(ही कथा काल्पनिक आहे नाव गांव किंवा आणखी  कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

हायवेवरून मी गाडी चालवीत होतो .जेवल्यापासून जवळजवळ चार तास मी नॉनस्टॉप गाडी चालवीत होतो .गुगलवर करवंद गावाची लोकेशन टाकली होती .नकाशा, गाव जवळ आल्याचे दाखवीत होता .लगेच करवंद तीन किलोमीटर अशी पाटी आली .मी डाव्या हाताला करवंद गावाकडे गाडी वळविली .थोड्याच वेळात करवंद गावाबाहेर असलेल्या धाब्यावर मी पोचलो.येथे हायवेवरून जाणाऱ्यांना राहण्याची व अर्थातच जेवणाचीही सोय होती. जेवण्याची व रहाण्याची  उत्तम सोय अशी पाटी हायवेवर लावलेली होती. मी एक खोली दोन दिवसांसाठी  घेतली.स्नान वगैरे करून मी ताजातवाना झाल्यावर करवंद गावाबद्दल चौकशी केली .मालकाने मला करवंद नावाची दोन गावे आहेत असे सांगितले .करवंद खुर्द व करवंद बुद्रूक .तुम्हाला कोणते पाहिजे ?असे विचारले .हे गाव कोणते असे विचारल्यावर तो म्हणाला हे गाव करवंद खुर्द.या पाठीमागच्या उंच डोंगरावर वसलेले गाव मूळगाव होय.त्याचे नाव करवंद होते.डोंगराच्या पायथ्याला जी नवी वस्ती झाली त्यालाही करवंद नाव पडले .पुढे कोणते करवंद म्हणून गोंधळ होऊ लागला. डोंगराखालचे करवंद व डोंगरावरचे करवंद असे म्हणण्याला सुरुवात झाली .नंतर या गावाला खुर्द व डोंगरावरच्या गावाला बुद्रुक असे म्हणण्याला सुरुवात झाली.

मला डोंगरावरच्या गावाला जायचे होते .म्हणजेच करवंद  बुद्रुकला जायचे होते.हे बुद्रुक फारच उंचावर वसलेले होते.कटरा गावातून वैष्णोदेवीचे मंदिर असलेला पर्वत पाहताना जसा तो पर्वत अंगावर आल्यासारखा वाटतो.तसाच हा डोंगर अंगावर आल्यासारखा वाटत होता .येथे वर जाणारी वाट पायवाट होती .सरळ उंच शिडीसारखा चढ होता.त्या रात्री विश्रांती घेऊन मी दुसऱ्या दिवशी करवंद बुद्रुकला जाण्यासाठी निघालो .

सकाळी लवकर उठून मी ट्रेकिंगचा जामानिमा करून निघालो . डोंगरावरून  पायवाट जात होती.पायवाटेच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी होती.मधून मधून झरे वाहात होते .त्यामुळे वाट निसरडी झाली होती .मधूनच रेतीवरून चालावे लागत होते. त्यावरून पाय घसरून पडण्याची शक्यता होती .समुद्राकाठची रेती वाळू येथे डोंगरावर कुठून आली होती ते एक डोंगरच जाणे.पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता .मधूनच एखादा वानर लांबून  ओरडताना ऐकायला येत होता . क्वचित दाट झाडीला छेदून काही सूर्यकिरण  पायवाटेवर पडत होते.मध्येच एक रानडुक्कर डावीकडच्या झाडीतून धावत आला व पायवाट ओलांडून उजवीकडे निघून गेला.  एकदा तर वाघाची डरकाळी एकल्यासारखे वाटले आणि छातीत चर्रss  झाले . 

तीन चार तासांच्या खडतर चढावानंतर मी करवंद बुद्रुक गावात  पोहोचलो .येथील लोक नेहमी सपाटीवर कसे येत असतील कोण जाणे ?माझी तर दमछाक झाली होती.हा एक आदिवासी पाडा होता .  पाच पंचवीस झोपड्या एकत्र उभारलेल्या होत्या .त्याच्या पाठीमागे एक कडा होता .त्या कड्यावरून धबधब्यासारखा एक झरा उंचावरून खाली पडत होता . मी झऱ्याजवळ गेलो .त्यातून वाफा येत होत्या.झरा उष्ण होता. सामान्यपणे आपण स्नानासाठी जेवढे गरम पाणी घेतो तेवढे त्या झऱ्याचे पाणी गरम होते .हे पाणी मुख्यतः औषधांसाठी वापरले जात असे .याशिवाय आणखी दोन झरे होते त्याचे पाणी इतर कामांसाठी वापरले जात असे .

एका आदिवासी जवळ चौकशी करता मला पुढील माहिती मिळाली .हा झरा ज्या डोंगरातून कपारीतून येत होता त्याच्यावर एक लहानसे तळे होते.त्या तळ्यातून या झर्‍याचा उगम होत होता.आणखी अर्धा एक तास चालल्यावर त्या तळ्यापर्यंत जाता येत होते . झऱ्याचे पाणी औषधी होते .त्यापाण्याने स्नान केल्यास आणि त्याचप्रमाणे ते पिण्यासाठी वापरल्यास संधिवात बरा होत असे .तेथे एक आदिवासी वैदू होता .तो संधिवातावर या झऱ्याच्या पाण्याचा वापर करून उपचार करीत होता.संधिवाताने वेंगलेले रोगी इथे उपचारासाठी येत असत .त्या वैदूने एक झोपडी बांधली होती .त्या झोपडीत चार खोल्या होत्या .ते त्याचे हॉस्पिटल होते असे म्हणता आले असते .रोगी व त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांची नातेवाईकांची तेथे राहण्याची व्यवस्था होती.

यातील सर्व माहिती मला मी करवंद खुर्द गावात जिथे धाब्यावर उतरलो होतो त्याच्या मालकाने सांगितली होती . वर जाण्यासाठी एखादी डोली पाहिजे का म्हणूनही मला विचारले होते.मीही या झऱ्याबद्दल वैदूबद्दल व उपचारांबद्दल ऐकले होते.मला प्रत्यक्ष येऊऩ खात्री करून घ्यायची होती .माझी आई संधिवाताने खूप आजारी होती.या झऱ्याबद्दल, वैदूबद्दल, झोपडीबद्दल, आम्हाला कुणी तरी सांगितले होते. मला प्रत्यक्ष येऊऩ खात्री करून घ्यायची होती .

माझी आई कित्येक वर्षे संधिवाताने आजारी होती .तिला संधिवाताचा अटॅक आला म्हणजे तिचे सर्व सांधे कडक होत असत .अशावेळी तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागत असे .इंजेक्शन्स औषधे इत्यादीनी तिला थोडीफार हालचाल करता येऊ लागली म्हणजे तिला डिस्चार्ज मिळत असे.  अॅलोपथीपाप्रमाणे होमिओपथी  व आयुर्वेद यांचेही तिच्यावर उपचार करून झाले होते. प्रकृतीत विशेष फरक जाणवला नव्हता .पोटात आम्ल साठते, ते रक्तावाटे सांध्यात जाऊन तिथे त्याचा संचय होतो,त्यामुळे सांधे कडक होतात,असे आयुर्वेद डॉक्टरांचे सांगणे असे .त्यांनीच या झर्‍याबद्दल सहज बोलता बोलता सांगितले होते.एकदा प्रत्यक्ष येऊन पाहावे आणि नंतर तिला येथे घेऊन यावे म्हणून मी आलो होतो .

वैदूला विचारता त्याने येथे सुमारे एक महिनाभर राहावे लागेल असे सांगितले.

एक महिन्याची रजा घ्यायची आणि आईला येथे घेऊन यायचे व राहायचे असा मी निश्चय केला.

आई बरी होणार या  आनंदात उतरत असताना माझा पाय रेतीवरून  घसरला आणि मी घसरगुंडी प्रमाणे झपाटय़ाने डोंगरावरून घसरत खाली येवू लागला . आता या डोंगराच्या पायथ्याला घसरून आपला कपाळमोक्ष होणार या भीतीने मी एक किंकाळी मारली आणि स्वप्नातून जागा झालो .

*आणि त्यामुळेच मी कपाळमोक्ष होण्यापासून वाचलो .*

हल्ली हे स्वप्न मला मधूनमधून पडत असे.वर सांगितल्याप्रमाणे सर्व स्वप्न यथासांग पडत असे.आणि त्याचा शेवट किंकाळीमध्ये होत असे.माझी आई संधिवाताच्या असाध्य रोगाने अंथरुणाला खिळलेली होती. तिच्यावर निरनिराळे उपचार करावे लागत होते .मी तिला निरनिराळ्या पाथींच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो.एका आयुर्वेदाचार्यांना त्यांच्या आयुर्वेदावरील पुस्तकात,झऱ्यांचे उपचार या खाली असा एखादा झरा औषधी झरा असू शकतो आणि त्यामुळे बरे वाटू शकते असे लिहिलेले आढळलेले होते असे त्यांनी मला सांगितले होते.

एवढाच मला मधूनमधून पडत असलेल्या या स्वप्नाला आधार होता . हा झरा कुठे आहे ते त्यांना माहित नव्हते.प्रत्यक्ष असा झरा असू शकतो का की ही एक कविकल्पना आहे याबद्दलही त्यांना खात्री नव्हती.

हे ऐकल्यापासून मला स्वप्न पडत होते एवढे मात्र नक्की .प्रथम मी या स्वप्नाकडे दुर्लक्ष केले . मनी वसे ते स्वप्नी दिसे या प्रमाणे हे स्वप्न मला पडत असावे असे माझे मत होते .परंतु एकच स्वप्न  तंतोतंत तसेच वारंवार का पडत असावे ते मला कळत नव्हते.

तो हायवे, ते माझे गुगलवर नकाशा पहाणे, ती करवंद गावाची पाटी, तो धाबा,  ती दोन खुर्द व बुद्रुक करवंद नावाची गावे, मला जागेपणी सुद्धा स्पष्ट दिसत होती.

जवळजवळ चार पाच वेळा तंतोतंत  एकच स्वप्न पडल्यावर हे करवंद गाव कुठेतरी नक्की असले पाहिजे आणि झरा व तलावही अस्तित्वात असला पाहिजे असे मला वाटू लागले.त्याने संधिवात बरा होत असला पाहिजे .निदान शोधून पाहायला तरी काय हरकत आहे असा विचार मी केला .

शोधायला सुरुवात केल्यावर मला करवंद नावाची पाच गावे आढळून आली .त्यातील तीन महाराष्ट्रात सह्याद्रीला लागून कोकणात होती.पहिले महाडजवळ दुसरे रत्नागिरीजवळ व तिसरे सावंतवाडी जवळ होते. उरलेली दोन एक केरळमध्ये व दुसरे हिमालयात आढळले. 

मी स्वप्नात पाहिलेले गाव मराठी भाषा बोलत होते. तेव्हा हे गाव सह्य़ाद्रीच्या पायथ्याला असले पाहिजे असे मी निश्चित केले.आपण आठ दिवसांची रजा टाकायची आणि संशोधनाला निघायचे असे मी ठरविले .प्रथम महाड जवळील करवंद, नंतर रत्नागिरी जवळील करवंद , व शेवटी सावंतवाडी जवळील करवंद, यांना भेटी देण्याचे ठरविले .मला स्वप्नात दिसलेला धाबा कुठे आढळतो ते मला पाहायचे होते.त्याचप्रमाणे करवंद खुर्द व करवंद बुद्रुक,झरा, तलाव, औषधी पाणी, गरम पाणी,आदिवासी पाडा, वैदू, स्वप्नात पाहिलेला डोंगर,खरेच अस्तित्वात आहे का त्याची मला खात्री करून घ्यायची होती .स्वप्नातील करवंद मला जिथे सापडेल तिथे माझा शोध संपणार होता .अर्थात अशीही शक्यता असणार होती की करवंद नावाचे गाव अस्तित्वात असणार नव्हते.

मला खरेच तसे गाव सापडले  तर मी वाटेल ते करून माझ्या आईला तेथे घेऊन जाणार होतो.आईला संधिवातामुळे होणारे कष्ट व वेदना मला पाहावत नव्हत्या.              

मला हवे असलेले करवंद गाव सावंतवाडी जवळ सापडले.मी स्वप्नात पाहिल्याप्रमाणे हायवे,करवंद गावाची पाटी, धाबा, त्याचा मालक, करवंद खुर्द व करवंद बुद्रुक अशी दोन गावे , करवंद खुर्दच्या पाठीमागे तसाच डोंगर, मला आढळला .मी डोंगर चढून गेलो .गरम पाण्याचा झरा, वैदू, हॉस्पिटलवजा झोपडी, सर्व काही जसेच्या तसे  मला आढळले.

मला स्वप्नात दिसलेल्या सर्व गोष्टी सत्यात तशाच आहेत हे पाहून मी आश्चर्यचकीत झालो .कधीही न पाहिलेल्या परंतु प्रत्यक्षात असलेल्या गोष्टींचे  असे स्वप्न पडू शकते असे जर मला यापूर्वी कुणी सांगितले असते तर मी त्यावर विश्वास ठेवला नसता. 

आता आईला घेऊन येथे यायचे. एक महिनाभर रहायचे. योग्य औषधोपचार करायचे.आणि त्याचप्रमाणे हे पाणी औषधी का आहे?औषधी गुणधर्मामागे कोणते रहस्य आहे? या झऱ्याचा ज्या तलावात उगम होतो तिथपर्यंत जाता येते का?  तो तलाव आणखी जास्त औषधी आहे का? हे पाणी नेऊन  शहरात त्याचा औषध म्हणून वापर करता येतो का?  या सर्वाचे संशोधन करायचे असे मी माझ्या स्वभावानुसार ठरविले. 

(क्रमशः)

१४/११/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel