“आम्ही काय गरिब म्हणून चोर ? मरु ; चोरी नाही करणार. चल ; मी येते.” असे म्हणून लक्ष्मी तणतणत गेली. तो चहाचा दुकानवाला पान खात होता.
“तू माझ्या दिराला बोललास ? गरीब पाहून का वाटेल ते बोलावे ? उपाशी मरु पण दुस-याच्या वस्तूला आम्ही हात लावणार नाही. कशाला घेईल तो तुझे चार आणे ? त्या चार आण्यांनी का आम्हाला माड्या बांधता येणार आहेत ? तो नाही पीत विडी, नाही खात सुपारी. कशाला घेईल तुमचे चार आणे ?”
“अगं, पण येथले गेले कोठे ?”
“ते शोधा तुम्ही.”
इतक्यात तेथे एक लहान मुलगा होता. तो इकडेतिकडे बघत होता.
“अहो, ते पाहा चार आणे. कुडाजवळ पडले आहेत.” तो मुलगा म्हणाला.
चार आणे सापडले.
“बघा आणि गरिबावर चोरीचा आळ.”
“मग, म्हटले म्हणून काय झाले ? त्याला कोठे काम मिळत नव्हते. मुंबईत त्याला रोजगार भेटेना. तेथून आला भीक मागत परत. मी म्हणून कपबशा विसळायला तरी ठेवले. नाही दिसले चार आणे म्हणून म्हटले. आजवर नाही म्हटले ते. एवढी मिजास असेल, तर येऊ नको कामाला. कामाला वाटेल तेवढी दुसरी पोरे मिळतील.” मालक म्हणाला.
“नाहीच येत कामाला.” हरी म्हणाला.
“हो चालता.” मालक गर्जला.
“माझा पगार द्या.”
“महिनाअखेर ये. असा मध्येच नाही मिळत.” हरी निघून गेला. लक्ष्मी गेली. परंतु दिराची नोकरी गेली म्हणून तिला वाईट वाटले. आणि आणखी संकटे येऊ लागली. यंदा तिने मळणी काढली. भात फार झाले नाही. कोठून घालणार मक्ता ? आदल्या वर्षींचीही दोन मण बाकी होती. मालकाने सांगितले, “सारे भात घाला. मागील वर्षाचे नि यंदाचे. नाही तर शेत काढून घेऊन दुस-यास देतो.’ काय करायचे ? शेताचा थो़डा आधार होता आणि शेत काढून घेतले म्हणजे राहायचे कुठे ? ते शेत ती मक्त्याने करीत म्हणून तेथेच झोपडीत राहत. लक्ष्मी संचित झाली.