( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
खोलीचे दरवाजे बंद असताना दोन खून कसे झाले?याचा उलगडा होणे कठीण दिसत होते.
वरवर पाहता कोमल दिनेशचा खून करू शकली नसती.दिनेश पीटी शिक्षक होता. ताकदवान होता.त्याचे शरीर कमावलेले होते.
जरी दिनेश बेसावध होता असे गृहीत धरले,तरीही एका घावात त्याचे शीर धडापासून अलग करणे कोमलला केवळ अशक्य होते.
दिनेश कोमलचे शीर एका घावात सहज उडवू शकला असता.पण सर्व दरवाजे आंतून बंद असताना दिनेशचे शीर कुणी उडवले हा प्रश्न इन्स्पेक्टर सुधाकरांच्या मनात घोळत होता.
कुणीही कुणाचाही खून केला असला तरी ज्याने प्रथम खून केला त्याचा खून कोणी केला हे कोडे सुटत नव्हते.
इन्स्पेक्टर सुधाकरानी प्रथम कोमलच्या वडिलांची भेट घेतली.इन्स्पेक्टर सुधाकर कोमलच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे खुनी शोधण्यास मदत होणार आहे.तुमच्या मुलीचा निर्घृणपणे खून झाला.खुन्याला न्यायासनासमोर आणण्यासाठी तुमच्या जबाबाची मदत होईल.
कोमल व प्रवीण यांच्या संबंधाबद्दल त्यांनी प्रथम चौकशी केली.दोघेही लहानपणापासून एकत्र खेळले, मोठे झाले, शाळेत कॉलेजात गेले, त्यांची मैत्री अजूनही कायम होती.सहवासाने व परस्परांचे स्वभाव जुळल्याने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.दोन्ही कुटुंबांच्या संमत्तीशिवाय अर्थातच ती लग्न करणार नव्हती.आम्हाला प्रवीणचा स्वभाव लहानपणापासूनच माहीत होता.जावई म्हणून तो आम्हाला पसंत होता. वगैरे माहिती प्रवीणने सांगितलेल्या माहितीशी जुळत होती.
कोणत्याही कारणाने असो कोमल दिनेशकडे आकर्षित झाली होती का असा एक सुप्त प्रश्न इन्स्पेक्टर सुधाकरांच्या मनात होता.परिणामी प्रवीणने दिनेशचा खून केला तर नसेल अशी एक शंका त्यांना होती.समजा तसे असले असे गृहीत धरले तरी खून करून तो आंतून दरवाजा बंद कसा काय करून घेऊ शकला हा प्रश्न होताच.आडदांड दिनेश समोर प्रवीण हा तसा नाजूक होता.कोणत्याही दृष्टिकोनातून विचार केला तरी तो खून करणे शक्य दिसत नव्हते.
तिथून इन्स्पेक्टर सुधाकर सरळ सुभाषचंद्र हायस्कूलमध्ये गेले.तेथे त्यांनी प्राचार्या डॉ अरुंधती बाई यांची भेट घेतली. सुधाकराना बाईंच्या दृष्टिकोनातून दिनेश कसा आहे ते माहीत करून घ्यायचे होते.
त्यानी दिनेशची एका बाजूने स्तुती केली.आपल्या विषयात तो वाकबगार आहे.मुलानी शिस्तपालन केले पाहिजे यावर त्याचा कटाक्ष होता.तो नोकरीला लागल्यापासून मुलामुलींमध्ये खेळाची आवड निर्माण झाली आहे.आमच्या शाळेचे संघ कबड्डी, खो खो, क्रिकेट, या खेळात त्याच्यामुळे वाकबगार झाले आहेत. जिल्हास्तरापर्यंत ते पोहोचले आहेत.जर तो आणखी कांही वर्षे असता तर राज्यस्तरावर आमच्या शाळेचा संघ सहज पोहोचला असता.परंतु आता सर्वच संपले आहे.
पुढे त्या म्हणाल्या तो अत्यंत तापट आहे.एकदा शाळेच्या शिपायाने कामांमध्ये कुचराई केली.त्याचा त्याला एवढा राग आला की त्याने त्याच्या मुस्कटात सणसणीत ठेवून दिली.दोन तीन मुलांवर शिस्तपालन केले नाही म्हणून त्याने असाच हात टाकला होता.शाळेच्या संचालक मंडळाकडून त्याला समज देण्यात आली होती.पुन्हा त्याने अशी मारहाण केल्यास त्याला नोकरीतून कमी केले जाईल अशी नोटीसही देण्यात आली होती.रागाच्या भरात तो कांहीही करू शकतो.त्याचे शरीर कमावलेले आहे. त्याची ताकद अफाट आहे.
इन्स्पेक्टर सुधाकरनी एस एच चे व्यवस्थापक करमरकर यांची भेट घेतली.त्यांनीही त्याच्या अफाट रागीट स्वभावाबद्दल वर्णन केले.एकदा रागावला कि तो त्याचे संतुलन संपूर्णपणे विसरून जातो.त्या भरात तो काय करील ते सांगता येत नाही.त्याला फ्रीजमधील पाण्यापेक्षा माठातील पाणी प्यायला आवडते.त्याच्या खोलीत फ्रीजही आहे आणि माठही आहे.एकदा माठ न धुतल्याबद्दल त्याने तो रागाच्या भरात शिपायाच्या डोक्यावर पाण्यासकट फोडला होता.करमरकर पुढे म्हणाले त्याची ताकद अफाट होती.पार्किंगमधील मोटर रिव्हर्स घेत असताना त्याच्याखाली एक लहान मूल सापडले.ते मूल चार चाकांमध्ये हाेते.कुणालाही ती मोटार मागेपुढे घेण्याचे धाडस होईना.या पठ्ठ्याने संपूर्ण मोटार एका बाजूने उचलून धरली.अशा तऱ्हेने लहान मुलाची सुटका झाली.
जो तो त्याच्या अफाट रागीट स्वभावाबद्दल सांगत होता.त्याच्या अफाट ताकदीबद्दल त्याचे कौतुक करीत होता.
तो सुरा फेकीत प्रवीण होता.त्याच्याजवळ विविध आकाराचे सुरे होते.एका खास पेटीत ते ठेवलेले होते.त्यातीलच एका सु्र्याने त्याने एका घावात कोमलचा गळा अारपार चिरला होता.
इन्स्पेक्टर सुधाकरना आता बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ लागला होता.त्यांच्या पुढ्यात शवविच्छेदन अहवाल व ठसे तज्ज्ञांचा अहवाल होता.सुर्यावर फक्त दिनेशच्या हाताचे ठसे होते.टेबलावर खूप रक्त सांडले होते. जमिनीवरही रक्ताचे थारोळे होते. दिनेश व कोमल यांच्या रक्ताच्या नमुन्याशी टेबलावरील रक्ताचे नमुने जुळत होते.खोलीमधील विविध ठसे दिनेश, त्याचे मित्र व हॉस्टेलमधील कर्मचारीवर्ग यांच्या ठशांशी जुळत होते.श्वास नलिका तुटल्यामुळे व अतोनात रक्तस्त्रावामुळे मृत्यू असे शवविच्छेदन अहवाल सांगत होता.
फ्रान्समध्ये पूर्वी शिक्षेची एक विशिष्ट पद्धत होती.गिलोटिन असे त्याचे नाव होते .त्यामध्ये डोके धारदार हत्यारांने एका घावात वेगळे केले जात असे.त्याच पध्दतीने टेबलावर डोके ठेवून अत्यंत निर्दयी पध्दतीने सुर्याने दोघांचीही डोकी तोडण्यात आली होती.
एवढ्यात त्यांना कुणीतरी मुलगी भेटायला आली आहे असे शिपायाने येऊन सांगितले.त्यांनी त्या मुलीला आंत बोलावले.श्रद्धा नावाची ती कोमलची मैत्रीण होती.तिने दिनेश व कोमल यांच्याबद्दल बरीच माहिती दिली.कोमल श्रद्धा जवळ दिनेशविषयी किंवा इतरही बऱ्याच गोष्टी सांगत असे.कोमल तिचे मन तिच्याजवळ मोकळे करीत असे.तिच्या सांगण्यानुसार,दिनेश कोमलवर अतोनात प्रेम करू लागला होता.त्याला कोमलशी विवाह करायचा होता.कोमलने त्याच्यावर तिचे प्रेम नाही. ती प्रवीणवर प्रेम करते.त्यांचा विवाह ठरला आहे.लहानपणापासून दोघेही एकमेकांना ओळखतात इत्यादी गोष्टी त्याला सांगून पाहिल्या.तरीही दिनेश ऐकायला तयार नव्हता.तो हट्टी होता. एकांतिक स्वभावाचा होता.मला कोमल मिळत नाही तर प्रवीणलाही ती मिळणार नाही अशा स्वभावाचा तो असावा.कोमल दिनेशच्या हॉस्टेलवर त्याची समजूत घालण्यासाठी जाणार होती.असेही श्रद्धेच्या बोलण्यात आले.
निरनिराळ्या मुलाखतीतून इन्स्पेक्टर सुधाकरना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या.अजून एकच गोष्ट लक्षात येत नव्हती.दिनेशचा मृत्यू त्याच पध्दतीने कसा झाला?कुणीतरी त्याचे डोके त्याच पध्दतीने उडविले असले पाहिजे.ती व्यक्ती तशीच ताकदवान पाहिजे.दरवाजे बंद असतानासुद्धा दिनेशचा खून करून,त्याचे डोके छाटून ती व्यक्ती खोली बाहेर पडली कशी हेच लक्षात येत नव्हते.खोलीला एखादा गुप्त दरवाजा असला पाहिजे.त्याशिवाय हे शक्य नाही.
इन्स्पेक्टर सुधाकरनी त्या खोलीचे पुन्हा एकदा बारकाईने निरीक्षण करण्याचे ठरविले.एक पोलीस बरोबर घेऊन ते ताबडतोब हॉस्टेलवर पोहोचले.खोलीत खून झाल्यामुळे खोलीला पाेलिसांचे सील लावलेले होते.ते तोडण्यात आले.करमरकर यांना बोलावण्यात आले.खोलीला एखादा गुप्त दरवाजा आहे का अशी त्यांच्याजवळ विचारणा करण्यात आली.त्यांनी त्यांच्या माहितीप्रमाणे नाही म्हणून सांगितले.इन्स्पेक्टर सुधाकरनी खोलीचे बारकाईने निरीक्षण केले.दरवाजातून बाहेर पडून कोणत्यातरी एखाद्या पध्दतीने आंतील कडी लावता येते का त्याचा प्रयोग त्यांनी करून पाहिला.एकाही दरवाजाला ती गोष्ट शक्य नव्हती.खिडक्या दरवाजाजवळ नव्हत्या.खिडकीतून हात घालून किंवा अन्य एखाद्या मार्गाने कडी लावणे शक्य नव्हते.
सर्व भिंती,बाथरूम, यांची काटेकोरपणे तपासणी करण्यात आली.कुठेही गुप्त दरवाजा आढळला नाही.टॉयलेटमध्ये व्हेंटिलेशनसाठी फ्रेमला खाचेमध्ये काचा बसवलेल्या होत्या.त्या काढून बाहेर जाणे किंवा आंत येणे शक्य नव्हते.खिडकीला बाहेरून भक्कम ग्रील बसवण्यात आले होते.
खोलीला पुन्हा सील लावून इन्स्पेक्टर सुधाकर ऑफिसवर परत आले.(अन् सॉल्व्हड मिस्टीरियस केस) न सुटलेली गूढ केस म्हणून फाईल बंद करावी लागणार असे त्यांच्या लक्षात आले होते.अजूनपर्यंत इन्स्पेक्टर सुधाकरांच्या बाबतीत असे घडले नव्हते.इन्स्पेक्टर सुधाकरानी केस हातात घेतली आणि ती सुटली नाही असे झाले नव्हते.
चालायचेच इलाज नाही असे मनाशी म्हणत इन्स्पेक्टर सुधाकर घरी परतले.रात्री झोपताना केस न सुटल्यामुळे ते अस्वस्थ होते. त्या रात्री त्यांना एक विचित्र स्वप्न पडले.त्यांच्या स्वप्नात कोमल आली होती.त्यांनी जरी तिला प्रत्यक्ष पाहिले नव्हते तरी तिचा फोटो पाहिला होता.रक्ताने लडबडलेले तिचे डोके व धड पाहिले होते.त्यांनी कोमलला बरोबर ओळखले.तिने त्यांना पुढील हकिगत सांगितली.
"मी त्या दिवशी दिनेशला भेटायला त्याच्या खोलीवर गेले होते.(ही गोष्ट अर्थातच सुधाकरराना कोमलची मैत्रीण श्रद्धेकडून कळली होती.)दिनेशला शेवटचे एकदा समजून सांगावे.प्रवीणवर माझे लहानपणापासून प्रेम आहे.आमचा साखरपुडा होणार आहे. तू माझा नाद सोड.असे मी त्याला सांगितले.दिनेश रागीट होता.रागाच्या भरात त्याने प्रवीणला कांही करू नये अशी माझी इच्छा होती.तो कांहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता.माझ्याशी लग्न कर म्हणून तो मला गळ घालत होता.निक्षून नाही म्हणून मी त्याला सांगताच, त्याने जर तू मला मिळाली नाहीस तर प्रवीणलाही मिळणार नाहीस असे सांगितले.त्या दिवशी त्याचा अवतार कांही वेगळाच दिसत होता.घाबरून मी पळण्याचा प्रयत्न केला.त्याने मला केसांना धरून पकडले.टेबलावर माझे डोके ठेवून निर्दयपणे तोडले.
पुढील गोष्ट कशी घडली मला माहीत नाही.माझे धड रागाने जागच्या जागी उभे राहिले. माझे धड उभे राहिलेले पाहून दिनेश गर्भगळित झाला. शेजारी ठेवलेला सुरा मी हातात घेतला.आणि दिनेशचे डोके पकडून ज्या पध्दतीने त्याने मला ठार मारले होते त्याच पध्दतीने मी त्याचे डोके तोडले.नंतर तिथेच मी कोसळले.तुम्हाला हे खरे वाटत नसेल तर मी तुमच्या टेबलावर हीच हकिगत कागदावर लिहून ठेवली आहे."एवढे बोलून कोमल स्वप्नातून निघून गेली.इन्स्पेक्टर सुधाकर दचकून जागे झाले. त्यांनी टेबल लॅम्प लावला.टेबलावर एक कागद पेपरवेटखाली ठेवला होता. कोमलने स्वप्नात जे सांगितले तेच त्यावर लिहिलेले होते.त्या रात्री, सुधाकर यांना झोप लागली नाही.
ऑफिसवर गेल्यावर त्यांनी तो कागद हस्ताक्षर तज्ज्ञांकडे सोपविला.कोमलच्या हस्ताक्षराचा नमुना त्यांच्याकडे होताच.त्या नमुन्याशी कोमलने मृत्यूनंतर(!) लिहिलेल्या पत्रावरील हस्ताक्षर जुळत होते.
*यांतील एकही गोष्ट सुधाकराना पटत नव्हती.तोच विचार डोक्यात सतत चालत असल्यामुळे स्वप्न पडले इथपर्यंत ठीक होते.*
*परंतु त्यांच्या टेबलावरील डायरीतील पान मृत आत्म्याने फाडले, त्यावर लिहिले आणि ते हस्ताक्षर कोमलच्या हस्ताक्षराशी बरोबर जुळत होते,यांतील एकही गोष्ट त्यांच्या बुद्धीला पटत नव्हती.परंतु प्रत्यक्ष घडलेली त्यांना दिसत होती.* *कोर्टाला कायद्याला कुणालाही ती पटणे शक्यही नव्हते.*
*कायदा, भूत पिशाच्च प्रेतात्मा इत्यादी गोष्टी जाणत नाही.*
*शेवटी त्यांच्यापुरती उलगडूनसुद्धा न उलगडलेले केस म्हणून त्यांना फाईल बंद करावी लागली.*
(समाप्त)
२५/११/२०२१©प्रभाकर पटवर्धन