(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

संजयला लहानपणापासून कुस्तीचा शौक होता .त्याचे वडील एक महान कुस्तीकार  होते.संजय जरी कुस्तीचा शौकीन असला आणि वडिलांना त्याने कुस्तीपटु व्हावे असे वाटत असले तरी त्याचबरोबर त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये असे त्यांचे मत होते .कुस्ती हा केवळ छंद असावा असे त्यांचे मत होते .

व्यायामाने संजयचे शरीर पीळदार व कसदार झाले होते. कुस्तीमध्ये तो अनेक जणांना सहज अस्मान दाखवू शकत असे .असे असले तरी त्याने शालेय,महाविद्यालयीन ,शिक्षण व्यवस्थित घेतले.तो चांगल्या मार्कानी बी.ई. झाला .त्याला पीडब्ल्यूडीमध्ये नोकरी लागली .जिथे रस्ता, बोगदा, धरण,कालवा किंवा अन्य काही प्रकल्प चालू असेल तिथे त्याला जावे लागे.कुठेही गेला तरी तो व्यायाम व योग केल्याशिवाय रहात नसे .त्याने ज्युडो व कराटे यामध्येही प्रशिक्षण घेतले होते.त्यामध्ये बऱ्यापैकी प्राविण्यही मिळविले होते . त्याला नेहमी जिथे प्रकल्प चालू असेल तिथे जावे लागत असल्यामुळे त्याने दोन बिर्‍हाडे ठेवली होती.एक शहरात जिथे त्याची मुले शिक्षण घेत होती.दुसरे जिथे तो प्रकल्पावर काम करीत असे .त्याचे आई वडील व पत्नी,आलटून पालटून  केव्हां इकडे तर केव्हां तिकडे रहात असत.प्रकल्पाच्या ठिकाणी कधी त्याला डाकबंगला रहायला मिळत असे,कधी उपलब्ध असेल शक्य असेल तर सरकारी क्वार्टर्स रहायला मिळत असे,तर कधी गावात जागा भाड्याने घेऊन रहावे लागत असे .

नुकतीच  त्याची बदली नवीन प्रकल्पावर आडगावला  झाली होती.इथे एक धरण बांधण्यात येणार होते .गाव लहान होता.इथे ना डाकबंगला, ना सरकारी क्वार्टर्स, गावातच राहावे लागत होते. धरणाची जागा गावापासून मोटारीच्या रस्त्याने लांब होती.जवळजवळ पंधरा वीस किलोमीटरचा वळसा घेऊन जावे लागत असे .धरणाच्या जागेपर्यंत जंगलातून पायवाट गेली होती .ते अंतर सुमारे पाच किलोमीटर असावे .धरणाच्या जवळ एक राहुटी उभारून तिथे ऑफिस सुरू केले होते . सरकारी जीपने  किंवा मोटारसायकलवर जाण्याऐवजी संजय रोज पायी येत जात असे .जाताना सकाळी तो शक्यतो पळत जात असे.तर येतांना तो जलद चालत येत असे.पायी जाण्याचे त्याचे दोन हेतू होते .अनायासे व्यायाम व्हावा हा त्याचा एक हेतू होता.दुसरा हेतू निसर्गरम्य वातावरणातून ये जा व्हावी हा होता . 

आडगाव ते धरण हा सर्वच परिसर निसर्गरम्य होता .विविध प्रकारची झाडे, लहानमोठी कुरणे, फुलझाडे, यांनी हा प्रदेश व्यापलेला होता.संजयला लहानपणापासून अशा वातावरणाची ओढ होती .निसर्गरम्य ठिकाणी तो कितीतरी वेळ स्तब्ध बसून राहत असे .निसर्गरम्य वातावरणात त्याची समाधी लागे.तो आडगावला आला तेव्हा थंडीचे दिवस होते .सकाळी जाताना काही वेळा सर्वत्र धुके पडलेले असे .दवबिंदूनी बूट, पाय, पँट, ओले होत असत.धुके नसेल तेव्हा सूर्य प्रकाशात दवबिंदू चमकत असत .निरनिराळ्या पक्षांचे मधुर संगीत चाललेले असे .फुलपाखरे लहान लहान फुलझाडावरून उडत  असत.केव्हांतरी लांबून कोकिळेचे कूजन ऐकू येई.वानरांचा चित्कार किंवा बूभूत्कार ऐकू येई.क्वचित एखादा हरणांचा कळपही दिसत असे . एकदा तर त्याने बिबट्याची डरकाळीही ऐकली होती.  हे सर्व अनुभवताना ,रस्ता केव्हा संपला  ते त्याला कळत नसे .व्यायामापरी व्यायाम,निसर्गरम्य वातावरणात सहल ,शुद्ध हवेमध्ये श्वसन सर्वच गोष्टी साधत असत. 

थंडीमुळे संध्याकाळ लवकर होत असे. संध्याकाळी त्याला यायला बऱ्याच वेळा उशीर होत असे.वाटेत वड पिंपळ यासारखी झाडे आहेत.अशी प्रचंड विस्तार असलेली झाडे भुतांना आवडतात.कातरवेळ वाईट असते.या रस्त्याने तू येत जाऊ नकोस .लांबच्या रस्त्याने, ऑफिसच्या जीपने ये ,असे त्याची पत्नी व आई त्याला अनेकदा सांगत असत.संजय तिकडे दुर्लक्ष करीत असे.भुते असोत किंवा नसोत आपल्याला ती कशाला त्रास देतील असे त्याचे मत होते .भूत वाटेल त्याला त्रास देत नाही .ज्याच्याशी त्याचा काहीना काही संबंध असतो त्यालाच ती त्रास देतात किंवा लाभदायी होतात ,असे संजयचे मत होते.जिथे संबंध असेल तिथे ती काही ना काही उपायांनी भेट देणारच,यावरही तो ठाम होता .उगीच काळजी कशाला करा ?

महिनाभर व्यवस्थित गेला.संध्याकाळी केव्हां चांदणे असे केव्हां नसे.एके संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखालून येत असताना त्याला स्पष्ट आवाज ऐकू आला ."मी येउं का?"आवाज स्त्रीचा आहे,कि पुरुषाचा आहे, ते त्याच्या लक्षात येत नव्हते. त्या आवाजात असे काहीतरी होते की त्याच्या काळजात चर्रss झाले.मागे न बघता तो तसाच शांतपणे चालत घरी आला . संजय मोठा धीराचा माणूस  होता.कोणत्याही प्रसंगात तो  गडबडून जात नसे. त्याला वडिलांनी सांगितलेले शब्द आठवत होते .कोणत्याही प्रसंगी घाबरू नये .घाबरल्यामुळे आपली बुद्धी व्यवस्थित काम करीत नाहीशी होते .अशा वेळी घेतलेले निर्णय योग्य नसतात .

त्याचे विचारचक्र चालू होते.आपल्याला कोणी विचारले ?एखादा झाडाखाली विश्रांती घेत असलेला वाटसरू असता तर आपल्याला दिसला असता. कदाचित त्याला सोबत हवी असेल. समजा काळोखामुळे दिसला नाही तरी त्याने पुढे येऊन आपल्याला विचारले असते.खरे म्हणजे रस्ता सर्वांचा आहे. असे विचारण्याचेही कारण नाही.विचारणारी व्यक्ती मनुष्य नाही या निर्णयावर तो आला.

जो कुणी असेल त्याने समोर येण्याऐवजी मी येउं का,असे कां विचारले?अशा विचारात संजय पडला होता .जरी विचारणारा कोणत्याही प्रकारचे भूत असेल तरीही ते परवानगी घेतल्याशिवाय येऊ शकत नाही .हे नक्की आहे.त्याला त्याच्या मर्यादा आहेत. नाहीतर त्याने विचारले नसते. तो पुढ्यात येऊन उभा राहिला असता. आता प्रश्न होता त्याला परवानगी द्यावी की न द्यावी? परवानगी दिली तर आपल्याला कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल? संजयच्या मनात आणखी एक विचार  आला.त्याला त्याच्या आईने लहानपणी सांगितलेली गोष्ट आठवली .संध्याकाळी आई स्तोत्र वगैरे म्हणत असे .मुलांना शुभं करोती शिकवीत असे . त्यामध्ये एक श्लोक  होता.घरातली पीडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो.संध्याकाळी आई कटाक्षाने बाहेरचा दरवाजा उघडा ठेवीत असे. संजयने आईला त्यावेळी त्याचा अर्थ विचारला होता .

आईने सांगितले होते दिवसभर घरात काही ना काही नकारात्मक (निगेटिव्ह) गोष्टी घडत असतात.नकारात्मक विचार येत असतात.उघड्या दरवाजातून त्या सर्व गोष्टी,ते सर्व विचार बाहेर जावेत .आपले मन उदार उघडे असावे. म्हणजे झाले गेले विसरून जावे .आजचा नकारात्मक बोजा मनावर ठेवू नये .सर्व विसरून कोर्‍या मनाने शांतपणे झोपी जावे.दुसऱ्या दिवसाला ताजेतवाने होऊन कालचा बोजा न घेता सुरुवात करावी.त्यावेळी त्याला आईने सांगितलेल्या गोष्टींचा विशेष अर्थ कळला नव्हता .परंतु आता मोठेपणी त्याला त्याचा अर्थ मनाला भिडत होता .आपण नकारात्मक विचारांचा बोजा घेऊन वावरत असतो. आपणच  आपल्या मनाला कलुषित करीत असतो.हा बोजा दिवसेंदिवस वाढतच जातो. या बोजामुळे आपण मुक्तपणे स्वतंत्रपणे जगायचे विसरूनच जातो.जगाकडे अनेकदा कलुषित नजरेनेच पहातो.जग क्षणोक्षणी  बदलत असते .आपण जुने असतो. आपण जुन्या चष्म्यातून जगाकडे बघतो. जगाची ओळख आपल्याला यथातथ्य होत नाही . नेहमी जीवनाला ताजेपणाने सामोरे जावे असा त्याचा अर्थ होय .

बाहेरची लक्ष्मी घरात येवो याचा अर्थ त्याने विचारला होता .त्यावेळी आईने त्याला सांगितले होते .संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेला  लक्ष्मी फिरत असते.जे घर तिला आवडते, ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात, म्हणजेच ज्याच्या मनाची कवाडे उघडी असतात, जो टीपकागदाप्रमाणे  शोषक(रिसेप्टिव्ह मूड ) अवस्थेत असतो .असे घर लक्ष्मीला आवडते . लक्ष्मी येउं का? येउं का? असे विचारीत असते.जो तिला ये म्हणतो,जो तिचे स्वागत करतो, त्याच्या घरात लक्ष्मी येते.आई पुढे असेही म्हणाली होती की चांगले विचार हे सुद्धा लक्ष्मीसारखेच मौल्यवान असतात .

हे सर्व संजयला आठवले .लक्ष्मी तर आपल्याला येउं का,म्हणून विचारीत नसेल?संजय लोभी नव्हता .जे आपले आहे ते आपल्याकडे येणारच या विचाराचा तो होता.तरीही जर विचारणारी लक्ष्मी असेल तर ये म्हणून सांगायला काय हरकत आहे ?असे विविध विचार त्याच्या मनात येत होते .असे असले तरी पिंपळाखाली लक्ष्मी काय करत आहे असा प्रश्न होताच.दुसर्‍या  दिवशी  पिंपळाखालून येताना त्याचे कान सावध होते .त्याला पुन्हा कुणीतरी मी येउं का? म्हणून विचारले.

आज त्याच्या मनात वेगळे विचार येत होते .लक्ष्मी पिंपळावर राहात नाही .ती साधारण पाण्याजवळ असते .

*हे बहुधा कोणत्यातरी प्रकारचे भूत असावे . परवानगी घेतल्याशिवाय ते येवू शकत नसावे .*

*परवानगी द्यावी की न द्यावी या द्विधा मन:स्थितीत संजय होता .*

*येणारा अावाज स्त्रीचा आहे की पुरुषाचा आहे ते त्याला ओळखता येत नव्हते .*

*सतत आठ दहा दिवस संध्याकाळी त्या विशिष्ट पिंपळाखालून येताना त्याला मी येऊं का ?हा एकच प्रश्न कुणीतरी विचारीत होते.*

*आणि त्याला निर्णय घ्यायचा होता.*

* ही गोष्ट तो घरी कुणाजवळही बोलला नव्हता नाहीतर त्याला त्या रस्त्याने येण्याजाण्याला बंदी करण्यात आली असती .*

(क्रमशः)

९/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel