डायरी, तारीख २६ मे १९९१
दुसरा दिवस
वेळ रात्री ११.४५ वाजता
आज सगळं सुरळीत होतं, जेवणाच्या टेबलावर जेवण आपापल्या जागी ठेवलेलं होतं, कदाचित ज्युली बरोबरच म्हणाली होती, काल कोणीतरी मांजर किंवा इतर प्राणी असावा, ज्याने अन्न किचवडून टाकलं असावं, अशा एखाद्या निर्जन ठिकाणी राहणाऱ्यांच्या मनात असली कसली अज्ञात भीती निर्माण होणे ही काही अनोखी गोष्ट नाही. अशी भीती माणसाला अशा स्थितीत अनेकदा घेरते. असो.
आता नुकतेच रात्रीचे बारा वाजले आहेत, ड्रॉईंगरुममध्ये मोठं भिंतीवरीचं घड्याळ आहे.... त्याच्या टोल्यांचा एवढा मोठा आवाज आहे की इतक्या रात्रीं मैलोन मैल दूर त्याचा आवाज ऐकू गेला असावा. असं वाटतंय कि.. वरच्या खोलीत कोणीतरी फिरत आहे, पण इथे कोणी कसे असू शकते?
मी आज पुन्हा ज्युलीला विचारले, तिने सांगितले की या घरात माझ्या व्यतिरिक्त रात्री कोणीच नव्हते. असं वाटतंय जणूकाही ते मांसाचे मोठे भांडे कोणीतरी ओढून नेले आहे आणि मग कोणीतरी खोलीचा दरवाजा धाडकन बंद केला आहे. माझे हात पाय थरथर कापत आहेत, मी खोलीत जाऊन हिंमत करून पाहते कि प्रकरण नक्की काय आहे?