"आणि अमित, ही आहे, मिस शनाया."
अमितने हात पुढे केला आणि मिस शनायाचा मऊ हात हळूवारपणे दाबला आणि म्हणाला,
"हाय!"
खांद्यापर्यंत नीट कापलेले केस, तरतरीत नाक, निळसर डोळे, त्यावर लाल फ्रेमचा चष्मा, रंगाने सावळी, हलक्या रंगाची लिपस्टिक, मेकअप बेताचाच, उंची ५ फुट ४ इंच आणि ३६ २४ ३६ का काय म्हणतात तसा बांधा. राखाडी रंगाचा फॉर्मल सूट, हातात स्मार्ट वॉच आणि एक आयपॅड! शनायला पाहून अमित पहिल्या भेटीतच क्लीन बोल्ड झाला होता
पुढे सायबेरीयाड रिसर्चचे व्हाईस प्रेसिडेंट टी. शशिधरन यांनी मिस शनायाला संबोधित केले
“शनाया, हे आपले नवीन सहकारी आहेत. मिस्टर अमित गोडसे यांना रिसर्च एंड डेव्हलपमेंट मध्ये खूप चांगला अनुभव आहे. कार्यक्षम नियोजन आणि व्यवस्थापन या कौशल्यांसाठी केवळ प्रशंसाच नाही तर अनेक वेळा त्यांना पुरस्कृतही केले गेले आहे. मला आशा आहे, ते सायबेरियाड रिसर्च साठी एक अॅसेट ठरतील.”
आपल्या हातातील आयपॅडवर स्टायलसने काही नोंदी करत शनायाने मनमोहक स्मितहास्य केले टी. शशिधरन पुढे म्हणाले,
"आणि हि शनाया, शनाया आमच्या सायबेरीयाडचे एक रत्न आहे. खूप हुशार, खूप निष्ठावान, मेहनती आणि हो... नो डाउट सुंदरही आहे!”
"सर, प्लीज बट कौतुक केल्याबद्दल धन्यवाद!" शनाया मंद स्मित करत म्हणाली.
“मिस्टर गोडसें शनाया तुम्हाला इंडक्शन प्रोसेस बद्दल मदत करतील. मी आशा करतो तुमची काही हरकत नाही."
“ओके मिस्टर गोडसे, सायबेरीयाड मधील आपल्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी आता निघतो.” एवढे बोलून टी. शशिधरन त्यांच्या चेंबरकडे निघाले.
इंडक्शन प्रोसेस बायोमेट्रिक पद्धतीने एका कॅबीन मध्ये होणार होती. अमितच्या हाताचे ठसे घेतले गेले आणि रेटीना स्कॅनिंगसाठी अमितला व्ही आर हेडसेट सारखा दिसणारा हेडसेट लावला गेला आणि इंडक्शन सुरु झाले.