मी इथे, या आम्रवृक्षाखाली एकटी बसली आहे .मुलगा आहे मुलगी आहे सून आहे जावई आहे नातवंडे आहेत सर्व काही आहे .तरीही मी अंतर्यामी एकटी एकटी आहे .काही केल्या हे एकटेपण दूर होत नाही .ज्याला मी आपला म्हटले ज्याने मला आपले म्हटले तो मला एकटीला टाकून निघून गेला आहे .लग्नात त्याने "तुला जीवनभर साथ देईन" असे वचन मला दिले होते .लग्नाच्या पहिल्या रात्रीही त्याने तसेच वचन मला दिले होते .मग असे काय झाले की त्याला मला एकटीला सोडून जावे असे वाटले .माझा काय गुन्हा होता .इथे त्याला काय खुपत होते .
लग्नाच्या पहिल्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही दोघांनी हा आम्रवृक्ष आमच्या फार्महाऊसवर लावला.त्याला माती, पाणी, खत, आम्ही दोघांनीही घातले .हा वृक्ष काही वर्षांनी आंबे देईल. आपण दोघे आपल्या मुलाबाळांसकट त्याचा आस्वाद घेऊ अशा आम्ही शपथा घेतल्या होत्या .अशी स्वप्ने आम्ही पाहिली होती .मग असे असताना तू मला एकटीला सोडून का निघून गेलास?
कबूल आपला प्रेमविवाह नव्हता.आपले चारचौघांसारखे दाखवून पाहून लग्न झाले होते .पण मी तुला बेहद्द आवडले होते असे तूच म्हणाला होतास. त्या दिवशी मी कॉलेजातून घरी आल्यावर आवरून लगेच बाहेर निघाले होते . सिनेमाला जायचे आम्ही सर्व मैत्रिणींनी ठरवले होते.मला बाबांनी बाहेर जाऊ नकोस म्हणून सांगितले . मी का म्हणून विचारता त्यांनी तुला बघायला येणार आहेत म्हणून सांगितले .त्यावर मी बाबांना माझे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे सांगितले .बाबा म्हणाले तुझे शिक्षण लग्नानंतरही पूर्ण होईल .तुझ्या शिक्षणात कोणताही अडथळा येणार नाही .त्यावर मी हसून म्हटले की लग्न, नवरा आणि सासर हाच एक मोठा शिक्षणात अडथळा आहे .
बाबा म्हणाले तू आधी त्याला पाहा तर खरे, तू नाही म्हटले तर मी तुझे लग्न लावणार नाही .तुझ्यावर आत्तापर्यंत मी कधीही सक्ती केली नाही आणि पुढेही करणार नाही .
तू आलास, तू पाहिलेस ,आणि तू मला जिंकलेस.तू माझ्यावर अशी काही मोहिनी टाकलीस की मी मैत्रिणी,शिक्षण, इच्छा, अाकांक्षा, भविष्यकालीन ध्येये सर्व काही विसरून गेले .
लग्न ठरण्याअगोदर तू मला विचारलेस की तुझ्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत?
मला तुझी जन्मभर साथ पाहिजे याशिवाय मला काहीही नको मी पटकन उत्तर दिले . धनदौलत मानसन्मान स्वाभिमान या सर्वांपेक्षा मला तुझी साथ हवी होती .तू पटकन् उत्तरलास, की जन्मभर मी तुझी साथ देईन .म्हातारपणापर्यंत आपण दोघेही एकत्र निश्चित राहू . मी तुझी कधीही साथ सोडणार नाही असे वचन तू मला दिलेस.
नंतर तू मला विचारलेस की तुला आणखी काय पाहिजे? मी तुला सांगितले, प्रथम मला माझे शिक्षण पुरे करायचे आहे .नंतर शक्यतो मला नोकरी करायची आहे .तू लगेच या दोन्ही गोष्टींना तयार झालास.
तू मला आवडला होतास .परंतु तुझ्यासाठी मी शिक्षणावर पाणी सोडायला तयार नव्हते .मला स्वावलंबन व स्वाभिमान जपायचा होता .तू पटकन मी मागितलेल्या सर्व गोष्टी मला दिल्यास.
मला कधीही न सोडण्याचे वचन देऊन मग तू असा अकस्मात मध्येच का निघून गेलास ?
लग्नाच्या पहिल्या रात्री एकत्र येण्या अगोदर अापण एकमेकांना एकत्र राहू असे वचन दिले.असे असूनही तू वचनभंग का केलास? तू मध्येच निघून का गेलास?
आपला संसार सर्वांना आदर्श होता .कुठेही आसमंतात आदर्श कुटुंब याची व्याख्या म्हणजे आपल्याकडे बोट दाखविले जात होते.आपल्याला दोन मुले झाली एक मुलगा व एक मुलगी . त्यांना हवे तेवढे आपण शिक्षण देऊ असे आपण ठरविले.शक्यतो त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू असे आपण ठरविले होते .अर्थात शिस्त यमनियम हे कडकरित्या पाळले जाणार होतेच .स्वातंत्र्य म्हणजे वाट्टेल ते करण्याचे स्वातंत्र्य नव्हे तर मर्यादशील स्वातंत्र्य हीच आपली व्याख्या होती .
मुले आपल्या कल्पनेप्रमाणे मोठी होत होती .तुला व मला दोघांनाही आपापल्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळत गेले .ज्याला हराभरा संसार असे म्हणतात तसा आपला संसार होता.काहीच कुठेही कमी नव्हते. परंतु कुणाची तरी आपल्याला दृष्ट लागली.
आणि तू मध्येच मला सोडून गेलास .
या आम्रवृक्षाखाली जो तू आणि मी एकत्रित लावला. ज्याची फळे आपण खाऊ असे आपण एकमेकांना वचन दिले .तिथे मी आता एकटीच तुझी आठवण काढीत बसले आहे .
तुझ्या ऑफिसच्या कामासाठी तू दिल्लीला जाणार होतास.माझा निरोप घेऊन तू निघालास.तू दिल्लीला पोचल्याबरोबर मला फोन करशील म्हणून सांगितले होतेस. मी तुझ्या फोनची वाट पाहात होते.तुझा येणारा फोन आलाच नाही.आणि आता तो कधीच येणार नव्हता .ती तुझी माझी शेवटची भेट होती .
तुझे दिल्लीला जाणारे विमान उतरत असताना काहीतरी तांत्रिक चूक झाल्यामुळे क्रॅश लँडिंग झाले .विमानाला आग लागली .दुर्दैवाने विमानातील कुणीही वाचले नाही .
ब्रेकिंग न्यूजमध्ये टीव्हीवर,मोबाइलमध्ये, हीच एक बातमी पुन्हा पुन्हा दाखविली जात होती.
आता सर्वच संपले होते .आपण दोघानी ठरविल्याप्रमाणे मी मुलाना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण दिले.सर्व सुस्थित, विवाहित, चांगल्या पदावर आहेत.
* या सर्व लोकांना मोहक वाटणार्या चित्रांमध्ये फक्त तू नाहीस .*
*ते अपुरेपण मला तीव्रतेने जाणवत आहे.*
*शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहण्याचे वचन मोडून तू मला अर्ध्यावर सोडून कां निघून गेलास?*
२०/११/२०१९©प्रभाकर पटवर्धन