“इतके दिवस रडले. आता हसू दे. माझ्या हसण्यावर दृष्ट नको पडायला. आणि माझे हसणे तुझ्या आधीन. तू जवळ आहेस, बोलत आहेस म्हणून बुडबुड झर्‍यासारखे हसू येत आहे. चंद्राचा प्रकाश सूर्यावर अवलंबून. समुद्राचे उचंबळणे चंद्रावर अवलंबून. तसे माझे सारे तुझ्यावर अवलंबून. तू त्या दिवशी बोलेनास, नुसते हूं हूं करीत होतास. तर दोन दिवस मी रडत होत्ये. उदय, मी हसावे असे वाटत असेल तर माझ्याजवळ गोड बोलत जा. बोलशील ना? हसत जा. हसशील ना?”

“मला नाही फार हसू येत.”

“का रे?”

“कोणाला माहीत. तुला एकदम हसू येते, एकदम रडू येते, तसे माझे नाही. तुझी  क्षणात पौर्णिमा, क्षणात अमावास्या; क्षणात वसंत तर क्षणात शिशिर; खरे ना?”

“म्हणून का मी तुला आवडत नाही?”

“तसे का मी म्हटले? परंतु तुला तोल राहात नाही. एकदम काही तरी मनात आणतेस व वाहून जातेस. मी जरा बोललो नाही की तुला वाटू लागते, याचे प्रेमच नाही. अग, कधी कधी दुसरे विचार मनात असतात. मन का सारखे एकाच गोष्टीत असते? जीवनात शेकडो गुंतागुंती असतात. त्या दिवशी तू मला दगड आहेस, दुष्ट आहेस, अहंकारी आहेस, किती किती विशेषणे लावलीस. आठवते का?”

“तू का ते अद्याप विसरला नाहीस?”

“मला नाही एकदम विसरता येत.”

“तू का ते सारखे मनात ठेवणार? उदय, ते शब्द तू लक्षात ठेवणार? आणि तुझी केवळ स्मृती येताच माझे डोळे भरून येतात, ते अश्रू नाही का लक्षात ठेवणार? उदय, सारे विसर हो. माझे चांगले ते मनात आण. आपण दोघे एकमेकांची ना? मी तुझी ना? तुझ्या हृदयात मी आहे ना? उदय, तुझ्या हृदयात तुझ्या आईखालोखाल प्रेमाचे कोण आहे?”

“तू आहेस.”

“खरेच?”

“हो, हो. कितीदा सांगू? तुझा विश्वासच नाही !”

“उदय दुधाने तोंड भाजले की ताक आपण फुंकून पितो. माझा आहे हो विश्वास. रागावू नको. हस, माझ्याकडे बघ व हस.”

“मला नाही हुकमी हसू येत.”

“ते बघ येत आहे. परंतु तू मुद्दाम लपवीत आहेस.”

अशी त्या दिवशीची ती त्यांची बोलणी. कधी रुसणी, कधी रागावणी; कधी अबोले, कधी आनंद; अशा अनेक रीतीने ते प्रेम दृढावत होते. वाढत होते. दोघांच्या जीवनाला रंग देत होते, पूर्णता देत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel