(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.कथेचा आशय नावे इत्यादीमध्ये साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
युवराज ऑफिसमध्ये वर्तमानपत्र वाचत होते.स्थानिक पेपरमध्ये स्थानिक बातम्यांमध्ये आलेल्या घात अपघात कोर्ट कचेऱ्या यासंबंधीच्या बातम्या ते विशेष लक्षपूर्वक वाचीत असत . ते जास्त प्रमाणात फौजदारी वकीली करीत असल्यामुळे अश्या बातम्यांनी त्यांच्या माहितीत भर पडत असे .आजच्या पेपर मधल्या एका विशेष बातमीने त्यांचे लक्ष वेधून घेतले.बातमी छोटीशीच होती.एका अपार्टमेंटमध्ये दोन भाऊ रहातात. थोरल्या भावाचे लग्न झाले आहे. थोरला भाऊ काही कामानिमित्त बाहेर गेला होता.अविवाहित भाऊ घरी होता .दुपारी अकस्मात त्याने चौथ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली .
बातमी वाचून युवराजांच्या मनांमध्ये नेहमीप्रमाणे असंख्य प्रश्न निर्माण झाले.
या भावाने खरेच आत्महत्या केली ?की त्याचा खून झाला ?
आत्महत्या केली असल्यास कारण काय असावे ? ~वेडाचा झटका?की तो मुळातच वेडसर होता ?तो वेडा होता की त्याला वेडा ठरविण्यात आले ?तो वेडय़ांच्या इस्पितळात जाऊन आला होता की नाही ?
प्रेमभंग हे तर आत्महत्येचे कारण नसेल ?~प्रेमभंग असल्यास मुलगी कोणती असावी ?विवाहित अविवाहित? गरीब श्रीमंत ?नातेवाईकांपैकी की दुसरीच कुणी?सोसायटीमधील की बाहेरील कुणी ?
कसला तरी मोठा जीवघेणा धक्का तर अात्महत्येचे कारण नसेल ?धक्का असल्यास तो कसला ?कर्जबाजारीपणा? धंद्यात अपयश ?त्याने केलेला एखादा गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता ?की आणखी काही ?
त्याला वरून कुणी तरी फेकून देऊन आत्महत्येचा भास तर केला नसेल ?~तसे असल्यास फेकून देणारे कोण ?त्याचा भाऊ ?भावाने पाठविलेले गुंड ?अपार्टमेंटमधील आणखी कोणी ?खून करण्याचे कारण कोणते असेल ?बहीण बायको प्रेयसी? या कुणाचे तरी या भावाशी संबंध असण्याच्या शंकेमुळे तर त्याचा खून झाला नसेल ?की खरेच प्रत्यक्ष संबंध असतील आणि त्यामुळे खून झाला असेल ?
एकाने त्याला उचलून फेकले की दोन तीन जण होते ?एकच असल्यास तो किती ताकदवान असला पाहिजे ?
की त्याला दारूपाजून किंवा अन्य मार्गाने नशेमध्ये ठेवून नंतर फेकून देण्यात आले?मृत व्यक्ती नशा करीत असे की त्याला जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आले?
की त्याला आपण केलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल मन खात होते आणि म्हणून त्याने उडी मारली ?
का यातील काहीच नव्हते?कठड्यावर तो वाकला आणि तोल जाऊन खाली पडला ?सहज वाकला ? की त्याला कोणी वाकण्यास उद्युक्त केले? वाकताना तो सावध होता कि नशेमध्ये होता?
कि काही कारणाने वाकल्यानंतर कुणी त्याला खाली ढकलून दिले?
*की या सर्वाहून काही निराळेच कारण होते ?*
घात आहे की अपघात ?सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसविलेला आहे काय? त्याचे फुटेज मिळू शकेल काय? त्यात ही घटना आली असेल काय ?या सर्वांचा यशस्वीपणे कसा उलगडा होईल?या घटनेचा कुणी साक्षीदार असेल का ?तसा असल्यास तो पुढे येऊन सत्य सांगण्यास तयार होईल का ?
युवराजांच्या मनात एखादी बातमी वाचल्यानंतर सहज असे असंख्य प्रश्न निर्माण होत असत.वरील प्रश्न ही एक झलक आहे .एखाद्या घटनेचा ते सर्व बाजूने विचार करीत असत. आणि त्यामुळेच ते अशी एखादी कुणाच्याही लक्षात न आलेली गोष्ट शोधून काढत आणि रहस्याचा आश्चर्यजनक धक्का देणारा उलगडा करीत असत . या त्यांच्या शोधांमध्ये त्यांचे बुद्धीचातुर्य व संदेशचे गुप्तहेर चातुर्य या दोघांचाही वाटा असे.
त्यांनी शामरावांना फोन लावला.बहुतेक वेळा शामराव त्यांना फोन करीत असत.शामरावांना युवराजांनी फोनचे कारण सांगितले.शामरावांकडे ती केस नव्हती .डिपार्टमेंटमधील दुसऱाच एक इन्स्पेक्टर ती केस पाहात होता. सुदैवाने तो इन्स्पेक्टर त्यावेळी ऑफिसमध्ये होता.शामरावांनी त्याला बोलावून युवराजांचा फोन आहे म्हणून सांगितले व त्याच्या हातामध्ये रिसीव्हर दिला. पोलिस डिपार्टमेंटमध्ये युवराजांना सगळेच ओळखत होते.त्या इन्स्पेक्टरने अदबीने बोलण्याला सुरुवात केली .त्याने सांगितलेली हकीकत पुढील प्रमाणे होती.
मृताच्या भावाला खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.निर्मल व विमलअसे दोन जुळे भाऊ आहेत.त्यांच्या नावावरून त्या बहिणी असाव्यात असेही एखाद्याला वाटेल .दोघेही एकत्रित व्यवसाय करतात .त्यांचे मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिसिंग व विक्रीचे दुकान आहे.अनेक मोबाइल कंपन्यांची त्यांच्याकडे एजन्सी आहे.दोघा भावांमध्ये प्रेम व सुसंवाद आहे असे शेजाऱ्यांच्या जबानीवरून दिसते . त्यांच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या कमल नावाच्या मुलीशी निर्मलचे लग्न झाले आहे .अजूनही दोघे भाऊ एकत्रच राहतात .विमल घरी होता. निर्मल कुठे बाहेर गेला होता.अकस्मात निर्मल घरी आला आणि त्याला नको ते पाहावयास मिळाले .रागाच्या भरात त्याने विमलला उचलून गॅलरीतून बाहेर फेकले . आत्महत्येचा बनाव केला असा त्याच्यावर आरोप आहे.खुनाच्या आरोपावरून निर्मलला अटक करण्यांत आली आहे. निर्मलला आरोप मान्य नाही .त्याने उडी टाकली. नंतर मला कमलचा फोन आला आणि म्हणून मी घरी आलो असा त्याचा जबाब आहे .निर्मलने वकील दिला आहे .इन्स्पेक्टरने त्या वकिलांचे नावही सांगितले .
ज्या वकिलाकडे निर्मलने केस दिली होती त्याला युवराजांनी फोन केला . त्यांच्या बोलण्यावरून या केसमध्ये विशेष दम नाही.निर्मल अपराधी आहे. असे बोलण्यात आले.त्यांचे बोलणे ऐकून युवराजांनी कपाळाला हात लावला. वकिलाचाच जर आपल्या अशीलावर विश्वास नसेल तर तो काय कप्पाळ केस जिंकणार ! अर्थात अशील अपराधी आहे हे माहीत असूनही, कुशल वकील खोटे साक्षी पुरावे व साक्षीदारांची उलट तपासणी,यांच्या जोरावर अपराध्याला सोडवू शकतो हा भाग वेगळा.युवराजांनी तुमच्या अशिलाला जाऊन मी भेटलो तर चालेल काय?असे विचारले .माझी काही हरकत नाही. अवश्य भेटा. या केसमध्ये विशेष काही दम नाही असे त्या वकिलांने सांगितले .
युवराजांनी निर्मलची पत्नी कमलला फोन लावला . तिला भेटण्याची परवानगी मागितली.कमलने युवराजांचे नाव ऐकले व वाचले होते .त्यांना भेटण्याची परवानगी आनंदाने दिली.आपण त्या वकिलांकडे जाण्याऐवजी युवराजांकडे का गेलो नाही असे तिच्या मनात आले . तिला युवराजाचे नाव आठवले नाही याबद्दल खंत वाटली .त्याच बरोबर युवराज तिला भेटण्यासाठी का येत असतील असे कुतुहलही निर्माण झाले.
युवराजांनी संदेशला फोन लावला .त्याला शक्य असेल तर ताबडतोब ऑफिसात येऊन भेटण्यास सांगितले .तो आल्यावर त्यांनी कमल निर्मल व विमल यांच्या संबंधी सर्व माहिती गोळा करण्यास सांगितले .संदेश व युवराज अनेक वर्षे एकमेकांबरोबर काम करीत असल्यामुळे युवराजांना सर्व माहिती म्हणजे काय काय अभिप्रेत असते ते त्याला कळत असे .शक्य तितक्या लवकर असे युवराज म्हणाले नाही तरी नेहमी ते तसेच असते हेहि त्याला माहीत होते .
त्यानंतर युवराज निर्मलची पत्नी कमलला भेटण्यासाठी गेले.तिला भेटल्यानंतर ते निर्मलला भेटण्यासाठी पोलीस कस्टडीमध्ये गेले.दोघांनाही भेटल्यानंतर युवराजांना मिळालेल्या माहितीमुळे जो दिलासा हवा होता तो मिळाला .निर्मलला गुंतविण्यात आले आहे यामागे एक मोठा कट आहे असे त्यांच्या लक्षात आले .
निर्मलला भेटून ते ऑफिसमध्ये येतात तोच कमलचा त्यांना फोन आला .तुम्ही ही केस स्वीकाराल का? असे कमलने विचारले .युवराजांनी परस्पर अशी केस स्वीकारणे हे प्रोफेशनल एथिक्सच्या व्यावसायिक नैतिकतेच्या विरुद्ध अाहे.जर आत्तांच्या वकिलांची हरकत नसेल, ते ही केस आपणहून सोडणार असतील तर मी स्वीकारण्यास तयार आहे असे सांगितले.
कमलने त्या वकिलांना फोन करून त्यांची लेखी परवानगी घेतली.
त्यांना दिलेला अॅडव्हान्स त्यानीच ठेवावा असे सांगितले .नंतर रीतसर युवराजांना वकीलपत्र दिले
युवराजांनी औपचारिकरित्या त्या वकिलाला फोन करून मी केस स्वीकारूना असे विचारले .त्या वकिलाने त्यांना आनंदाने स्वीकारा या केसमध्ये विशेष काही दम नाही असे सांगितले.
एवढ्यात संदेशचा फोन युवराजांना आला . त्याने अशी काही माहिती गोळा केली होती .की त्यामुळे निर्मल खुनाच्या आरोपातून निश्चित सुटणार होता . खरा खुनी पकडला जाणार होता.
*त्यांनी संदेशला प्रत्यक्ष भेटण्यासाठी ऑफिसमध्ये बोलावले*
(क्रमशः)
२८/४/२०१९©प्रभाकर पटवर्धन
बातमी वाचून युवराजांच्या मनांमध्ये नेहमीप्रमाणे असंख्य प्रश्न निर्माण झाले.