सरला पाणी घाली. तिचे हृदय आनंदाने भरुन येई. तिची आंतरिक फुलबागही फुलू लागली. तेथे आत्तापर्यंत केवळ उजाड ओसाड रान होते. तेथे सुखाचे, स्नेहाचे, केवळ भावनांचे मळे फुलू लागले. जीवनात आनंद व सुगंध आला.

घरात आता फोनोग्राफ आला होता. सरला सुंदर सुंदर प्लेटी लावी. रमाबाई झोपाळयावर बसून ऐकत.

“आई, आता कोणती लावू?’

“तुला आवडेल ती लाव.’

“मला सार्‍याच आवडतात.’

“मलाही.’

असे संवाद चालत.

कधी कधी रमाबाई व सरला दोघी फिरावयाला जात. एके दिवशी दोघी कालव्याच्या काठी बसल्या होत्या आणि एकाएकी सरलेचे डोळे भरून आले.

“काय ग झाले, सरले? रडतेसशी?’

‘मला एक आठवण आली.’

‘कशाची?’

‘येथे अशीच मी एकदा बसले होते. आईची आठवण आली होती. मला कोणी नाही असे वाटत होते. मी किती वेळ बसले त्याचे भानही नाही राहिले. उशिरा घरी गेले. बाबा रागावले. ते सारे पुन्हा आठवले.’

‘पूस डोळे. वेडी कुठली ! आता मी आहे ना तुला?’

‘तुम्ही कराल माझ्यावर प्रेम? कराल का माया? मी तुम्हाला आई म्हणते. व्हाल ना माझी आई? तुम्ही प्रेम करता म्हणून बाबाही करू लागले आहेत. ते पूर्वी मला फुलझाडांसही पाणी घालू देत नसत. म्हणत की ती झाडे सुकतील. आई, माझे हात का असे पापी आहेत? बघ ना.’

रमाबाईंनी सरलेचे हात प्रेमाने जवळ घेतले. त्यांनी आपल्या पदराने तिचे डोळे पुसले.

‘मी देईन हो तुला प्रेम. मी होईन तुझी आई. सावत्र नव्हे तर सख्खी आई. इतके दिवस तू एकटी होतीस; आता एकटी नाहीस. हसत जा. रडत नको जाऊस. समजलीस ना?’

आणि जवळ असणार्‍या मळयातल्या आम्रवृक्षावरील कोकिळा कुऊ करून ओरडली. सरला आनंदली. तीही कूऊ कूऊ करू लागली. कोकिळा चिडली; ती रागाने कूऊ करू लागली.

‘कशी चिडून ओरडते आहे?’ रमाबाई म्हणाल्या.

‘पशुपक्ष्यांनासुध्दा समजते. त्यांना रागलोभ समजतात नाही आई?’

‘चल आता जाऊ.’

‘ही कोकिळा काय म्हणते आई?’

‘मला नाही माहीत.’

‘मला आहे माहीत.’

‘सांग.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel