“उदय, नको रे असे बोलू ! आपण गरीब आहोत. तुझी आई गरीब आहे. बाळ, मला दुसर्‍याकडे काम करावे लागते. अपमान गिळावे लागतात. आपली चूक नसली तरी त्यांची क्षमा मागावी लागते.”

“तू कोट कशाला आणलास? कशाला भीक मागितलीस? मी फाटका कोट का घालीत नव्हतो?”

“अरे, त्यांच्याकडे मी काम करते म्हणून मागितला कोट. त्यात काय बिघडले? तुझ्या अंगावरचे फाटके कपडे मला बघवत नव्हते ना.

“आई, पुन्हा माझ्यासाठी कोणाकडे काही मागू नकोस.”

“नाही हो मागणार. तू शीक. मोठा हो. लौकर हे दिवस जावोत. नवीन दिवस लौकर येवोत. चल, दोन घास खा. तुझ्या आईसाठी तरी खा.”

उदय उठला. आईच्या अश्रूंसमोर त्याचा हट्ट किती वेळ टिकणार? तो जेवला आणि अंथरूणावर पडला. आई त्याला थोपटीत होती. उदयला झोप लागली. देवाची अश्रुपूर्ण प्रार्थना करून माताही झोपी गेली.

असे दिवस जात होते. अशी वर्षे जात होती आणि उदय मॅट्रिक पास झाला. तो पुण्याला पुढील शिक्षणासाठी आला. त्याला नादारी मिळाली होती. एका बाजूला एका लहानशा खोलीत तो राहात असे. तो बंगला बंद असे. भय्या रखवाली करी. एकच खोली भाडयासाठी होती. उदयने ती घेतली होती. तो हाताने स्वयंपाक करी. अभ्यास करी. त्याचे फारसे मित्र नव्हते. तो मिसळत नसे. एकटाच फिरायला जाई. तो गरीब होता. मित्रमंडळी जोडणे म्हणजे थोडे पैसेही हवेत. कधी मग सिनेमा हवा. हॉटेल हवे. चहा हवा. सिगारेट हवी, पानपट्टी हवी.  उदय कोठून आणणार पैसे? यामुळे तो एकटा असे.

सुटीत तो आईला भेटायला जाई. आई त्याची वाट पाहात असे. तो आला म्हणजे ती त्याच्यासाठी काही करी. उदय आता उंच झाला होता. त्याचे डोळे फारच तेजस्वी होते. आईला आपल्या मुलाला कोठे ठेवू, कोठे नको ठेवू असे होई.

असाच एका सुटीत उदय घरी आला होता.

“द्वारकाबाई, तुमचा उदय आला आहे ना घरी?” मालकिणीने विचारले.

“हो.”

“त्याला उद्या जेवायला बोलावले आहे म्हणून सांगा. आंबरस आहे. आणा त्याला. लहानपणीची भांडणे तो आता विसरला असेल. बंडू म्हणत होता की उदयला बोलवावे. नलीही म्हणत होती.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel