“तू लौकर यावेस, इकडे कोठे राहू नयेस म्हणून असे लिहिले असेल. आई जास्त आजारी असती तर तार नसती का आली ! राहा रे दोन दिवस. नाही म्हणू नकोस. तुझ्या आईला तुझ्याशिवाय कोणी नाही. मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे? एखादे वेळेस वाटते की गेलास तर पुन्हा येशील की नाही. तू लग्न लावून परत जा. उदय, काय करायचे? राहतोस ना दोन दिवस? चल माझ्याकडे, ऊठ.”
तो उठला. दोघे सरलेकडे आली. सरलेने फराळाचे केले. दोघांनी खाल्ले. सायंकाळी दोघे फिरायला गेली. कितीतरी वेळ ती बोलत होती. उशिरा घरी परत आली. प्रेमाच्या गोष्टी बोलत झोपली. दोन दिवस झाले.
“सरले, जाऊ दे मला. आई आजारी असेल.”
“फार आजारी असली तर तार येईल. आणखी दोनच दिवस राहा. किती राहिलास तरी का पुरे होणार आहे? आणि गेलास म्हणजे लौकर परत ये हो.”
आणखी दोन दिवस तो राहिला.
आज तो आपल्या खोलीवर आला. तो सामानाची बांधाबांध करीत होता तो तार आली. “आई अत्यवस्थ, सारखी आठवण करीत आहे. ताबडतोब नीघ.” असा मजकूर होता. त्याला वाईट वाटले. अपराध्यासारखे वाटले. जाण्याची तयारी झाली. सरला परभारे स्टेशनवर निरोप द्यायला येणार होती.
“भय्या, खोली कोणाला देऊ नका. मी लौकरच परत येणार आहे. खोली मला लागेल.”
“अच्छा.”
“खाट खोलीतच असू दे. काढू नका.”
“ठीक.”
उदय सामान घेऊन स्टेशनवर आला. सरलेने तिकीट काढून ठेवले होते. दोघे प्लॅटफॉर्मवर आली. गाडी अजून रूळावर आली नव्हती.
“सरले, ही बघ तार.”
तिने तार वाचली. तिने उदयच्या तोंडाकडे पाहिले. त्याच्या डोळयांतून का पाणी येत होते?
“उदय ताबडतोब पत्र पाठव. आणि आईची प्रकृती बरी झाली की लगेच ये. आईलाच घेऊन ये. आपण नवीन संसार मांडू. आईला सुख देऊ. तिची सेवा करू. उदय, वाईट वाटून घेऊ नको. भेटेल हो आई. मी तुला चार दिवस राहवून घेतले. दिवाळीच्या सुटीतही मीच जाऊ दिले नाही. उदय, भेटेल हो आई.”
“भेटेल. मलाही वाटते की, भेटेल. आता परीक्षा पास होईन. तिघे एकत्र राहू.”
गाडी आली. सामान ठेवण्यात आले. उदय व सरला दोघे आत बसली. त्यांचे हात हातांत होते. त्यांना बोलवत नव्हते. पहिली घंटा झाली.
“सरले, उतर खाली. दु:ख नको करूस. काळजी नको करूस. विश्वास ठेव. सारे चांगले होईल.”