( ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
तिला जमीनदारापासून वैवाहिक सुख फारच कमी मिळाले होते.जवळजवळ मिळाले नव्हतेच . तिलाही भावना होत्या. तिलाही शरीराची गरज होती.तरुण तगडा पोलिस इन्स्पेक्टर, तरुण देखणा वकिलीला नवीनच सुरुवात केलेला वकील ,अशा अनेक लोकांची तिच्या घरी ये जा सुरू झाली .शहरातील अनेक प्रकारचे अधिकारी फिरतीवर आले की आवर्जून राधेच्या राजवाड्यावर आपला मुक्काम टाकीत असत.राधा सर्वांची सरबराई उठबस चांगल्या प्रकारे ठेवीत असे .मोठमोठ्या अधिकाऱ्यांपासून राजकारण्यांपर्यंत तिचे घनिष्ठ संबंध होते .लोक काहीबाही बोलत खरे काय ते राधेला व त्या लोकांनाच माहीत.काही कमी जास्त असले तरी राधेची परिस्थिती, वय पाहता ,तिला दोष देता येणार नाही असे बर्याच जणांना वाटत होते.
मुलगा लहानपणी आजारी अशक्त होता .तरुणपणी त्याची प्रकृती चांगलीच सुधारली होती .तो वडिलांवर गेला होता .त्याला वाईट मित्रांची संगत लागली होती .पैसा पाहिला की अनेक मित्र जमा होतात .आधीच वाईट प्रवृत्ती, त्यात नामांकित मित्र, मग काय विचारता !आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास.दारू,बाया, जुगार,वाईट नजर,या बाबतीत तो बापसे बेटा सवाई होता.
राधेला, त्याच्या आईला, त्याच्याकडून सुख होण्याऐवजी क्लेशच जास्त होत होते.राधेने सर्व कारभार आपल्या हातात ठेवला होता. मुलगा देणी करून ठेवी.घरच्या श्रीमंतीच्या जोरावर त्याला पैसे कर्जाऊ मिळत असत .आई ते फेडीत असे.मुलगा बाहेर लफडी करून ठेवी आणि ती आईला निस्तरावी लागत असत.
मुलगा झाला तेव्हा राधेला किती आनंद झाला होता. पतीपासून सुख नाही तरी मुलापासून मिळेल अशी तिला आशा होती.तो मोठा होईल,समर्थपणे सर्व कारभार सांभाळील, अशी आशा तिला होती.त्याचे लग्न होईल,चांगली सून मिळेल,तरुणपणात नाही तरी म्हातारपणात सुखाने राहता येईल, अशी तिची माफक अपेक्षा होती . त्याच्या प्रत्येक आजारपणात तिचा जीव खालीवर होत असे.तो जवळजवळ सतत या ना त्या कारणाने आजारी असे.मायेची पाखर घालून,अनेक डॉक्टर्स स्पेशालिस्ट यांना दाखवून, तिने त्याला इथपर्यंत आणला होता.तो तिचा एक शेवटचा आधाराचा तंतू होता .आणि हा असा चिरंजीव दिवटा निघाला होता.यापेक्षा मूल झाले नसते तरी चालले असते असे तिला वाटत असे.त्याने मुलीला त्रास दिला म्हणून अनेक तक्रारी येत असत . त्या मिटवता मिटवता तिची दमछाक होई.मुलापायी ती गांजून गेली होती.
आपले माहेर सुखी आहे .आपल्या त्यागामुळे ते सुखी झाले.एवढाच तिला सुखाचा आनंदाचा कवडसा होता .
आणि एक दिवस ती भयंकर बातमी तिच्या कानी आली.
तिच्या मुलाला बलात्कार व खुनाच्या केसमध्ये पकडण्यात आले होते.त्याच्या बरोबर आणखी चार मुलांना पकडण्यात आले होते .हे सर्व तिच्या मुलाचे "अभंग"चे मित्र होते.
अभंगमध्ये अनेक दोष होते ही गोष्ट राधाबाईनाही माहीत होती .त्यांनी ती कुणाजवळही मान्य केली असती .परंतु आपला मुलगा एखाद्या मुलीवर बलात्कार करील हे त्यांना पटत नव्हते .तो बाहेरख्याली होता .त्याची नजर वाईट होती. तो वाड्यावर नायकिणी आणित असे.हे सर्व जरी खरे असले तरी तो एखाद्या मुलीच्या मनाविरुद्ध तिच्यावर बळजबरी करील हे त्याच्या आईच्या राधाबाईंच्या मनाला पटत नव्हते.खून करण्याइतकी बेदरकार निडर क्रूर प्रवृत्ती त्याच्यामध्ये नव्हती. असा तिचा समज होता .
कदाचित हा मित्रांबरोबर असेल परंतु त्याने त्यात भाग घेतला नसेल .
कदाचित त्यांनी असे करू नये म्हणून तो त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करीत असेल .
कदाचित बलात्कार करणारे व खून करणारे त्याचे मित्र आहेत एवढ्या कारणासाठी त्याला यामध्ये गुंतविण्यात आले असेल.
असे राधाबाईंना वाटत होते .
निदान राधाबाई मनाची तशी समजूत घालीत होत्या .
राधाबाई पोलिसांत जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्या .त्यांनी जामीनावर मुलाला सोडविण्याचा प्रयत्न केला . या गुन्ह्याला जामीन देता येणार नाही इतका हा गुन्हा भयंकर संगीन आहे असे त्यांना सांगण्यात आले.
या वेळी राधाबाईंचे वय सुमारे पंचेचाळीस असावे .राधाबाईनी अजूनही आपली फिगर चांगली ठेवली होती.पंचेचाळीस वर्षांच्या असूनही त्या पस्तिशीच्या दिसत असत .त्यांचे एकेकाळचे चाहते आता त्या त्या खात्यात उच्च अधिकारावर होते. आपला मुलगा निरपराधी आहे याची त्यांना खात्री होती .त्याला सोडविण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ शकत होत्या .आपल्या पूर्वीच्या घट्ट मैत्रीचा,गडद ओळखीचा, फायदा करून घेण्याचे त्यांनी ठरविले.
प्रथम त्या सरकारी वकिलाला जावून भेटल्या . एकेकाळी वकिलीला सुरुवात केली तेव्हा हे राधाबाईंकडे वारंवार येत असत.त्यांनी अभंगला सोडविणे अशक्य आहे असे सांगितले.गुन्ह्याच्या ठिकाणी त्याच्या हाताचे ठसे सापडले आहेत.गुन्ह्याच्या ठिकाणी त्याची ओळख पटविणाऱ्या वस्तू सापडल्या आहेत .गुन्ह्याच्या जागेकडे जाताना व येताना पाहणारे साक्षीदार आहेत .बऱ्याच चर्चेअंती जरी त्याला जामिनावर सोडविता आला नाही तरी त्याला माफीचा साक्षीदार शक्य झाल्यास करण्याचे ठरविण्यात आले .
त्याच्या विरुद्धची केस कमकुवत कशी होईल हे ठरविले गेले . केस तयार करताना कच्चे दुवे मुद्दाम ठेवण्यात आले .वरिष्ठांकडून चक्रे फिरविण्यात आली. पैशाच्या जोरावर कनिष्ठानाही वश करून घेण्यात आले.मंत्र्यापासून संत्र्यापर्यंत त्याची त्याची किंमत चुकविण्यात आली .
शेवटी केस कोर्टात उभी राहिली.जिच्यावर बलात्कार झाला होता आणि जिचा खून झाला होता तिच्या पालकांनी न्यायासाठी प्राणांतिक उपोषण सुरू केले.शक्य तितक्या लवकर न्याय मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले .न्याय नक्की मिळेल असे आश्वासन मुख्य मंत्र्यांमार्फत देण्यात आले. उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले .
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या गुन्ह्याची चर्चा झाली.स्त्रियांचे मोर्चे निघाले.
स्पेशल कोर्टाची नेमणूक करण्यात आली .सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यात निकाल दिला पाहिजे असा हुकूम काढला .
राधाबाईनी आपल्या मुलाची निर्दोष सुटका व्हावी म्हणून नामांकित वकिलांची नेमणूक केली.
कोर्टात केस उभी राहिली .रोजचे साक्षी पुरावे आणि त्यावरील टीका स्थानिक वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून येवू लागली
ती बिचारी मुलगी ऑफिसमधून घरी येत होती.बस स्टॅन्डवर उभी असताना या टोळक्याने तिचे जबरदस्तीने हरण केले. बागेत एकांतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.तिने आरोपींना ओळखू नये म्हणून तिची निर्घृण हत्या करण्यात आली .तिचे प्रेत एका ओसाड जागी फेकण्यात आले.सुदैवाने गस्ती पोलिसांना ते सापडले अन्यथा कोल्ह्या कुत्र्यांनी त्याची वाट लावली असती.
राधाबाईंच्या प्रयत्नांना यश आले .एकूण पाच आरोपींपैकी एकाला फाशी झाली .दोघांना जन्मठेप झाली.दोघे जण निर्दोष सुटले त्यांत अभंग होता .
(क्रमशः)
२/१/२०२०©प्रभाकर पटवर्धन