त्याला आल्याबरोबर कपालिनीने विचारलें

“झालें का काम!" कपालिनीने विचारले.

"मी प्रयत्न तर केला आहे. यश अपयश दैवाधीन आहे...! दोरीचें एक टोक दगडाला बांधलें आहे व दुसरे टोक दरीत खाली सोडले आहे. परंतु तो दगड पूर्वेकडे ओढला गेला तरच शंख खाली पडणार! नाहीतर आपला प्रयत्न फुकट जाणार..!" चंद्रवर्मानें शंका केली.

“म्हणजे तुझे म्हणणे असें आहे की जर यांत कांही चूक झाली तर तुझा प्रयत्न फुकट जाईल...?" कपालिनी स्मित करून म्हणाली

“तें तूं माझ्यावर सोड. दोरीचे दुसरे टोक कोठे आहे तेवढे मला दाखव. मी तुझी शंका दूर करतें."

कपालिनी चंद्रवर्माबरोबर डोंगराजवळ गेली. तेथें चंद्रवर्माने तिला दोरीचे दुसरे टोंक दाखविलें. कपालिनीने ते हातात घेऊन म्हटले

“अरे, दोरीचे दुसरे टोंक ज्या दगडाला बांधलेले आहे तो दगड टेकडीच्या अगदी काठावर आहे. आतां तो दगड हालला की पुरें, तो शंख काही वाचत नाही. तो खाली पडणार आणि त्याचा कपाळमोक्ष होणार. ह्यांत तुला शंका वाटण्याचे कारण काय, हे नाही मला समजले...!”

तितक्यांत तिने डोळे वटारून व तोंडावर बोट ठेवून चंद्रवर्माला सावध केले आणि बोटानें शंखाला दाखवीत चंद्रवर्माच्या कानांत पुटपुटली

"तो पहा!!! शेख येतो आहे. त्याच्या हातात ती जादूची कांडी दिसते आहे का तुला? तो दगडावर चढल्याबरोबर तूं दोरी ओढ...!"

चंद्रवर्मानें डोकं वर करून टेकडाच्या टोकाला पाहिले. सकाळच्या अंधुक उजेडांत त्याला शंख मांत्रिकाचे विकृत रूप दिसले. त्याचे सर्व अंग एक क्षणभर थरारले. परंतु लगेच स्वतःला सावरून व सर्व शक्ति एकवटून त्याने दोरी ओढली. शंख दगडावर चढून हात वर करून मंत्रोच्चार करू लागला होता. चंद्रवर्मानें दोरी ओढून सैल सोडल्या बरोबर शंख मांत्रिकाचा तोल सुटला आणि तो स्वतःचा तोल सावरण्यासाठी हवेत हातवारे करूं लागला. परंतु त्याच्या दुर्दैवाने तो स्वत:ला सावरू शकला नाही. तो मोठ्याने ओरडला 

“दगाबाजी..!!!"

त्याच्या हातातली जादूची कांडी सुटली व पूजा गृहाजवळ जाऊन पडली. त्याबरोबर पूजा गृहाजवळ एक मोठा स्फोट झाला आणि जादूची कांडी तलावांत जाऊन पडली. इकडे शंख टेकडीच्या टोकावरून खाली दरीत पडला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel