(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
बाहेर जावून पहाटे तीन वाजता लिफ्टशी चाळा कोण करीत आहे ते पाहावे.लिफ्ट खाली वर सतत कोण नेत आहे ते पाहावे , मोठा आवाज कोण करीत आहे ते पहावे.जमल्यास त्याला दम द्यावा असा विचार मनात आला.
दम देण्यासाठी,विचित्र किरकिर करणाऱ्या या लिफ्टशी चाळा करणे योग्य नाही हे समजून सांगण्यासाठी , यामुळे लोकांची झोपमोड होते हे लक्षात आणून देण्यासाठी , मी दरवाजा उघडून बाहेर जाणार एवढ्यात हा भुताटकीचा प्रकार तर नाही ना असा एक विलक्षण विचार मनात आला. या विचाराबरोबर मी आपोआपच जागच्या जागी ब्रेक लावल्यासारखा थांबलो.
लिफ्टचा आवाज ऐकत मी ब्लॉकच्या बाहेरच्या दरवाजाजवळ तसाच खिळून उभा राहिलो.
आतापर्यंतची हकीगत वाचून तुम्हाला असे वाटत असेल की मी एक भित्रा मनुष्य आहे . पान पडले की दचके अशा सशाच्या जातीचा आहे परंतु तसे मुळीच नाही .मध्यरात्रीही स्मशानात जायला,ख्रिश्चनांच्या किंवा मुस्लिमांच्या कब्रस्तानात जायला मी मुळीच घाबरत नाही .कितीही धीट माणसाचा एखादा वुइक पॉइंट असतो. माझा वुइक पॉईंट,माझे न्यून लिफ्ट आहे .कुणी झुरळाला,कुणी पालीला, कुणी बेडकाला,कुणी काळोखाला, कुणी आणखी कशाला तरी घाबरताना आपण पाहिले असेलच. कोणत्याही अत्याधुनिक किंवा जुनाट लिफ्टच्या बाबतीत मी जरा संवेदनशील आहे. तुम्हाला म्हणून सांगायला हरकत नाही विमानातून प्रवास करायला मी तसाच घाबरतो .असो.
त्या दिवशी मी जरी दरवाजाजवळ लिफ्टशी भूत खेळत तर नसेल ना या कल्पनेने थांबलो असलो तरी मध्यरात्रीनंतर अडीच तीन वाजता लिफ्ट खाली वर कोण करीत आहे त्याचा छडा लावण्याचे मी निश्चित केले .मी दरवाजाजवळ थांबलो असताना कां कोण जाणे लिफ्टचा आवाज थांबला .जो कुणी लिफ्टशी खेळत होता त्याला मी दरवाजाजवळ आलो असल्याचे बहुधा कळले असावे.हे त्याला कसे कळले असावे, असा एक विचार माझ्या मनात आला. मी पुन्हा माझ्या बेडरूममध्ये गेलो .लिफ्ट पुन्हा सुरू होतो का ?लिफ्टचा आवाज येतो का? ते मला पाहायचे होते .लिफ्टचा आवाज येत नव्हता.लिफ्ट वर खाली होण्याचे थांबला होता .दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम रात्री अडीचचा गजर लावला होता .लिफ्ट खाली वर होऊ लागतो का ते मला पाहायचे होते .बरोबर अडीच वाजता लिफ्टच्या येरझाऱा सुरू झाल्या .एखादा लहान मुलगा खेळ म्हणून लिफ्ट खाली वर करीत असावा असा विचार माझ्या मनात आला .परंतु एवढ्या रात्री एखादा लहान मुलगा जागा राहून ,घरातील मोठ्या माणसांची नजर चुकवून, असा खेळ खेळत असेल अशी शक्यता मुळीच नव्हती .
रोज रात्री कुणीतरी लिफ्टशी खेळत होते हे नक्की .पुन्हा माझ्या मनात हा भुताचा चाळा तर नसेल ना अशी कल्पना आली .भूत असले तरी त्याला असा चाळा, असा खेळ, करण्याचे कारण काय असावे हे माझ्या लक्षात येत नव्हते .हे भूत बालिश, खेळकर व खोडकर असावे असा एक गमतीशीर विचार मनात येवून गेला. ही गोष्ट बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या इतरांच्या लक्षात आली नाही, की लक्षात येवून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले काही कळण्याला मार्ग नव्हता.बिल्डिंगमधील चार जणांकडे जाउन माझा अनुभव शेअर केल्यावरच खरे काय ते कळले असते.तूर्त कोणालाही न भेटता, न सांगता, स्वतःला काय अनुभव येतो ते पाहण्याचे मी ठरविले .लिफ्टमधून खाली वर कोण करतो ते प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय उलगडा होणार नव्हता.
एकदा निदान शेजारी तरी जाऊन तुम्हाला आवाज येतो का अशी चौकशी करावी असा विचार माझ्या मनात आला.परंतु तूर्त ही घटना मी माझ्या पुरतीच ठेवावी असे ठरवले.काही दिवस असेच गेले .रोज लिफ्टचा खेळ चाललाच होता.एक दिवस लिफ्ट सातव्या मजल्यावर येऊन थांबल्याचा आवाज आला.कदाचित शेजारच्या ब्लॉकमधील कुणीतरी आले असावे,किंवा त्यांच्याकडे परगावाहून कोणीतरी आले असावे,असे मला स्वाभाविकपणे वाटले.मी बाहेरच्या दरवाजाजवळ येउन चाहूल घेत होतो.शेजारच्या ब्लॉकमध्ये कुणीही आले नाही.थोड्या वेळाने शटर लावल्याचा आवाज आला आणि लिफ्ट पुन्हा खाली वर होऊ लागली .
मला आता हा नादच लागला होता .पहाटे तीन ते चार साडेचार पर्यंत मी जागा रहात होतो . लिफ्टच्या हालचाली सहजच लक्षात येत होत्या.पहाटे पांच नंतर दूधवाला भय्या, दुधाच्या पिशव्या पोचवणारे, वर्तमानपत्र टाकणारे, मोलकरणी, यायला सुरुवात होत असे .पहाटे साडेचार नंतर मी गाढ झोपी जाई तो साडेआठलाच उठत असे.सर्व आवरून धावपळ करीत मला ऑफिसला पोचावे लागे.
एक दिवस लिफ्ट आमच्या मजल्यावर थांबली शटर्स कुणीतरी उघडले. दबक्या पावलांनी माझ्या फ्लॅटपर्यंत कुणी तरी आले.ते तिथेच बाहेर थांबल्याचा आवाज आला.जरा वेळाने पावले लिफ्टपर्यंत गेल्याचा आवाज आला .शटर्स बंद झाले .लिफ्ट सुरू झाली .अधून मधून हा प्रकार सुरू झाला .जणू काही कुणाला तरी या ब्लॉकमध्ये यायचे असावे. बेल वाजवावी की न वाजवावी अशा विचारात तो असावा.त्याचा निश्चय होत नसावा असा एकूण प्रकार दिसत होता.
लिफ्ट कोण चालवतो ते मला पाहायचे होते .मी पहाटे तीन वाजता उठून लिफ्ट खाली वर होण्याची वाट पाहू लागलो .लिफ्टचा आवाज सुरू झाला .मी दरवाजा उघडून पॅसेजमध्ये आलो .हळूच चालत लिफ्टपर्यंत गेलो .लिफ्ट खालून वर येत होती .लिफ्ट सातव्या मजल्यावरून वर जात असताना त्यामध्ये एक लहान मुलगा दिसला .त्या मुलाचेही लक्ष माझ्याकडे गेले .लहान मुलाचा हा खेळ असावा हा माझा तर्क बरोबर होता.मी माझ्या मजल्यावरील बटन दाबले.लिफ्ट वरून खाली आली व आमच्या मजल्यावर थांबली .लिफ्ट रिकामी होती.मला बघितल्यावर तो मुलगा वरती कुठेतरी उतरून गेला असावा किंवा वरती कुठेतरी राहत असावा असा तर्क मी केला.
मुलाला दम भरण्याची माझी इच्छा तशीच राहिली.त्याच दिवशी सकाळी मी रखवालदाराला एक लहान मुलगा पहाटे तीन ते चार साडेचार पर्यंत लिफ्ट खाली वर करीत असतो अशी तक्रार केली .लिफ्टच्या आवाजामुळे झोपमोड होते.त्यावर त्याने साहेब मी लक्ष ठेवतो असे सांगितले.
नंतर काही दिवस लिफ्ट खालीवर होत नव्हती .बहुधा रखवालदार जागा असलेला पाहून तो मुलगा लिफ्टशी खेळत नसावा.
काही दिवसांनी पुन्हा लिफ्टचा आवाज येऊ लागला .लिफ्ट आमच्या मजल्यावर थांबू लागली .लिफ्टचे शटर उघडून कुणीतरी माझ्या ब्लॉकजवळ येवून उभे राहू लागले.
माझ्या ब्लॉकच्या बाहेरच्या दरवाज्याला संरक्षक दरवाजा(सेफ्टी डोअर) आहे.एक दिवस मी ,आंतील दरवाजाची कडी, लॅच,साखळी, वगैरे अगोदरच काढून ठेवले.रात्री साडेतीन वाजता लिफ्ट थांबली. शटर उघडण्याचा आवाज आला . कुणीतरी दबक्या पावलांनी चालत माझ्या दरवाजाबाहेर येऊन उभे राहिले.मी आतील दरवाजा निमिषार्धात विजेच्या वेगाने उघडला . बाहेर तोच मुलगा उभा होता .मला पाहून तो गोंधळून गेलेला दिसला .आम्हा दोघांमध्ये संरक्षक दरवाजा होता .दरवाजाच्या वरच्या एकतृतीयांश भागात लोखंडी रेजे होते.त्यातून तो मुलगा मला स्पष्टपणे दिसत होता . तो मुलगा धावत लिफ्टकडे गेला .घाई घाईने शटर्स बंद केल्याचा आवाज आला. लिफ्ट सुरू झाल्याचा आवाज आला.मुलाला नीट पहाण्याची, भेटण्याची,बोलण्याची, माझी इच्छा तशीच राहिली.
नंतर काही रात्री मी त्या मुलाची भेट होईल म्हणून वाट पाहत होतो .तो मुलगा पुन्हा दरवाजाजवळ आला नाही .लिफ्ट खाली वर होत असताना आपल्या मजल्यावर लिफ्ट थांबवावी व मुलाची भेट घ्यावी हा माझा प्रयत्न पूर्वीच फसला होता.मी पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करून पाहिला .वर किंवा खाली लिफ्ट जाताना त्यामध्ये दिसणारा मुलगा लिफ्ट माझ्या मजल्यावर येऊन थांबे त्यावेळी लिफ्टमधून नाहीसा होत होता.
एके दिवशी रात्री नऊ वाजता मी जेवण करून ब्लॉकवर परत येत होतो .जिना चढताना एक दहा बारा वर्षांचा मुलगा पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या वरच्या पायरीवर बसलेला आढळला.लांबून अंधुक प्रकाशात मला तो लिफ्टमधला मुलगा वाटला. त्याला ओलांडून मी दुसरा जिना चढायला सुरुवात केली .त्यावेळी मला त्याला जवळून पाहता आले.तो लिफ्टमधला मुलगा होता.या अगोदर मी त्याला लिफ्टमध्ये व माझ्या दरवाज्यासमोर उभा असलेला पाहिला होता.हा असा येथे बसलेला कां आहे असा विचार माझ्या मनात आला. त्याच्याजवळ किल्ली नसेल आईवडील बाहेर गेले असतील त्यांची वाट पाहत बसला असेल. असे मला वाटले .मी पुढच्या मजल्याचा जिना चढू लागलो .तो मुलगा पुन्हा तसाच त्याही जिन्याच्या वरच्या पायरीवर बसलेला होता .ही गोष्ट प्रत्येक मजल्याचा जिना चढत असताना होत होती .तो मुलगा मला ओलांडून कधीच गेला नव्हता .तरीही मी जिने चढत असताना प्रत्येक वेळी त्याला ओलांडून गेल्यावर, तो पुढच्या मजल्याच्या जिन्याच्या वरच्या पायरीवर कसा होता ते माझ्या लक्षात आले नाही.
जिन्यातील अत्यंत अंधुक प्रकाश,त्यात प्रत्येक जिन्यात वरच्या पायरीवर बसलेला तो मुलगा.मला काहीच उलगडा होत नव्हता .
*या गडबडीत त्या मुलाला आपल्याला भेटायचे आहे, त्याच्याशी बोलायचे आहे,त्याला समजून सांगायचे आहे ,हे मी विसरूनच गेलो होतो.*
*माझ्या ब्लॉकचा दरवाजा उघडून आत आलो .त्या मुलाबद्दलच माझा विचार चालला होता .*
* हा मुलगा मला इमारतीतील एखाद्या ब्लॉकमधला वाटला नाही.*
* हा प्रकार मला निखालस भुताटकीचा वाटला .*
(क्रमशः)
२३/६/२०२०©प्रभाकर पटवर्धन