(ही गोष्ट काल्पनिक आहे. पात्रे व कथावस्तू यामध्ये कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

सकाळचे सहा वाजले होते .पोलिस स्टेशनमध्ये ड्यूटी ऑफिसर रात्रभर त्याच्या एरियात कुठेही काहीही. गडबड न झाल्यामुळे खुशीत होता. आठ वाजता त्याची ड्युटी संपल्यावर तो लगेच घरी जाऊ शकणार होता.एवढ्यात  केस विस्कटलेली रात्रभर झोप न झाल्यामुळे डोळे सुजलेली एक बाई दरवाजातून आत आली .आल्याबरोबर तिने मला खुनाची कंप्लेंट करायची आहे म्हणून सांगितले .खून म्हटल्याबरोबर पोलिस चौकीतील सर्वजण सावरून बसले. कुणाचा खून झाला व कुणाविरुद्ध कम्प्लेंट करायची आहे असे विचारता तिने ड्यूटी ऑफिसरला  मी माझ्या नवर्‍याचा डोक्यात दगडी पाटा घालून  खून केला असे सांगितले.

खून झाला असे ऐकल्याबरोबर ड्युटी ऑफिसर खुर्चीत सावरून बसला.कुणी बाई आपल्यासमोर उभी राहून मीच नवऱ्याचा खून केला म्हणून सांगत आहे हे ऐकून तो जरा गडबडल्या सारखा  झाला होता.

त्याने बाई तुम्ही खून का केला? व केव्हा केला ते सविस्तर सांगा   असे सांगितले ?

त्या बाईने तिची हकिगत सांगण्यास सुरुवात केली. मधून मधून ती रडत होती .मधून मधून ती किंचाळत होती. मधून मधून ती हिस्टेरिक होत होती .तिने तिच्या ग्रामीण बाजामध्ये तुटक तुटक सांगितलेल्या एकूण माहितीचा गोषवारा पुढीलप्रमाणे होता .

मी सुदर्शन झोपडपट्टीत राहते .जवळच सुदर्शन नावाची टोलेजंग इमारत असल्यामुळे या झोपडपट्टीला सुदर्शन झोपडपट्टी असे नाव पडले आहे .माझे नाव सुभद्रा .माझे लग्न होवून तेरा वर्षे झाली .माझा नवरा लग्नाची पहिली दहा वर्षे व्यवस्थित होता.त्याला एका कारखान्यात नोकरी होती.कारखान्यातील मालाची वाहतूक करण्यासाठी तो ड्रायव्हर म्हणून काम करीत असे .सुटीच्या दिवशी किंवा कधीतरी मध्येच एखादवेळ तो दारू पीत असे.तीन वर्षांपूर्वी त्याच्या हातून एक अपघात झाला .त्यामुळे त्याची नोकरी सुटली.

त्यानंतर त्याला ड्रायव्हर म्हणून एका ठिकाणी नोकरी मिळाली .परंतु त्याला मधल्या काळात रिकामटेकड्या  वाईट लोकांची संगत लागली होती .तो जवळजवळ रोज दारू पिऊन घरी येऊ लागला .दारूमुळे सकाळी त्याला उठून कामावर जाता येत नसे .त्याचे मधूनमधून खाडे होऊ लागले.वारंवार होणाऱ्या  खाड्यामुळे त्याची नोकरी सुटली .पुढे पुढे त्याने काम शोधणे बंद केले .नुसता घरी बसून तो राहू लागला. उड्डाणटप्पू मित्रांच्या संगतीत तो दिवसा रात्री केव्हाही दारू पिऊ लागला.दारूमुळे त्याची तब्येत खालावत चालली .दारूमुळे व रिकामटेकडेपणामुळे  त्याचे डोके सैतानाचे घर झाले .

घरी पैसे देणे तर दूरच राहिले .परंतु  तो जवळजवळ रोज माझ्याजवळ दारूसाठी पैसे मागू लागला.जर पैसे दिले नाहीत तर तो मारझोड करू लागला .मी धुणी भांडी करून माझा व माझ्या मुलांचा गुजारा करते .गेली दोन अडीच वर्षे नवऱ्यालाही मला पोसावे लागत होते .एवढेच नव्हे तर त्याच्या दारूचीही व्यवस्था मला करावी लागत होती.दारूसाठी पैसे मिळाले नाहीत की तो माझ्या अंगावर हात टाकून मिळेल तो दागिना हिसकावून जात असे.मी काटकसरीने राहून हौशीने केलेले दोन तीन दागिने त्याने केव्हाच ओरबडून नेले व ते विकून तो  त्याची दारू प्याला .नंतर हळूहळू तो घरातील एकेक भांडी विकू लागला .येईल त्या किमतीला भांडी विकून तो त्याची दारू आपल्या मित्रांसोबत पीत असे.

दारू प्यायल्यावर त्याच्या अंगात राक्षस  शिरत असे.मी काम करून दमून भागून संध्याकाळी घरी येत असे .माझे शरीर अतिश्रमामुळे  ठणकत असे.रोज रात्री हा शरीरसुखाची मागणी करीत असे.एवढेच नव्हे तर तो माझ्याकडून रोज ते ओरबाडून घेत असे.माझ्या शरीराचा तो रोज चोळामोळा  करून टाकीत असे.सकाळी उठून मला कामावर जाणेसुद्धा त्रासदायक होत असे .त्यामुळे माझे मधूनमधून खाडे होऊ लागले .

माझा नवरा दारूमुळे माणूस राहिला नाही . त्याचे हळूहळू राक्षसात परिवर्तन झाले.एकदा तर त्याने दारूसाठी पैसे न मिळाल्यामुळे एका माणसाला रात्री माझ्याबरोबर झोपण्यासाठी पाठविले होते .तो माणूस चपलांचा मार खाऊनच माझ्या झोपडीतून पळाला.  मला तीन मुले.थोरली मुलगी आता बारा वर्षांची झाली आहे .दोन मुलगे त्यानंतरचे आहेत .मुलांनी शिकून मोठे व्हावे असे मला वाटते .अाम्ही जे आयुष्य जगतो त्यापेक्षा जास्त चांगले आयुष्य त्यांना मिळावे असे मला वाटते.या असल्या वातावरणात ती पुढे शिकतील असे मला वाटत नाही .मुलीने तर शाळा केव्हाच सोडून दिली आहे.ती मला आमच्या घरी  सैपाक करणे, धुणी भांडी करणे,यामध्ये मदत करीत असे.तब्येत बरी नसल्यामुळे मी कामावर जाऊ शकले नाही तर तीही केव्हा केव्हा  माझ्या बदली कामावर जात असे.माझ्याबरोबर येऊन मला कामात मदत करत असे.

मी दिवसभर कामावर गेलेली असे .माझी मुलगी घरात एकटीच असे .दोन्ही मुलगे शाळेत किंवा खेळण्यासाठी बाहेर उंडारत असत .

*माझी मुलगी सहा महिन्यांपूर्वीच शहाणी(वयात आली आहे.पदर आला.) झाली .*

*दारूच्या नशेत माझ्या नवऱ्याची नजर त्याच्याच मुलीवर पडली .*

*तो रात्री जसा मला कुस्करून टाकीत असे त्याप्रमाणेच तो दिवसा संधी मिळेल तेव्हा तिलाही कुस्करून टाकू लागला.*

*वरती त्याने तिला धमकी दिली की जर तू यातील काही, आईजवळ किंवा आणखी कुणाजवळही बोलशील तर मी तुला ठार मारीन .*

*घाबरल्यामुळे भेदरल्यामुळे माझी बिचारी मुलगी माझ्याजवळ केव्हाच काहीच बोलली नाही.*

(क्रमशः)

१९/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel