*लव्ह ट्रँगल *१/२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी याचा संबंध नाही.तसा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा )

अमर

त्या दिवशी मी कॉलेज कॅन्टिनमध्ये मित्रांबरोबर  गेलो होतो .एका कोपऱ्यात एक मुलींचा ग्रुप कॉफी पीत बसला होता .त्यात एक मुलगी नवीनच दिसत होती .ती बहुधा दुसऱ्या कॉलेजमधून इकडे कुणाला तरी भेटायला आलेली असावी .माझा अंदाज बरोबर होता .पाहता क्षणीच ती मुलगी मला आवडली होती .ती गेल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला ती कोण होती म्हणून विचारले. सुषमाची ती खास मैत्रीण होती. दहावीपर्यंत दोघी एकाच शाळेत होत्या .नंतर सुषमा आमच्या कॉलेजात आली आणि प्रिया दुसऱ्या कॉलेजात गेली.दोघी एकाच सोसायटीमध्ये राहत होत्या .मी खोदून खोदून जास्त चौकशी करतो असे पाहिल्यावर सुषमाने विचारले.कायरे तिच्या प्रेमात पडला की काय ?त्यावर मी कसनुसे हसून नाही असे म्हणालो .त्यावर सुषमा मिश्किलपणे हसली .

दुसऱ्या दिवशी भेटल्यानंतर मी तिला  प्रियाबद्दल जास्त माहिती विचारली.तिचे वडील एका ऑफिसमध्ये हेड क्लार्क म्हणून काम करीत होते .मी तिला माझी प्रियाशी ओळख करून दे म्हणून सांगितले.चार दिवसानी सुषमाने एका बागेत  मला संध्याकाळी सहा वाजता बोलाविले.त्याच वेळी सुषमा प्रियाला घेऊन बागेत सहज फिरण्यासाठी म्हणून अाली.पूर्वनियोजित परंतु सहज अशी आमची भेट झाली .प्रिया फार सुंदर होती असे नाही. तिचे डोळे पाणीदार होते .चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची चमक दिसत होती .तिचा आवाज मंजुळ होता . बोलण्यात गोडवा होता .ती बोलताना सुंदर वाटत होती .तिचे बोलणे ऐकताना चांदीच्या घंटेचा आवाज ऐकल्या सारखे वाटे.काही असो ती मला आवडली होती एवढे खरे .

आम्ही जेव्हा जेव्हा भेटत असू तेव्हा तेव्हा ती एक विशिष्ट अंतर राखून राहते असे मला आढळून आले .कदाचित तिच्या संकोची स्वभावामुळे असे होत असेल असे मला वाटले .ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली होती.तिला मी एकदा स्पष्टच विचारले की तिला मला भेटायला आवडत नाही का?त्यावर तिने गुळमुळीत उत्तर दिले .एकदा मी सिनेमाला गेलो असताना ती दुसऱ्या एका मुलाबरोबर सिनेमाला आलेली आढळली. मी तिला सहज भेटल्यासारखे दाखवून भेटलो .मला पाहून ती दचकली असे मला वाटले.

प्रिया

त्या दिवशी मी सुषमाला भेटायला गेले होत्ये .तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारत असताना एक मुलांचा ग्रुप कॅन्टीनमध्ये आला .त्या ग्रुपमध्ये अमर होता .माझ्या समोरच दूरच्या टेबलाजवळ तो बसला होता .तिथून तो मधून मधून माझ्याकडे पाहात होता .मी त्याला आवडले आहे हे माझ्या लगेच लक्षात आले.नंतर आमची एका बागेत भेट झाली.मी सुषमाबरोबर फिरत असताना तो समोर आला.ही भेट पूर्वनियोजित परंतु सहज अशी होती हे माझ्या लगेच लक्षात आले.त्याला मी आवडले आहे हे मला लगेच कळले .अशा गोष्टी बायकांना लगेच कळतात.खरे म्हणजे ज्या दिवशी त्यांने त्याच्या कॉलेजच्या  कॅन्टीनमध्ये मला बघितले तेव्हाच तो माझ्या प्रेमात पडला आहे हे मी ओळखले .अमर स्वभावाने तसा चांगला होता .मला तो मित्र म्हणून आवडला होता .परंतू जीवन सहचर म्हणून त्यांच्याकडे मी पाहणे शक्य नव्हते.कारण माझे अगोदरच दुसऱ्या एका मुलावर प्रेम होते.  

हेमंत व मी फार पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होतो.आमचे भावबंध जुळले होते .एकमेकांना कायमची साथ द्यायची हे आम्ही अगोदरच ठरविले होते .आम्ही दोघांनी हेमंत व मी,त्याचे शिक्षण पुरे होऊन तो नोकरीला लागल्यानंतर लग्न करायचे असे केव्हाच ठरविले होते. अमर श्रीमंत होता .त्याचे वडील काकासाहेब हे शहरातील एक बडे प्रस्थ होते .तर हेमंत  मध्यमवर्गीय होता.स्थळ म्हणून अमर कुणालाही आकर्षक वाटला असता .परंतु प्रेम हे गरीब श्रीमंत वगैरे बघून होत नसते.

मी त्याला उत्तेजन द्यायचे नाही असे ठरविले .त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर मैत्री तोडायची नाही असेही ठरविले.

हेमंत

त्या दिवशी सिनेमाला मी व प्रिया गेलो होतो .सिनेमा सुटल्यावर अकस्मात आमची भेट अमरशी झाली .त्याला प्रिया अगोदरपासूनच ओळखत होती .मी व प्रिया सिनेमाला आलो होतो ते त्याला आवडले नाही हे त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते.हा बेटा प्रियावर प्रेम करीत असणार हेही मी ओळखले .मी प्रियाला त्याच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला .आम्ही एकत्र चहा घेतला आणि नंतर निरोप घेतला .तो मधून मधून प्रियाला भेटतो .प्रियाशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतो.प्रियाने त्याला उत्तेजन अजिबात न देताही तो वारंवार प्रियाला भेटण्याचा प्रयत्न करतो .एक दिवस तो प्रियाला लग्नाचे विचारणार .हे सर्व वेळोवेळी मला प्रियाकडून कळत होते .तो स्वभावाने चांगला होता .तो मित्र म्हणून स्वीकारार्ह होता .याही गोष्टी मला वेळोवेळी प्रियाकडून कळत होत्या .एक दिवस त्याला माझे व प्रियाचे प्रेम लक्षात येईल आणि तो तिचा नाद सोडील असे आम्हाला वाटत होते .तसे स्पष्ट प्रियाने त्याला सांगावे असेही मी प्रियाला सांगितले .प्रियाच्या संकोची व भिडस्त स्वभावात ते बसत नव्हते. 

अमर

आता प्रिया भेटली किं तिला मागणी घालावी असे मी ठरवीत असे .परंतु तिला भेटल्यावर माझी जीभ लुळी पडत असे .तिने नाही म्हटले तर ?त्यापेक्षा विचारणेच नको असे वाटे.तिच्या मैत्रीला आपण दुरावू असे वाटत असे .असे एक वर्ष गेले.मी पास होऊन वडिलांना त्यांच्या कारखान्यात मदत करू लागलो .हल्ली आमच्या भेटीही कमी होत होत्या .माझ्या लग्नाची बोलणी घरात सुरू झाली .

काकासाहेब (अमरचे वडील )

अमर आता कारखान्यात बऱ्यापैकी रुळला होता .हळूहळू कारखान्याची धुरा त्याच्याकडे सोपवून आपण निवृत्त व्हावे असा विचार माझ्या मनात होता. आतापर्यंत कारखाना उर्जितावस्थेला आणण्यासाठी मी अतोनात परिश्रम घेतले होते.माझ्या आवडत्या गोष्टींसाठी मला वेळ देता आला नाही.कारखाना अमरवर सोपववा, कारखान्यातील लक्ष कमी करावे.आता आपल्याला आवडतात त्या गोष्टी कराव्यात असा विचार होता .त्याचे लग्न करावे म्हणजे त्याला स्थैर्यही येईल . त्याचे मित्रांबरोबर भटकणे कमी होईल .तो कारखान्यात जास्त लक्ष घालू लागेल. घरातही जास्त लक्ष देईल .हिलाही व्यापातून सवड मिळेल .असा सर्व विचार करून आम्ही त्याचे लग्न करायचे ठरविले .त्याने अगोदरच  ठरविलेले नाही ना याची त्याच्याजवळ चौकशी केली .त्यावर त्याने कुणी प्रिया नावाची एक मुलगी त्याला आवडत आहे. तिच्या बरोबर त्याची ओळखही आहे. तिच्याबरोबर त्याला लग्न करायचे आहे असे त्याने सांगितले .तिच्या वडिलांचे नाव विचारता त्याने माधवराव म्हणून सांगितले ते कुठच्या तरी ऑफिसमध्ये  हेड क्लार्क होते .जास्त चौकशी करता तो माझा बालपणीचा मित्र निघाला .मी त्याला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो माधव व मी एकाच शाळेत एकाच वर्गात एका बाकावर बसत होतो .दहावीनंतर मी शहरात आलो नंतर आमचा काही विशेष संबंध राहिला नाही .आता या निमित्ताने संबंध जोडण्याचा योग आला याबद्दल आम्हा दोघांनाही आनंद झाला .

अमरच्या बोलण्यावरून त्या दोघांनी परस्परांना पसंत केले आहे असे मला वाटते असे माधवला सांगताच त्यालाही आनंद झाला .दुसर्‍या  दिवशी प्रियाला घेवून त्या सर्वाना आमच्या घरी बोलाविले .

प्रिया

बाबांनी मला दुसऱ्या दिवशी काकासाहेबांकडे जायचे आहे असे सांगितले .काकासाहेब बाबांचे बालपणीचे मित्र आहेत असेही कळले काकासाहेबांकडे काही फंक्शन असेल आणि आम्हाला बोलावले असेल असे मला वाटले.तिथे आम्ही गेलो तर वेगळेच फंक्शन आहे असे लक्षात आले .मला दाखवण्याचा बघण्याचा कार्यक्रम होता .तिथे मी काहीच बोलू शकले नाही .घरी गेल्यावर सविस्तर बाबांना सांगू असे मी ठरविले .बाबा माझ्यावर सक्ती करणार नाही याची मला खात्री होती .

परंतु कसचे काय, घरी जाताना आमच्या रिक्षाला अपघात झाला.मला मुळीच लागले नाही. आईला किरकोळ लागले,परंतू बाबांना फ्रॅक्चर  होऊन दवाखान्यात अॅडमिट करावे लागले . विशेषतः त्यांच्या डोक्याला मार लागला होता .त्यांना धक्का पोचेल असे काही करू नका म्हणून डॉक्टरांनी सूचना दिली होती .  बाबा शुद्धीवर आल्यावर त्यानी एकच ध्यास घेतला .पुढील सर्व बोलणी होऊ द्यात. मला मुलीचे लग्न पाहायचे आहे. बाबांच्या अशा बिकट परिस्थितीत मला कुणाजवळच काही बोलता येईना. काकासाहेबांना अॅक्सिडेंटचे कळल्यावर ते लगेच हॉस्पिटलमध्ये आले.मोठ्या डॉक्टरांना भेटून त्यांनी ऑपरेशन औषधोपचार वगैरेसाठी एक लाख रुपये डिपॉझिट हॉस्पिटलमध्ये भरले .आईला व मला घाबरू नका सर्व काही व्यवस्थित होईल म्हणून सांगितले .आम्हाला संकोच वाटू नये म्हणून पंचवीस हजार रुपये ड्रायव्हर बरोबर पाठवून दिले .जे जे होत होते ते ते पाहण्याशिवाय मला काहीही गत्यंतर नव्हते .हेमंतबद्दल आई वडिलांना सांगण्यासाठी मला संधीच मिळाली नाही.

क्रमशः 

लव्ह ट्रँगल  २/२     

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी याचा संबंध नाही.तसा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा )

हेमंत

गोष्टी इतक्या झपाट्याने घडत गेल्या की मला काही उलगडा होत नव्हता .पंधरा दिवस मला प्रिया भेटली नव्हती .मी फोन केला तर ती धड उत्तरही देत नव्हती . तिचे वडील खूप आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत एवढेच मला कळले .नंतर त्यांना अपघात झाल्याचे कळले .एक दिवस प्रियाने मला बागेत भेटण्यासाठी बोलाविले .तिथे तिने सर्व हकीगत सविस्तर मला सांगितली . बोलताना ती सारखी रडत होती . काकासाहेबांच्या उपकराखाली ती दबली गेली होती.दुसरीकडे बाबांना धक्का बसू नये म्हणून तिला काळजी घ्यायची होती .त्या विशिष्ट परिस्थितीत आईलाही ती काही सांगू शकत नव्हती .सर्व बाजूने तिची कोंडी झाली होती .मलाही अजून नोकरी मिळाली नव्हती .काकासाहेबांचे पैसे फेडायचे म्हटले तरी मी कुठून  फेडणार होतो.मी तिला धीर दिला .सर्व काही व्यवस्थित होईल म्हणून सांगितले .हे सर्व बोलणे पोकळ आहे हे तिला व मलाही कळत होते .

अमर

सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या पटापट घडून येत होत्या .बाबांनी माझे म्हणणे ऐकणे.प्रियाच्या बाबांना दुसऱ्या दिवशी घरी बोलाविणे.प्रियाने काहीही विरोध न करता मूक संमती देणे .मी प्रियाला प्रपोज करायला उगीचच घाबरत होतो .माझ्या मनात जे होते तेच तिच्या मनात होते . तिच्या बाबांना अपघात झाला तेवढेच त्यात वाईट झाले.बाबा बरे होऊन घरी येईपर्यंत आम्हाला वाट पाहणे भाग होते .महिन्याभरात बाबा घरी आले .पुढे लग्नाची तारीख ठरली .पत्रिका वाटण्यात आल्या .आणि एक दिवस आमचे लग्नही झाले .त्या दिवशी कॅन्टीनमध्ये तिला पाहिल्यानंतर मी जो संकल्प सोडला होता तो पूर्ण झाला .

प्रिया

सगळ्या गोष्टी इतक्या जलद घडत गेल्या की मला कुठे त्या थांबविणे शक्यच झाले नाही .बाबांचे आजारपण,बाबांच्या मनाविरुद्ध काही घडू देऊ नका नाहीतर त्याचा कदाचित विपरीत परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होईल म्हणून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ,आईचा आनंद,कासाहेबांची लगबग ,अमरचे माझ्यावरील प्रेम ,मी व हेमंत या दोघांची तडफड,सर्व काही मी उघड्या डोळ्यानी बधीर होऊन पाहात होते .मी लग्नाला विरोध करू शकत नव्हते .

अमर

माझा आनंद गगनात मावत नव्हता. चार वर्षांपूर्वी मी प्रियाला पाहिले. त्यानंतर जे स्वप्न उराशी बाळगले ते  आज पुरे झाले होते .प्रियाशी माझा विवाह संपन्न झाला होता .माझ्या व तिच्या आईबाबांना खूप आनंद झाला होता .सर्व आनंदात दिसत होते .प्रिया माझी प्रिया मात्र अपेक्षेप्रमाणे आनंदात दिसत नव्हती .ती प्रत्येक वेळी चेहऱ्यावर खोटे हसू आणित होती असे वाटत होते .सगळ्यांना तिचा डोळे भरून आलेला चेहरा माहेर सोडून जाणार म्हणून  असावा असे वाटत होते .प्रिया जरा जास्तच भावनाप्रधान आहे असे एक दोघांना बोलतानाही मी ऐकले.हेमंतही लग्नाला आवर्जून आला होता.त्याचा चेहराही मला खिन्न दिसत होता .प्रियाच्या मनाविरुद्ध तर लग्न होत नाही ना असा विचार माझ्या मनात चमकून गेला .प्रियाला मी स्पष्टपणे तू माझ्यावर प्रेम करतेस ना? तुला माझ्याशी लग्न करायचे आहे ना?असे आत्तापर्यंत कधीच विचारले नव्हते .ती ज्या अर्थी विरोध करीत नाही त्या अर्थी तिला सर्व काही पसंत आहे असे मी सोईस्करपणे धरून चाललो होतो.नीट विचार करता ती कदाचित  नाही म्हणेल म्हणून मी घाबरत होतो असे वाटते .मी तिला स्पष्टपणे विचारणे आवश्यक होते .माझे प्रियावर अपरंपार प्रेम होते .तिच्या मनाविरुद्ध काही घडावे असे मला कधीच वाटले नव्हते .ती सदैव सुखी असावी असेच मला वाटत होते .

प्रिया

लग्न झाले आणि रात्र आली.पहिल्या रात्री मी दमले म्हणून सुटका झाली असती .कदाचित सत्यनारायण  झाल्याशिवाय आम्हाला एका खोलीत झोपू दिले नसते.आम्ही लगेच मधुचंद्रासाठी काश्मीरला जाणार होतो .केव्हा ना केव्हा ती रात्र तो प्रसंग येणार होताच.जो प्रसंग आनंदाचा असतो, कुतूहलाचा असतो, आयुष्यात एकदाच येणार असतो,जो यावा यावा असे प्रत्येकाला वाटत असते. तो येऊच नये असे मला वाटत होते .आतापर्यंत अनेक कारणाने जे मी बोलू शकले नाही ते बोलणे आवश्यक होते .त्या प्रसंगाला तसेच सामोरे  जाणे अमरचा विश्वासाघात ठरला असता. मला माझ्या आयुष्याच्या जोडीदाराचा विश्वासघात करायचा नव्हता .

अमर

आम्ही हाऊस बोटमध्ये पोचल्यावर प्रियाने तिला मला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे असे सांगितले . तिचा चेहरा गंभीर होता.तिच्या चेहऱ्यावर अभ्रे दाटून आली होती . प्रिया शांतपणे सावकाश बोलत होती.मधून मधून ती थांबत होती. मधून मधून तिला खूप गहिवरून येत होते.सर्व सांगत असताना तिला किती क्लेश होत आहेत ते स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत होते . आणि ते सर्व ऐकतांना माझ्या कानात गरम शिसे ओतल्यासारखे वाटत होते.मला प्रथमपासून ज्याची भीती वाटत होती  तेच ती सांगत होती .प्रिया हेमंतवर प्रेम करीत होती. हेमंतला नोकरी लागताच दोघे आपापल्या घरी सर्व काही सांगणार होती .त्या दिवशी अकस्मात एक साधे कसले तरी फंक्शन आहे म्हणून ती आमच्या घरी आली होती .तिच्या बाबांनी कशासाठी आपण जात आहोत हे तिला सांगितले नव्हते . आमच्या इथे ती काहीच बोलू शकत नव्हती . घरी गेल्यावर प्रिया बाबांना सर्व काही सांगणार होती .पण तो दुर्दैवी अपघात घडला .आणि सर्व चित्रच बदलले .नंतर सर्व घटना इतक्या भराभर घडल्या की प्रिया सुन्न होऊन गेली . एकीकडे बाबांच्या प्रकृतीची काळजी,त्यांना धक्का बसू देवू नका म्हणून डॉक्टरांनी घ्यायला सांगितलेली खबरदारी  दुसरीकडे आईचा आनंद, वेगाने घडणाऱ्या  घटना, यामुळे प्रिया काही बोलू शकली नाही .तिला कोणत्याही परिस्थितीत माझा विश्वासघात करायचा नव्हता . सर्वस्व अर्पण करण्याअगोदर तिला सर्व काही मला सांगून टाकायचे होते .सर्व काही सांगून ती स्तब्ध बसून राहिली .आम्ही दल सरोवरात सजविलेल्या स्वतंत्र बोटीमध्ये होतो.बाहेर निरव शांतता होती .सरोवराच्या पाण्यावर वाऱ्यामुळे मंद लाटा येत होत्या.पौर्णिमा होती .सर्वत्र शुभ्र चांदणे पडले होते .थंडी जाणवत होती . दोघांच्याही मनात आग पेटली होती .माझ्या मनात पश्चात्तापाची,तिला अगोदरच सर्व काही का विचारले नाही याबद्दलची . तर प्रियाच्या मनात हे सर्व सांगताना आलेल्या विलक्षण ताणाची.शेवटी मीच शांतता मोडली .आता आपण झोपूया उद्या यावर बोलू .प्रियाने मला तुम्ही रागावले का असे विचारले .त्यावर मी नाही परंतु मी उदास झालो आहे असे सांगितले .

प्रिया

दुसर्‍या दिवशी अमर काय बोलणार म्हणून मला रात्रभर झोप आली नाही .आम्हाला ज्यामुळे झोप येणार नव्हती त्यापेक्षा वेगळ्याच कारणाने झोप आली नव्हती अमरही रात्रभर तळमळत होता.दुसऱ्या दिवशी अमर जे काही बोलला ते ऐकून मी स्तिमित झाले .हे पाणी किती खोल आहे त्याचा मला अंदाज नव्हता.तो म्हणाला मी अज्जिबात रागावलेला नाही .रात्रभर विचार करून मी शांतपणे निर्णय घेतला आहे .

अशा परिस्थितीत आपण दोघांनी एकत्र राहणे बरोबर नाही .तू वेळीच सर्व परिस्थिती मला समजून सांगितली असतीस तर मी त्यातून कुणालाही न दुखविता मार्ग काढला असता .परंतु झाले ते झाले त्याला काही इलाज नाही .मी स्वार्थी नाही .माझे तुझ्यावर निरतिशय प्रेम आहे .तुझ्या सुखात माझे सुख आहे .तू दुःखी असशील, मनातल्या मनात कुढत असशील ,तर मी सुखी कसा असू शकेन?       असा संसार म्हणजे  जुलमाचा रामराम ठरेल.तूही सुखी होणार नाहीस.मीही सुखी होणार नाही .कदाचित आपण दोघेही सर्व विसरून जाऊ.आणि आपला सुखाचा संसार होईलही .पण मला हे पसंत नाही.

मी यावर उपाय शोधून काढला आहे  .*मी तुला हेमंतची माझ्याकडे ठेवलेली ठेव समजतो.ती ठेव त्याच्याकडे सुरक्षितपणे पोचवणे हे मी माझे कर्तव्य  समजतो .आपण पती पत्नी नाही. परंतु चांगले मित्र होऊन राहू शकतो 

*आठ दिवसांनी ठरलेल्या वेळी आपण परत जाऊ .इथे आलोच आहोत तर काश्मीर व्यवस्थित पाहून घेऊ .आपण आनंदाने मित्र म्हणून आहे ही परिस्थिती एन्जॉय करू या .उगीचच चेहरे लांब करून बसण्यात काही अर्थ नाही. तिथे गेल्यावर सर्व परिस्थिती तुझ्या व माझ्या आई बाबांना  समजून सांगू.आपण हेमंतला भेटून त्यालाही सर्व काही सांगू.आपण घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज करू .परस्पर संमतीने आपल्याला  घटस्फोट सहज मिळेल.

हेमंतला मी माझ्या किंवा दुसऱ्या कुठल्या कारखान्यात नोकरी लावून देईन.

*मी तुमचे दोघांचे लग्न लावून देईन .तू काळजी करू नकोस. हे मी रागाने म्हणत नाही.*

(यानंतर सहा महिन्यानी *एका पतीने पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिले*.म्हणून वर्तमानपत्रात छोटीशी बातमी आली. )

समाप्त 

२५/४/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel