ती उठली. तिने आपली ट्रंक उघडली. ट्रंकेत तो रक्तलांच्छित रूमाल होता. सरलेने तो रूमाल जवळ घेतला. त्याच्यावर तिने वेल भरला होता. दोन पाखरे होती.
“परंतु एक पाखरू कोठे आहे? कोठे गेले उडून? कोठे त्याला साद घालू? येथून केलेले कुऊ त्याला ऐकायला तरी जाईल का? उदय, कोठे रे गेलास उडून? अरे, चिमण्यासुध्दा घरटे बांधतात ना, त्या वेळेस त्या एकटया नाही बांधीत. नर व मादी दोघे मिळून घरटे बांधतात. दोघे उडतात. चोचीतून गवत आणतात, काडया आणतात, धागे आणतात. दिवसातून शंभर शंभर खेपा दोघे करतात. मी कितीदा पाहिले आहे. तो दिसला नाही, तर ती हाका मारते. ती दिसली नाही तर तो हाका मारतो. आणि दोघे भेटतात. चोचीत चोच घालतात. एकमेकांस गुदगुल्या करतात. आणि चिमणी नराला म्हणते, “खेळ पुरे. चला, घर बांधू. सामान आणू. ही मी निघाल्ये.” आणि ती उडून जाते. तोही जातो. चिव चिव करीत दोघे भुर्रकन जातात. आणि पुन्हा चोची भरून येतात. सुंदर घरटे बांधतात. कोणासाठी? पिलांसाठी. सुंदर घरटे. बाहेरून मजबूत, आत मऊ मऊ. बाहेरून जाडेभरडे सामान, आत सुंदर सामान. उदय, पाखरेसुध्दा जबाबदारी ओळखतात. आणि माणसे? आपण आपल्या बाळासाठी नको का घरटे करायला? परंतु मी एकटी कोठे करू घर? तू हवास रे बरोबर.
काल पारिजातकावर चिमण्या सारख्या चिवचिव करीत होत्या. त्यांना का माझी कीव येत होती? “आम्ही बघ सुखी. तू किती दु:खी” असे का त्या मला म्हणत होत्या?
उदय, तुझ्या रूमालावर मी पाखरे भरून दिली होती. तुझा रूमाल तुझ्याजवळ नसेल का बोलत? का तो फाटला? तू फेकून दिलास?”
तो रूमाल जवळ घेऊन सरला अशा विचारात होती. तिला किती ताप होता कोणास ठाऊक?
आणि उजाडताच रमाबाई आल्या. बाळाला घेऊन आल्या. विश्वासराव आले.
“सरले, अग सरले !” त्यांनी हाक मारली.
तिला झोप लागली होती. रात्रभर नव्हती झोप. तिला पटकन जाग आली नाही. विश्वासरावांनी जोराने हाक मारली. “सरले, ए सरले !” ते ओरडले.
“एकटी आहे की आणखी कुणी आहे?” रमाबाई म्हणाल्या.
“सरले, ए सरले !”
“आल्ये, आल्ये उदय !”
आपला उदय आला असे तिला वाटले. ती धावत आली. तिने कडी काढली.
“उदय, उदय !”
“काय म्हणतेस तू? तू का वातात आहेस? हो दूर. आमचाच उदय झाला, समजलीस?” पिता म्हणाला.