( ही कथा काल्पनिक आहे.या कथेतील सर्व पात्रे काल्पनिक आहेत.वास्तवाशी कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
सकाळचे साडेआठ वाजले होते .रात्रपाळी संपल्यावर प्रताप नेहमीप्रमाणे घरी आला.त्याच्या जवळ नेहमीच दरवाजांच्या चाव्या असत .तो दरवाजे उघडून घरात आला .सुहासिनी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे स्वयंपाक घरात काम करीत असेल अशी त्याची समजूत होती .त्याला तहान लागली होती .तो स्वयंपाक घरात गेला.फ्रीजमधून गार पाण्याची बाटली घेऊन पाणी प्याला. स्वयंपाक घरात पत्नी न दिसल्यामुळे ती बहुधा स्नान करीत असावी असे त्याला वाटले .पाणी प्यायल्यानंतर तो कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये आला .तेथील दृश्य पाहताच त्याच्या तोंडातून हलकीशी किंकाळी बाहेर पडली .
बेडरूममध्ये दरवाज्याजवळ त्याचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता .तो मृत आहे हे सांगण्यासाठी कुणा डॉक्टरची गरज नव्हती सुहास वेडीवाकडी उपडी बेडवर पडलेली होती.तिच्याकडे पाहताच ती मृत झालेली आहे हे त्याच्या लक्षात आले.तरीही जवळ जाऊन त्याने तिला उताणे केले .तिच्या नाकाजवळ बोट धरून व निरीक्षण करून ती मेली असल्याची त्याने खात्री करून घेतली .तिचा कुणीतरी गळा दाबल्याचे स्पष्ट दिसत होते .सुहास बेडवर विवस्त्र पडलेली होती .तिच्या अंगावरील कपडे इतस्तत: पडलेले होते. तिच्यावर त्याने एक चादर टाकली.
एकूण सर्व अवस्थेवरून तिच्यावर कुणीतरी बलात्कार केला किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असे वाटत होते.त्याने प्रथम पोलिसांना फोन केला.पोलीस त्यांच्या सर्व सरंजामासह आले. त्यांनी परिस्थितीचा ताबा घेतला.पंचनामा करून प्रेते पोस्टमार्टेमसाठी सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आली . हे सर्व चालू असताना इन्स्पेक्टर शामराव प्रतापची चौकशी करीत होते .प्रताप एका कारखान्यात मुकादम म्हणून काम करीत होता .त्याच्या कामाच्या वेळा शिफ्ट प्रमाणे बदलत असत .तो काल रात्री नऊ वाजता कामावर गेला .त्याची रात्रीची शिफ्ट बारा वाजता सुरू होत असल्यामुळे तो अकरा वाजता घरातून नेहमी निघत असे .काल कारखान्यात मिटिंग असल्यामुळे तो लवकर गेला होता. तो नेहमीप्रमाणे आज सकाळी साडे आठ वाजता घरी आला .त्याला सुरुवातीला सांगितलेले बेडरूममधील दृश्य दिसले.नंतर त्याने पोलिसाला फोन केला.
शामरावांनी शेजारील बंगल्याबद्दल चौकशी केली.बंगला व आऊट हाऊस कॅप्टन भवानराव जगदाळे यांचे होते.कॅप्टन भवानराव जगदाळे यांच्या आऊट हाऊसमध्ये प्रताप भाडेकरू म्हणून राहत होता.भवानराव निवृत्त झाल्यावर गावाबाहेर जमीन घेऊन त्यावर हा बंगला बांधला होता.त्यांनी हौशीने आऊट हाऊस बांधले होते.सुरुवातीला त्यांनी वॉचमन ठेवला होता .त्याची विशेष गरज नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी पहिला वॉचमन सोडून गेल्यावर नवीन वॉचमन ठेवला नाही .आऊट हाऊस तसेच रिकामे पडून होते .हळूहळू गाव विस्तारत बंगल्या पलीकडे त्याचा विस्तार झाला .गावात इंडस्ट्रीयल इस्टेट उभी राहिली .अनेक कारखाने सवलतीत जमीन पाणी वीज व इतर सवलती मिळाल्यामुळे आले.वस्ती वाढली जागेची टंचाई भासू लागली .आपल्याला सोबतही होईल आणि भाडेही मिळेल असा विचार करून भवानरावानी ही जागा भाड्याने प्रतापला दिली होती .बंगल्यामध्ये भवानराव ,त्यांची पत्नी, मुलगा व सून राहात असत.
सायरन वाजवीत पोलीसांची गाडी आली .पोलिसांची ये जा झाली .अॅम्बुलन्स आली .तरीही बंगल्यात सामसूम होती .प्रतापला आणखी माहिती विचारता प्रताप म्हणाला भवानराव व त्यांची पत्नी टूरवर हिमाचलला गेले आहेत.बंगल्यात त्यांचा मुलगा संपत व त्याची बायको असतात. बंगल्यात कोणतीही हालचाल दिसत नव्हती . शामरावांनी एका पोलिसाला बंगल्यात जाऊन संपतला बोलाविण्यास सांगितले .पोलीस बंगल्याला कुलूप आहे असे सांगत आला .
आऊट हाऊसमध्ये एक छोटासा हॉल बेडरूम व एक किचन एवढी जागा होती .हॉलमध्ये टीपॉयवर अर्धवट खाल्लेल्या चिवड्याची बशी व एक रिकामी कपबशी पडलेली होती .कपाच्या तळाशी चहाचे डाग दिसत होते. त्यावरून रात्री प्रताप गेल्यावर कुणीतरी ओळखीचे आलेले असावे.त्या आलेल्या इसमाने किंवा नंतर आणखी कुणी तरी खून केले असावेत असा अंदाज करता येत होता .एवढ्यात एक मोटार येऊन बंगल्यासमोर पोर्चमध्ये थांबली.त्यातून एक तगडा तरुण उतरला.मोटार बंद करून तो दरवाजा उघडण्यासाठी जाणार तेवढ्यात त्याला पोलिसांची गाडी दिसली . बंगला न उघडता तो चौकशी करण्यासाठी आऊट हाऊसकडे आला .त्याची शामरावांशी ओळख झाल्यावर त्याला तू रात्री कुठे होतास ?असा प्रश्न शामरावानी विचारला .त्याने त्याची पत्नी तिचे वडील आजारी असल्यामुळे गावात माहेरी गेलेली आहे.रात्री तिचे वडील सिरियस असल्याचा फोन आल्यामुळे तिकडे गेलो होतो असे सांगितले .फोन किती वाजता आला होता असे विचारता त्याने रात्री सव्वा अकरा वाजता असे उत्तर दिले.त्याच्या सासर्यांना हार्ट अटॅक आला होता.त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला लगेच बोलाविले .तिथे जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून सर्व काही स्थिरस्थावर झाल्यावर तो आता घरी येत होता . त्याच्या हातावर व तोंडावर बोचकारल्याच्या खुणा दिसत होत्या .त्या कसल्या म्हणून चौकशी करताना त्यांने पाळीव मांजराने ओरबडल्याचे सांगितले.रात्री त्यांचे मांजर बेडवर येऊन बसले होते.त्याला हाकलीत असताना त्याने बोचकारले असे सांगितले.
शामरावाना त्या तरुणाचा संपतचा संशय आला.त्यांनी एका पोलिसाला त्याच्या हाताचे ठसे घ्यायला सांगितले.सुहासिनीच्या प्रेताच्या नखांचा तपासणी रिपोर्ट पाहायला पाहिजे असे त्यांना वाटले .कदाचित रात्री प्रताप बाहेर कामावर गेल्यावर हा आऊट हाऊसमध्ये काही कामाच्या निमित्ताने आला असावा .प्रतापच्या पत्नीने त्याचे चहा चिवडा देऊन स्वागत केले असावे.नंतर या तरुणाकडून तो प्रकार घडला असावा.त्या वेळी सुहासिनींने ओरबाडल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर व हातावर जखमा झाल्या असाव्यात. आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून सुहास व लहान मुलगा कुणाल याची हत्या करण्यात आली असावी.असा एक तर्क शामरावांनी बांधला .काल रात्री नऊ वाजल्यानंतर तुम्ही येथे आला होता का?असे विचारता त्याने नाही म्हणून उत्तर दिले.का कोण जाणे शामरावांना त्याचा चेहरा संशयास्पद वाटला.तो काहीतरी लपवित आहे असे त्यांना भासले.त्याची आणखी चौकशी करणे आवश्यक आहे असे वाटल्यामुळे त्यांनी त्याला अटक करून पोलीस चौकीवर आणले .
कुणालचा गळा चिरला होता .खुनाचे हत्यार सुरा सापडणे आवश्यक होते . बेडरूममध्ये आणि आऊट हाऊसमध्ये कुठेही खुनाचे हत्यार सापडले नाही .संपतला घेऊन त्यांनी त्यांच्या बंगल्याची तपासणी केली .तिथेही काही खुनाचे हत्यार मिळाले नाही .बंगल्यात मांजरी होती.ते सर्वजण बंगल्यात गेले त्या वेळी ती रुबाबात गादीवर बसलेली होती.मांजराने ओरबाडल्याच्या कहाणीमध्ये कदाचित तथ्य असावे असे शामरावांना वाटले.
खुनाच्या आरोपावरून मुलाला अटक झाल्याचे कळताच भवानराव आपली टूर अर्धवट सोडून परतले.त्यांच्या मुलाने अत्याचार व खून केला असेल यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता .त्यांना त्यांचा मुलगा सालस वाटत होता .संपतला जामिनावर सोडविणे गरजेचे होते.त्याचप्रमाणे त्याला खुनाच्या आरोपातून सोडविणेही आवश्यक होते .यासाठी एक तगडा वकील देणे गरजेचे होते. फौजदारी केसमध्ये युवराजांचे नाव सर्वांनाच माहीत होते.केस युवराजांकडे सोपविली की अर्धे काम झाले असे सर्व समजत असत.भवानराव युवराजांच्या ऑफिसमध्ये पोहोचले .सुदैवाने युवराज ऑफिसमध्ये होते.त्यांची भेटही लगेच झाली.
भवानरावांनी युवराजांना सर्व केस सविस्तर सांगितली.केस घेण्याअगोदर युवराजाना त्याची सत्यता तपासणी गरजेची वाटली .जर आरोपी निर्दोष आहे असे त्यांना वाटले तरच ते केस हातात घेत असत .केस ऐकल्यावर त्यांनी शामरावांना फोन केला .त्यांच्याशी बोलणे झाल्यावर त्यांनी ती केस स्वीकारली .
शामरावांनी ही केस ओपन अँड शट आहे असे युवराजांना सांगितले.शामराव पुढे म्हणाले .
प्रताप रात्री साडेनऊपासून कारखान्यात होता याचा सबळ पुरावा आहे .कारखान्यात सीसीटीव्ही बसविलेला आहे. त्याचप्रमाणे आत जाताना व बाहेर जाताना अंगठ्याचा ठसा देऊन आगमन निर्गमन करावे लागते ,त्याशिवाय स्वयंचलित दरवाजा उघडत नाही.त्याचप्रमाणे तो मिटिंगमध्ये होता आणि नंतर कामावर होता तेव्हा त्याची अॅलिबी भक्कम आहे .पोस्टमार्टेम रिपोर्टप्रमाणे मृत्यू रात्री एकच्या सुमारास झाला असावा .प्रताप रात्री घरी आला व खून करून परत गेला असे सिद्ध करता येणार नाही .घराच्या चाव्या त्याच्याजवळ असतात.आणखी कुणाजवळही चाव्या नसतात .हे लक्षात घेऊनही त्याच्यावर खुनाचा आरोप करता येणार नाही.
आऊट हाऊसला दोन दरवाजे आहेत .सिक्युरिटी दरवाजा व एक आंतला दरवाजा त्यामुळे सुहासिनीच्या ओळखीच्या माणसाशिवाय दुसरा कुणीही आत येणे शक्य नाही.संपत अर्थातच सुहासिनीच्या ओळखीचा होता .त्यामुळे तिने तो आल्यास त्याला आत घेणे साहजिक आहे.यावेळी त्याने अतिप्रसंग केला असेल आणि त्यातून पुढील घटना घडल्या असतील असे अनुमान सहज काढता येईल .संपत मालक असल्यामुळे चाव्यांचा तिसरा जोडहि त्याच्याकडे असणे सहज शक्य आहे.कदाचित त्याचा वापर करून तो सुहासिनीला कळल्याशिवाय अकस्मात आत आला असेल. कपबशीवर व चिवड्याच्या बशीवर संपतचे ठसे सापडले नाहीत.बेडरूममध्येहि संपतचे ठसे सापडले नाहीत.त्याने हातमोजे घातले असावेत.त्याच्या खिशात हातमोजे सापडले .मोटार ड्रायव्हिंग करताना हातमोजे घालतो असा त्याचा खुलासा आहे .
त्याच्या चेहऱ्यावर व हातावर नखांचे ओरखडे आहेत.अतिप्रसंग करताना बहुधा ते उठले असावेत.त्याच्या पत्नीच्या वडिलांना हार्टअटॅक आल्याचा फोन आल्यावर तो तिथे साडेअकरा वाजता पोचला .येथे खून करून अत्याचार करून तो तिथे पोचलेला असणे सहज शक्य आहे. पोस्टमार्टेम प्रमाणे मृत्यूची असलेली एक ही वेळ थोडी आगे मागे होऊ शकते .
*त्याला असलेली संधी व इतर पुरावा पाहता तो संशयित नंबर एक ठरतो .*
*यावेळी युवराज तुम्ही ही केस नक्की हरणार असे पुढे शामराव म्हणाले .*
(क्रमशः)
१४/५/२०१९©प्रभाकर पटवर्धन