित्र त्याला भेटला .परंतु त्याने नावाने हाक मारली नाही.दोघांनी अंधेरी येईपर्यंत बऱ्याच गप्पा मारल्या .मित्राला पुढे जायचे होते .बाळ्या उतरण्यासाठी निघाल्यावर त्याने बर तर बाळ्या भेटू पुन्हा म्हणून मोठ्याने म्हटले. त्याची प्रार्थना फुकट गेली .आपले बाळ नाव ऐकून तिला काय वाटले असेल असा विचार त्यांच्या मनात आला .त्याचबरोबर तिचे नाव पहिल्यांदा ऐकले त्यावेळी आपल्या मनात आलेला विचार तिच्या मनात येईल का? असाही एक विचार त्याच्या मनात आला.
त्याच्या मित्राने त्याला निरोप घेताना मारलेली हाक ऐकून ती जरा चमकलीच.बाळ्याच्या मनात आलेला विचार बरोबर तिच्याही मनामध्ये आला .आपण एकमेकांना बहुधा मॅचिंग आहोत.आपली टोपण नावेही मॅचिंग आहेत.त्याचे खरे नाव काय असेल? असाही विचार तिच्या मनात आला.अजूनपर्यंत दोघांनी एकमेकांकडे बघून ओळखीचे स्मितही केले नव्हते.
एक दिवस ती पैसे भरण्यासाठी त्याच्या बँकेत गेली होती.कॅशिअर काऊंटरवर त्याला बघून तिला गंमत वाटली. स्लिपवरून त्याला तिचे नाव कळले.तिचे नाव बालिका होते बालिकाचे हाक मारण्यासाठी सुटसुटीत बाळी असे नाव झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीत त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी एकमेकांकडे बघून स्मित केले .नंतर रोजच स्मित होऊ लागले.कुणाला कोण आवडावे याचे काही नियम नाहीत .बऱ्याचदा विरुद्ध स्वभावाच्या माणसांना का कोण जाणे एकमेकांचे आकर्षण वाटते.कदाचित हा त्यातलाच प्रकार असावा .मनोमन दोघेही एकमेकांना पसंत होती . डेटिंग, फिरायला जाणे,हॉटेलमध्ये जाणे, सिनेमाला जाणे, इत्यादी पुढच्या पायऱ्या यापुढे होतील असे दोघांनाही मनोमन वाटत होते .त्याने प्रथम सुचवावे असे तिला वाटत होते .आणि त्याला तसे विचारण्याचा धीर होत नव्हता .दिवस असेच चालले होते .
एक दिवस गंमतच झाली .तिच्या वडिलांनी ती घरी आल्यानंतर तिच्या पुढ्यात एक फोटो टाकला .हा मुलगा तुला कसा काय वाटतो ते सांग असे ते म्हणाले.तिने मला एवढ्यात लग्न करायचे नाही म्हणून सांगितले.तिला म्हटले तर ओळखीचा म्हटले तर अनोळखी अशा बाळ्याला तिच्याबद्दल काय वाटते ते जाणून घ्यायचे होते .वडिलांनी हे मध्येच लग्नाचे तिला काही विचारल्याशिवाय काय काढले असे तिला वाटले.वडिलांनी फोटो तर पाहा असे तिला म्हटले.वडिलांचा थोडासा धाक आणि थोडेसे कुतूहल यामुळे तिने तो फोटो पाहिला .ती फोटो पाहते तो,तो फोटो बाळ्याचा होता.
झाले ते असे झाले .बाळ्याचे नाव त्याच्या वडिलांनी एका मॅरेज ब्युरोमध्ये नोंदविले होते.तिथूनच तिच्या वडिलांनी हा फोटो सर्व दृष्टींनी मुलगा आवडला म्हणून आणला होता .
पुढे काय झाले ते सांगायला पाहिजे का ?पाहण्याचा कार्यक्रम झाला .अर्थातच परस्परांनी होकार दिला .साखरपुडा विवाह यांच्या तारखा ठरल्या.
*डेटिंग,फिरणे, हॉटेलिंग, सिनेमा, इत्यादी सर्व साखरपुड्याअगोदर व साखरपुड्यानंतर परंतु लग्नाअगोदर झाले.*!
*प्रेम विवाह झाला परंतु प्रेम विवाहाचे थ्रील त्याना अनुभवायला मिळाले नाही *
*त्यांची मनोमन इच्छा असूनही त्यांचा चार जणांचा होतो त्याप्रमाणे प्रेमविवाह होऊ शकला नाही *.
*दाखवून चार जणांसारखे त्यांचे लग्न झाले असे आपण म्हणू शकतो*
*त्यांची संपूर्ण कहाणीच एकप्रकारे थ्रीलिंग नव्हती का*?
१०/४/२०१९©प्रभाकर पटवर्धन