राजेश, रिया, सोनिया आणि आकांक्षा बागेत बसले होते. त्या वाड्याची चर्चा सुरू होती. सोनिया आणि आकांक्षा या दोघींनाही वादविवादात एकमेकीना पराभूत करायचे होते. आणि शेवटी काहीच निर्णय झाला नाही तेव्हा राजेशने सोनियाला पाठिंबा दिला आणि आकांक्षाला म्हणाला
“आई,एकदा तिला तिकडे जाऊ द्या ना.” पण आकांक्षा सहमत झाली नाही.
"ठीक आहे मग, आपण एक काम करूया, आपण सगळेच त्या वाड्यात जाऊया आणि तिथली परिस्थिती बघूया, जगलो तर एकत्र आणि मेलो तरी एकत्र... काय काकू? या रहस्यासाठी सोनियाने आपले अर्धे आयुष्य झोकून दिले आहे, पण आता ‘आर या पार’ निर्णय घेऊनच टाकूया.” रिया म्हणाली.
क्षणभर शांतता पसरली.
"पण..."आकांक्षा
"नाही आई, तुम्ही आता काही बोलणार नाही"
राजेश आकांक्षाला धीर देत म्हणाला.
"घाबरू नका, आपण सगळे तिकडे जाऊ...माहित्ये तिथून कोणी परत आले नाही, पण आपण सगळे परत येऊ."
"ठीक आहे मग आपण उद्याच देवळाच्या मागे असलेल्या जंगलातल्या त्या वाड्यात जाऊ!"
आकांक्षाला मिठी मारून सोनिया म्हणाली.
दुसऱ्या दिवशी सोनिया, आकांक्षा, रिया, राजेश आणि टफी झपाटलेल्या वाड्याचा पर्दाफाश करायला निघाले. घनदाट जंगलांच्या मधोमध एक मोठा वाडा जो कित्येक वर्षं निर्मनुष्य होता. त्या वाड्यात राहणार्या ५० लोकांनी आत्महत्या केली आणि ते भूत बनले. त्यांचे आत्मे कोणालाही आत प्रवेश करू देत नाहीत. जो जातो तो परत येत नाही. आकांक्षाचे वडील, भाऊ आणि जवळपास २०० जणांना ह्या वाडयाने गिळून टाकले होते.
ते पाच जण घनदाट जंगलात पोहोचले. वाड्यासमोर गाडी थांबताच सोनिया सोडून इतर तिघांच्याही हृदयाची धडधड वाढली, कारण सोनियाचा भुताखेतांवर विश्वास नव्हता.
वाड्यातून आशिष आणि कौस्तुभ येऊन तिला मिठी मारतील असे आकांक्षाला वाडा जवळ येताच क्षणभर वाटले.
“चला सर्वांनी खाली उतरूया...?”
सोनियाने गाडीतून खाली उतरण्यासाठी पुढाकार घेतला. सगळे गाडीतून उतरले आणि हळूहळू पुढे जाऊ लागले.