पण मानवी मन ना विचित्र असतं! आपण आजवर काय अनुभवलं किंवा मिळवलं याचा त्याला चटकन विसर पडतो आणि जे आपल्याकडे नाही त्या गोष्टीचा त्याला हव्यास असतो. इतरांकडे असेलेली गोष्ट आपल्याकडे का नाही याचा विषाद नेहमी असतो आणि मग त्या प्राप्त न झालेल्या गोष्टी मिळवण्याच्या कधी न संपणाऱ्या प्रवासाला मन निघतं.
अमितही काही अपवाद नव्हता. इतकी चांगली लाईफस्टाइल असल्यामुळे तो ३४ वर्षाचा दिसत असला तरी आता तो खरा ४४ वर्षाचा झाला होता. असे असूनही तो सिंगल एंड रेडी टू मिंगल होता. अमित दिसायला देखणा होता. गोरापान, घारे डोळे, चष्मा होता. फक्त आता वयोमानानुसार थोडेसे केस कमी होऊन कपाळ मोठे झाले होते. तरीही हुशार माणूस मुळातच आपली छाप पाडतो अमितही तसाच होता. ठाण्यात मोठा फ्लॅट वगैरे त्याने घेतलाच होता. बाकी त्याला ठाण्याच्या घोडबंदर रोडचे ट्रॅफिक पाहून कार विकत घेण्याची इच्छाच झाली नाही. त्यामुळे त्यांनी कार तेवढी घेतली नव्हती.
असं सगळं मस्त चाललं होतं. त्याला वाटत होतं आता काय आपल्याला हवी ती मुलगी एका पायावर आपल्याशी लग्न करेल. मग फेसबुक वगैरेवर शाळेचा ग्रुप जॉईन करून जुन्या मित्र आणि मैत्रीणीना शोधण्याचा सोपस्कार झाला. अनेक जुन्या मित्र मैत्रिणींच्या भेटी झाल्या. गेटटुगेदर झाले.
सगळ्यांची लग्न होऊन आता मुलं मोठी झाली होती. शाळेतल्या काही मोजक्या मुली ज्यांचा अमित क्रश होता किंवा अमितचा ज्यांच्यावर क्रश होता त्या सगळ्यांनी मुद्दाम अमितची ओळख ‘माझा खूप चांगला मित्र’ किंवा ‘मानलेल्या भावासारखा’ म्हणून आपापल्या नवऱ्याशी करून दिली आणि अमित अचानक अनेक शाळकरी मुलांचा मामा सुद्धा झाला.
नंतर याच अमितच्या मानलेल्या बहिणींपैकी एक मैत्रीण दोन तीन वेळा अमितकडे येऊन सुद्धा गेली. पण त्याला फारसा काही अर्थ नाही. ती तिच्या संसारात खुश होती. तिला फक्त अधून मधून स्निक आउट व्हायला अमित भेटला होता. पण अमितला असे रिलेशन मान्य नव्हते त्याने तिला नवऱ्याला घटस्फोट देऊन माझ्याबरोबर लग्न कर असे सांगितले पण तिने नकार दिला आणि मग ते प्रकरण तिकडेच संपले.