शामराव काळजीपूर्वक गेल्या तीन चार महिन्यामध्ये झालेले अपघात संगणकावर पहात होते .काही अपघात हे स्वच्छपणे अपघातच असे लक्षात येत होते .परंतु सहा अपघात हे संशयास्पद वाटत होते .जवळ जवळच्या तीन चार खेड्यांमध्ये हे अपघात झाले होते .अपघात किंवा खून जे काही असेल त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते.सर्व अपघात विहिरीवर वयस्कर स्त्रिया पाण्यात पडून झालेले होते .फक्त पहिला अपघात एका तरुण स्त्रीचा होता .बाकी सर्व स्त्रिया चाळीस ते पन्नास या वयातील होत्या .सकाळी व संध्याकाळी अंधुक प्रकाश असताना हे अपघात झाले होते .कामांवर लवकर जायचे असल्यास पहाटे पाणी काढण्यासाठी स्त्रिया विहिरीवर येतात .किंवा कामावरून आल्यावर तिन्ही सांजेच्या वेळी पाणी शेंदण्यासाठी येतात .ज्याना कुठे कामाला जायचे नसते त्या दुपारी गर्दी कमी झाल्यावर पाणी काढण्यास येतात.
या सर्व स्त्रियाना विहिरीतून पाणी शेंदण्याची सवय वर्षानुवर्षे होती .त्यामुळे तोल जाऊन पाण्यात पडणे जवळजवळ अशक्य होते .त्या स्त्रियांना पोहोता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला होता .एखादीचा कदाचित तोल जाईल किंवा चक्कर येईल परंतु अशाप्रकारे एकामागून एक सहा स्त्रिया पाण्यात बुडून मराव्यात हे आश्चर्यजनक ,जरा बुचकळ्यात पाडणारे होते .यामागे काहीतरी काळेबेरे असावे असे वाटत होते .
प्रत्येक खुनामागे काहीतरी कारण असते .या घटनांचे खून असल्यास कारण कळत नव्हते.दोन स्त्रिया सवती होत्या .बाकीच्या स्त्रिया निरनिराळ्या खेडेगावातील होत्या .त्यांचे एकमेकांशी काही नातेही नव्हते .त्यांच्यावर काही अत्याचार झाल्याचेही दिसत नव्हते .पोस्टमार्टैम रिपोर्टमध्ये पाण्यात बुडून मृत्यू असे मृत्यूचे कारण होते.अंगावर इतर अत्याचार वगैरेच्या खुणा नव्हत्या .पाणी शेंदत असताना तोल जाऊन पाण्यात पडून किंवा कुणीतरी मागून ढकलल्यामुळे पाण्यात पडून मृत्यू झाले असे दिसत होते .कुणीतरी ढकलले असल्यास ढकलण्याचे कारण लक्षात येत नव्हते.नेहमी पाणी काढणाऱ्या बायका तोल गेल्यामुळे पडल्या असतील हे पटत नव्हते .कुणीतरी वेडा किंवा वेडी बायकाना मागून ढकलून देत असावी असे वरवर पाहता वाटत होते .अपघाती पाण्यात पडून मृत्यू अशी नोंद होती.ज्यावेळी विहिरीवर गर्दी नसेल काळोखामुळे कुणी ढकलले ते कळणार नाही अशी वेळ साधून एकमेकांशी नाते नसलेल्या उतारवयीन बायका पाण्यात पडून मृत्यू पावत होत्या .
शामरावांनी युवराजांची मदत घेण्याचे निश्चित केले .युवराजांना फोन लावला .सर्व केस मेल केली .युवराजांचे सर्व केस पाहून शामरावासारखेच मत झाले.तिथे जाऊन प्रत्यक्ष माहिती गोळा केली पाहिजे त्याशिवाय आपल्याला नक्की कळणार नाही असा युवराजांनी शामरावांना फोन केला.शामराव व युवराज जिथे हे अपघात घडले होते त्या गावांकडे जीपने निघाले. तिथे पोचल्यावर ते चारही गावातून फिरले.गावांमध्ये अनेक विहिरी नव्हत्या .एका गावामध्ये दोन तर तीन गावांमध्ये एक एकच विहीर होती .विहिरींच्या आसपास बरीच झाडी होती .झाडीमध्ये लपून बसणे व हळूच पाठीमागून येऊन ढकलून देणे सहज शक्य होते.विहिरीवर का कोण जाणे परंतु रहाट बसविलेले नव्हते.त्याचप्रमाणे कप्पीही बसविलेली नव्हती.प्रत्येक ठिकाणी वाकून पाणी शेंदणे आवश्यक होते .अशा वेळी पाठीमागून कुणी सहज लहानसा धक्का दिला तरी पाण्यात पडणे अपरिहार्य होते.गेले दोन तीन महिने सोडले तर तोपर्यंत कुणीही पाण्यात पडून मेले नव्हते .हल्लीच हे अपघात झाले होते .लहान मुले तरुण बायका पुरुष सर्व येऊन पाणी शेंदत असत .एक अपवाद सोडून फक्त उतारवयीन बायकांचेच अपघात झाले होते .हे जरा आश्चर्यच होते .कुणीतरी मुद्दाम केल्याशिवाय हे अपघात झाले नव्हते असा एकूण निष्कर्ष निघत होता .शामराव व युवराज ऑफिसात आल्यावर त्यांनी संदेशला फोन केला .
संदेशला त्यांनी त्या चार गावांमधून कोणती माहिती गोळा करायची त्याबद्दल सूचना दिल्या .तीन चार दिवसांत माहिती देतो असे संदेशने सांगितले .एवढ्यात आणखी एक अपघात झाल्याची बातमी फोनवर आली .पाण्यात पडणारी स्त्री उतारवयीन होती .सुदैवाने तिला पोहता येत होते .त्यामुळे ती पोहून कडेला येऊन थांबली. लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला दोरीने वरती ओढून घेतले .संदेशने पाठविलेल्या माणसाने सर्व चौकशी व्यवस्थित केली .त्या बाईने कुणीतरी मागून येऊन अकस्मात मला ढकलून दिले असे सांगितले .तिने पडता पडता तिला अस्पष्ट पाहिले होते .ती मुलगी होती आणि तरुण असावी असे तिला वाटत होते .म्हणजे अगोदरचा तर्क बरोबर ठरत होता . अपघात नव्हते. कुणीतरी मागून येऊन ढकलून देत होते. परंतू कोण व का ते स्पष्ट व्हायचे होते .आणखी खोलात जाऊन चौकशी करणे आवश्यक होते .
जे कुणी असेल त्याला पकडणे आवश्यक होते .त्यासाठी एक योजना आखण्यात आली .त्याची माहिती कुठेही गावात फुटणार नाही याची काळजी घेण्यात आली .विजयाने एका वयस्क बाईचे रुप घेऊन व खेडेगावात बायका जशी साडी नेसतात त्याप्रमाणे नेसून जीपमधून रोज आलटून पालटून प्रत्येक गावातील विहिरीवर जायचे व पाणी शेंदायचे.एकना एक दिवस कुणीतरी ढकलण्यासाठी येईल .झाडीमध्ये लपून राहिलेल्या संदेशने त्या व्यक्तीला ढकलताना ताबडतोब पकडायचे. अशी एकूण योजना ठरली .एकदा ती व्यक्ती पकडली की मग सर्व उलगडा होईल. यासाठी किती दिवस लागतील ते सांगता येत नव्हते.चिकाटीने काम करीत रहाणे आवश्यक होते . विजयाला चांगले पोहता येत असल्यामुळे जरी ती विहिरीत पडली तरी तिला धोका नव्हता .
वरील प्रमाणे रोज कार्यक्रम सुरू झाला .आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले तरी कुणीही ढकलण्यासाठी आले नाही.आपला अंदाज फसतो कि काय असे युवराजांना वाटू लागले. आपली योजना त्या व्यक्तीला कळली तर नसेल असाही संशय येऊ लागला. युवराज त्यांच्या मतावर ठाम होते .अजून पंधरा दिवस हा कार्यक्रम चालू ठेवावा तोपर्यंत जर यश मिळाले नाही तर नंतर काय करायचे ते ठरवता येईल असे त्यानी ठरविले. योजनेच्या एकविसाव्या दिवशी योजना यशस्वी झाली .विजया पाणी शेंदीत असतांना झाडीमधून झपकन एक तरुण मुलगी आली व तिने विजयाला जोरात ढकलून दिले .विजयाला सावरण्यासाठी वेळ मिळाला नाही .आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवून आहे हे त्या मुलीला माहीत नव्हते .ती ढकलल्यानंतर पळून जात असताना संदेशने तिला पकडले .विजया पोहून वरती आली .तिने कोरडे कपडे घातल्यावर त्या मुलीसह संदेश शहरात युवराजांच्या ऑफिसवर आला .तिथे शामरावाना बोलावून घेण्यात आले. अापण पोलिसांच्या तडाक्यात सापडलो हे तिच्या गावीही नव्हते ती थोडीशी वेडसर वाटत होती .
युवराज शामराव संदेश यांनी तिची चौकशी केल्यानंतर व गावात माहिती गोळा केल्यानंतर पुढील माहिती उजेडात आली .तिच्या वडिलांनी दोन लग्ने केली होती.पहिलीला मूल होत नसल्यामुळे दुसरे लग्न केले होते .दुसरी बायको तरुण होती.ही दुसऱ्या बायकोची मुलगी. वडिलांचे दुसर्या बायकोकडे जास्त लक्ष असे.ही गोष्ट मोठ्या आईला आवडली नाही .मुलीची आई जी तरुण होती ती पाणी शेंदीत असताना त्या मोठ्या आईने तिला ढकलून दिले .मोठ्या आईने आपल्या आईला पाण्यात ढकलून दिले ही गोष्ट मुलीने पाहिली.त्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला.मुलीच्या आईला पोहोता येत नसल्यामुळे ती बुडून मरण पावली .वयस्क बाई दिसली की हिच्या मस्तकात कळ उठे. हिच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला .
तिने पहिला बळी आपल्या थोरल्या आईचा घेतला .ती पाणी शेंदत असताना तिने तिला ढकलून दिले .तिचा सूड खऱ्या अर्थाने पूर्ण झाला होता .तरीही जेव्हा जेव्हा वयस्क बाई पाणी शेंदताना दिसे तेव्हा तेव्हा तिला ही आपली थोरली आई समजून पाण्यात ढकलून देत असे .
चार महिन्यांपूर्वी तिची सावत्र आई पाण्यात पडून मेल्याचे कळले .त्याअगोदर तिची सख्खी आईही पाण्यात पडून मेली होती .तेव्हापासून ही मुलगी वेडी झाली आहे असे गावातील लोकांच्या बोलण्यात आले.
ती मुलगी जाणून बुजून खून करीत नव्हती.बसलेल्या धक्क्यामुळे मानसिक असंतुलनामुळे ती असे काम करीत होती . मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आले . पाणी शेंदताना वयस्कर स्त्री दिसली की तिला ती आपली सावत्र आई वाटे.तिला योग्य मानसोपचाराची गरज होती .तेही तिथे तिला दिले जात आहेत यावर युवराजांनी लक्ष ठेवले .त्या मुलीला पूर्ण बरे वाटल्यानंतर तिला तिच्या वडिलांकडे सोपविण्यात आले .
त्यानंतर पुन्हा पाण्यात पडून अशा प्रकारचे अपघात झाले नाहीत.
३१/१/२०१९©प्रभाकर पटवर्धन