(ही गोष्ट काल्पनीक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

तू त्या मुलीचे अनेक फोटो काढलेस. ती तुझ्या डोळ्यात भरली वाटते,असे त्याचा मित्र परत जाताना अविनाशला म्हणाला.

त्यावर मंद स्मित करीत त्याने होकारार्थी मान हलविली.

त्यावर त्याचा मित्र पुन्हा त्याला म्हणाला छायाचित्रकाराची दृष्टी, की आणखी कुठली दृष्टी !

त्यावरही त्याने काहीही अर्थ व्हावा असे एक गूढ स्मित केले .

थिबा पॉइंटला अविनाश जरी साक्षीला पाहात होता तरी साक्षीचे त्याच्याकडे लक्ष गेले नव्हते.ती समोरचे निसर्ग सौंदर्य पाहण्यात मग्न झाली होती.तिची समाधी लागली होती .तिचा समाधीभंग करण्याएवढा अविनाश अरसिकही नव्हता. तिला आवडेल न आवडेल म्हणून तिला जाऊन भेटण्याचे त्याने टाळले होते .मित्राबरोबर त्याच्या घरी येताना व आल्यावरही त्याला सूर्यकिरणांनी न्हालेली,त्यामुळे आणखीच सुंदर दिसत असलेली समाधीमग्न साक्षी डोळ्यासमोर दिसत होती. अजूनही त्याला तिचे नाव माहीत नव्हते .त्याने त्याच्यापुरते तिचे नाव अनामिका ठेविले होते .त्याचा दैवावर विश्वास होता. जर तिची भेट आपल्या नशिबात असेल तर ती होईलच यावर त्याचा  गाढ विश्वास होता .शाहरूखचे ओम शांती ओम मधील ते अजरामर वाक्य त्याला नेहमी आठवत असे.जर मनापासून तुम्ही एखाद्या गोष्टीची इच्छा कराल तर सारा निसर्ग सारा अवकाश सारी सृष्टी तुम्हाला ते मिळवून देतो. मिळवून देण्याच्या मागे लागतो .

साक्षीलाही मधून मधून अविनाश व त्याचा सहजपणा, त्याची सभ्यता, त्याची  मदत करण्याची वृत्ती, आठवत होती .तो पुन्हा कधी आपल्याला भेटेल का? असा विचारही तिच्या मनात येत होता .

अविनाश मित्राबरोबर रत्नागिरीत  फिरत असताना साक्षी कुठे दिसते का ते न्याहाळून  पहात होता.

साक्षी मैत्रिणीच्या लग्नात हरवून गेली होती तरीही तिला अधून मधून  अविनाशची आठवण येत होती.तिने तिच्या पुरते त्याचे नाव मिस्टर ए असे ठेविले होते .

लग्नाच्या दिवशी मंडपामध्ये दोघेही होते . लग्नाच्या गर्दीत अर्थातच त्यांचे परस्परांकडे लक्ष गेले नव्हते .अविनाशला एकदा अनामिका दिसल्यासारखे वाटले परंतु मनी वसे ते स्वप्नी दिसे या ऐवजी मनी वसे ते समोर भासे असे असावे असे हसत हसतच तो मनाशी म्हणाला .

मित्राचा विवाह संपन्न झाला .स्टेजवर वधूवर स्थानापन्न झाले.अभिनंदनासाठी ,भेटण्यासाठी, लोकांची स्टेजवर लाईन लागली .तिथे दोघांची भेट झाली .त्यांनी एकमेकांकडे बघून ओळखीचे स्मित केले .तिची मैत्रीण व त्याचा मित्र दोघांच्याही चेहऱ्याकडे पाहात होते. दोघांच्याही डोक्यात घंटा वाजल्याचे त्यांनी जाणले .मैत्रिणीने ढुशी मारून कोण ग? म्हणून विचारले तर मित्राने चिमटा काढून कोण रे? म्हणून विचारले.दोघांनी माहीत नाही गाडीत आम्ही एकाच बाकावरून आलो असे उत्तर दिले .

यावरती अनामिकेची मैत्रीण प्रथम पुढे सरकली आणि तिने ही माझी मैत्रीण साक्षी .पुण्याला असते. शिक्षिका आहे.अशी तिची ओळख करून दिली .तर  मिस्टर ए च्या मित्राने याचे नाव अविनाश हा अतिशय प्रसिद्ध  फोटोग्राफर आहे.सर्व सिनेसृष्टी व जाहिरातजगत् याला ओळखते .याचा मोठा स्टुडिओ मुंबईला आहे .अशी ओळख करून दिली.

दोघांनीही लग्नमंडपात गर्दीमध्ये आपल्या मैत्रिणीला व मित्राला सहज गुंगारा दिला आणि एका कोपऱ्यात खुर्चीवर बसून दोघे गप्पा मारू लागली .अविनाश मुंबईला डायरेक्ट जाणार होता .त्याचा स्टुडिओ तिथे त्याची वाट पाहात होता .तो वाकडी वाट करून साक्षी बरोबरच पुण्याला आला .नंतर तिथून मुंबईला गेला.

अविनाशच्या बाबांनी अरे तू मुंबईला जाणार होतास ना? इकडे कसा काय आलास ?असे विचारले .त्यावर त्याने इथे एक काम निघाले म्हणून आलो असे गुळमुळीत उत्तर दिले .

पुढील सर्व वाटचाल नेहमी प्रेमिकांची होते त्याप्रमाणेच झाली .एकमेकांचे मोबाइल नंबर अर्थातच घेण्यात आले होते .दोघांचे पत्तेही माहीत झाले होते .  फोनवर गप्पा, फेसबुकवर गप्पा, विशेषत: व्हॉट्सअॅपवर गप्पा सुरू झाल्या .अविनाशच्या दर आठवड्याला पुण्याला चकरा सुरू झाल्या .एकदा तर त्याच्या बाबांनी त्याला विचारले सुद्धा की अरे इथे तुझी काही गडबड तर नाही ना ?त्यावर त्याने हसून अशी मान हलविली कि ती होकरार्थीही घ्यावी किंवा नकारार्थीही घ्यावी.

त्यावर हसून त्याची आई म्हणाली की कोंबडे झाकून ठेवले तरी उजाडायचे ते उजाडणारच .उजाडले की आपल्याला कळणारच .उगीच घाई कशाला ?सस्पेन्स सस्पेन्सच राहू दे .

एकदा तर बाबांनी दोघांनाही  बंडगार्डनवर फिरताना  पाहिले.त्यांनी साक्षी लक्षात ठेविली .त्याबद्दल ते घरात काहीच बोलले नाहीत .

एकदा अविनाशच्या आईने त्या दोघांना पेशवे पार्कमध्ये तर एकदा  तळ्यातील  गणपती मंदिरात पाहिले. भावी सून आईंना ठीक वाटली.

अविनाशने स्वतः काही सांगेपर्यंत आपण काहीही बोलायचे नाही असे त्यांनी ठरविले होते.

एक दिवस दोघेही फिरत असताना साक्षीला तिची मुंबईची मैत्रीण भेटली .

तिने नंतर साक्षीला विचारले की तू कोणाबरोबर फिरत होतीस तुला माहीत आहे का?

मुंबईचा हा प्रसिद्ध फोटोग्राफर ज्याच्याकडे मॉडेल्स नटनट्या फोटो काढू इच्छितात.

ज्याने फोटो काढला म्हणजे  यशाची पायरी चढता येते, असा हा सुप्रसिद्ध अविनाश फोटोग्राफर .

ती पुढे म्हणाली, ज्याने हात लावला तर मातीचे सोने होते, जर सोन्याला हात लावला तर त्याचेकाय होईल?मातीत लपलेल्या सोन्याची ज्याला पारख आहे असा हा अविनाश फोटोग्राफर. 

कोणती रंगसाधना असावी, कोणत्या कोनातून फोटो काढावा, म्हणजे अंगभूत सौंदर्याला उठाव मिळेल हे ज्याला कळते तो हा अविनाश फोटोग्राफर.

ज्याच्याकडे फोटोसेशन  करायला मिळावे म्हणून महिनोनमहिने नट्या थांबून राहतात तो हा अविनाश फोटोग्राफर. 

त्या मैत्रिणीने कपाळाला हात लावीत म्हटले की तू तर गये कामसे झाली आहेस.तू तर याच्या प्रेमात आकंठ बुडाली आहेस.तुला सांगून काय कळणार? तुला सांगून थोडेच पटणार ?जाऊ द्या झाले.

मैत्रिणीचा  किंचित काळजीचा व जास्त चिंतेचा स्वर ऐकून साक्षी थोडी सतर्क झाली. मला पटेल किंवा न पटेल तू मला सांग तर खरी .त्यानंतर त्या मैत्रिणीने  तिला जे काही सांगितले ते ऐकून साक्षी अत्यंत गंभीर झाली. अजून हे आपल्याला कसे कळले नाही असा विचार तिच्या मनात आला. मैत्रीण भेटली ते बरे झाले नाही तर आपण फसलो असतो असा विचार तिच्या मनात आला .

मैत्रीण गेल्यावर तिने सांगितलेल्या गोष्टीच तिच्या मनात सारख्या घोळत होत्या .अविनाश तर तिला साधा सरळ प्रामाणिक वाटला होता .तो असा असेल असे तिला आंतून मुळीच वाटत नव्हते .

मैत्रीण म्हणाली होती.

हा सारखा मुलींच्या गराड्यात असतो .

तरुण मुली याच्या मागे मागे करीत असतात.

फोटो सेशन चालू असताना मुली याच्याबरोबर एकांतात असतात .

अर्धनग्न किंवा झिरझिरीत तोकड्या  कपड्यांनी अवगुंठीत अशा मुलींच्या सहवासात हा नेहमी असतो .

त्यांनी पोझ कशी घ्यावी हे दाखवण्यासाठी तो त्यांना स्पर्श करीत असणारच !  

आधीच हा गोरा गोमटा, देखणा त्यात मुलींच्या सहवासात, मग काय विचारता.

लोण्याजवळ अग्नी नेला काय किंवा अग्नीजवळ लोणी नेले काय परिणाम एकच लोणी वितळणारच!!

थोडक्यात त्या मैत्रीणीने पुरेशी आग लावून दिली होती. 

साक्षीला हे सर्व ऐकून फार मोठा धक्का बसला होता .तिने जो अविनाश आतापर्यंत पाहिला होता त्याच्या बरोबर विरुद्ध अशी ही  माहिती होती .तिचा या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. ती मैत्रीण उगीच काही एकाचे दोन करून सांगणारी नव्हती.तिने जे ऐकिले ते सांगितले .तिने आणखी एक दोघींकडून बातमी मिळविण्याचे ठरविले .त्यांनीही इतकी कठोर नाही परंतू साधारण मिळती जुळती अशी प्रतिक्रिया दिली .सर्वांची माहिती ऐकीव  होती. मला असा अनुभव आला.माझ्या ओळखीच्या अमुक अमुक मुलीला असा अनुभव आला  असे सांगणारे कुणीच कुणाला भेटले नव्हते. 

*आत्तापर्यंत दोघांनीही आपआपल्या आई वडिलांना  बातमी दिली होती.दोघांच्याही आईवडिलांना ते अगोदरच माहीत झाले होते. दोघाही कुटुंबांची ओळख निघाली होती .त्यांनी या विवाहाला संमती दिली होती.*

*आता मागे फिरायचे विवाह करीत नाही म्हणून सांगायचे ही गोष्ट कठीण होती.काय करावे ते साक्षीला कळत नाहीसे झाले .*

*तिने स्वतः मुंबईला जाऊन पाहण्याचे ठरविले.*

(क्रमशः)

१७/१२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel