“उदय, आई आजारी होती तरी कोठे रे होतास?”
“मी माझे लग्न लावीत होतो.”
“उदय, थट्टा काय करतोस?”
“नलू, श्रीमंतांची लग्ने जमतात व गरिबांची जमत नाहीत वाटते?”
“तुझ्या डोळयांवर केलेली कविता तुला आवडली का?”
“मी ती फाडून टाकली.”
“का?”
“माझ्या डोळयांवर कविता करण्याचा हक्क तुला नाही.”
“मग कोणाला?”
“सरलेला.”
“कोण रे ही सरला? तुझी बायको वाटते? लग्न मनात लागले की जनात?”
“मनात लागले. जनातही लागल्यासारखे आहे.”
“नलू, चल; तिकडे बाबा बोलावीत आहेत.”
नलू व बंडू निघून गेली. उदय तेथेच होता. त्याची गाडी लगेच येणार होती.
ती पाहा आलीच भुसावळकडे जाणारी गाडी. गर्दी झाली. उदय डब्यात शिरला. ती पाहा नली आली. धावत आली.
“उदय, उदय !”
“काय?”
“ही घे चिठ्ठी, आपली पुन्हा भेट होणार नाही. तुझी आई दोन दिवसांची सोबती ! मग तू कोठे जाशील? मी कोठे असेन? परंतु कोठेही असलो तरी कधीमधी एकमेकांस आठवू. तुझ्या डोळयांवर मी कविता करीत राहीन. त्याचा राग नको मानू. मी तुला न कळता दुरुन हा हक्क बजावीन. जा, सुखी हो. आई भेटो.”
शिट्टी झाली, गाडी निघाली. नली उभी होती, ती आता दिसेनाशी झाली. उदयने ती चिठ्ठी वाचली. काय होते तीत?
“उदय,
तुझ्यावर माझे प्रेम होते, मी आईबाबांस तसे सांगितले. तुला मी तसे स्पष्ट लिहिले नव्हते. एकदोन पत्रे तुला लिहिली होती. माझी श्रीमंती आड आली. तू आमच्याकडच्या स्वयंपाकीणबाईंचा मुलगा. बाबांना राग आला, आणि त्यांनी घाईघाईने हे माझे लग्न जमवले. मी मोठया जहागीरदाराच्या घरी पडणार आहे. संपत्तीत लोळेन. परंतु मन कोठे असेल? पुढील जन्मी तरी तू माझा हो. कोण रे ही सरला? तू थट्टा केलीस की खरोखरच कोणी तुला मिळाली? सुखात राहा. गाडी येईल तुझी. मला कधी मनात आठव. तुझ्या सरलेला माझे नाव नको सांगू. ही तुझी-माझी गोष्ट आता तुझ्या-माझ्याजवळच राहो.
- नली.”