काही वेळातच मग इंडक्शनचे सोपस्कार संपले आणि काही वेळातच त्याने त्याचा हेडसेट काढून ठेवला.
"मिस शनाया?"
"सर!"
"हे बघ, आज कामाचा पहिला दिवस आहे."
"हो सर."
"आज कामाविषयी नाही बोललो तर चालेल का?"
"का सर?" (चकित होऊन)
"आय मीन.... आज काम नको... गप्पा मारुया."
"हो सर. हो चालेल."
"तू खूप हुशार आणि मेहनती आहेस, शनाया."
"धन्यवाद सर."
“मला स्ट्रेट फोरवर्ड बोलणे आवडते. मी सॅपिओ सेक्शुअल आहे.”
“म्हणजे? मला समजले नाही.”
“म्हणजे मी सौंदर्यापेक्षा बुद्धिमत्तेच्या प्रेमात पडतो... आणि तू म्हणजे सौदर्य आणि बुद्धिमत्ता यांचे अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहेस.”
“म्हणजे?”
"म्हणजे असं कर न. ते इनबॉक्स मध्ये येऊन पडलेले इमेल्स उद्या पाहूया का? आता गप्पा मारू. मिस शनाया.... मला सांग , तुला ही सायबेरियाड रिसर्च हि कंपनी कशी वाटते?
"चांगली वाटते, सर. माझे सर्व काही या सायबेरीयाड रिसर्चचे आहे आणि मी सायबेरीयाडला समर्पित आहे."
"मस्तच. तू या ऑर्गनायझेशनमध्ये कधी पासून आहेस?"
"दोन वर्ष, तीन महिने, साडेदहा दिवस, सर"
"व्वा, परफेक्ट हिशोब सांगितलास. अगदी अर्धा दिवस सुद्धा."
"हो सर, आता बारा वाजून तीस सेकंद झाले आहेत."
"तुला संख्या आणि आकडेमोड आवडते का?"
" जन्मत:च, सर."
"अरे व्वा! मला पण."
"हो सर."
"खूप सुंदर!"
"काय सर?"
"तू."
"ठीक आहे, सर."
"कॉफी की चहा?"
"नाही सर."
“का?”
"पुरेशी माहिती नाही... नाही, चहा नाही? काही नाही? सर्रर्र...”
शनाया एकदम गप्प झाली होती.
“तू ठीक आहेस ना..?”
असे म्हणून अमितने शनायाच्या डोक्यावरून हात फिरवला.
"धन्यवाद सर."
"पण चहा कॉफी च काय?" ,
"नाही सररर्रर्र...."
"पण का? बर नको घेऊस, तुला चहा कॉफी ची अलर्जी आहे का?
"नाही सर?"
"बरं हरकत नाही. दुपारच्या जेवणाचा प्लान काय?"
"सर, तुम्ही ते कॅन्टीनमध्ये जाऊन घेऊ शकता."
"तू काम करायला सुरुवात करत्येस का?"
"हो सर. मला बरीच कामं आहेत."
"शनाया तू खरोखरच सायबेरीयाड रिसर्चला समर्पित आहेस. चहा नाही, कॉफी नाही, गप्पा गोष्टी नाही. कामा व्यतिरिक्त, तुझा छंद काय आहे?"
"फक्त काम, सर."
"नाईस.. नाईस. ऑफिसनंतर काय करतेस ?"
"घरी जाते. माझ्या स्लॉटमध्ये."
"तुझा स्लॉट? यु मीन फ्लॅट? बरं तुला आणखी कुठे कुठे फिरायला आवडतं? मी पुण्यात फिरलो नाहीये फारसा, सिंहगडावर जाऊया का"
"नाही सर."
"अगं, फिरायला हवं. दिवसभर एवढं काम करतेस, मग संध्याकाळी फिरायचं. पण तू काही नाही फिरत? तुला काही टेन्शन आहेत का?"
"टेन्शन? मला समजलं नाही सर. मला माझं काम आवडतं."
"हो ते ठीक आहे, पण शनाया, तू फिरायला जायला हव. एखाद्या मित्राबरोबर............ माझ्यासारख्या...त्यामुळे फिगर पण मेंटेन राहते आणि सौंदर्य पण अधिक खुलून येतं."
"सौंदर्य?"
"हो, म्हणजे, आपण कधीतरी फिरायला जाऊया. चालेल न?"