(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )
तुझे दुःख माझ्या जवळ शेअर कर.असे स्पष्टपणे बोलूनही पाहिले . त्यावर तिने कुठे काय सगळे तर ठीक आहे असे म्हणून विषय टाळण्याचा प्रयत्न केला .
तिचे दुःख, तिच्या ह्रदयाचा सल तिने सांगितला नाही.
स्वप्नीलच्या स्वभावाप्रमाणे नाही सांगत तर नाही .गेली उडत.असे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करावे असे एकदा त्याच्या मनात आले .परंतु ते त्याचे हृदय मान्य करण्याला तयार होईना .तिचे दुःख जाणावे . तिच्या उदासीचे कारण माहीत करून घ्यावे व आपण शक्य तेवढे ते दूर करण्याचा प्रयत्न करावा असे त्याचे हृदय ओरडून सांगत होते .
ती घरी नसताना तो एकदा काकूंना तिच्या आईला भेटायला गेला .स्नेहल हल्ली अशी का वागते त्याचे कारण त्यांच्याशी बोलून शोधून काढण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु त्यातून त्यांच्या हाती विशेष काही लागले नाही .स्नेहल हल्ली विशेष बोलत नाही. तिचे खाणे पिणे कमी झाले आहे.ती आपल्याच विचारात असते .ती घुमी झाली आहे .तिला खोदून खोदून विचारले तरी ती काही सांगत नाही .काही नाही गं आई मी कुठे काय वेगळी वागत आहे असे बोलते.तू उदास का असतेस असे विचारल्यावर ती कसनुसे हसते.खोटे खोटे हसते.तिच्या मनात काय आहे ते उघड करीत नाही .अशा प्रकारचे बरेच त्या बोलल्या .त्यांनाही तिची काळजी वाटत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसले.तरीही त्यांना सर्व काही माहीत आहे .त्या आपल्यापासून काहीतरी लपवित आहे असा भास त्याला झाला .
काकूंनी दिलेला चहा पीत असताना स्नेहल बाहेरून घरी आली .तिच्या हातात पर्स बरोबर एक फाइल होती .स्वप्नीलला आपल्या घरात बघून ती जरा चपापली.कारण नसताना उगीचच तिने तिच्या हातातील फाईल लपविण्याचा प्रयत्न केला .
तिचा पाठलाग करून, तिच्या आईला भेटून,तिच्या अलिप्तपणाचे उदासीपणाचे कारण लक्षात येत नव्हते .आपल्याला न दुखविता तिला आपल्यापासून दूर व्हायचे आहे असे स्वप्निलला वाटत होते .
असे का? असे का?याचे उत्तर मिळत नव्हते आणि ते मिळाल्याशिवाय त्याला स्वस्थ बसवत नव्हते.असे जवळजवळ वर्षभर चालले होते .विचार करून करून स्वप्नीलही किंचित बारीक झाला होता.
*आणि अकस्मात एक दिवस योगायोगाने तिच्या अशा वागण्याचा उलगडा झाला.*
स्वप्नीलच्या आईने काही तरी काम सांगितल्यामुळे तो स्नेहलच्या आईला भेटायला त्यांच्याकडे आला होता.तिघेही बोलत हॉलमध्ये बसली होती .तिने आपला मोबाइल टीपॉयवर ठेवला होता.स्वप्नीलचाही मोबाइल तिथेच होता.थोड्या वेळानंतर स्वप्नील घरी आला. कुणाला तरी कॉल करण्यासाठी त्याने मोबाइल उचलला . मोबाइल ओपन होत नाही असे पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की हा मोबाइल स्नेहलचा आहे .
स्नेहल अशी विचित्र होण्याअगोदर त्या दोघांनी एकाच मेकचे एकसारखे दिसणारे दोन मोबाइल घेतले होते.त्यावेळी बोलताना दोघांनी कदाचित केव्हातरी किंवा बऱ्याच वेळा,आपल्या मोबाइलची अदलाबदल होईल .एकसारखे दिसणारे मोबाइल असू नयेत असेही बोलणे झाले होते .त्यावर त्याला काय झाले?आपण एकमेकांचे फोन वापरू शकतो .आपल्यात काही गुप्त नाही असेही बोलणे झाले होते . आपले पॅटर्न पासवर्ड्स परस्परांना माहित आहेत. आपण दुसऱ्याचा मोबाइल उघडून वापरू शकतो असेही बोलणे झाले होते .
मोबाइल उघडावा आणि तिच्या अशा उदासीचे कारण शोधून काढावे असा विचार त्याच्या मनात आला .परंतु हे सभ्य गृहस्थाचे लक्षण नाही .तिने सांगितल्याशिवाय तिची गुपिते आपण जाणून घेणे योग्य होणार नाही,असे त्याला प्रामाणिकपणे वाटले .हो नाही हो नाही त्याचा हॅम्लेट झाला .कारण जाणून घ्यावे.कारण कळल्यास ते दूर करावे .हेतू चांगला असेल तर असे करण्यास हरकत नाही असे त्याचे एक मन सांगत होते .तर दुसरे मन नको म्हणून सांगत होते .
अशा द्विधा मनस्थितीत तो असताना तिच्या फोनची रिंग वाजली .त्याने आता मात्र विचार न करता मोबाईल उचलला व घेतला .
पलीकडून स्किन स्पेशालिस्ट बोलत होते .त्यांचा आवाज आश्वासक समाधानाचा व आनंदाचा होता .ते सांगत होते तुम्ही पूर्णपणे बऱ्या झाल्या आहात .तुम्हाला कशाचीही आता भीती नाही .तुमच्यापासून दुसऱ्यालाही कोणतीही भीती नाही .तुमच्यापासून आता कुणालाही संसर्ग होणार नाही .तुम्ही नॉर्मल लाइफ सर्वसाधारण आयुष्य जगू शकता .बोलता बोलता डॉक्टरानी केव्हातरी कुष्ठरोग हा शब्द उच्चारला.आणि थोडा वेळ बोलून फोन बंद केला .ऐकताना स्वप्नील फक्त हा हा एवढेच म्हणत होता .
त्याला आता स्नेहलच्या वर्तणुकीचे कारण पूर्णपणे कळले होते . स्वप्नीलला कोणताही संसर्ग होऊ नये त्रास होऊ नये यासाठी ती अलिप्त वागत होती.स्वप्नीलशी लग्न करून त्याचे आयुष्य बरबाद करण्याची तिची इच्छा नव्हती .
तेवढ्यात त्याला तिच्या आईच्या मोबाइलवरून रिंग आली .स्नेहलने माझा मोबाइल तू चुकून नेलास. तुझा मोबाइल येथे राहिला आहे असे म्हटले. त्यावर उत्तर देताना स्वप्नीलने तिला बाहेर बागेमध्ये भेटायला बोलाविले. तिथे तू माझा फोन घेऊन ये.मी तुझा फोन घेऊन येतो असे सांगितले.तिने टाळाटाळ करण्यास सुरुवात करताच त्याने तू तिथे ये. अर्जंट आहे.असे म्हणून फोन बंद केला .
तो सांगितलेल्या ठिकाणी जाऊन थांबला .ती येईलच अशी त्याला खात्री नव्हती .तिथेही त्याचे ती येईल ,ती येणार नाही, असे चालले होते .शेवटी ती दुरून येताना दिसली .
*नंतर दोघांचे काय बोलणे झाले ते सांगण्यात विशेष अर्थ नाही *
* शेवटी स्नेहल स्वप्नीलच्या मिठीत होती.*
*बागेतून दोघेही हातात हात घालून बाहेर पडली* .
*स्नेहल एकदम दहा वर्षांनी तरुण झालेली दिसत होती*
(समाप्त)
१०/५/२०१९©प्रभाकर पटवर्धन