(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

माझ्या ब्लॉकचा दरवाजा उघडून आत आलो .त्या मुलाबद्दलच माझा विचार चालला होता .

हा मुलगा मला इमारतीतील एखाद्या ब्लॉकमधला वाटला नाही.

हा प्रकार मला निखालस भुताटकीचा वाटला .

माझ्या डोळ्यासमोर मी पाहिलेल्या सर्व घटना उभ्या राहिल्या .लिफ्ट खालीवर होणे. लिफ्ट माझ्या मजल्यावर थांबणे.लिफ्ट उघडून दबक्या पावलांनी कुणीतरी माझ्या ब्लॉक पर्यंत येणे.मी त्या मुलाला प्रत्यक्ष लिफ्टमध्ये पाहणे.मी त्याला माझ्या दरवाज्याबाहेर पाहणे ,तो मुलगा मला पुन्हा पुन्हा प्रत्येक जिन्यात वरच्या पायरीवर बसलेला दिसणे ,  मी जिना चढत असताना मला ओलांडून तो कधीही  पुढे न जाणे, तरीही वरच्या पायरीवर बसलेला तो दिसणे .या सर्वांचा अर्थ एकच होता.तो मुलगा अमानवी होता. त्या मुलाचे मग तो कुणीही असो, माझ्याजवळ काही तरी काम होते .पुन्हा तो मुलगा भेटला की त्याला त्याचे काम विचारावे असे मी  ठरविले . त्याचा हात पकडून त्याला विचारले की सर्व उलगडा होईल अशी माझी समज होती .तो मनुष्य योनीत नसला तर त्याचा हात मी कसा काय पकडणार होतो हा विचार माझ्या मनात आला नाही. 

दुसऱ्या रात्री मी जिना चढत असताना त्या मुलाची प्रतीक्षा करीत होतो.मला तो मुलगा भेटला नाही .प्रत्येक वेळी मला तो मुलगा दिसत होता आणि नंतर आणखी कुठे तरी दिसत होता .तो मुलगा माझ्याजवळ आट्यापाट्या खेळत होता .

मला एक विलक्षण कल्पना सुचली .तो मुलगा मी रहात असलेल्या ब्लॉकमध्ये रहात असावा. त्याची काही तरी वस्तू मी रहात असलेल्या ब्लॉकमध्ये राहिली असावी.ती वस्तू त्याची अत्यंत आवडती असावी .ती माझ्याकडून मिळविण्याचा त्याचा प्रयत्न असावा .मला प्रत्यक्ष भेटून त्याला ती कदाचित  मिळविता येत नसावी. कदाचित तो घाबरत असावा.कदाचित ते सामर्थ्य त्याला नसावे .

मी रखवालदाराला तो इथे किती वर्षे कामाला आहे ते विचारले.त्याने दहा वर्षे असे उत्तर दिल्यावर माझ्या ब्लॉकमध्ये पूर्वी कोण रहात होते त्यांची माहिती  विचारली.त्याचा चेहरा गंभीर झाला .त्याच्याकडून पुढील माहिती मिळाली .आई वडील व त्यांची दोन लहान मुले असे चौकोनी कुटुंब मी रहात असलेल्या ब्लॉकमध्ये रहात  होते .मुलगा मोठा व मुलगी लहान होती.आई वडील दोघेही नोकरी करीत असत.मुलाला लिफ्टचे फार वेड होते. शाळेत जाताना, शाळेतून परत येताना,  संध्याकाळी खेळायला जाताना,संध्याकाळी खेळून घरी परत येताना,तो लिफ्टचा वापर करीत असेच परंतु एरवीही गंमत म्हणून तो लिफ्टमध्ये चढून लिफ्ट खाली वर नेत असे.आपल्या बरोबर लहान बहिणीलाही घेत असे .आई वडीलांनी कित्येकदा रागवूनही तो त्यांची नजर चुकवून लिफ्टचा खेळ खेळत असे .गर्दीच्या वेळी गरजेच्या वेळी लिफ्ट उपलब्ध होत नाही म्हणून लोकांनी तक्रारीही केल्या .  

एक दिवस लिफ्ट काही तांत्रिक कारणामुळे मध्येच अडकला होता.  दुर्दैवाने तळमजल्यावरील दरवाजे तांत्रिक दोषामुळे उघडे होते .हा मुलगा त्याच वेळी बाहेरून आला .हा मुलगा लिफ्ट  तळमजल्यावर जिथे थांबतो त्या जागी जाऊन, लिफ्ट कुठे आहे ते पाहत होता.एवढ्यात लिफ्ट वेगाने खाली आली. मुलगा बाहेर येऊ शकला नाही .तो लिफ्ट खाली चिरडला गेला .पोलिस चौकशी, शवविच्छेदन अहवाल,इत्यादी गोष्टी झाल्या.ते कुटुंब जागा सोडून गेले .या गोष्टीला पांच वर्षे झाली.त्यानंतर जो कुणी येथे येतो तो जागा सोडून काही महिन्यात निघून जातो.इतक्या घाईगर्दीने ब्लॉक सोडण्याचे कारण काय ते एकाही कुटुंबाने सांगितले नाही. ब्लॉक अपयशी आहे असा त्याच्यावर शिक्का बसला आहे .यामुळेच तुम्हाला कमी भाड्यात हा ब्लॉक मिळाला .

आता सर्व उलगडा झाला होता .तो मुलगा मृत्यूनंतरही येथे अडकून पडला होता . रात्रीच्या शांत वातावरणात सर्व झोपलेले असताना तो मुलगा त्याचा आवडता खेळ चालू करीत असे . सर्व पहाटेच्या गाढ निद्रेमध्ये असल्यामुळे त्यांना या खेळाचा पत्ताच लागला नव्हता .कदाचित माझ्या ब्लॉकमध्ये राहणाऱ्या लोकांनाच त्या खेळाचा पत्ता लागत असावा .त्यामुळेच ते घाई गर्दीने दुसरीकडे निघून जात असावेत.मलाही एकूणच सर्व वातावरणाचा कंटाळा आला होता.सौभाग्यवती माहेराहून परत येईल त्यावेळी आपण दुसरीकडे असावे असे मला वाटू लागले होते.मी दुसरीकडे जागा पाहायला सुरुवातही केली होती .

त्या मुलाला मुक्त करण्यासाठी, या अडकलेल्या चक्रातून सोडविण्यासाठी, तो त्याच्या पुढील यात्रेला जावा म्हणून काय करता येईल असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला .

रखवालदाराला त्या मुलाबद्दल मी आणखी माहिती विचारली .लिफ्टच्या खेळाप्रमाणेच त्याला आणखी काय आवडत होते ते विचारले .त्यावर त्याने क्रिकेट असे उत्तर दिले .काखोटीला त्याची आवडती बॅट घेऊन, चेंडू हातात ठेवून, तो रोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर क्रिकेट खेळायला जात असे .सुट्टीच्या दिवशी तर कितीतरी तास केव्हा केव्हा सबंध दिवस ग्राऊंडवर इतर मुलांबरोबर क्रिकेट खेळत राही .

त्या मुलाला ब्लॉकमधून काय हवे असावे ते माझ्या लक्षात आले .त्यासाठीच तो मला जिन्यांमध्ये केव्हा केव्हा दिसत असे .त्यासाठी तो ब्लॉकबाहेर येऊन दरवाजाजवळ थांबत असे.

मी एक प्रयोग करून बघण्याचे ठरविले .दत्तगुरूंची एक मूर्ती लिफ्टमध्ये काचेच्या पेटीत भिंतीवर अडकवून ठेवावी असा विचार केला .त्याचप्रमाणे त्या मुलाची बॅट व चेंडू ब्लॉकमध्ये  कुठे तरी निश्चित असणार तो शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. 

बिल्डिंगमध्ये एक पत्र रखवालदारामार्फत फिरविले. लिफ्टमध्ये दत्तगुरूंची मूर्ती ठेवण्याला कुणाचा विरोध आहे का ते विचारले .सर्वांची संमती मिळाल्यावर एक सुबक मूर्ती काचेच्या पेटीत ठेवून ती लिफ्टमध्ये बसविली .

गुरुचरित्र वाचन, दत्तगुरूंची प्रतिमा, या गोष्टी अनिष्ट अशुभ शक्तींना दूर ठेवतात असे बरेच जण म्हणतात.दत्तगुरूंची मूर्ती  लिफ्टमध्ये ठेवून तो मुलगा लिफ्टमध्ये येणार नाही अशी तरतूद मी केली .

त्या दिवसापासून रात्रीचा लिफ्टचा खेळ कायमचा बंद झाला . जिन्यात मात्र तो मुलगा अधूनमधून दिसत असे .त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला .परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला मृत व्यक्तीला पुढे योग्य गती मिळावी म्हणून त्याला त्याची इच्छा लक्षात घेऊन ती इच्छा पूर्ण करण्याची पद्धत हिंदू धर्मामध्ये आहे.तसाच काहीसा प्रकार मी माझ्या अल्पमतीप्रमाणे करण्याचे ठरविले. शोधता शोधता दिवाणखान्यामध्ये असलेल्या सोफ्यामध्ये एक कप्पा सापडला .तो कप्पा इतका बेमालूम तयार केलेला होता की चटकन लक्षात येत नसे. त्यात दोन चेंडू व बॅट सापडली.रात्री तीन वाजता मी ती बॅट व चेंडू माझ्या दरवाज्याबाहेर  ठेवून दिले .सकाळी चेंडू व बॅट कुणीतरी नेले होते.अशा प्रकारे त्याची ती इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला .

तेव्हापासून जिन्यात मुलगा  दिसण्याचे कायमचे बंद झाले आहे.

मध्यरात्रीनंतर तीन वाजता लिफ्टची खाली वर होणारी हालचाल दत्तगुरूंची मूर्ती  लिफ्टमध्ये ठेवल्यापासून बंद झाली होती .

मी ब्लॉक सोडण्याचा विचार सोडून दिला. 

माझी पत्नी माहेराहून परत आली.

* सर्वांशी ओळख होण्यासाठी मी आमच्या घरी एक कार्यक्रम ठेवला होता.*

*आमची इमारतीतील बर्‍याच  कुटुंबांशी ओळख झाली आहे.*

*मी आता या इमारतीत रमलो आहे*

*लिफ्टचा खेळ, मुलगा, बॅट, चेंडू  याबद्दल मी कोणाजवळही काहीही कधीही बोललेलो नाही .*

*त्याबद्दल आजच मी प्रथम लिहीत आहे.*

*कदाचित मी थापा मारीत आहे असेही काही जण म्हणतील.बोलणार्‍यांचे तोंड कोण धरणार ?*

*या अनुभवांचे स्पष्टीकरण कसे देता येईल ते मला माहित नाही .*

*अजूनही मी शक्यतो जिन्याचाच वापर करतो.बरोबर आणखी कुणी असेल तर लिफ्टचा वापर करतो .*

*मी सहसा एकटा लिफ्टमधून जात नाही* 

(समाप्त)

२३/६/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel