निलेशची अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती. आता त्याला त्या बैचेनीची सवय झाली असावी. आठवड्यापासूनची ही अस्वस्थता होती, इतर भावनांप्रमाणेच त्याच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य घटक झाली होती. ही अस्वस्थतेची भावना नसती तर तो त्या विचारानेही अस्वस्थ झाला असता. त्याची बैचेनीने आता वेगळीच उंची गाठली ती. आज मात्र ही अस्वस्थता नसल्याची अस्वस्थता होती. खरं तर असे अस्वस्थ आणि बैचेनीत जीवन जगायचे हे काही त्याला नवे नाही.आज त्याला ही अस्वस्थता धड संपतही नाही आणि वाढतही नाही अशी अवस्था झाली होती.

निलेशची ही मनाची चलबिचल चालू होती. त्याच्या मनात विचारांची घालमेल होत होती. त्याने त्याच्या गळ्याशी आलेल्या या परिस्थितीला पाण्याच्या घोट पचवायचा निष्फळ प्रयत्न केला. आज त्याने तेच जुनं पण त्याच्यासाठी फार स्पेशल असलेलं घड्याळ घातलं होतं. त्या घड्याळांच्या काट्यांची टिकटिक त्याच्या डोक्यात होत होती. त्याने मागच्या १० मिनिटांत किमान २० वेळा तरी या घड्याळाच्या वेळेकडे पहिले होते. निलेशने पुन्हा आपल्या मनगटावर एक कटाक्ष टाकला. 

“पावणे सहा..!!”

म्हणजे ठरलेल्या वेळेपेक्षा एक अर्धा-पाउण तास जास्त झाला होता. 

‘‘हे बरं आहे…!! म्हणजे आम्हीच तेवढं वेळेत यायचं आणि इतरांनी उशीर केला की आम्ही मात्र बोलायचा नाही …” तो चिडून स्वतःशीच पुटपुटला.

मुद्दामहून उशीरा येणं ही बहुधा या मुलींची काहीशी युक्ती असावी…!

“पुरे झालं आता वाट पाहणं…! अजून फक्त दहा मिनिटे…! आली तर ठीक…!”

असे काहीसे पुटपुटून त्याने दहा मिनिटांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला होता.

या एका तासात त्याने आपला हाच निर्णय किमान ४५ वेळा तरी निश्चित केला होता.

शेवटची ही दहा मिनिटे जणू तिच्या येण्याच्या आशेवर त्याच्या मनगटावर त्याच घड्याळात बंद झाली होती ते काटे जणू तसूभरही पुढे सरकायला मागत नव्हते.  कधी कधी घड्याळाचे काटेच फिरतात पण वेळ मात्र त्याच क्षणात अडकते आणि आपल्यालाही त्या क्षणभंगुर भ्रमात अडकवून ठेवते.

आता मात्र निलेशची अवस्था केविलवाणी झाली होती. तेवढ्यात त्याच्या मनाला हळुवार फुंकर घातली गेली आणि त्याचा रोमरोम हर्षित झाला.

“माझ्या ऐकण्यात तर काही चूक नसेल ना झाली कि वाट बघून-बघून मला भास होत आहेत??”

त्याच्या मनाचे वारू दौडले. आता त्याचे मन जुन्या आठवणीत आणि गाठीभेटीत गुंतले होते. पूर्वीच्या काही गुलाबी गाठीभेटी त्याच्या डोळ्यांत तरळल्या. 

"शनिवार. संध्याकाळी पाच वाजता. वेदा." निलेश म्हणाला.

यात किंचितही चूक झाली नव्हती. ही म्हणजे दोन मिनिटांच्या भेटीत घाईघाईतच ठरलेली पुढच्या भेटीची वेळ होती. वेदा जरा घाईतच] होती. निलेशला अगदी नक्की लक्षात होते. निलेश कधीच त्यांच्या भेटींच्या वेळा किंवा तारखा विसरला नव्हता त्यामुळे मागच्या भेटीतली या भेटीची वेळ त्याला अगदी पक्की लक्षात होती.

मग आज  इतका वेळ का? आता तर क्षितिजावर किरमिजी रंग पसरला होता. सूर्य नुकताच अस्ताला गेला होता.

हिवाळ्याच्या ऋतूत संध्याकाळी अवकाळी आभाळ दाटून आलं की, सहा वाजताच अंधार होतो. तसाच पावसाच्या रिमझिम सरीही सुरु होतात.

“हा पाउस आता किती वेळ येईल माहीत नाही…!” निलेश वैतागून पुटपुटतो.

हा पाऊस आणि ती नेहमीच एकत्र यायचा नियम होता त्यामुळे आजही ती येईल याची त्याला खात्री होती. 

“ती येईल कि नाही…?? तिच्या लक्षात तरी असेल का आज भेटायचं ठरलं आहे ते??” त्याच्या मनात शंकांचं काहूर उठलं होतं. 

त्याच्या मनात येऊन गेलं, “तिला नक्की का भेटायचं आहे? मला भेटायचं आहे का तिला? तिला पुन्हा प्रेमात पडायचं आहे का?? पुन्हा प्रेमात पडण्यात काहीच गैर नाही..!!  वेदाने हा विचार केला असेल तर मलाही काहीच हरकत नाही.” 

निलेश स्वतःच्या विचारांमध्ये गुंतत चालला होता. त्याच्या मनात उठलेले विचारांचे, प्रश्नांचे काहूर आणि त्यात संततधार पावसाने धरलेला जोम आता त्याच्या विचारांनाही साथ देत होता. त्याच्या पायांची सतत होणारी हालचाल त्याच्या मनाची स्थिती सांगत होती.

"साहेब , आता काय घेनार चहा, कॉपी, वडा, मिसळ,उत्तपा,इडली,कि राईस प्लेट ??" एक वेटर थोड्याश्या कळकट्ट खाकी कपड्यात डोक्यावर पेन अडकवून आला होता. त्याने खांद्यावर एक लाल पांढरा चौकडीचा पंचा टाकला होता. त्याच पेनाने तो दुसऱ्या हातात असलेल्या छोट्या डायरीत लिहून घ्यायला तयार होता. निलेशने कॉफी मागवली.

मागच्या दीड तासात त्याने दोनद ऑर्डरच्या नावाखाली कॉफीच मागवली होती. तोंडाची चव बेचव झाली होती. पण वेटरला निलेशचा कितवा कॉफी कप आहे याच्याशी काहीच घेणं-देणं नव्हतं. तो आपले कर्तव्य अगदी निष्ठेने बजावत होता. आता अजून काय वेगळे सांगावे, हे निलेशलाही काही कळेना.

"एक कॉफी." तो हळूच म्हणाला.

त्याच्या रिपीट ओर्डरवर वेटर जरा त्रासून म्हणाला, "साहेब, आनी काही?"

"काही नाही." निलेश म्हणाला.

त्यावर वेटर हसला आणि मागे वळला. आता आत बसणे आता त्याला फार अवघड जात होतं. आता हॉटेल भरत होते, जेमतेम एकादे टेबल रिकामे राहिले असेल. हॉटेलात बसलेले बहुतेक लोकं आता मद्याचे पेलेही भरायला लागले होते. आता निलेशला एक सिगरेटचे थोटूक ओढायला मिळाले असते तर किमान या सगळ्यांमध्ये तो थोडा व्यस्त दिसला असता. त्याला त्याच टेबलावर बसून रहायला लाज वाटली नसती.

पण हॉटेलच्या भिंतीवर टांगलेल्या “नो स्मोकिंग” च्या फलकालाही ते मान्य नव्हते. निलेशच्या संयमाचा बांध आणि वेदा येण्याची आशा पुरती मोडून पडली होती. तेवढ्यात अचानक त्याचे हृदयाचे ठोके चुकले अगदी पूर्वी चुकायचे तसेच….!! ती रेस्टॉरंटमध्ये शिरली होती. 

निलेशने आपल्या डोळ्यातली चमक आणि उत्साह, हावभाव कमी करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. सरते शेवटी त्याचे बैचेनी थांबली आणि त्याने आपली पाठ खुर्चीवर टेकवली. वेदा आजूबाजूला न पाहता कोपऱ्यातल्या टेबलांच्या दिशेने निलेशला शोधू लागली. त्याच्या पूर्वीच्या सवयीनुसार आजही त्याने एखादे कोपऱ्यातले टेबल बुक करून ठेवले असेल आणि तो तिथेच तिची वात पाहत असेल याची तिला खात्री होती. अश्या टेबलाला तो नेहमीच “कोझी कॉर्नर” असं म्हणायचा.

आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही तिच्या आवडी-निवडी तिच्या सवयी विसरली नव्हती. म्हणूनच कि काय आजही ती त्याच तिच्या आवडत्या निळ्या रंगाच्या कपड्यांत होती. वेदानी हलक्या आकाशी रंगाची आणि गडद निळ्या रंगाच्या किनारीची साडी नेसली होती. या निळ्या रंगाच्या साडीत ती एखाद्या परीसारखी दिसत होती. तिच्याकडे पाहून त्याला दिलासा मिळाला होता. ती अनौपचारिकपणे समोर बसली. 

"सॉरी...! उशीर झाला." ती जराशी लाजतच म्हणाली.

"काही हरकत नाही." तो हसला.

"अरे व्वा..! कसं नाही बोलायचं…!! बघ मी आजही तशीच दिसते ना…!" ती उत्साहाने म्हणाली.

"अगदी तशीच होती तशीच…!" निलेश म्हणाला.

म्हणजे आजही ती तशीच दिसत होती…! कशाश्या विचाराने त्याचे हृदय प्रफुल्लीत झाले होते.

"खरंच..! तू ही अजिबात बदलली नाहीस." निलेश म्हणाला.

"हो. आजही मी तुझं खोटं क्षणार्धात पकडू शकते....!" असं म्हणून ती खळखळून हसली. 

“तुझा चष्मा बदल जरा निलेश, मी तशीच आहे पण मी तशीच दिसत नाही…! बघ ना...! किती जाड झालेय मी…!"

निलेशने चष्म्यावर फुंकर घातली आणि रुमालाने आपला चष्मा पुसण्याचा बहाणा केला. त्याने ऐटीत चष्मा डोळ्यांवर चढवला. तो आता खरच तिच्याकडे अगदी निरखून पाहू लागला होता. ती तशीच दिसत होती.

तिचं शरीर पूर्वीपेक्षा थोडं जास्त सुडौल झालं होतं. पण चेहऱ्याच्या जिवणीत तसूभरही फरक नव्हता. मनात घर करून जाणारे तिचे मृगनयनी डोळे, तिची नितळ कांती. तीच बोलण्याची मनमोहक शैली आणि तोच कानाला मंत्रमुग्ध करणारा 'व्हिस्कीसारखा मधुर आवाज'. आज तिच्या मोठ्या कपाळावरच्या टिकलीचा रंग मात्र बदलला होता. तिच्या कोरलेल्या भुवयांमध्ये नेहमी छानशी चंद्रकोर असायची. ती कधी कपाळावरून पडलेली निलेशला आठवत नव्हती.

त्या रेस्टॉरंटमध्ये मंद आवाजात काही गझली आणि जुनी गाणी वाजत होती. त्या गाण्यांची धून त्याला आठवत नव्हती. तो कधीही काहीही विसरत नाही मात्र आज त्याला त्या गाण्यांचे शब्दच ऐकू येत नव्हते. खरं तर, त्याला सध्या काहीच आठवत नव्हते. त्याच्या मेंदूने विचार करण्याची क्षमता गमावली होती. याउलट, ती मागे वाजत असलेल्या गाण्यांबरोबर सहज गुणगुणत होती. 

तिला मनात वाटलं,“ किती बरं झाल असत जर तो पूर्वीसारखा तासनतास माझ्यासोबत राहिला असतां…!”

तिची हिच जवळीक आजही त्याला भुरळ घालते. त्याला पुन्हा तिच्याबरोबर प्रेमाची खेळी खेळायची होती.

जुन्या प्रेमाची दुसरी इनिंग…!!!

त्याने आपल्या ठेवणीतले तेच जुने फासे परत फेकले,"हा रंग छान दिसतोय तुला."

"अरे..! होय, माझ्या अहोंना खूप आवडतो. माझ्याकडे निळ्या रंगाच्या सर्व छटा. आकाशी, नीलमणी, नेव्ही. अरे...! जवळपास डझनभर साड्या आहेत.ते ऐकत नाहीत सांगून… किती साड्या घेऊन दिल्या आहेत त्यांनी.." 

तर हे सगळे रंग वेदाला आवडतात म्हणून नव्हे तर त्याला आवडतात म्हणून होते. आठवणींची शिदोरी  उघडली.

त्यालाही तिला नेहमी निळ्या साडीत] पाहायचं होतं. तेव्हाही ती त्याच्यावर तशीच चिडायची. आपले टोकदार नाक मुरडत, चिडून.

"हे पण एक फॅडच होतं. जर तू निलेश आहेस तर नेहमी निळाच वापरायचा असं कुठे काही लिहिले आहे का? तुला तुझ्याच रंगात मला रंगवायचा आहे का?"

त्याच्या अश्या बोलण्याने तिला जरा जास्तच चीड यायची.

तेव्हा तो म्हणे, "काश..!! तुझे नाव नीलिमा असते."

आता त्याची लांब सडपातळ बोटे टेबलावर सुरात वाजू लागली होती. 

"तू कसा आहेस?" ती म्हणाली.

"ठीक आहे." तो तिच्या मुडचा अंदाज घेत आता बोलु लागला होता. त्याच्यात आता तिला पुन्हा गमावण्याची ताकद नव्हती.

“ठीकच असतील तर काय होणार तुला??" तिच्या चेहऱ्यावर भावच नव्हते. ती पूर्णपणे भावनाशून्य होती. ती तिच्या मनगटात अडकलेल्या निळ्या बांगड्या मागे-पुढे करत होती. त्याला वाटलं तिच्या त्या बांगड्यांना आपल्या हाताने पकडाव्या पण तो शांत तिच ऐकत होता.

त्याच्या हृदयाचे ठोके चुकले.एखाद्या तज्ज्ञ वैद्याप्रमाणेत्याने तिच्या मनातली सगळी परिस्थिती जाणून घेतली. समोरच्या टेबलावर एक अफगाणी बाई आपल्या  दातांनी तंदुरी खात होती. डावीकडील टेबलावर, एक तरुण जोडपे बिअरवर ताव मारत एकमेकांच्या डोळ्यात मग्न होते. शेजारीच एक मुलगा हातवारे करून कुजबुजत होता. एका टेबलावर मुलगी अखंड हसत होती. हे सगळं पाहून त्याला अचानक बिअरची तीव्र तल्लफ झाली. त्याने वेटरला बोटाने इशारा केला. 

 "एक बिअर. व्हेज कबाब." त्याने मागवले "आणि तू?"

"मी पण." ती म्हणाली

"तू पीतेस?" त्याला आश्चर्य वाटले.

"अरे! मग मी पितेच" ती म्हणाली

"ठीक आहे..! कधीपासून?" तो गप्प राहिला.

त्याने आपले शब्द बदलले आणि म्हणाला, "मला वाटत की ज्याने बीअरचा शोध लावला, तो एक हुशार माणूस होता.”

तिने हो किंवा नाही काहीच म्हटले नाही. ती नेहमीच असे करायची. तिला वाटलं तर ती बोलायची नाही वाटलं तर गप्प रहायची नेहमीच असे केल होते.त्याला पुन्हा तिच्याशी जवळीक साधण्याची आशा निर्माण झाल्यासारखी वाटली. ती आता बिअर प्यायल्यानंतर थोडी स्पष्ट बोलू लागली होती.

ती इकडचे तिकडचे, नवीन-जुने सगळे किस्से आठवून त्याच्याशी गप्प्पा मारत होती. जुने मित्र, कॉलेजमधील मजेदार किस्से, नवरा, मुलं, घरोघरीचे किस्से पण त्याला तिच्याकडून असे अनावश्यक काहीही ऐकायचे नव्हते. या त्याला अपेक्षित असलेल्या चर्चा  नव्हत्या. त्याला त्या वेळेला त्यांचे रोमँटिक क्षण तिच्यासोबत शेअर करायचे होते. आणि रिफ्रेश करायचे होते. तिने शेजारी असलेल्या तरुण मुलासारखे बोलावे, त्याच्या पाणीदार डोळ्यात हरवून जावे  आणि शेजारच्या त्या मुलीप्रमाणे, तिनेही लाजावे.

निलेशला वाटून गेलं. कदाचित यावेळी ते दोघं या गजबजलेल्या रेस्टॉरंटऐवजी पूर्वीप्रमाणेच एखाद्या गार्डन किंवा जुन्या किल्ल्यातील कुठल्याशा निर्जन कोपऱ्यात, तो आपल्या बोटांनी तिच्या मऊ हाताला हळुवार स्पर्श करत असत. पण या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. हे सगळे करताना तिच्या नाकारला होकाराम्ध्ये बदलण्याचे कौशल्य त्याच्यात होते.आठवणीत हरवलेल्या एका जुन्या उत्कट भेटीने त्याचे मन ताजेतवाने केले होते.

त्याच्या अंगावर काटा आला. त्याने आता काही प्रयत्न केले तर कदाचित रोजच्या भेटी-गाठी सुरु होतील. उत्साहाने त्याच्या पायांना कंप सुटला. त्याचे स्वतःचे स्वतःला कळत नव्हते कि त्याला बियर चढलीय कि तिची साथ…!! टेबलवर ती तशीच शांत आणि निश्चिंत होती जशी ती एक तासापूर्वी होती. तिचे असे निश्चिंत आणि निवांत राहणे त्याला खूप अस्वस्थ करत होते. ती टेबलावर जरा पुढे झुकून कोपर टेकवून बसली होती. ते दोघाही बिअरचे छोटे घोट घेत होते. बिअरच्या प्रत्येक घोटाचा कडूपणा तिच्या चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा दिसून येत होता, हे ती कुशलतेने आपल्या स्मित हास्याने लपवत होती.

ती टेबलावर जशी बसली होती तिला पाहून जणू एखद्या गृह्शोभाचं कव्हर बघतोय असंच वाटत होतं. त्याने असच कव्हर जेव्हा पाहिलेला होतं जे त्याला लक्षात राहिला होतं. हे सगळं ही तो कधी विसरत नाही. तिच्याकडचा शब्द संग्रह कदाचित संपला असावा. तिने खूप किस्से सांगितले होते. तिची बोटं काचेच्या ग्लासच्या कडांवर खिळून राहिली होती.त्याला अजून बराच वेळ तिच्याबरोबर गप्पा मारायच्या होत्या. तो फारच उत्साहात होता.

"मागच्या आठ वर्षात मला तुझी खूप आठवण आली तु माझी कधीतरी आठवण काढलीस का???”  तो थोडा भावूक होत म्हणाला.

"मी नेहमी तुझी आठवण काढते. अनेकदा." तिने आता रिकाम्या ताटावर चमचा-काटा व्यर्थ फिरवायला सुरुवात केली होती. शेवटी त्याने तिला महत्वाच्या मुद्द्यावर आणले होते.

"माझी की माझ्या प्रेमाची?" त्याने विचारलं.

"प्रेम..! म्हणजे नक्की काय असते रे नील?" तिने मस्करीत त्याला चिडवले. 

त्याचा चेहरा जरा गंभीर झाला. "मला तुझे नाईलाज आणि तुझे प्राधान्यक्रम माहिती आहेत." त्याच्या भुवयांवर अनेक आठ्या उत्स्फूर्तपणे उमटल्या.

"चल जाऊया?" ती अचानक उभी राहिली. 

त्याच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल जाणवला.त्याला तिला काही सांगायचे होते.

"इतक्या लवकर?" तो म्हणाला.

"मला जायचे आहे.जय एकटा आहे." तिने त्याला सांगितले. शांत मनाने, त्याने उरलेली बिअर ग्लासमध्ये ओतली, बिलासह टीपचे शंभर रुपये सोडून तो अनिच्छेने तिच्या मागे निघाला. डिसेंबरची थंडी होती. पुण्यात तसा तापमान कमीच असंत.

हलक्या रिमझिम पावसामुळे हिवाळा अजून मनमोहक वाटत होता. पुणे युनिवर्सिटी चौकात गजबजलेल्या रस्त्यावरून तो हळू हळू पुढे जात होता. त्यांच्यामधील अंतर आता इतके कमी झाले होते की त्यांच्या बियरचा दुर्गंध आणि उष्ण श्वासाची वाफ एकमेकांना स्पर्श करत होती. त्याने आपले हात तिहया हातात द्यायचा निष्फळ प्रयत्न केला होता.पुढे काय बोलावे काय करावे हेच त्याला कळत नव्हते. तो त्याचे दोनही हट एकमेंवर घासतो या थंडीत थोडी उब मिळावी म्हणून त्याला खरं तर तिच्या हातांची उब हवी होती. पण सध्या त्याला आपलेच हाथ एकमेकांवर घासून गरम करावे लागत होते. त्याने हाताच्या मुठी वळल्या आणि आपल्याच अंगाशी स्वतःला घट्ट मिठी मारली.

काही मिनिटांनंतर, त्याने आपले हाथ काखेतून बाहेर काढले आणि त्याच्या जॅकेटच्या उबदार खिशात सरकवले.अश्या कडाक्याच्या हिवाळ्यात बसस्टॉपवर उभं राहून अनेकदा त्याने आपल्या थंडगार हातांनी तिच्या मानेला हळूवार स्पर्श केला. खूप वर्षांपुर्वीची ही अशीच रात्र त्याला आठवत होती.नाकाची थंड टोकं जेव्हा त्याने तिच्या गालावर हळुवार फिरवले होते. तेंव्हा तिने तिचे गुलाबी हात एकमेकांना घासून गरम केले आणि आपल्या हाताने त्याच्या नाकाचे टोक झाकले होते. तो प्रेमाने तिचे दोन्ही हात आपल्या जॅकेटच्या खिशात भरायचा. 

त्याने जुन्या आठवणींची शिदोरी उघडली.

आता थोड्याच वेळात ते मेन रस्त्याला लागणार होते. इथून आता त्यांचे मार्ग वेगळे होणार होते. त्याला याच थोडक्या वेळात तिच्याबरोबरची पुढची मिटिंग फिक्स करायची होती. ती आता थोडीशी बिनधास्त आणि निरस दिसत होती. तिची अवस्था पाहून त्याने पानवाल्याच्या दुकानातून सिगारेट घेतली आणि शिलगवली. तो स्वतःला शांत ठेवण्यासाठी दोन-चार पफ ओढले..

पावसाच्या हलक्या सरी त्याला उत्तेजित करत होत्या. तो तिच्या शेजारी उभा होता. तिथे दोन माणसांना उभं राहण्याइतकीही पुरेशी जागा नव्हती. तो देवाकडे प्रार्थना करत होता कि ही रिमझिम थोडी जोरात व्हावी. पाऊस वाढला तर तो तिला घेऊन पानवाल्याच्या गादीच्या प्त्र्याखाली गेला असता. त्याने पानवाल्याकडे पहिले तो आपल्या गल्ल्यातले सुटते पैसे मोजत होता. तेवढ्यात नीलने त्याला अजून एक सिगरेट मागितली त्याच्या कडे सुट्टे नसल्याने त्याने गोळ्या काढून दिल्या. तिने पटकन नीलच्या हातातून एक गोळी घेऊन आपल्या तोंडात टाकली.

"तू अजूनही तेवढ्याच सिगारेट ओढतोस?" तिने चिंतेने त्याला विचारलं.

त्याची नजर रस्त्यावर होती."ह्या पेक्षा थोडे जास्त." ती म्हणाला.

"का, बायको रागावत नाही?" 

"छे नाही ती माझ्यावर कधीच रागवत नाही..! तिला या गोष्टींची फारशी पर्वा नाहीये…!” इतके म्हणून तो स्वतःच्या विश्वात मग्न झाला.

“चांगली बायको मिळालीय तुला...! ती काय करते..?" तिने विचारलं.

"काही नाही.तेच मुलं, घर, स्वयंपाकघर." 

"हे तर तुझं जग आहे ना नील...हो कि नाही?" ती खळखळून हसली.

तो किती अहंकारी आहे हे त्याला जाणवत होते. त्याला कधी, कुठे, काय बोलावे तेच कळत नव्हते. त्याला स्वतःचाच राग येत होता.

रस्त्यावरील वाहतूक रोजच्या तुलनेत कमी झाली होती. हाडे गोठवणारा थंड वारा होता. ती या थंडीत हूडहुडायला लागली होती.

"हे घे…!जा, जाकीट घेऊन जा, थंडी आहे. मी पुरेसे कपडे घातले आहेत." त्याने जॅकेट काढण्यासाठी हट वर केले. "पुढच्या वेळी परत दे." 

"नको अरे..! मला इतकी थंडी नाही वाजत. तू खूप काही विसरलास असं दिसतंय."

त्याने परत तिच्या डोळ्यात पाहिलं. "मी अजूनही तसाच आहे, पूर्वी जसं होतो तसाच."

त्या डोळ्यांत तक्रार किंवा पश्चातापाची झलक दिसत होती. आता कदाचित पुढच्या भेटीबद्दल काही बोलू असे म्हणून तो अधीर झाला. तिने हाताच्या इशार्‍याने बाजूने जाणारी रिक्षा थांबवली.

"ठीक आहे, मी जाते." 

चालताना तिने आपला उजवा हात पुढे केला. त्याने तिचा हात हातात घेतला. भिजलेल्या मऊ कापसाला स्पर्श झाल्यासारखा. त्याने तिचा हात आपल्या तळहातात धरला आणि विचार करू लागला की आज रात्री हे सगळं त्याला साध्य झाले होते. तिच्या हाताची ही अवर्णनीय स्पंदनं तो ओळखतो. या थंडीतही त्याचा तळहात थोडासा ओलसर होता. त्याने विचार केला. तो तिला आपल्या मिठीत घेऊ शकला असता तर बरं झालं असते. त्या दोघांच्या डोळ्यांत भावनांचे काहूर माजलेले दिसत होते. तो सध्या तिच्या हाताला सोडू इच्छित नव्हता.

"मग कधी?" त्याने आपली सारी चिंता आणि मनाची घालमेल या दोन शब्दांत ओतली.

"माहित नाही." ती ऑटोमध्ये बसली होती.

त्याला आपली फसवणूक झाल्यासारखे वाटत होते. तिने त्याला त्यांच्या पुढच्या भेटीबद्दल काहीच सांगितले नव्हते. त्याच्या मनाची घालमेल चालू झाली होती. थोडा वेळ मिळाला असता तर,  तेवढ्यात तो तिचा फोन नंबर मागू शकला असता. त्याच्या संयमाचा बांध तुटला होता. या भेटीसाठी त्याने आठवडाभर चातकासारखी वाट पहिली होती..!

ती नुकतीच निघून गेली होती. त्याच्या बाजूला बहुधा आता काहीच उरले नव्हते. तिच्या जाण्याने त्याच्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती. तो अस्वस्थ झाला होता. 

“या बायका…!! अश्याच करतात…प्रेम हे सर्व त्यांच्यासाठी निरर्थक आहे. आपल्यासोबत घालवलेल्या अनेक अविस्मरणीय संध्याकाळ त्यांना आठवत नाहीत का? प्रेम नावाचा कुठलाही शब्द कदाचित त्यांच्यासाठी अस्तित्वातच नाही.

 तो थकून घरी परतला होता.आज तो थोडा दु:खी वाटत होता. मेहनतीने घेतलेले पीक एकाच पावसात जसे वाहून जाते तशीच त्याचीही मेहनत वाया गेल्याची त्याला वाटले. त्याची बायको धावत आली.

"आज लवकर आलात...!" 

त्याच्या बायकोने स्वेटर, शाल, स्कार्फ, मोजे, सगळे अगदी गाठोडे करून अंगावर पांघरून घेतले होते. तिला खूपच थंडी वाजत होती वाटत. बायकांना खूपच थंडी वाजते त्यात माझ्या बायकोला जरा जास्तच..!! त्याच्या चेहऱ्यावर तिरस्काराचे भाव उमटले. बायको फोनवर कुणाशी तरी बोलत होती.

 "ठीक आहे आता ठेवते फोन... हो ते आले आहेत... हो, उद्या दुपारी...अच्छा ठेवते....!!"

अचानक त्याच्या मनाट बायकोबद्दल शंकेची पाल चूकचूकून गेली. त्याच्या साधी सरळ दिसणाऱ्या बायकोच्या आयुष्यात त्याच्या व्यतिरिक्त कुणी माणूस आहे कि काय???  तो शांतपणे सोफ्यावर आडवा झाला. बायकोने त्याच्या खिशातून सिगारेटचं पॅकेट काढून सिगारेट मोजत आहे.

"फक्त चार..! म्हणजे आज पुन्हा सहा सिगारेट?" बायकोच्या कपाळावर एक काळजीची आठी आली होती.

"थकलेला वाटतोयस..!" तिने त्याच्या कपाळाला हात लावून प्रेमाने विचारले.

"हो." त्याने संक्षिप्त उत्तर दिले.

"खूप थंडी आहे ना…! चहा आणू का?” तिने प्रेमाने विचारला.

"नाही, चहा नको, थोडा वेळ जरा बस बाजूला माझ्या..!" बराच वेळ त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलेच नाही. ती जरा प्रश्नांकित नजरेने त्याच्याकडे बघत होती. बायकोला पाहून त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. कृतज्ञ बायका अश्याच असतात वाटतं…! त्याच्या मनात एक विचार येऊन गेला. हो..!अशाच असतात..! त्याची बायको वेगळ्याच विचारात मग्न झाली होती. ती निलेश घरी यायच्या आधीचे क्षण आठवत होती...

ती रिक्षातून उतरली होती. जवळ जवळ पळतच घरी पोहोचली होती. संध्याकाळी घाईघाईने ती घराबाहेर पडली होती त्यामुळे घरात पसारा तसाच पसरलेला होता. तिला घराची आवरा आवर करायची होती. तिच्या मुलाने कित्येक तास खाल्ले नव्हते माहिती नाही. त्याच्या स्वेटरच्या खिशात ठेवलेली बिस्किटे अजूनही तशीच होती.

तिने घाईघाईने जेवणाचं ताट त्याच्या हातात दिलं. नेहमीच्या सवयीनुसार तिच्या खोलीतल्या मोठ्या आरशासमोर उभी राहून, आपल्या केसांची गुंफण उलगडत होती. याला भेटून आल्यानंतर ती बऱ्याचदा आरशात बघायची. निळ्या रंगात ती किती सुंदर दिसते. जसे हा रंग फक्त तिच्यासाठीच बनवला गेला आहे.

थोडावेळ स्वतःला आरश्यात निराखल्यावर तिने कपाटाच्या एका दुर्लक्षित कोपऱ्यातून एक निळी डायरी बाहेर काढली. त्यावर 'निलिमा' असे मोठ्या अक्षरात लिहिले होते. पिवळी पडलेल्या पानांमधून तिला त्याच्या आणि तिच्या कित्येक वर्षांच्या आठवणींची गुंफण तिला मोहित करून टाकणारी होती. या आठवणी सुमारे दशकभर जुन्या होत्या त्यात एक तितकाच जुना एक फोटो होता. तिने त्या फोटोकडे पहिले आणि तिचे डोळे पाणावले. ती आपल्याच तंद्रीत होती.

तिचं मन अजूनही रेस्टॉरंटच्या त्याच निवांत कोपऱ्यात बसलं होतं. तिच्या चेहऱ्यावर उदासीनता आणि दुखः दिसत होतं. अचानक तिला थंडी जाणवू लागली अंगावर शहारा आला. तिला डोळे झाकून आणि ब्लँकेटने थोडा वेळ असेच पडायचे होते.एकदम निपचित आणि शांत, पण घड्याळात नऊ वाजत आले होते.

निलेश लवकरच येईल या विचाराने तिने पटकन उठून डायरी पुन्हा जागेवर ठेवली आणि पॉलिथिनमध्ये डांबर गोळ्या टाकून ती एकमेव निळी साडी जतन करून ठेवली होती. बराच वेळ ती बाथरूममध्ये तोंड धुत राहिली होती. 

आता अश्रू, वेदना किंवा नैराश्याची चिन्हे तिच्या चेहऱ्यावर  दिसत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते. हॉटेल ते घर,आता दिनक्रम झाला होता. ती हे नियमितपणे करत आली होती.

 

गेली पाच वर्ष…!!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel