(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

चंद्र अाकाशाच्या मध्यावर आला होता.

वाड्यावरील कौले  बहुधा उडालेली असावीत.

वाडा चंद्र प्रकाशाने उजळलेला होता.

या वाड्यात जावे, वाडा सर्वत्र फिरून पाहावा.

भूत भेटल्यास त्याला हॅलो हाय करावे .अश्या  गमतीशीर विचाराने आम्ही त्या वाड्यात पाऊल ठेवले  .

वाड्याच्या दरवाजाना झडपे नव्हती .खिडक्यांनाही झडपे दिसत नव्हती .ही वस्तुस्थिती मला चांगली वाटली .समजा वाड्यात एखादे किंवा त्याहून जास्त भुते असती तर  आम्हाला पळ काढणे सोपे झाले असते.दरवाजे खिडक्या बंद झाल्या त्यामुळे आत अडकून पडलो असे झाले नसते .भुते असतीच तर त्यांच्या तावडीत आम्ही सापडलो नसतो.अशी आमची एक बालिश कल्पना होती .

येथील रहिवासी,खोत मंडळी, कारण कोणतेही असो परागंदा झाली होती.वाडे ओसाड रिकामे पडले होते .अमानवी अस्तित्वाच्या भीतीने कुणबीही त्यांची घरे सोडून गेले होते.पडीक जागा, पडीक वास्तू, वड पिंपळ यासारखी झाडे, भुताना वस्ती करायला,रहिवासाला प्रिय असतात असे आम्ही ऐकून होतो .ही पेठ हे सर्व वाडे ही सर्व घरे पडीक होती .स्वाभाविक इथे भुतांची वस्ती आहे.अशी खरी किंवा खोटी आवई उठली होती.भुते खरीच असतात का? असल्यास ती इथे आहेत का?    

तेच तर पाहण्यासाठी आम्ही येथे आलो होतो .

वाड्यात आम्ही प्रवेश केला .वाड्यातील सर्व खोल्यांच्या  दरवाजाना व खिडक्याना झडपा नव्हत्या.बहुधा  घरात कुणी राहत नाही असे लक्षात आल्यावर दरवाजे व खिडक्या यांची झडपे काढून ती पळविण्यात आली असावीत .

आम्ही वाड्यातील दालना मागून दालनात जात होतो . आकाशात ढग नव्हते.चंद्र आकाश मध्यावर आला होता.पौर्णिमेची रात्र होती .सर्वत्र पिठूर चांदणे पडले होते .आश्चर्याची गोष्ट म्हणजे पडीत वाडा असूनही  सर्वत्र स्वच्छता होती.कुठेही केर मातीचे ढीग कोळिष्टके आढळत नव्हती.हे जरा अमानवी वाटत होते.आज आम्ही यायला नको होते असे एकदा मनात आले .प्रकाशात भुतांची ताकद कमी होते असे ऐकून होतो. आज तर पौर्णिमा, सर्वत्र स्वच्छ प्रकाश, भुते कशी दिसणार?आज समजा काही विपरीत दिसले नाही तर अमावस्येच्या रात्री पुन्हा यावे असे मी माझ्या मित्रांजवळ बोललो. आम्ही सर्व दालने पाहिल्यानंतर परत फिरलो.

आणखी एक दोन वाड्यांची सैर करावी आणि नंतर परत घरी जावे असा विचार होता.तेवढ्यात एक प्रदीर्घ किंकाळी ऐकू आली.नीरव शांततेमध्ये अकस्मात आलेल्या त्या किंकाळीने आमच्या अंगावरील केस अन् केस ताठ झाला. त्या किंकाळीने आम्ही इतके भयभीत  झालो होतो की काहीही ठरविल्याशिवाय आम्ही  सर्वांनी एक साथ पळायला सुरुवात केली . आम्ही बाहेरच्या खोलीत आलो.आता फक्त बाहेर पडायचे शिल्लक होते. एकाएकी दरवाजाला झडपा आल्या आणि त्या बंद झाल्या .बाहेर जायचा दरवाजा बंद झाला.आम्हा सर्वाना पूर्णपणे नीट आठवत होते की आम्ही आत आलो तेव्हा दरवाजाला झडपे नव्हती.आता अकस्मात ती कुठून आली होती?आम्ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला . जणू काही दरवाज्याला बाहेरून कुणीतरी कडी लावली होती .कितीही जोर केला तरी दरवाजा उघडत नव्हता.नंतर लक्षात आले दरवाजाला आतून कड्या होत्या. दरवाज्याच्या आंतील कड्याही लावलेल्या होत्या. त्या कड्या कुणी लावल्या होत्या .कड्या उघडण्याचा अाम्ही आटोकाट प्रयत्न  केला. कड्या उघडत नव्हत्या.जणू काही फेविकॉल किंवा एम्.सील.लावून त्या घट्ट  बसविल्या होत्या.आम्ही बाहेर पडण्यासाठी खिडकीकडे धाव घेतली .मगाशी एकाही खिडकीला झडपा नव्हत्या .आता सर्व खिडक्यांना झडपे होती .झडपा बंद होत्या .त्याच्याही  कड्या निघत  नव्हत्या. त्याही जणूकाही फेविकॉल लावून कुणीतरी घट्ट बसविल्या होत्या .

आम्ही आत कोंडले गेलो होतो .आणखी एक भयानक किंकाळी  उठली.घरी परत जाऊ या असे शापित पेठेमध्ये शिरण्याच्या अगोदरच म्हणणारा आणि नाइलाजाने आमच्या बरोबर आलेला आमचा मित्र बेशुद्ध पडला.

आपण बाहेर कसे पडायचे हा एक प्रश्न होता .बाहेर पडताना या मित्राला उचलून कसे न्यायचे हा आणखी एक प्रश्न निर्माण झाला .अकस्मात दिव्यांचे स्विच ऑफ केल्याप्रमाणे चंद्रप्रकाश नाहीसा झाला.सर्वत्र दाट काळोख पसरला .भूत आहे की नाही याचा साक्षात उलगडा झाला होता .या वाड्यात या पेठेत अमानवी शक्तींचे अस्तित्व आहे हे स्पष्ट झाले होते.या वाड्यातून बाहेर कसे पडायचे हा यक्ष प्रश्न होता .पौर्णिमेचे पिठूर स्वच्छ चांदणे सर्वत्र पडलेले असताना, सर्व काही चांदण्यात स्पष्ट  दिसत असताना अकस्मात काळोख कसा काय झाला याचा उलगडा करता येत नव्हता.

अर्थातच ही तात्विक चर्चा करण्याची वेळ नव्हती.सुटका कशी होईल ते पाहावयाचे होते . कोणताही मार्ग दिसत नव्हता.सकाळपर्यंत येथे बसून राहायचे .सूर्यप्रकाश पडला किं या अस्तित्वांची ताकद नष्ट होईल .त्यांनी केलेली जादू लयाला जाईल.आणि आपली सुटका होईल एवढीच आम्हाला आशा  होती.

दरवाजे खिडक्यांना झडपा आल्या .त्यांच्या कड्या घट्ट बसल्या.आम्ही कोंडले गेलो .चंद्र प्रकाश अकस्मात  नाहीसा झाला.याहून आणखी काही विपरीत घडू नये अशी आम्ही प्रार्थना करीत होतो .

कुत्र्यांचे भेसूर रडणे ऐकू येऊ लागले .लांबवर कोल्हेकुई सुरू झाली .घुबडांचा घुघुत्कार ऐकू येऊ लागला.त्यातच अधून मधून कमी जास्त आरोह अवरोह असलेल्या  विचित्र भीतीदायक किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या होत्या.कानात बोटे घालूनही त्या किंकाळ्या ऐकू येत होत्या.बहुधा  आम्ही सर्व किंवा एखाद दुसरा हार्टफेल होउन सकाळपर्यंत जाणार  असे वाटू लागले होते .

मित्राप्रमाणे आम्हीही बेशुद्ध  झालो असतो तर फार बरे झाले असते असे वाटू लागले .एवढ्यात आमच्या पुढ्यात एक उंच निंच आकृती दिसू लागली.क्षणात तिचा आकार लहान होत होता तर क्षणात तिचा आकार मोठा होत होता.क्षणात ती आकृती सुंदर दिसत होती तर क्षणात भेसूर दिसत होती.आम्ही डोळे विस्फारून त्या आकृतीकडे पाहात होतो.क्षणात त्या अमानवी  अस्तित्वाने पक्ष्याचे रूप घेतले .नंतर ते अस्तित्व कोल्हा  सिंह इत्यादी रूपे घेऊ लागले.दाट काळोखात हे सर्व आम्हाला कसे काय दिसत होते हाही एक प्रश्न होता. आम्हाला घाबरवण्याचा त्या अस्तित्वाचा विचार होता .आम्हाला बहुधा ते अस्तित्व स्पर्श करू शकत नव्हते.आमच्या मनावर प्रथम कब्जा बसवायचा .नंतर आमचा खुळखुळा करून टाकायचा असा त्याचा विचार असावा. आम्ही निश्चित घाबरले होतो.परंतु त्या अस्तित्वाला आमच्यावर कब्जा मिळविता येत नव्हता .ही आमची कल्पना बरोबर नव्हती हे दुसऱ्याच क्षणी आमच्या लक्षात आले .आमचा एक मित्र जागच्या जागी उचलला गेला .त्याला गरगर फिरविण्यात आले.त्याला हवेत इकडे तिकडे फिरविण्यात आले .खाडकन थोबाडीत मारण्याचा आवाज आला .मित्र गाल चोळीत उभा होता.आता आपले काही खरे नाही असे वाटू लागले .  आपण भूत आहे की नाही हे पाहण्याच्या फंदात उगीचच पडलो असे वाटू लागले.

एवढय़ात आम्ही असलेल्या खोलीत एक तेज:पुंज अस्तित्व दिसू लागले .यक्ष गंधर्व किन्नर देव यापैकी ते कुणी होते की भुताचाच एखादा प्रकार होता.कांही समजत नव्हते.काही उमजत नव्हते. काही कळत नव्हते.त्या अस्तित्वाने आम्हाला आश्वस्त केले.त्या अस्तित्वातून चारी दिशांनी प्रकाश पडत होता .काळोखमय असलेली खोली प्रकाशाने उजळून गेली होती .

ते अस्तित्व, आपण त्याला देवदूत म्हणूया, वाटले तर देवभूत म्हणूया, ते आल्याबरोबर आम्हाला घाबरवणारे भूत नाहीसे झाले होते.बहुधा  आम्हाला भयभीत करणाऱ्या भुतावर  त्या आलेल्या तेज:पुंज अस्तित्वाचा वचक असावा.

एखाद्याचा गळा दाबला असावा किंवा नाक घट्ट दाबून धरलेले असावे त्यामुळे घुसमटायला व्हावे तसे ते अमानवी भयानक अस्तित्व असताना वाटत होते.त्यावेळी सर्वत्र दाट काळोख पसरला होता .मांस सडल्याचा घाणेरडा वास येत होता.

तेजःपुंज भूतदेव किंवा देवभूत आल्याबरोबर सर्वत्र दाटलेला काळोख नाहीसा झाला .चांदण्याचा प्रकाश सर्वत्र पसरला . घाणेरडा वास नाहीसा झाला.मंद सुवास सर्वत्र पसरला .  सर्व काही नॉर्मल आहे असे वाटू लागले .दरवाजाच्या कड्या निघाल्या .झडपे उघडली .मोकळा वारा सर्वत्र फिरू लागला .कोंडलेला श्वास मोकळा झाला .ताजेतवाने उत्साही वाटू लागले .

आमचा बेशुद्ध पडलेला मित्र शुद्धीवर आला . आम्ही त्या वाड्यातून सहीसलामत बाहेर पडलो .आम्ही एकही शब्द न बोलता मित्राच्या घरची वाट चालत होतो.आणखी एखाद्या वाड्यात जावून अनुभव घेण्याची इच्छा कुणालाही नव्हती .शापित पेठेतून आम्ही बाहेर पडलो .हा अनुभव जन्मभर लक्षात राहण्याजोगा होता.

*ज्याप्रमाणे म्हटले जाते की इथेच स्वर्ग नरक व पृथ्वी आहे .*

*देव दानव मनुष्य  सर्व इथेच आहे .*

*सर्व अनुभव इथेच घेता येतात .*

*त्यासाठी आणखी कुठे जाण्याचे कारण नाही .*

त्याचप्रमाणे असेही म्हणता येईल की भूतयोनीमध्ये सर्व प्रकार आहेत .*

*जिथे मारणारे आहेत तिथे तारणारेही आहेत.*

*जगात सर्व काही आहे.*

*जग विविधतेने नटलेले आहे.*

*जग द्वंद्वमय आहे..

(समाप्त)

४/४/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel