डायरी, तारिख २५ मे १९९१

पहिला दिवस

वेळ रात्री ८.३० वाजता

आज संध्याकाळी ज्युलीने  ६.३० वाजता जेवण आधीच तयार केले आहे. मी इथे खिडकीपाशी बसले आहे, बाहेरचे निर्जन वातावरण बघून मनातली शांतता सर्वदूर पसरलीय असं वाटतं. पंखा चालू आहे पण उष्णता इतकी जास्त आहे की संपूर्ण शरीर घामाने न्हाऊन निघाले आहे. आधीपासून स्वप्न  होते त्यानुसार गोव्यात कॉन्व्हेंट शाळेत नोकरी मिळाली आहे म्हणून आधी खुश झाले आहे. पण लहानपणा पासून नाशिकमध्ये राहिलेल्या मला इथला दमट उन्हाळा असह्य होतो आहे. असो आणखी काही दिवसातच शाळा सुरु होईल. माझ्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शर्ली फर्नांडीस या मैत्रिणीच्या ओळखीने हे तिचे नातवाईकांचे कॉटेज राहायला मिळाले ते बरेच झाले आहे. इथून शाळा चालत अगदी  १० मिनिटे अंतरावर आहे.

दोन अडीच मजल्यांचे हे एवढे मोठे कॉटेज आहे आहे की इथे एकटे बसायला भीती वाटते, आज सकाळी आम्ही इथे आलो  तेव्हा बरं वाटलं, ज्युली, दिवसभर इथेच होती, त्यामुळे एकटेपणा किंवा भीती जाणवत नव्हती. लोकेश आणि मी दोघे असतो तर मला इतकं एकटं वाटलं नसतं पण आज असं वाटतंय की या भल्यामोठ्या घरासारखीच मी देखील आतून रिक्त आहे.मी जरी एकटी श्वास घेत असले तरी एक दोन लोक एकत्र श्वास घेत असल्यासारखा त्याचा आवाज प्रतिध्वनीत होतो आहे इतकी भयाण शांतता आहे.

हेच अवाढव्य दुमजली कॉटेज किती तरी लोकांचं घर सहज होऊ शकतं. एवढ्या मोठ्या घरात ८ ते १० माणसं आरामात राहू शकतात. वरच्या मजल्यावरील सर्व खोल्या कुलूपबंद आहेत, त्यातली एक खोली स्टोअर रुम म्हणून वापरली जाऊ शकते, निदान ज्युलीने तरी मला असेच सांगितले आहे.

पण अजून एक गोष्ट मला विचित्र वाटली. मी पूर्णपणे शाकाहारी आहे हे ज्युलीला माहित आहे पण तरी इथे रोज ३ ते ४ किलो मांस शिजवलं जातं, ते वरच्या मजल्यावर एका भांड्यात मधोमध ठेवलं जातं, ज्युलीने याचे कारण मात्र स्पष्ट सांगतिले नाही आणि मी अनेक वेळा सांगूनही ती रात्री झोपायला इथे थांबली नाही. स्वयंपाक पूर्ण होताच निघायची तिला इतकी घाई झाली होती की तिने सकाळी किती वाजेस्तोवर येईल हे सुद्धा सांगितले नाही. असो, जेवण आतमध्ये डायनिंग टेबलवर ठेवलेलं आहे, मला वाटतं की आधी मस्त गार पाण्याने आंघोळ करावी आणि मग जेवण करून झोपी जावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel