एका गांवांत एक शेतकरी राहात असे. त्याला रघू नावाचा एक मुलगा होता. बापाचे रघूवर मुळीच प्रेम नव्हते. म्हणून तो त्याच्याकडून खूप कामे करून घेई. वास्तविक पाहतां रघु फार चांगला मुलगा होता. आपल्या कामांत तो तत्परता आणि कसब दाखवीत असे. पण त्याची कदर केली जात नसे. तो जे काही काम करी त्याहून जास्त काम बाप त्याला सांगत असे. त्याच गांवांत जानकी नावाची एक मुलगी होती. ती सुद्धां रघुप्रमाणे हुशार आणि कामसू होती. त्या दोघांची ओळख झाली. त्यांनी लगा करण्याचे ठरविले.
जानकीच्या बापाने त्याला होकार दिला. रघुनें बरेच दिवस ही गोष्ट आपल्या बापाला सांगितलीच नाही. पणाला करण्याची वेळ जवळ येत चालली तेव्हा मात्र त्याने आपल्या बापाला सांगितले,
"तुलाच संभाळतां संभाळता नाकी नऊ आली आहेत आणि म्हणे बायको आणतो. पैसे मिळवायची अक्कल तर येऊ दे..! धमक नाही काडीची आणि लग्न करायला निघाला आहे. ते काही नाही. ज्या दिवशी तूं आपल्या स्वत:च्या पायावर उभा राहाशील त्या दिवशीच बायको आण." बाप गरजला.
वडिलांच्या हाताखाली मी जेवढे काबाड कष्ट करीत आहे तितके जर मी दुसरीकडे कोठे केले तर आमचे दोषांचे पोट भरण्याएवढे पैसे खात्री पूर्वक मिळविन. असे विचार रघूच्या मनांत घोळू लागले आणि एके दिवशी तो घरांतून खरोखरच नाहीसा झाला. ही गोष्ट त्याने एकट्या जानकीलाच तेवढी सांगितली होती. जाता जातां त्याला एक घर लागले. तो तसाच त्यांतून मार्ग काढीत पुढे जाऊं लागला. वाटेंत त्याला एक म्हातारी दिसली. ती डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन काठी टेकीत टेकीत चालली होती. रघू झपाझप पावलं टाकत तिच्याजवळ गेला व म्हणाला,
“आजीबाई, फार जड असावी मोळी असे वाटते. आणा मी पोहोचवून देतो तुमच्या घरी."
त्याने ती मोळी तिच्या डोक्यावरून घेतली सुद्धा. रघु म्हातारी बरोबर जाऊं लागला. म्हातारीने त्याला कोण, कुठला, कुठे चालला वगैरे प्रश्न विचारून सर्व माहिती काढून घेतली. रघूने हि काही एक न लपविता सर्व सांगितली.
रघु म्हणाला, "मी आता कामधंदा शोधून चार पैसे मिळवीन आणि मग लग्न करीन."
“अरे मग माझ्याकडेच रहा. काम कर मी तुझ्या पोटापुरती व्यवस्था करून देईन आणि वर्षा अखेरीस मला वाटेल तसें काही तरी देईन! बघ तुला कसे काय परवडतें तें."
“ठीक आहे. तुम्हांला तसं वाटत असेल तर राहतो इथेच. म्हाताऱ्याची सेवा करणे सुद्धा पुण्यच आहे." रघू म्हणाला आणि तेथे राहूं लागला.
रघु रोज गुराढोरांना दाणा-पाणी देई, दूध काढी. परसांत भाजीपाला लावून त्याला खत-पाणी देई. जंगलात जाऊन लाकडे तोडून आणी. कामें सर्व तो मोठ्या आनंदाने आणि मेहेनतीने करी.
एक वर्ष झाले. तेव्हा म्हातारी रघुला म्हणाली, "रघु, तुला येथे काम करायला लागून एक वर्ष झाले, मी सांगितलेले काम तूं मन लावून केलेंस. फार आवडले मला तुझें काम. मी तुला सांगितले होतें ना, एक वर्षभर काम केल्यावर तुला काही तरी देईन ! माझ्या जवळ एक गाढव आहे. ते घेऊन तूं जा आणि आनंदानें रहा."
रघूला वाईट वाटले. मनांत म्हणाला,
“काय करायचे आहे हे गाढव घेऊन...! कोण करणार याचे चारा पाणी..? एखाद्या परिटाला विकले तर मिळतील दोन चार रुपये. पण काय करावयाचें? तेवढयाने काय बायकोला आणता येईल?"
त्याचा उदास चेहेरा पाहून म्हातारीला हंसू आले.
“तुझ्याकडून इतकें काम करवून घेऊन साधे एक गाढव देऊन तुझी पाठवणी कशी करीन..! त्याचे दोन्हीं कान जरा जोराने ओढ पाहूं..!" म्हातारीने सांगितले
म्हातारीने सांगितल्या प्रमाणे रघुनें गाढवाला खुंटाशी बांधले आणि त्याचे दोन्ही कान धरून जोराने ओढले. गाढव 'ही आ ही आ' करून ओरडू लागले. त्या बरोबर त्याच्या तोंडांतून हिरे मोती पडले. ते पाहून रघूला आनंद झाला. त्याने म्हातारीला नमस्कार केला आणि गाढव घेऊन आपल्या घराकडे वळला. संध्याकाळ होता होता तो एका गांवांत पोहोचला. तेथे एका म्हातारीच्या घरी जाऊन तो म्हणाला
"आजीबाई, आज रात्री पुरता मुकाम करायला मला जागा द्याल का? आणि पहा, जमलं तर भाजी भाकर दिलीत तर फार चांगले होईल. उद्या पाहाटेंच मी निघून जाईन."
म्हातारीने कबूल केले. तिच्या मुलाने त्याच्या गावाला अंगणांत नारळाच्या झाडाखाली बांधून ठेविलें. रात्री जेवणखाण झाल्यावर रघू जेव्हां झोपण्याची तयारी करु लागला तेव्हा म्हातारी म्हणाली
“तूं पाहाटेंच सकाळी निघून जाणार तेव्हां जे काय द्यायचे आहे ते आत्तांच देऊन ठेव."
"बरं बघतो." म्हणून रघू आपल्या गाढवाजवळ गेला.
त्याचे दोन्ही कान ओढले, त्या बरोबर हीरे मोती पडले. ते सर्व त्याने गोळा केले, पुरचुडी बांधून आपल्या सामानात ठेविली आणि फक्त एक मोती काढून म्हातारीला नेऊन दिला. हा सर्व प्रकार म्हातारीच्या मुलाने पाहिला. रघू झोपल्यावर त्याने रघूचे गाढव दुसऱ्या झाडाला बांधले. त्याच्या जागी दुसरेंच एक गाढव आणून बांधले. नंतर रघुच्या सामानांतील हिऱ्यामोत्यांची पुरचुंडी काढून घेतली आणि झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी रघू उठला. आपले सामान घेतलें, आपलें समजून दुसरे गाढव घेतले त्यावर बसला व आपल्या गांवीं निघून गेला. घरी गेल्यावर आपल्या बापाला गाढवाचे वैशिष्ट्य वर्णन करून म्हणाला,
“ओढून तर पहा त्याचे दोन्ही कान!" बापाने कान ओढले.
गाढव रेकले, पण त्याच्या तोंडातून काही सुद्धा पडले नाही. गाढवाने लाथ मारल्यामुळे बापाला मात्र खूप लागले. तो रागावला आणि मुलाला म्हणाला
“मूर्ख कुठला. गाढव, कशाला आणलेंस तें गाढव. जा चालता हो. पुन्हा येऊ नकोस माझ्याकडे.”
रघु पुन्हां नोकरीला निघाला. आता एक जंगल लागले. त्यांत एक सुतार फळ्या तयार करून घरी घेऊन चालला होता. त्याला पाहाल्यावर रघु म्हणाला
“बाबा, तुम्ही कशाला हे ओझे उचलतां...! मी नेतों तुमच्या घरांपर्यंत...!” असे म्हणून त्याने तें ओझें आपल्या शिरावर घेऊन त्याच्याघरीं नेऊन पोहोचविलें.
आता बोलता बोलता सुताराने रघूनी सर्व माहिती मिळविली. नंतर म्हणाला
“जर माझ्याकडे एक वर्ष काम केलेस तर यथा शक्ति तुला काही तरी देईन."
रघुनें तें मान्य केले. एका वर्षानंतर सुताराने त्याला एक कांशाचे भाडे दिले. आणि म्हणाला,
“हे भांडे अक्षय पात्र आहे. बाला आज्ञा देतांच पाहिजे असलेले सर्व पदार्थ यांत वाहून येतात." ते घेऊन रघु आपल्या घरी जाण्यास निघाला.
पहिल्यावेळी ज्या म्हातारीकडे मुक्काम केला होता. त्या गांवीच त्यावेळी हि रात्र पडली. तो पुन्हां त्या म्हातारीकडेच उतरला. म्हातारीने त्याला रात्रीच्या जेवणाचे विचारले. तो म्हणाला
“नको माझ्याजवळ एक विचित्र भांडे आहे. ते मला देते सर्व काहीं.”असे सांगून त्याने आपलें आणि आपल्या पुढे ठेऊन म्हणाला
“पात्रा, मला अन्न दे." लगेच चार तऱ्हेचे पदार्थ त्यांत दिसू लागले.
त्या तिघांनी यथेच्छ भोजन केलें. रघुने ताट घासून पुसून उशाशी ठेविलें आणि झोपी गेला. म्हातारीच्या मुलाने भांड्याचा प्रताप पाहिला होता. रघूला झोप लागताच तो हळूच आला. त्याच्या सामानांतील भांडे काढून घेऊन त्या जागी दुसरे भांडे ठेविले. दुसरे दिवशी रघू पाहाटे उठला. सामान घेतले आणि आपल्या गांवी निवून गेला.
"मी पहा या वेळी एक भांडे आणले आहे. ते द्रौपदीच्या थाळी प्रमाणेच आहे. पहा तुम्ही त्याची प्रचीति." रघु बापाला म्हणाला.
बापाने ताटाजवळ बसून जेवण मागितले पण त्यातून काहीहि आले नाही. रघूला आश्चर्य वाटले. बापाला राग आला. रघू पुन्हां कामाच्या शोधार्थ निघाला. वाटेत त्याला एक कालवा लागला. तो पार करण्याच्या विचारांत तो होता. एवढ्यात त्याने पाहिले एक म्हातारा कऱ्हाडने एक झाड तोडीत होता.
"कशाला तोडतां एवढा मोठा वृक्ष..?” रघुने विचारले.
कालवा पार करण्यासाठी म्हातारा म्हणाला,
"आणा, मी करतो तुम्हांला थोडी मदत," असे म्हणून रघूने त्याच्या जवळून कुऱ्हाड घेतली आणि झाड तोडूं लागला. दहा बारा घावांत झाड कालव्यावर आडवें पडले. म्हाताऱ्याला आनंद झाला. त्याने एक काठी रघूला बक्षीस दिली.
"आला तूं मारायला सांगशील त्याला ही काठी मारत सुटेल. हिला साधी म्हणून फेंकून देऊ नकोस" त्याने सांगितले.
काठीची परीक्षा पाहण्यासाठी रघु म्हणाला, "हवेत प्रहार कर."
त्या बरोबर खरोखरच काठी त्याच्या हातांतून सुटली आणि हतप्रहार करूं लागली. मग ती काठी घेऊन रघू आपल्या गावी निघाला. त्याच्या मनात विचार आला, की त्या म्हातारीच्या घरीच नाहीं का माझ्या पहिल्या दोन्ही वस्तू हरवल्या? आता दाखवू या त्यांना चांगला इंगा. म्हणून तो पुन्हां त्या गांवीं गेला. त्याच म्हातारीकडे गेला.
"बरें आहे ना आजी बाई..! ठीक चाललें आहे ना...! सर्व काही...!"
म्हणत तो आंत शिरला.
“कोण रे तूं! मला नाहीं बाबा काही तुला पाहिल्यासारखे आठवता." म्हातारी म्हणाली.
"मला हि या मुलाला पाहिलेले आठवत नाही." म्हातारीच्या मुलाने दुजोरा दिला.
"अहो माझें गाढव आणि भांडे तुम्हीच नाहीं का चोरलेत...!" रघुने विचारले.
"आम्हांला काय करायचे आहे गाढव..! तुझें गाढव आम्ही कशासाठी घेऊं..?" म्हातारीचा मुलगा तोऱ्यात म्हणाला.
"अस्सं, मार त्याला...!!" रघूने असे म्हटल्या बरोबर काठी दणादण त्या मुलाच्या पाठीवर पडू लागली.
"मरेल कारटं, पुरे रे. नको आम्हांला तुझें सामान, घेऊन जा आपले. पण माझ्या, मुलाला मारूं नकोस." असे म्हणत म्हातारी गयावया करू लागली.
तिने त्याचे गाढव आणि भाडे आणून दिले. रघून ते हातांत घेतले व मग आपल्या काठीला परत बोलाविलें. त्या नंतर रघू आपले सर्व सामान घेऊन घरी गेला. बापाला सर्व दाखविलें. त्याचा बाप खुश झाला.
पुढे रघुने जानकीशी लग्न केले आणि सर्व सुखाने राहू लागले.