आतमध्ये उंच उंच भिंतीं आणि छपरावर लावलेल्या काचेच्या कवडशामधून येणारा प्रकाश आणि अगम्य अंधार यांचे विस्मयकारक पण भयानक असे दृश्य होते.
चार भिंतीं आणि अंधार यांच्यात आकांक्षाचा जीव गुदमरला आणि ती बेशुद्ध पडली. टफी इकडे तिकडे सैरावैरा पळू लागला .
“आई, .....आई उठ...”
सोनिया आकांक्षाला उठवण्याचा प्रयत्न करु लागली. रियाने राजेशला हाक मारली. सोनियाने तिच्या पाठीवर बांधलेल्या पिशवीतून पाण्याची बाटली काढली आणि आकांक्षाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले.
टफी पळत पळत एका खोलीच्या दारावर धडकला आणि तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला. रिया पळत गेली आणि तिने टफीला पकडले. मग सोनियाकडे आली.
"तू आई जवळ थांब, मी आलेच" एवढं बोलून सोनिया खोलीकडे निघाली तेव्हा रियाने सोनियाचा हात धरला आणि म्हणाली
“मी तुझ्याइतकी धाडसी नाहीये, राजेश कुठे आहे? काकूंना शुद्धीवर आण” इतके बोलून रिया रडू लागली.
"ऐक रिया, मी एक खिडकी उघडण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे हवा आत येऊ शकेल, तू प्लीज धीर धर, सर्व काही ठीक होईल, आई शुद्धीवर येईल, पण आधी खिडकी उघडावी लागेल."
टफीच्या धक्क्याने उघडलेले दार सोनियाने लोटले. सोनियाला खूप अंधार दिसला, ती मोठ्या हिमतीने खोलीत गेली आणि आजूबाजूला पाहिले. तिला कुठेही खिडकी दिसली नाही, मग तिची नजर भिंतीवर टांगलेल्या एका जुनाट फॅमिली फोटोकडे गेली आणि तिने ती फोटो फ्रेम काढताच खोलीत थोडा उजेड पडला कारण त्यामागे एक छोटेसे गवाक्ष होते. तिने सुटकेचा नि:श्वास सोडला आणि मग पळत जाऊन रियाच्या मदतीने आकांक्षाला त्या खोलीत आणले.
खोली खूप अस्वच्छ होती... एक मोठा पलंग होता. तिच्यावरच्या बेडशीटवर धुळीचा जाड थर होता. सोनियाने टफीला सांगितले
“टफी ती घाणेरडी चादर काढ...” टफी पळत जातो आणि चादर तोंडाने ओढून खाली खेचतो.
आकांक्षा आजूबाजूला बघून म्हणाली, "राजेश....., राजेश कुठे आहेस?"
रियाने आकांक्षाला पाणी दिले आणि म्हणाली.
"काकू, आधी तुम्ही पाणी प्या, तुम्ही शुद्धीत असाल तरच आपल्याला राजेश सापडेल."