(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच असावे .
चार दिवसांनंतरची गोष्ट.तो मॉलमध्ये एका कपड्याच्या दुकानात कपडे निवडीत होता .पँटची निवड झाली होती.त्यावर कोणता शर्ट चांगला दिसेल ते तो निरनिराळ्या रंगाचे शर्ट त्यावर लावून पहात होता.एवढ्यात मागून आवाज आला .सर तो नाही मरून रंगाचा शर्ट चांगला दिसेल .तो तुम्हाला खुलून दिसेल .त्याने चमकून मागे वळून पाहिले .त्याच्या मागे ते मोहक स्मित करीत सुधा उभी होती.सुधा त्याच्याजवळ फार जुनी ओळख असल्यासारखी गप्पा मारीत होती .तिचे हास्य जेवढे मोहक होते, तेवढीच बोलण्याची पद्धतीही आकर्षक होती.गप्पा मारता मारता आणखीही एक दोन शर्टची खरेदी झाली .नंतर रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेऊन दोघानीही परस्परांचा निरोप घेतला.
नंतरचा त्याचा दिवस चांगला गेला .तो स्वतःशीच खुषीत शीळ घालीत होता.त्याच्या आईने त्याला विचारले सुद्धा की एवढे आनंदित होण्याचे कारण कोणते?त्यावर त्याने फक्त एक मंद स्मित केले.तिची पुन्हा पुन्हा पुन्हा भेट व्हावी असे त्याला वाटत होते.
त्याचे नेहमीचे रुटीन चालू होते.तो व त्याचा एक मित्र सिनेमाला जाणार होते.सिनेमागृहापाशी तो मित्राची वाट पाहत उभा होता.काही आकस्मिक कारणामुळे तो मित्र येऊ शकणार नव्हता .एवढ्यात त्याला ती रस्त्यावरून चालत जाताना दिसली.तो घाई घाईने रस्त्यावर गेला आणि त्याने तिला हाक मारली.बोलता बोलता त्याने त्याचा मित्र सिनेमाला येणार होता परंतु तो आता येऊ शकत नाही असा त्याचा फोन आला असे सांगितले. मला एकट्याला सिनेमा पाहायला आवडत नाही असेही पुढे तो म्हणाला.त्याला काय वाटले कोण जाणे त्याने तुम्ही सिनेमाला येणार का? तुम्हाला आणखी काही महत्त्वाचे काम नाही ना म्हणून विचारले.
त्यावर ती तिचे सारंगप्रसिद्ध स्मित करीत म्हणाली की जर तुमच्या बरोबर सिनेमाला जाता येत असेल तर कुठलेही महत्त्वाचे काम मी बाजूला सारण्यास तयार आहे.अतिशय सहजतेने तिने सिनेमाला येण्याला संमती दिली.सिनेमागृहात बसता बसता ती म्हणाली की तुम्ही मला अहो जाहो करू नका .जशी वसुधाला हाक मारता तशीच मला मारत जा .
त्या दिवशीही घरी गेल्यावर तो खुषीत होता.ती खुषी त्याच्या चेहऱ्यावर व वागण्यात दिसत होती.यावेळी त्यानी परस्परांचे फोन नंबर घेतले होते.दुसऱ्या दिवशी तिचा फोन आला .यानंतर त्यांचे परस्परांशी रोजच काही ना काही संभाषण होऊ लागले .एकूण गाडी व्यवस्थित रुळावर धावू लागली होती.
सारंगचा थोडा दैवावर विश्वास होता.जर दोघांची अशीच आकस्मिक भेट झाली तर दैव आपल्या बाजूला आहे असे त्याने मनाशी ठरविले होते .
तो आपल्या मोटारीतून जात असताना त्याला वाटेत सुधा तिच्या स्कूटरशी काहीतरी खटपट करीत असलेली दिसली.त्याने मोटार बाजूला घेतली आणि कोणता प्रॉब्लेम आहे ते तिला विचारले .तिची स्कूटर बंद पडली होती .काहीतरी फॉल्ट निर्माण झाला होता.त्याने थोडी खटपट करून पाहिली. शेवटी त्याच्या मेकॅनिकला फोन लावला.स्कूटर त्याच्या ताब्यात देऊन नंतर त्याने तिला तिच्या घरी आपल्या मोटारीतून सोडले.तिने त्याला घरात बोलाविले .तिच्या आईवडिलांशीही त्याची ओळख झाली.
नंतर केव्हा तरी त्याने तिला आपल्या घरी नेले .आपल्या आईवडिलांशी तिची ओळख करून दिली.दोघांनीही परस्परांना पसंत केल्यावर आजकालच्या जमान्यामध्ये बहुधा मोठी माणसे त्याला मान तुकवतात .
एकदा मात्र आईने त्याला विचारले .मुलगी तशी ठीक आहे .परंतु तू तिच्यात काय पाहिले ?त्यावर त्याने तिचे मोहक हास्य व बुद्धिमत्ता असे उत्तर दिले.त्यावर त्याची आई म्हणाली हे मात्र खरे .एरवी जरी तिच्यात विशेष काही नसले तरी तिचे हास्य मात्र सर्व काही भरून काढते.मिलियन डॉलर स्माइल म्हणतात त्याप्रमाणे तिचे हास्य लाखमोलाचे आहे.
आपल्या विचारात तो किती वेळ गुंगून गेला होता ते त्याचे त्यालाच माहीत .आतापर्यंत पंख्याच्या वाऱ्याने त्याचे अंग सुकले होते.तो चटकन बसला.त्याने मोबाईल घेऊन तिचा नंबर लावला .फोनची रिंग वाजत होती परंतु ती उचलत मात्र नव्हती . असे दोन तीनदा झाल्यावर त्याने तिच्या वडिलांना फोन लावला .तेही फोन उचलत नव्हते .
चटकन उठून तो फ्रेश झाला .कपडे बदलून त्याने पुन्हा एकदा फोन लावला .अजूनही कुणीही फोन उचलत नव्हते .त्याने लगेच निर्णय घेतला . गाडी काढून तो तिच्या घरी पोहोचला .सकाळी सकाळी घराला कुलूप होते.त्यांने शेजारी चौकशी केली .सुधाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे असे त्याला कळले .कालपर्यंत ठीक असलेल्या सुधाला अकस्मात काय झाले ते त्याला कळेना.शेजाऱ्यानाही विशेष काही माहिती नव्हती.त्याने हॉस्पिटलचे नाव विचारले व गाडी हॉस्पिटलकडे घेतली.तिथे तिचे चिंताग्रस्त आई वडील बाहेर बसले होते.
त्यांच्याकडून त्याला पुढील हकीगत कळली .
हल्ली काही दिवस सुधाचे डोके खूप दुखत असे.विशेषतः रात्री डोके खूप दुखत असे.ती पेनकिलर घेत असे.बाम वगैरेही लावीत असे .जवळजवळ गेले महिनाभर तिचे डोके कमी जास्त प्रमाणात दुखत होते .ती आमच्या जवळ सुद्धा काही बोलली नाही .तिच्या स्वभावाप्रमाणे ती दुःख सहन करीत राहिली .आठ दिवसांपूर्वी ती आमच्याजवळ बोलली .डॉक्टरनी स्कॅनिंग करायला सांगितले होते .आज करू उद्या करू म्हणून ती टाळीत होती.दिवसा ती ठीक असे.त्यामुळे तुम्हाला काही कळले नाही .तिने तुम्हालाही सांगितले नाही .
काल रात्री अकस्मात तिचे डोके प्रचंड दुखू लागले .दुःखामुळे ती बेशुद्ध झाली .तिला आम्ही लगेच काल रात्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केली .तिला ब्रेन ट्यूमर आहे .ऑपरेशन केल्याशिवाय दुसरा कोणताही इलाज नाही .आज तिचे ऑपरेशन आहे .ती जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत आहे .पुढे सर्व काही त्याच्या हाती.असे म्हणून तिच्या वडिलांनी आकाशाकडे पहात हात उंचावले .
*तिचे ऑपरेशन यशस्वी होईल का?*
*ती शुद्धीवर येईल का?*
*ती सारंगला पुन्हा नेहमीसारखी भेटेल का ?*
*तिचे ते सारंगप्रिय हास्य परत येईल का?*
*सर्वच प्रश्न अनुत्तरित आहेत*
*किंवा फक्त "तोच"त्याची उत्तरे जाणतो*
(समाप्त)
१०/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन