“करतो हो.”
“आज तार केलीस म्हणजे केव्हा पोचेल?”
“दुपारी पोचेल. तो लगेच निघाला तर उद्या पहाटे येईल.”
“उद्या गुरूवार ना?”
“गुरूवार, एकादशी.”
“वा ! छान वार आहे. उदयचे वडील एकादशीसच वारले. जा तार कर.”
मामाने भाच्यास तार केली. त्या वेळेस भाचा निघण्याच्याच तयारीत होता.
उदय गाडीत बसला. सरला परत गेली. गाडी जात होती आणि उदयचे विचारही सर्वत्र धावत होते. मध्येच त्याचे तोंड फुले, मध्येच ते खिन्न होई. आई भेटेल, ती बरी होईल, तिला मी सुखवीन असे मनात येऊन तो आनंदे. परंतु एखादे वेळी आई देवाघरी गेली तर नसेल असे मनात येऊन त्याला धक्का बसे. पत्र येताक्षणीच आपण निघाले पाहिजे होते. प्रेमसिंधू आई ! तिने माझ्यासाठी आज वीसबावीस वर्षे किती खस्ता काढल्या, किती श्रम केले ! किती तिचे उपकार ! किती तिची माया ! आणि ती आजारी आहे असे कळूनही मी ताबडतोब गेलो नाही. परीक्षा संपली होती तरी गेलो नाही. माझी परीक्षा बुडू नये म्हणून तिने आधी कळवले नसेल. काळजी वाटू नये म्हणून तार केली नसेल. परंतु आई नक्की आजारी असेल, बरीच आजारी असेल म्हणून मामा आले. आणि मी? सरलेच्या प्रेमपाशात होतो. चार दिवस आणखी राहिलो. सरले, आई जर भेटली नाही तर? आपण दोघे अपराधी ठरू. नाही का भेटणार आई, का ती मुलाला सोडून जाईल? मुलाला आता आपली काय जरूर? त्याला अधिक प्रेमाचे माणूस भेटले आहे असे तर तिच्या आत्म्यास नसेल कळले? आणि सरलेच्या प्रेमात मी रंगलो आहे असे दिसल्यामुळेच तर ती निघून नसेल ना जात? प्रेम शुध्द आहे का? आईला काय वाटेल? आमचे अद्यापि लग्न नाही. आधी आम्ही लग्न का लावले नाही? लग्न लावून मग परस्परांशी संबंध का नाही ठेवला? एकदम कायदेशीर पतिपत्नी म्हणून का नाही झालो? सरला अधीर होती. ती निराश होती. आणि एकदम लग्न लावून आम्ही कोठे राहणार? परंतु कोठे राहावयाचे ही फिकीर होती तर आणखी काही दिवस दुरूनच प्रेम नको होते का घ्यायला? आमचे का चुकले? परंतु आम्ही एकमेकांस अंतर थोडेच देणार आहोत? मी तिला काही फसवणार नाही. आम्ही एकमेकांची आहोत. देवाला माहीत आहे. आमचे खरेच लग्न लागलेले आहे. हृदयाच्या वेदनांनी व भावनांनी लावलेले लग्न. अश्रूंनी व स्मितांनी लावलेले लग्न. मी तिला फसवणार असेन तर ते करणे पाप आहे. परंतु सरलेला मी फसवणार नाही. अशा प्रेमळ व हळुवार हृदयाच्या मुलीस कोण फसवील? निराशा व दु:ख यांनी पोळून होरपळून ती निघाली होती. म्हणे “माझी ही पहिली दिवाळी.” तिच्या जीवनात लागलेला प्रेमाचा हा पहिला दीप. तो का अमंगळ आहे. पापरूप आहे?
आई, तुला मी सारे सांगेन. तू का रागावशील? स्त्रीहृदयाची तुलाही नाही का कल्पना येणार? तू आशीर्वाद देशील, का तोंड नको दाखवू असे म्हणशील? काय करशील तू? आई, तू आई आहेस. तुला रूचले नाही तरीही तू आशीर्वाद देशील. देव-धर्म रागावतील. परंतु माता रागावणार नाही.