“किती सरळ मुलगी ! खरेच सरला आहे. मनात ना मत्सर ना संशय. माझ्या हातात उशी पाहून संतापली नाही. चिडली नाही. तिला सारे प्रेमसुख आठवले. भराभरा सांगू लागली. जीवनात ओतप्रोत भरलेले मधुर, सुंदर प्रेम ! सरले, तू दु:खी असलीस तरी अभागिनी नाहीस. तुझ्याजवळ असे काही आहे की, ते कोणाला फारसे मिळत नाही. असे उत्कट प्रेम कोठे दिसणार, कोठे पाहायला मिळणार? अशा प्रेमाचे दर्शन म्हणजे दिव्यता आहे. अंधारातील झलक आहे. संसाराच्या बाजारातील ही उदात्तता आहे. स्वार्थी गोंगाटातील हे मधुर, मंगल संगीत आहे. सरले, सरलाताई, झोप हो. तुझा उदय तुला मिळेल हो.”

सरलेकडे तिने पाहिले. सरलेच्या मुखावर अपार कोमलता होती. ते पाहा ओठांवर स्मित. सरला का स्वप्नात आहे? गोड स्वप्न का पाहात आहे?

“ये राजा, तुला घेते हं. लबाडा, हसू नको. आधी पोटभर पी. नको रडू. मी तुला टाकून नाही हो जाणार.” असे शब्द ती स्वप्नात बोलत आहे. आणि तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा सुटल्या. सरला जागी झाली.

“गेले बाळ ! कोणाला पाजू हा पान्हा?” ती म्हणाली.

“सरले ! सरलाताई !”

“काय?”

“काय झाले? स्वप्न का पाहिलेत?”

“माझे बाळ का केवळ स्वप्नमय ठरले? स्मृतीरूप झाले? आहे हो माझे बाळ. आणि त्याला सोडून मी जात आहे. त्याच्या पित्याला शोधायला. नलू, नलू, तुला काय  सांगू? माझ्या बाळकृष्णाला मी पंढरपूरला ठेवून आल्ये आहे. उदयला शोधायला मी निघाल्ये आहे. नलू, माझी कीव कर, करुणा कर. माझे डोके पापी नाही हो. उचलू का   डोके? का असू दे मांडीवर?”
“असू दे.”

“ही बघा दुधाची गळती ! कोठे आहे बाळ? स्वप्नात त्याला जवळ घेतले आणि दूध भरभरून आले. मुलाचा त्याग करणार्‍या कठोर व निर्दय मातेच्या स्तनांत कशाला दूध? दुधा, जा रे आटून.”

“सरले, दु:ख नको करू.”

“नलू, तू झोप आता.”

“आपण दोघी झोपू. तुझ्या उशीखाली माझी उशी ठेवते. आणि त्यावर डोकी ठेवून आपण दोघी पडू.” नलीने आपली उशी आणली. तिच्यावर सरलेची उशी तिने ठेवली. दोघी पडून राहिल्या. त्यांना झोप लागली.

चाळीसगाव स्टेशन आले होते. नलूचे वडील बायकांच्या डब्याशी आले. त्यांनी तिला हाका मारल्या. ती उठली.

“काय बाबा?”

“आता पाचोरे येईल. मग जळगाव. जाग्या राहा हा.”

गाडी सुटली. सरलाही आता उठली. दोघी मैत्रिणी हातात हात घेऊन बसल्या होत्या. आता एकमेकींकडे मध्येच पाहून मुक्यानेच त्या बोलत होत्या. दोघी पुन्हा जरा लवंडल्या. पाचोरे गेले. आणि जळगाव आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel