(ही गोष्ट काल्पनिक आहे. पात्रे व कथावस्तू यामध्ये कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

तो रात्री जसा मला कुस्करून टाकीत असे त्याप्रमाणेच तो दिवसा संधी मिळेल तेव्हा तिलाही कुस्करून टाकू लागला

घाबरल्यामुळे भेदरल्यामुळे माझी बिचारी मुलगी माझ्याजवळ केव्हाच काहीच बोलली नाही.

हल्ली अधूनमधून ती आजारी पडत असे.या अत्याचारामुळे तिचे अंग दुखते तिला भयानक त्रास होतो हे मला काहीच माहित नव्हते .पंधरा दिवसांपूर्वी मी माझ्या मुलीला ओकार्‍या करताना पाहिले.प्रथम मला तिच्या खाण्यात काही कमी जास्त आले असेल असे वाटले.परंतु नंतर माझ्या सर्व प्रकार लक्षात आला .मला प्रथम मुलीनेच कुठेतरी बाहेर शेण खाल्ले असे वाटले.मी तिला तो कोण आहे ते सांग मी त्याला आता जिवंत सोडीत नाही असे रागाच्या भरात म्हणाले .काठी घेऊन तिला मी मारायला सुरुवात केली .त्यावर तिने काकुळतीने आई मला मारू नको मी तुला सर्व काही सांगते असे सांगितले .

तिने जे सांगितले ते ऐकून माझे डोके फिरले .माझा राग अनावर झाला .असे किती दिवस चालू आहे असे तिला विचारता तिने एक वर्ष म्हणून सांगितले.माझी बिचारी दहा अकरा वर्षांची लहान मुलगी हे सर्व अत्याचार वर्षभर सहन  करीत राहिली .तिचा त्या राक्षसाने पूर्णपणे चोळामोळा करून टाकला आणि मी मात्र मुलगी कामाच्या ताणामुळे अशी विस्कटलेली दिसते असे समजत राहिले .अशा अत्याचारात तिला दिवस गेले.रोज रात्री माझ्यावर अत्याचार करून हा नराधम थांबला नाही तर त्याने त्याच्या मुलीलासुद्धा सोडले नाही .हा जगण्याच्या लायकीचा नाही याला संपविलेच पाहिजे असे मी तेव्हाच मनात ठरविले .

जेव्हा मला हे सर्व कळले तेव्हाच मी त्याला आठ दिवसांपूर्वीच संपविले असते.

परंतु माझी मुले मला माझ्या डोळ्यासमोर दिसत होती .मी गेल्यावर त्यांना रस्त्यावर भीक मागावी लागली असती .

मुलीचे काय धिंडवडे निघाले असते ते त्या परमेश्वरालाच माहीत .

मी एका स्त्री रोगतज्ज्ञ्याच्या घरी काम करते.त्या बाईंचे हॉस्पिटल आहे .मी त्यांना माझ्या मुलीची सर्व हकीगत सांगितली .तिला त्यांच्याकडे सोपवून  आले आहे .अनाथाश्रमात किंवा अन्यत्र त्या तिची व्यवस्थित सोय लावतील .माझा त्यांच्यावर विश्वास आहे .

चार दिवसांपूर्वी मी माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्या मामाकडे सोपवून आले आहे .

मी जगात नाही असे म्हटल्यावर माझा भाऊ त्यांची काहीनाकाही सोय लावीलच.

अशाप्रकारे मी माझ्या मुलांची सोय लावली .गेल्या रात्री तो राक्षस झोपल्यावर मी वाटण वाटण्याचा दगडी पाटा त्याच्या डोक्यात घातला आणि त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा केला.

उजाडेपर्यंत मी झोपडीत त्याच्या प्रेताजवळ  बसून होते.उजाडताच मी आता तुम्हाला सर्व कैफियत सांगण्यासाठी येथे आले आहे .असे म्हणून सुभद्रा थांबली . 

पोलिस तिला घेऊन तिच्या झोपडपट्टीत आले.डोक्याचा चेंदामेंदा  झालेल्या अवस्थेत तिचा नवरा झोपडीत पडलेला होता.सर्व झोपडपट्टी तिथे जमली होती .

कायदेशीर बाबी पुऱ्या करून  सुभद्रेच्या नवर्‍याच्या प्रेताला शवविच्छेदनासाठी पाठवून सुभद्रेला  घेवून पोलीस ,चौकीवर परत आले .

सुभद्रेवर खुनाचा आरोप ठेवून कोर्टात केस उभी राहिली.

ज्या बाईंकडे सुभद्रा काम करीत होती आणि ज्यांच्याकडे तिने आपल्या मुलीला सोपविले होते.त्यांनी सुभद्रेच्या बाजूने एक वकील दिला .

सुभद्रेने कोणत्या परिस्थितीत खून केला, त्यावेळी तिची कोणती मन:स्थिती होती,तिचा नवरा माणूस नसून कसा नरराक्षस होता , तो सुभद्रेला कसा छळीत असे,त्याने सुभद्रेकडे गिर्‍हाईक कसे पाठविले होते,  त्याने त्याच्याच मुलीवर वर्षभर कसे अनन्वित अत्याचार केले, वगैरे सर्व गोष्टी त्या वकिलांनी कोर्टापुढे व्यवस्थित सविस्तर आणल्या .

सर्व बाजूंचा नीट विचार करून कोर्टाने सुभद्रेला सात वर्षांची सक्तमजुरी दिली .

सुभद्रेने ज्या दयाळू बाईंकडे आपली मुलगी सोपवली होती त्यांनी कायदेशीररित्या तिचा गर्भपात केला .

एवढेच नव्हे तर त्यांनी त्या मुलीला दत्तक घेतले.तिचे शिक्षण लग्न वगैरे सर्व त्यानी व्यवस्थित केले .

मुलांच्या मामाने सुभद्रा येईपर्यंत  त्यांचा व्यवस्थित प्रतिपाळ केला .हल्ली मुले सुभद्रेकडे असतात . 

चांगली वर्तणूक असल्यामुळे सुभद्रा पाच वर्षांनंतरच तुरुंगातून सुटून आली.

*त्या दयाळू बाईंनी तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये कायमची नोकरी दिली आहे .*

*सुभद्रा जेव्हा पाठीमागे वळून पाहते तेव्हा तो दहा पंधरा वर्षांचा काळ तिला एखाद्या कटु स्वप्नासारखा वाटतो.*

*मुलानी शिकून मोठे व्हावे ही सुभद्रेची इच्छा बहुधा पूर्ण होईल असे वाटत आहे .* 

{सुभद्रेच्या मुलांना आता जरी बऱ्यापैकी व्यवस्थित आयुष्य जगता येत असले ,तरी असे भाग्य झोपडपट्टीतील मुलांच्या नशिबी क्वचितच असते.सुभद्रेची केस  अपवादात्मकच म्हणावी लागेल.सुभद्रेच्या पाठीमागे त्या गायनाकॉलॉजिस्ट बाई खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणूनच हे सर्व शक्य झाले.}

(समाप्त) 

१९/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel